परिशिष्ट चौथें
आइन्स्टाइन – अलबर्ट आइन्स्टाइन : (१८७९ ते १९५५).
जर्मनीमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ. १९०५ सालीं सापेक्षतावादाच्या एका अंगावर संशोधन केल्याबद्दल पीएच्. डी. ही पदवी मिळाली. पुढें सापेक्षतावादाच्या सिद्धान्तावर व्यापक प्रमाणावर संशोधन केलें. या सिद्धान्तानें दिशा आणि काल या विषयींच्या परंपरागत कल्पनांमध्यें मूलगामी क्रांति झाली. १९२१ सालीं या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळालें. १९४१ सालीं अमेरिकेचें नागरिकत्व मिळविलें. विसाव्या शतकांतील थोर तत्त्वचिंतक व शास्त्रज्ञ.
त्रिं. ना. अत्रे : (इ. स. १८७२ ते १९३३).
अहमदनगर व पुणें येथें बी. ए., एल्एल्. बी. पर्यंत शिक्षण. पारनेर, कर्जत, जामनगर, जामखेड, सिन्नर इ. ठिकाणीं मामलेदार म्हणून नोकरी. पुढें खानदेशमध्यें सबजज्ज म्हणून काम केलें. कांहीं काळ दुष्काळविषयक अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. ‘गांवगाडा’ हें यांचें पुस्तक समाजशास्त्राच्या दृष्टीनें विशेष महत्त्वाचें आहे. मुंबई विद्यापीठानें हें पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून नेमलें होतें.
एलफिन्स्टन माउन्ट स्टुअर्ट : (१७८९-१८५९).
१७९६ सालीं ईस्ट इंडिया कंपनींत नोकरी. १८१० सालीं पुण्याचे रेसिडेन्सीवर नेमणूक. यानंतर अखेरपर्यंत पश्चिम हिंदुस्थानांतच. पेशवाईच्या अस्तानंतर मुंबई राज्याची शासनाची घडी बसविली. शासनांत, समाजव्यवस्थेंत बदल करतांना जुन्या परंपरा शक्यतों सांभाळून बदल करण्याकडे कल. The rise of the British Power in th East व History of Hindu and Mahommedan India. (1841) हीं पुस्तकें प्रसिद्ध.
महादेव शिवराम गोळे : (१८५८ ते १९०७).
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य. आगरकरांनंतर फर्ग्युसन कॉलेजचे १८९५ सालीं प्राचार्य झाले. ब्राह्मण आणि त्यांची विद्या (१८९५), हिंदुधर्म आणि सुधारणा (१८९८) हे यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सनातनी परंपरागत विचाराचें समर्थन करण्याकडे मनाचा कल.
नारायण गोविंद चापेकर : (जन्म – ५ ऑगस्ट १८६९).
जन्मस्थळ – मुंबई. शिक्षण - बी. ए., एल्एल्. बी. व्यवसाय – रिटायर्ड फर्स्ट क्लास सब जज्ज. सन १९२५ मध्यें सेवानिवृत्त.
महाराष्ट्र साहित्य परिषद्, पुणें ह्या संस्थेचे कार्याध्यक्ष (सन १९२७-३७). आठ वर्षें महाराष्ट्र साहित्य पत्रिका संपादन. औंध संस्थानांत सरन्यायाधीश (१९३१-४०).
ग्रंथ व लेख - बदलापूर, गच्चीवरील गप्पा, समाजनियंत्रण, हिमालयांत, रजःकण, चापेकर, वैदिक निबंध, पेशवाईच्या सांवलींत, तर्पण, निवडक लेख, एडमण्ड बर्कचें चरित्र, जीवनकथा (आत्मचरित्र), चित्पावन, पैसा साहित्यसमीक्षण. ह्या ग्रंथांखेरीज हिंदुधर्म, ग्रामोद्धार, ऋग्वेदांतील ऋषी इत्यादि अनेक विविध विषयांवर लेख.
