मराठ्यांची पूर्वपीठिका
रट्टवंशोत्पत्तीविषयीं शास्त्रीय विचार
हा प्रयत्न निर्णायक मुळींच नाहीं. केवळ दिग्दर्शक आहे, असल्या प्राचीन विषयाचा निर्णय लावूं पाहणें केव्हां केव्हां हास्यास्पद होतें. हें जाणून ह्याची जवळ जवळ दिशा जरी दाखवितां आली, तरी मी स्वतःस कृतार्थ समजेन. शिवाय माझा दुसरा एक हेतु आहे. तो तरुण विद्यार्थ्यांना अनुलक्षून आहे. ह्याच विषयाचा विचार मागें एकदा मी भारतीय इतिहास संशोधक मंडळापुढें केला होता. त्या वेळीं माझा हेतु आर्य आणि अनार्य ह्या शब्दांचा प्रचार आणि तज्जन्य कांहीं दृढमूल झालेल्या तीव्र भावना विद्वान् म्हणविणा-यांमध्येंहि असलेल्या पाहून, त्या कशा अनैतिहासिक आहेत हें दाखविण्याचा होता. कॉलेजांत उच्च शिक्षण घेणा-या तरुणांना अशा भरमसाट भावनांचा वेळींच इषारा मिळून, त्यांना विशाल विचारांची संवय लागेल, ह्या आशेनें मी त्यांचेपुढें हा विषय ठेवीत आहें.
आजचा विषय, मराठे हे क्षत्रिय आहेत कीं नाहींत, किंवा ते अतिशूद्राहून वाईट आहेत कीं ब्राह्मणाहून चांगले आहेत वगैरे, असल्या भावनांचें विवेचन करण्याचा नाहीं. ते मूळ दक्षिणेंतील, किंबहुना हिंदुस्थानांतील आहेत काय ? नसल्यास बाहेरील कोणत्या मुख्य मानववंशांतील ते असावेत, हें पाहण्याचा आहे. मानववंशशास्त्र हा विषय अद्यापी बाल्यावस्थेंत आहे. पाश्चात्य विद्धानांत तौलनिक भाषाशास्त्राचा उदय झाला. नित्य नवीन शोधामुळें ह्या दोन्ही शास्त्रांची घडी अद्यापि नीट बसलेली नाहीं. नदीच्या मुळाहून माणसांचें कूळ शोधणें अत्यंत कठीण आहे. तरी तें सशाचें शिंग शोधण्याप्रमाणें अशक्य आणि मूर्खपणाचें नाहीं. निदान त्यांत कांहीं घोर पाप तरी खास नाहीं. मात्र शोधकानें निर्भीड असलें पाहिजे. शक व द्राविड म्हणजे कोणी तरी नीच आणि हीन जात, आणि आर्य व मोंगल म्हणजे कोणी तरी निर्भेळ उच्च जात अशा भावना ज्यांच्या मनाच्या तळाशीं तळ देऊन बसलेल्या असतात अशांना इतिहासशास्त्रांत गतीच नाहीं. शक द्राविडांप्रमाणें आर्य म्हणून कधींकाळीं एखादा विशिष्ट मानववंश होता कीं नव्हता ह्याबद्दल आज विद्वानांत मोठा वाद माजून राहिला आहे. ‘ज्ञानकोश’कारांच्या परिश्रमामुळें तर नास्तिपक्षांत मोठीच भर पडली आहे. आर्य म्हणून एखादा वंस अगर वंशसंघ असला तरी भरतवर्षांत प्राचीनकाळीं त्याची जी निर्भेळ श्रेष्ठता गाजत होती, ती त्यांची केवळ स्वयंमन्य क्लृप्ति होती हें खरें.
