ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य
परंतु समाजसुधारणेचें कार्य आमच्या देशांत जें इतक्या सावकाशीनें व अल्पप्रमाणांत प्रगति करीत आहे, त्याच्या आणखी एका कारणाचा, (व माझ्यामतें सर्वांत महत्त्वाच्या अशा कारणाचा) अद्यापहि उल्लेख करावयाच आहे. आणि तें म्हणजे शुद्ध सामाजिक सुधारणेचें म्हणविलें जाणारें कार्य अद्यापहि बुद्धिपुरस्सर धर्मापासून अलिप्त ठेविलें आहे हें होय. कै. आगरकरांसारखे जुन्या परंपरेंतील समाजसुधारक या कार्याची उभारणी अद्यापहि उपयुक्ततावाद, युक्तिवाद, भूतद्या वगैरे दुस-या कोणत्याहि तत्त्वावर करण्यास तयार असतात; पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्यास तयार नाहींत. त्यांना एक तर अशा प्रकारच्या धार्मिक मनोवृत्ति नसतात किंवा असल्या तरीहि त्यांचा उपयोग करण्याची त्यांची प्रवृति नसते आणि अशा त-हेची ही धर्मविन्मुख प्रवृत्ति समाजसुधारकांमध्यें असावी ही अगदीं दुर्दैवाची गोष्ट आहे इतकें तरी निदान म्हटल्यावांचून माझ्याच्यानें राहवत नाहीं. या धार्मिक औदासिन्यामध्यें हल्लींच्या काळच्या परिस्थितीचा आपणास दुजोरा आहे अशी कदाचित् त्यांची समजूत दिसते. फ्रान्सांतील मोठ्या राज्यक्रांतींतील प्रमुख पुढारी धर्मविन्मुखवृत्तीचे होते, तसेंच रशियन राज्यक्रांतींतील पुढारीहि असेच धर्मविन्मुखवृत्तीचे होते, इतकें कीं त्यांतील कांहींजणांना तर धर्मांसंबंधीं वावडें होतें. युरोप व अमेरिका खंडांमध्यें सामाजिक सुधारणा (Socialism) म्हणून जें कार्यक्षेत्र उल्लेखिलें जातें त्याचे पुरस्कर्ते ज्या झेंड्याखालीं काम करतात त्यांत धार्मिक वृत्तीचा अंशहि नाहीं. आणि अगदीं जवळचें उदाहरण घेऊनच बोलायचें म्हटलें तर केवळ धार्मिक बाबतींतील तटस्थवृत्तीमुळेंच इंग्रज लोकांना हिंदुस्थानांत पाय रोवतां येऊन आपलें वर्चस्व राखतां आलें. त्याचप्रमाणें केवळ हिंदुस्थानांतीलच नव्हे तर सर्व सुधारलेल्या जगांतील सार्वजनिक शिक्षणपद्धति मुख्यतः धार्मिक तटस्थवृत्तीच्या पायावरच उभारलेली आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्यें वावरल्यामुळेंच आजकालच्या सर्वसाधारण समाजसुधारकांना आपल्या धोरणास व वृत्तीस दुजारा असल्यासारखें वाटतें हें खरें. पण उलटपक्षीं ज्या हिंदु धर्माची त्याच्या शुद्धतेबद्दल, सनातनत्वाबद्दल व संग्राहकत्वाबद्दल पूर्वींच्या काळीं इतकी ख्याति होती त्याच्याच आजकालच्या लाकडी सांपळ्यांत हल्लीं समाजसुधारकांचा समावेश करण्याइतकी व्यापकता व संग्राहकवृत्ति नसल्यामुळेंच त्यांची अशा प्रकारची मनोवृत्ति होण्यास मदत होत आहे. परंतु सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांच्यामध्यें साहचर्य नाहीं हें म्हणणें जसें पोकळ व अर्थशून्य आहे असें वर सांगितलें त्याचप्रमाणें समाजसुधारणा व धर्माच्या आद्य तत्त्वांचें आचरण यांजमध्यें साहचर्य नाहीं असें म्हणणेंहि तितकेंच भ्रामक आहे असें माझें ठाम मत आहे; मग आपण त्याला किती मान द्यावयाचा असेल तो द्या. वस्तुतः आमच्यासारख्या भावनामय लोकांच्या बाबतींत तर अशा त-हेच्या भ्रामकपणास मुळींच जागा नाहीं. सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी या आध्यात्मिक चळवळी असतात; आपण कोठूनहि सुरुवात करा, शेवटीं एकाच उगमापाशीं जाऊन पोहोंचतो; आणि तो उगम म्हणजे आध्यात्मिक होय. मी ब्राह्मो समाजाच्या तत्त्वावरील आपल्या अलकडील व्याख्यानांत महात्मा गांधी यांना हिंदुस्थानांतील नवयुगाचे जनक जे राजा राममोहन राय त्यांचे नवीन अवतार म्हणून संबोधीत असतों. करितां आपण राजा राममोहन राय व महात्मा गांधी यांचें चारित्र्य व कार्य यांकडे दृष्टि द्या म्हणजे माझ्या विधानांतील भावार्थ आपल्या बरोबर लक्षांत येईल. राजा राममोहन राय यांनीं धर्मापासून सुरवात करून शेवटीं व्यवहार्य धर्माचें सार जें उच्च राजकारण त्यामध्यें आपल्या कार्यक्षेत्राचा शेवट केला; उलटपक्षीं महात्मा गांधींनीं प्रथम राजकारणाच्या प्रवाहांत उडी घातली पण शेवटीं ते प्रस्तुत काळांतील जो उच्चतम धर्म त्याच्या कडेस लागलेले आहेत. ध्येयात्मक प्रयत्नांचें अशा प्रकारचें ऐक्य आहे. या ऐक्याच्या योगानें आमच्या सुधारकांची सुधारणा होऊन व त्यांच्या ध्येयास अधिक उत्कटता प्राप्त होऊ शक्य तितक्या लवकर त्यांच्या प्रयत्नांना यशाचें सुमधुर फल लाभो एवढीच माझी प्रार्थना आहे !