‘बदलापूर (आमचा गांव) : पांचशें पानांच्या ह्या ग्रंथांत पुणें – मुंबई रेल्वे लाइनवर मुंबईपासून ४२ मैलांवरील बदलापूर नामक एका खेडेगांवची आर्थिक, सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक पाहणी आहे. २३०० वसतीच्या ह्या गांवांतील सुमारें २८ भिन्न पोटजातींचा सर्वंकष व सखोल अभ्यास प्रस्तुत ग्रंथांत आढळतो.
गो. म. जोशी : (१८९५)
संस्कृत, गणित, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, ज्योतिष या विषयांचें व्यासंगी. हिंदूंच्या परंपरागत समाजरचनेचे अभिमानी व पुरस्कर्ते. प्रसिद्ध ग्रंथ – (१) हिंदूंचें समाजरचनाशास्त्र, (२) धर्मशास्त्रविचार, (३) हिंदूंचें अर्थशास्त्र, (४) सनातन धर्माचें स्वरूप.
लोकमान्य टिळक - बाळ गंगाधर टिळक : (१८५८ ते १९२०).
भारतांतील राष्ट्रीय चळवळीचे एक प्रमुख शिल्पकार हिंदुस्थानांतील जहाल राष्ट्रवादाचे प्रवक्ते. राजकीय नेत्यांप्रमाणें तत्त्वचिंतक व संशोधक. त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ -
गीतारहस्य १९१५.
The Artic Home in the Vedas (आर्यांचें मूळ वसतीस्थान) (१९०३).
The Orion (वेदकाल निर्णय) (१८९३).
Vedic Chronology and Vedang Jyotish (वेदांचा काल, निर्णय व वेदांग ज्योतिष) (१२५).
केसरींतील निवडक निबंध ४ खंड.
न्या. तेलंग – काशिनाथ त्र्यंबक तेलंग : (१८५० ते १८९३).
मुंबई येथें हायकोर्टांत न्यायमूर्ति म्हणून महत्त्वाचें कार्य केलें. १८८५ सालीं स्थापन झालेल्या इंडियन काँग्रेसच्या संस्थापनेमध्यें वांटा. १८८५ ते १८८९ पर्यंत काँग्रेसचे सेक्रेटरी म्हणून काम केलें. शास्त्र व रूढी यांच्या “बलाबलाविषयीं विचार” व “सामाजिक विषयासंबंधीं तडजोड” हे निबंध प्रसिद्ध आहेत. प्राच्यविद्या पंडित म्हणून यांचें स्थान महत्त्वाचें आहे. इ. स. १८८९ सालीं झालेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
न्यूटन – सर इझॅक न्यूटन : (१६४२ ते १७२७).
इंग्लिश तत्त्वचिंतक व शास्त्रज्ञ. गणित आणि optics या क्षेत्रांत मोठी कामगिरी. परंतु यांचें नांव प्रसिद्ध आहे तें मुख्यतः गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्तामुळें. मोठ्या ज्ञानोपासकाप्रमाणेंच साधे जीवन व्यतीत करणारे धर्मनिष्ठ ख्रिश्चन.
बसवराज – (इ. स. सुमारें ११६०)
सुप्रसिद्ध कानडी कवि व लिंगायत धर्माचे प्रणेते. यांनीं कर्नाटकामध्यें जातिव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलें व अध्यात्मिक समतेचा पुरस्कार केला. १२ – १३ व्या शतकांत दक्षिण हिंदुस्थानांत विदर्भामध्यें महानुभाव पंथ, पश्चिम महाराष्ट्रामध्यें भागवत संप्रदाय व कर्नाटकांत लिंगायत संप्रदाय यांनीं धर्मसुधारणेच्या चळवळी केल्या. चक्रधर, ज्ञानेश्वर, व बसव हे अनुक्रमें या चळवळींचे प्रवक्ते होते. त्यांच्या स्वरूपामध्यें फरक होता; परंतु स्थूल मानानें त्यांनीं जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला.
