नामदेव तुकाराम
भागवत धर्माचा प्रसार होतां होतां त्याची अवनति किती आणि कशी झाली, हें मागें सांगितलें आहेच. अंधभक्तिभावाचा बहुजनसमाजांत प्रसार म्हणजे भामटेगिरीला मुक्तद्वारच! भक्त आणि भामटा ह्यांचें साहचर्य म्हणजे फूल आणि भुंगा ह्यांच्या साहचर्याप्रमाणेंच आहे. भागवत धर्माची जशी पारमार्थिक दृष्टि आहे तशीच मानवी दृष्टीहि आहे. भक्तांचें लक्ष ख-या देवांवरून उडतें न उडतें तोंच भामट्यांनीं त्याला घेरलेंच समजावें. ह्यामुळें जगांत सर्वत्र सर्वकाळीं भागवत धर्माला देव आणि भामटे यांचे हेलकावे खावे हे लागणारच?