निराळे भागवत पंथ
शाक्त आणि शैव पंथाचा 'वैदिक' धर्माशीं फारच अल्प आणि अप्रत्यक्ष संबंध आहे, हें पहिल्या व्याख्यानांत सांगितलेंच. शैवांतील विशेषतः लिंगायत पंथ तर वेदाला मुळींच न मानतां आगमाला मानतो. द्रावीड शैवांचा शैवसिद्धान्त स्वतंत्रच आहे. त्यांचा वेदापेक्षां आगमाशींच जास्त संबंध आहे. जैन व बौद्धहि वेदाला जुमानीत नाहींत. राहतां राहिलेले विष्णु भागवत. हे वेदापेक्षां आपल्या अंतःकरणांतील श्रद्धाभक्तीवर आणि भगवंताच्या कृपेवरच जास्त अवलंबून असतात. ह्या भक्ति आणि कृपा तत्त्वांचा विकास प्रस्थानत्रयींतील शेवटलें ठाणें जी भगवद्गीता तिच्यापासून तो आतांपर्यंत सारखा वाढत्या प्रमाणावर होत आला आहे. गीतेंत जसें बहुदेवांच्या त्रैगुण्यविशिष्ट वेदांना गौणत्व आणि अनन्य भक्तीला श्रेष्ठत्व दिलें आहे, तसेंच भागवत धर्माचा ज्याला 'कळस' अशी पदवी वारकर्यांनीं दिली, त्या आधुनिक तुकाबालाहि वेदाचें महत्त्व फारसें वाटलें नाहीं. बाकी उरले जे शंकर, वसुगुप्त, रामानुज (काश्मीरचा), मध्व, निंबार्कवल्लभ इ. शाक्त, शैव, वैष्णव आचार्य. त्यांनी मात्र आपल्या मतांचा संबंध वेदांशीं, उपनिषदांशींख् निदान ब्रह्मसूत्राशीं तरी लावला आहे, पण भागवत धर्म जसें एक मत आहे, तसाच तो एक धर्महि आहे. किंबहुना त्याच्या मतापेक्षां त्याच्या उपासनाभागाचा किंवा भक्तितत्त्वाचा परिणाम हिंदुस्थानांतील लहानथोर सर्व समाजावर अधिक सात्त्विक आणि टिकाऊ असा झाला आहे, हें निर्विवाद आहे. म्हणून ह्या धर्मांतील आचार्यांपेक्षां ह्या धर्मांतील संतांवरच विष्णु भागवतांचा अधिक भर आहे. असो. ह्या भागवत धर्माचा पाया ज्या वरील पांच भागवतांनीं घातला त्यांचा आतां क्रमशः विचार करूं या.