बॅबिलोनिया – (इ. स. पू. २२०० ते ७५०)
इ. स. पू. २२०० च्या सुमारास सेमेटिक वंशापैकीं अमोराहा या टोळीनें सिरियामधून आकडियन, सुमेरियन या साम्राज्यावर स्वारी केली व तें साम्राज्य उध्वस्त केलें. आणि त्या जागीं टायग्रीस व युफ्रायटीस नद्यांच्या मधल्या प्रदेशांत आपलें साम्राज्य स्थापन केलें. हें साम्राज्य इराणी आखातापासून भूमध्यसमुद्रापर्यंत पसरलें होंतें. या साम्राज्याची राजधानी यूफ्राइटीस नदीच्या कांठी बॅबिलॅन या ठिकाणीं होता. यावरून या साम्राज्यास ‘बॅबिलोनियन साम्राज्य’ असेंच म्हणतात. या संस्कृतीमध्यें हमुराबी (इ. स. पू. २०६७ ते २०२५) हा प्रसिद्ध व पराक्रमी सम्राट होऊन गेला. त्यानें दोन नद्यांच्यामध्यें कालवे खणून शेतीस उत्तेजन दिलें. हमुराबी यानें सुमेरियांत चालत आलेल्या पूर्वापार कायदेकानू व रीतिरिवाज यांचा अभ्यास करून बॅबिलोनियामध्यें सुमेरियन संस्कृतीमधील चांगला भाग आणला. त्यामुळें बॅबिलोनियाची संस्कृति प्रगत झाली. बॅबिलोनियाचा प्राचीन काळीं इजिप्त, क्रीट, इराण, हिंदुस्थान या देशाशीं व्यापार होता.
जगदीशचंद्र बोस : (१८५८ ते १९३७).
जागतिक कीर्तीचे भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ. वनस्पतींना जीव असतो, इतर प्राण्यांप्रमाणें ते व्यवहार करतात, हें यांनीं प्रथम जगासमोर शास्त्रीय पद्धतीनें मांडले. इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष (१९२७).
कुमारिल भट्ट : ( ६५० ते ७५० ).
हे मीमांसेतील भट्ट विचारशाखेचे संस्थापक होते. दुसरी मीमांसा वा विचारशाखा प्रभाकरांनीं सुरूं केली. भट्टांची कामगिरी प्रामुख्यानें तत्त्वज्ञानाच्या ज्ञानमीमांसा शाखेंत आहे. त्यांच्या मतें आपणाला जें ज्ञान होतें त्याची सत्यता ही ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेंतच अंतर्भूत असते म्हणजे ज्ञानाची सत्यता स्वतःसिद्ध असते. ती सिद्ध करण्यास बाह्यप्रमाणाची आवश्यकता नाहीं. यास स्वतः प्रामाण्यवाद म्हणतात. प्रभाकर हे ज्ञानाची पांच प्रमाणें मानतात. ती म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान व अर्थपत्ती. कुमारिल भट्ट हें पांचाशिवाय आणखी एक प्रमाण मानतात. ते म्हणजे अनुपलब्धी होय.
त्यांची महत्त्वाची कामगिरी ख्यातीच्या विवरणांत आहे. ज्ञानांत चूक कां होतें या विषयीं अनेक मतें प्रचलित आहेत. यापैकीं भट्टाच्या मतास विपरित ख्यातिवाद म्हणतात. या मताप्रमाणें दोरीऐवजीं आपणांस साप दिसतो. याचें कारण आपला पूर्वानुभव व सध्यांचें प्रत्यक्ष ज्ञान यांत गल्लत करून त्यांत चुकीचा संबंध प्रस्थापित करतो. दोरी व साप दोन्ही अस्तित्वांत असल्यानें त्यांचा संबंध चुकीचा आहे. म्हणून ही चूक पूर्वानुभव व सध्यांचा अनुभव यांच्या विपरित संबंधामुळें होते.
