पुण्यांतील जाहीर सभा
(५) सुमारें महिन्यापूर्वी मुंबई विश्वविद्यालयांत कानडीचें अध्ययन अधिक शास्त्रीय रीतीनें व्हावें अशा अर्थाचा एक लेख मद्रास व कलकत्ता युनिव्हर्सिटींतील भाषाध्ययनाचे दाखले देऊन मीं प्रसिद्ध केला होता. आतां पुणें विश्वविद्यालयाची चळवळ जोंरात आली आहे. परवां शिवाजीमंदिरांत ह्या नवीन विद्यालयासंबंधीं विद्वानांची जी जाहीर सभा झाली, तिच्यांतील वक्तेच नव्हेत तर श्रोते देखील एकूण एक मराठीचेच अभिमानी असतील असें वाटतें. मी स्वतः जरी मराठाच असलो तरी कानडीचे जे मराठीवरचे उपकार झाले आहेत ते महाराष्ट्रानें विसरावेत असें मला कधींहि वाटणार नाहीं. म्हणून श्री. नरसोपंत केळकरांनीं जो वरील सभेंत मूळ ठराव आणिला त्याच पायावर थोंडाबहुत शक्य असल्यास फेरफार करून पुणें विश्वविद्यालयाची उभारणी व्हावी असें मला वाटतें. त्याचीं कारणें अशीं :
(६) पुणें येथील विद्यापीठांत सांगली, कोल्हापूर आणि धारवाड येथील कॉलेजें सामील करून घ्यावींत, आणि कर्नाटकांतल्या त्या कॉलेजांना भाषेचें माध्यम मराठी अथवा कानडी विकल्पानें ठेवण्याचा अधिकार द्यावा. त्या कॉलेजांना हा अधिकार मुंबईच्या डोईजड विद्यापीठांत मिळण्याचा संभव नाहीं. कारण मुंबईचें पीठ हें विद्यापीठ नसून सिंधी, गुजराथी, मराठी व कानडी या भाषांची – वधूपक्षी करवल्यांचा - इंग्रजी भाषारूपी वरमाईकडून अपमान करण्यासाठीं बांधलेला एक लग्नमंडप आहे, किंवा युरोपियन, पार्शी आणि गुजराथी श्रीमंतांचा शिळोप्याचे वेळीं जमण्याचा एक क्लब आहे; किंवा फार तर अलीकडे नवीन नवीन निघणा-या राजकीय पक्षांचें एक लुटुपुटीचें रणांगण आहे ! तें कांहींहि असो, अर्वाचीन चालू भाषांची खरी उपपत्ति शिकविण्याचें तें स्थान नव्हे एवढें खरें. जरी पुढें कधीं काळीं या अनागुंदी दरबारांत गुजराथीची आणि मराठीची दाद लागली तरी दुबळ्या आणि दडपलेल्या कानडीची दाद तेथें लागण्याची आशा नाहीं. अशा आशेला पुणें विद्यालयांत जागा मिळण्याचा निदान संभव तरी आहे.