नामांच्या विभक्ति
कानडींत नामाचें विभक्तिरूप व्हावयाचें तें शब्दाच्या मूळ रूपाला हा किंवा तो या अर्थीं जें सर्वनाम असेल त्याच्या विभक्तीचीं रूपें लागून सिद्ध होतें. हें विभक्तीचीं रूपें बारकाईनें तपासून त्यांचा माग काढीत गेल्यास दिसून येण्यासारखें आहे. हाच प्रकार मराठींतहि आहे. घोडियाचा, पाणियांत, माळियाला, इत्यादि जुन्या मराठींतील रूपांवरून इयाचा, इयांत, इयाला हीं ‘ई’ ह्या सर्वनामाचीं रूपें लागलेलीं स्पष्ट दिसतात. ‘ई’ हा कानडींतील ‘हा’ या अर्थीं दर्शक सर्वनामवाचक शब्द आहे. गुरु शब्दाला ह्या ‘ई’ सर्वनामाच्या विभक्तीचीं रूपें जोडून कानडींत गुरविनगे (द्वितीया), गुरविनिंद (तृतीया), गुरविन (षष्ठी) अशीं रूपें होतात. कोंकणांत पूर्वीं कानडीचा जास्त प्रचार असावा, म्हणून तिकडे घोडयेक (एकवचन), घोड्यांक (अनेकवचन) अशीं चतुर्थीचीं रूपें होतात. हा ‘क’ प्रत्यय कानडीचा आहे.
कानडींत अण्णा आवरू अथवा अण्णानवरू बंदरू म्हणजे अण्णा ते आले असा प्रयोग होतो ! ह्याच धर्तीवर बंगलूरकडचे मराठे अद्यापि ‘अण्णा आले’ असें न म्हणतां ‘अण्णा त्यांनीं आले’ असें म्हणतात. शके १५०० मधील त्र्यंबक कवीनें आपल्या ‘बालबोध’ नांवाच्या योगावरील ग्रंथांत म्हटलें आहे कीं, ‘भलेतेणें एथ नावें, प्रयागीं माधवीं विश्वरूपो तें पहावें, एतुलेनी संसारा देयावें, तिलोदक’ ह्यांत भला ह्या शब्दाला तो ह्या सर्वनामाचें तृतीयेंचें रूप लागलें आहे. आणि भल्यानें त्यांच्याऐवजीं भलेतेणें असा प्रयोग झाला आहे. मराठीमध्यें सामान्य रूपाचा जुन्या षष्ठीचा जसा संबंध आढळतो तसाच कानडींतहि आढळतो. म्हणजे मनुष्यन असें षष्ठीचें रूप होतें, त्यालाच प्रत्यय लागून मनुष्यनन्नु, मनुष्यनिंदे, मनुष्यनिगे असें द्वितीयेचें, तृतीयेचें, चतुर्थीचें रूप होत जातें. ह्यावरून हा प्रचार कानडींतून आला असण्याचा संभव आहे. कारण, त्याजला, माझ्याच्यानें, तुमच्याहून, या षष्ठीच्या प्रत्ययाला पुनः इतर विभक्ति लागण्याचा दुहेरी प्रकार मराठींत नसतो. तींत तो विकल्पेंकरून आहे, तर कानडींत षष्ठीचें रूप जणूं कांहीं एक प्रकारचें प्रातिपदिकच होऊन बसलें आहे. ‘आंत’ हें शब्दयोगी अव्यय लावून सप्तमी करण्याचा नवीन प्रकार तसेंच ‘आमच्या येथें’, ‘तुमच्या तिकडे’ असे प्रयोगहि कानडीवरून येणें पुष्कळ शक्य आहे.