राजारामशास्त्री भागवत : ( १८५१ ते १९०८ )
जुन्या पठडीतील शास्त्री पंडिताजवळ ५-६ वर्षें संस्कृतचें अध्ययन केलें. सेंट झेविअर कॉलेजमध्यें १८७७ ते १९०८ पर्यंत संस्कृतचें अध्ययन केलें. कोल्हापूर येथील वेदोक्त कीं पुराणोक्त या प्रकरणामध्यें सुधारणावादी भूमिका घेऊन वेदाचा अधिकार सर्वांना आहे असें सांगितलें. महाराष्ट्रांतील भाषाशास्त्राचें व्यासंगी, मराठ्यांचेसंबंधीं चार उद्गार, ब्राह्मण व ब्राह्मण धर्म, विधवाविवाह शास्त्र कीं अशास्त्र हीं पुस्तकें प्रसिद्ध आहेत.
प्रा. गो. चि. भाटे : ( १८७० ते १९४६ )
सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचें पहिलें प्राचार्य. प्रसिद्ध समाजसुधारक व लेखक. हिंदु चालीरीती, तीन तत्त्ववेत्ते, कलाविषयक तत्त्वज्ञान, कान्ट व शंकराचार्य, मराठी वाङ्मयाचा इतिहास हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
सर डॉ. भांडारकर - रामकृष्ण गोपाळ भांडारकर : (१८३७ ते१९२५ )
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक. मुंबई सरकारच्या हस्तलिखित खात्याचे संपादक म्हणून महत्त्वाची कामगिरी केली. जैन विहारांत जाऊन जैन वाङ्मयाचा अभ्यास केल्यामुळेंच नवीन संशोधन शाखा सुरूं झाली. प्राचीन वैष्णव पंथ, चालुक्य घराणें, काश्मीरांतील शैव संप्रदाय व रामानुजांचे तत्त्वज्ञान या संबंधींचें संशोधन महत्त्वाचें. मुंबईच्या विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चरची पहिली व्याख्यानमाला गुंफण्याचा मान यांना देण्यांत आला. प्रसिद्ध पुस्तकें :- Outlines of Vaishnavism, Shivaism and Minor Religions.
भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ :
१८ आक्टोबर १९०६ रोजीं मुंबई येथें या मंडळाची स्थापना झाली. मुंबई प्रार्थना समाजाचे उपाध्यक्ष श्री. दामोधरदास गोवर्धनदास सुखडवाला यांनीं प्रारंभीं या संस्थेस देणगी दिली. मंडळाच्या वतीनें अस्पृश्य समाजासाठीं शाळा सुरूं झाल्या. या संस्थेचे जनरल सेक्रेटरी म्हणून श्री. कर्मवीर वि. रा. शिंदे यांनीं १९०६ ते १९२३ पर्यंत काम केलें. या काळांत संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळालें व कामाचा पसाराहि वाढला. बंगालमधील बॅकवर्ड क्लासेस मिशन या संस्थेचें उगमस्थान महाराष्ट्रांतील ही संस्था होय. संस्थेचें कार्य अद्याप चालूं आहे.
महायान :
इ. स. पू. तिस-या शतकाच्या सुमारास हा धर्मपंथ पुढें आला. बहुसंख्य समाजामध्यें भक्तिमार्गाचा प्रसार करण्याच्या कामीं या पंथानें महत्त्वाचें कार्य केलें. या पंथाचा मूर्तिपूजेवर विश्वास आहे. या धर्मपंथांतील आचारविचार बहुसंख्य समाजाला पेलेल, झेपेल असे आहेत. त्यामुळेंहि या पंथाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. केवळ आत्मनिर्वाणावर भर देणें इष्ट नव्हे, समाजाच्या मुक्तीवरहि भर दिला पाहिजे असें या पंथियांस वाटतें. त्यामुळें बहुजनसमाजाच्या दृष्टीनें त्यांनीं जुन्या कडक आचारविचारांत कांहींसा फरक केला. हिंदुस्थानच्या उत्तरेकडे हा धर्मपंथ मोठ्या प्रमाणावर पसरला. अशोकापासून कनिष्कापर्यंत या धर्मपंथाला राजाश्रय मिळाला होता.