आजच्या विषयाला तीन प्रकारच्या पुराव्यांची मदत घेण्यांत आली आहे : [१] लिखाणाचा आणि लिखित इतिहासाचा, [२] नांवांचा व भाषाशास्त्राचा, [३] चालीरीति आणि समाजशास्त्राचा. पैकीं पहिला फारच दुर्लभ, त्रोटक आणि अपुरा आहे. अप्रत्यक्ष रीतीनें ज्याचा संबंध लावतां येईल असा मला जो कांहीं पुरावा मिळाला, त्याचा उल्लेख मीं शेवटीं केला आहे. प्रथम आपण दुसरा म्हणजे नांवाचाच घेऊं. कारण हा जितका विपुल मिळतो, तितकेच त्याचे धागेदोरेहि पुरातनकाळांत मागें फार दूरवर जाऊन पोंचतात, ही मोठी विशेष गोष्ट आहे. दोनचार पुरातन शब्दांचा ह्या लोकांच्या ‘मराठे’ ह्या जातीय ऊर्फ राष्ट्रीय नांवांत इतका बेमालूम लय झाला आहे कीं, त्यामुळें ह्या लोकसमूहाला एक एक वैशिष्ट्य प्राप्त झालें आहे. त्यामुळें हा समूह विशिष्ट संघटना पावलेला एक स्वतंत्र मानववंश असावा असें समजण्यास कारणें दिसत आहेत. हें म्हणणें हिंदुस्थानांतील सन १९०१-१० सालांच्या सेन्सस रिपोर्टांतून वेंचून घेतलेल्या खालील आंकड्यांवरून ध्यानांत येईल.
रट्टवंश | रजवंश |
राठी, पंजाब ९७७९८ | राजपूत ९४३००८५ |
मराठे ५०८७४३६ | राबत १५५०७५ |
कुणबी ४५१२७३७ | रावुतिया १७५९७ |
............ | राव १२८९५ |
९६००१७३ | रावळ (राजपुताना) ४८१५ |
रट्टी | रावकिया (बडोदे) ७८१८९ |
मुंबई ५०५१५ | राजू (मद्रास) १०३१२३ |
मद्रास २५७६४४८ | राचेंवार (म्हैसूर) ५९८३ |
एकूण १२३२४५३४ | एकूण ९८०७७७२ |
ज्यांच्या जातीय नांवामध्यें रट्ट आणि राज ह्या दोन शब्दांचे पर्याय समाविष्ट झाले आहेत, अशा दोन लोकसमूहांचा वर पृथक् पण समांतर निर्देश केला आहे. ह्यावरून वंशदृष्ट्या हे दोन्ही भिन्न आहेत असें दर्शविण्याचा माझा उद्देश नाहीं किंवा तसें माझें मतहि नाहीं. उलट हे दोन्ही संघ आज हिंदुस्थानांत अलग राहात असूनहि एकमेकांशीं नांवानें कसे संबद्ध आहेत हें खालील आंकड्यांवरून दिसून येतें.
राठोड (मारवाड, बिकानेर, किशनगर.) १,२२,१६०
चव्हाण (बुंदी, कोटा, शिरोही.) ८६,४६०
यदु (करोळी, जसलमीर.) ७४,६६०
परमार (उज्जनी.......) ४३,४३५
सोळांकी १८,९४४
ह्या आंकड्यांत राठोडच नव्हे तर परमार (पवार), सोळांकी (साळुंखे, चाळके, शेळके), यदु (यादव, जाधव), चव्हाण हीं अस्सल मराठ्यांचीं नावें प्रामुख्यानें आहेत व आणखीहि पुष्कळ मराठ्यांचीं नांवें उत्तरेकडील अस्सल राजपुतांत सहज सांपडण्यासारखीं आहेत; पण नांवांपलीकडे ह्या उत्तरेकडील राजपुतांत व दख्खनमधल्या मराठ्यांत आतां शरीरसंबंध फारच थोडा उरला आहे, किंबहुना नाहींच म्हणण्यासारखा आहे. तसाच पंजाबांतील राठ्ठी, महाराष्ट्रांतील मराठे व दक्षिणेंतील रड्डी यांच्यांतहि पण संबंध राहिलेला नाहीं. तरी तेवढ्यावरून ह्यांच्यांत मूळचा जातीय संबंध नव्हता, असें मुळींच म्हणतां येणार नाहीं. मानववंशशास्त्राच्या दृष्टीनें पाहतां वरील रट्टवंश आणि राजवंश ह्यांच्यांतच नव्हे तर राठी, मराठे, रड्डी ह्यांच्यांतहि चालीरीतींची परंपरा, धर्म, पेहराव, प्रकृतिस्वभाव, राज्यपद्धति, भरतखंडाबाहेरील संबंध, भरतखंडांतील फैलाव, भरीरसंबंध, शारीरिक साम्य, ऐतिहासिक कामगिरी व धंद्यांची परंपरा अशा अनेक दृष्टींनीं ऐक्य दिसत आहे. त्यांतल्या त्यांत रट्टे व राजपूत हे वंशानें एक आहेत हें सिद्ध करणें जितकें सोपें आहे, त्याहून ते भिन्न आहेत हें सिद्ध करणें फारच अधिक कठीण आहे.
पन्नास लाख मराठ्यांमध्यें पंचेचाळींस लाख कुणब्यांची भर पडली आहे; तशी राजपुतांत नाहीं. ही शंकाहि राजपुतांहून मराठ्यांना भिन्न समजण्याला फारशी उपयोगी पडत नाहीं. कारण एक तर मराठा कोण व कुणबी कोण हें नक्की वेगळें करणें अगदीं दुरापास्त झालें आहे.
पुणें-साता-याकडे मराठ्यांपेक्षां कुणबी किंचित् कमी समजले जातात, तर व-हाड - नागपुराकडे कुणबी मराठ्यांहून आपणास जास्त समजतात. शिवाय हा कमीजास्तपणा केवळ दर्जाचा आहे. जातीचा अगर वंशाचा आहेच असें सहसा सांगतां येत नाहीं. जमिनीचा मालक म्हणजे मराठा आणि वाहक म्हणजे कुणबी असा अर्थ महाराष्ट्रापुरताच आहे. व-हाडकडे तसा मुळींच नसून, कुणबी म्हणजे तेथील वतनदार रहिवासी आणि मराठा म्हणजे उप-या असें समजण्यांत येतें. शरीरसंबंधांत हा भेद दोन्ही देशांत पाळण्यांत येत नाहीं, त्याअर्थीं हा भेद सेन्सस रिपोर्टांत आतां उगाच दाखविण्यांत येत आहे, अशीहि तक्रार आहे, व ती ब-याच अंशीं खरी आहे. कुणबी म्हणून जो वर्ग आहे तो मुळांत एतद्देशीय द्रावीड असावा व तो कालवशानें मराठ्यांत आतां एकजीव झाला असावा, हें म्हणणें अगदीं संभवनीय आहे. पण ह्याचा विचार आपण चालीरीतीचा पुरावा पाहतांना पुढें अधिक करूं. राजपुतांत अशी भेसळ उत्तरेकडे जाठ, काठ, भाट ह्या भिन्न जातींशीं झाली आहे व ह्या जाती आतां पुष्कळ ठिकाणीं राजपुतांत बेमालूम वावरतात; ह्याचाहि विचार पुढेंच करणें बरें. नांवाच्या पुराव्यांत येथें मराठे व राजपुत वंशानें एकच आहेत असें धरून चालण्याशिवाय गत्यंतर नाहीं.
“राठी”, “मराठे” (महारट्टे) आणि “रड्डी” ह्यांतील रट्ट हा शब्द आणि ‘राजपूत’ ह्यांतील राज हा शब्द ह्या दोहोंत राज् हा धातु आहे असें आपण तूर्त धरून चालूं. वैदिक ऊर्फ छांदस् (मूळ संस्कृत) भाषेंत राज् धातूचा मूळ अर्थ अंमल करणें असा आहे. प्रकाशणें असा अर्थ ही भाषा अभिजात होऊन संस्कृत हें नांव पावली त्या काळचा असावा असा तर्क प्रि. राजवाडे ह्यांचा आहे. अति प्राचीन छांदस् वाङ्मयांत हा अर्थ फारसा आढळत नाहीं. महो अज्मस्य राजति = (सूर्य) मोठ्या रस्त्यावर राज्य करितो. – ऋग् ४, ५३, ४; गायत्रं च त्रैष्टुभं च अनुराजति = गायत्री व त्रैष्टुभ् ह्या दोन्ही वृत्तांवर (पक्षांची) सत्ता आहे. – ऋग् २, ४३, १; य एको वस्वो वरूणो राजात – ऋग् १, ४३, ४ इ. ठिकाणीं अंमल करणें हाच अर्थ लागतो; प्रकाशणें लागत नाहीं. ह्यावरून रट्टे आणि राजपूत ह्या दोघांचा प्रभुत्व आणि राजकारण ह्यांशीं पुरातन संबंध आहे.