मॅक्समुल्लर – फ्रेडरिक मॅक्सिमिलन मॅक्समुल्लर : (१८२३ ते १९०० )
जर्मनीमधील प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक व तुलनात्मक भाषाशास्त्राचे व्यासंगी. तुलनात्मक धर्मशास्त्राच्या अभ्यासाकडून ऋग्वेदांकडे वळले. हिंदुस्थानांतील संस्कृतीला आर्यांच्या आगमनानंतरच सुरवात झाली असें विचार प्रतिपादन केलें. प्रसिद्ध पुस्तकें :- (१) Science of Language, (२) An Introduction to Science of Religion, (३) History of ancient Sanskrit literature (१८५९).
राजा राममोहन राय : (१७७२ ते १८३३ )
१८३० सालीं कलकत्ता येथें स्थापन झालेल्या ब्राह्मोसमाजाचें संस्थापक. ईस्ट इंडिया कंपनींत नोकरी. पुढें १८१४ सालीं नोकरींतून निवृत्त. जगांतील सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करून एकेश्वर वादाच्या निष्कर्षाला आले. सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते. सतीची चाल बंद करण्यास ब्रिटिश सरकारला महत्त्वाचें सहाय्य केलें. १८३० सालीं इंग्लंडला गेले. १८३३ सालीं तिकडेच वारले.
डॉ. रामन चंद्रशेखर व्यंकट : (१८८८)
विज्ञानाच्या क्षेत्रांत महत्त्वाचें संशोधन. १९३० सालीं त्यांना या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषक मिळालें. १९३४ सालीं बंगलोर येथें ‘इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्स’ ही संस्था स्थापन केली. इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष.
चि. वि. वैद्य : (१८६१ ते १९३८)
सुप्रसिद्ध इतिहास संशोधक ग्वाल्हेर. संस्थानांत हायकोर्टामध्यें मुख्य न्यायाधीश म्हणून १८९६ ते १९०५ या काळांत काम केलें. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अनेक वर्षें अध्यक्ष. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९०८) पुणें. मध्ययुगीन भारत (भाग १ ते ३), महाभारताचा उपसंहार, श्रीराम चरित्र, Shivaji the Founder of Maratha Swaraj हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
शाहू महाराज : (१८७४ ते १९२२)
महाराष्ट्रांतील एक मोठे समाज सुधारक. अस्पृश्यता निवारणासाठीं मोठा प्रयत्न. खेड्यांपाड्यांतून शिक्षण प्रसार व्हावा म्हणून १९१२ सालीं कोल्हापूर संस्थांनांत प्राथमिक शिक्षण सक्तीचें केलें. १९०१ पासूनच सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठीं कोल्हापुरांत वसतीगृहें चालूं केलीं. अस्पृश्यासाठींसुद्धां मिस क्लार्क अस्पृश्य बोर्डींग सुरूं केलें. वेदोक्त प्रकरणांमुळें यांचें लक्ष समाजसुधारणेकडे विशेष लागलें. वेदाचा अधिकार सर्व व्यक्तींना आहे, त्यांत जातीभेद येऊं नयेत असें त्यांना वाटत होतें.
शंकराचार्य : (७४८ ते ८२०)
अद्वैतवादाचे पुरस्कर्ते. सर्व विश्वांतील अंतीम सत्ता व सत्य ब्रह्म आहे. जग हें ब्रह्माच्या तुलनेनें मिथ्या व आभासात्मक आहे. जीवाचें मूळ स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे. त्यांच्यांत अद्वैत आहे. हें अद्वैतवादाचें तत्त्वज्ञान समजण्यासाठीं मायावादाची भूमिका समजावून घेणें आवश्यक आहे. ज्या शक्तीमुळें जग मिथ्या असूनहि सत्य भासते त्या शक्तीस माया असें म्हटलेलें आहे. या मायाशक्तीचें कार्य दोन प्रकारचें आहे. (१) मिक्षेप - आहे त्यापेक्षां निराळें भासविणें. (२) आवरण - सत्य झाकून ठेवणें.
ब्रह्म हें सतचित् आनंदमय आहे. या ब्रह्मज्ञानानें मोक्षप्राप्ती होतें.
सयाजीराव महाराज : (१८६३ ते १९३८)
१८७५ सालीं सयाजीराव नांवानें बडोद्याच्या गादीवर दत्तक घेण्यांत आलें. १८८१ सालीं महाराजांना राज्याधिकार देण्यांत आले. १८८३ सालीं बडोदें संस्थानांत अस्पृश्यता निवारणाची चळवळ सुरूं केली. १८९३ सालीं बडोदें संस्थानच्या एका भागांत सक्तीचें प्राथमिक शिक्षण सुरूं केलें व १९०६ सालीं सर्व संस्थानभर ही योजना लागूं केली. अस्पृश्यता निवारण सक्तीचें, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण या क्षेत्रांत बडोदें संस्थान हें महाराष्ट्रांत पुष्कळच आघाडीवर होतें. १९१८ सालीं भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळाच्या वतीनें मुंबईस अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद भरली होती. तिचें अध्यक्षस्थान महाराजांनीं भूषविलें होतें. १९०४ सालीं मुंबई येथें भरलेल्या सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान मंडीत केलें होतें. सामाजिक सुधारणेचें व उदारमतवादी विचारांचे एक प्रवक्ते म्हणून त्यांचें स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
स्पेन्सर : (१८२० ते १९०३)
१९ व्या शतकांच्या उत्तरार्धांतील सुप्रसिद्ध समाजशास्त्रांत उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्तामध्यें महत्त्वाची भर. व्यक्ति आणि समाज यांच्यामध्यें सेंद्रिय संबंध कसे आहेत हें दाखविण्याचा प्रयत्न. यांच्या या विचाराचा राजकीय विचारावर इष्ट व अनिष्ट दोन्ही परिणाम झाले. Proper Functions of the State हा ग्रंथ प्रसिद्ध. महाराष्ट्रांतील सुधारणावाद्यांवर या विचाराचा परिणाम.
डॉ. सुरेंद्रनाथ सेन (१८९० ते १९६२)
मराठ्यांचा इतिहास हा आवडता विषय. फॉरेन बायग्रॉफीज ऑफ शिवाजी (परकीय शिव चरित्रें) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. १९३९ ते १९४९ या काळांत दिल्ली येथें किपर ऑफ रेकॉर्डस्. या नंतर दिल्ली विद्यापीठांत रेक्टर व कुलगुरु. १८५७ हा ग्रंथ मृत्युपूर्वीं कांहीं वर्षें प्रकाशित झाला. इतिहासांतील संशोधनासाठीं ऑक्सफर्ड विद्यापीठानें १९५८ सालीं डी. लिट्. ही पदवी दिली. १९४४ सालीं भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष.
हीनयान :
गौतम बुद्धाच्या मृत्युनंतर बौद्ध धर्मांत दोन प्रमुख विचारप्रवाह निर्माण झालें. हे दोन प्रवाह म्हणजे हीनयान व महायान होत. हीनयान पंथाला मूर्तिपूजा मान्य नाहीं. त्याचप्रमाणें या पंथाचा मुख्य भर आत्मनिर्वाणावर आहे. समाजांतील सर्व व्यक्तीच्या निर्वाणापेक्षां या पंथाचा भर आत्मनिर्वाणावर आहे. या धर्मपंथांतील आचार अधिक कडक आहेत. त्यामुळें समाजांतील बहुसंख्य वर्गांत या पंथाचा प्रसार होऊं शकला नाहीं. स्थूलमानानें हिंदुस्थानच्या दक्षिणेकडे या पंथाचा प्रसार झाला आहे.