रट्ट शब्दाचा राजपुतांहूनहि अधिक संबध दुस-या एका राजकारणी शब्दांशीं आहे तो असा. तो शब्द पाली वाङ्मयांत फार आढळतो. तो राष्ट्र ऊर्फ जात, वंश, टोळी ह्या अर्थानेंच आढळतो, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे. रट्ट म्हणजे राज्य ह्या अर्थानें पालींत प्रचार आहे. शिवाय राज्य हा अर्थ रज्य अशा रूपानेंहि पालींत वरचेवर प्रचारला जातो. सिविरट्ट = शिबींचें राष्ट्र; सोवीररट्ट = सौविरांचें राष्ट्र; कोसलरट्ट= कौसलांचें राज्य; मगधरट्ट, मल्लरट्ट, असे प्रचार असंख्य आढळतात.
“अतीते मल्लरट्टे कुशावती राजधानीयां ओक्काकोनाम राजा धम्मेन रज्जं करेसि | सोलसानं इति सह्स्सानं जेठिका सीलवतीनाम अग्ग महेसी आहोसि | सा न एव नवीतरं पूतं लभेत्तीति | नागराच रट्ट वासिनोच राजं निवेसनदारे सन्निपातेत्वा ‘रट्टं’ नस्सिसति विनस्सितीति उपक्कोसिंसु” अर्थ-मल्ल राष्ट्रांत इक्ष्वाकु नांवाचा राजा होता. त्याच्या सोळा हजार बायकांपैकीं पट्टराणीला किंवा इतरांना पुत्र होईना, म्हणून त्याचे नागरिक व इतर राष्ट्रवासी वेशीजवळ त्याजकडे येऊन ‘राष्ट्र अथवा राज्य नाश पावेल, विनाश होईल’ असें ओरडूं लागले. ह्या उता-यांत रज्ज आणि रट्ट हे दोन्ही शब्द राज्य आणि राष्ट्र ह्या दोन्ही अर्थीं प्रचारलेले आढळतात, हें विशेष आहे.
रट्ट शब्दाचा राज्य आणि राष्ट्र ह्या शब्दांप्रमाणेंच आणखी एका ज्या छांदस् शब्दाशीं निकट संबंध आहे तो रथ हा होय. भाजें, वेडसा आणि कार्लें येथील प्राचीन गुंफांतील शिलालेखांतून 'महारथी' व 'महारथिनी', मराठा व मराठीण ह्या जाती व वंशदर्शक अर्थानें देणगी देणा-या पुरुष आणि स्त्रियांना उद्देशून योजलेले शब्द आढळतात. महारथी म्हणजे रथांतून युद्ध करणारा मोठा योद्धा; असा एखादा पदवीधर असा अर्थ होईल. पण महारथिनी म्हणजे युद्ध करणारी अशी पदवी धारण करणारी बाई असा नसून अशा योद्ध्याच्या जातींतील एक बाई असाच अर्थ करणें योग्य आहे, असें जें डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकरांनीं आग्रहपूर्वक म्हटलें आहे तेंच ग्राह्य दिसतें. म्हणजे ख्रिस्ती शकाच्या दुस-या शतकांतल्या ह्या शिलालेखांच्या काळांत, ज्याचें महारथी असें विशेषनाम बनलें होतें असा एक खानदानी वंश दक्षिणेकडे होता आणि ह्या वंशाचा शरीरसंबंध महाभोज नांवाच्या दुस-या एका खानदानी वंशाशीं होता हें शिलालेखांवरून सिद्ध होतें. (Early History of the Dekkan, Bhadarkar पान १०) डॉ. भांडारकरांनीं ह्याच पानाखालील टिपणांत स्पष्ट म्हटलें आहे कीं, रट्ट हें एका (Tribe) जातीचें विशेषनाम होतें आणि हल्लींचें ‘मराठा’ हें जातिवाचक नांव तेंच आहे. ह्या अधिकृत पंडितांनीं भाषाशास्त्राच्या दृष्टीनें थोडा अधिक विचार येथेंच केला असता तर कितीतरी काम झालें असतें. परंतु मराठे हे क्षत्रिय आहेत इतकेंच नव्हे तर आर्य आहेत एवढ्या परंपरागत कल्पनेवरच हे गुरुवर्यहि त्या काळीं तृप्त होते म्हणून त्यांनीं ह्या वंशशास्त्रावर कधीं फारसा अट्टाहास केला नाहीं.
असो. रट्ट ह्या वंशनांवाचे धागेदोरे शोधीत आम्ही बरेच मागें गेलों आहों. ह्याचा भाषाशास्त्रीय संबंध एका बाजूस रथशब्दाशीं व दुस-या बाजूस राज व तज्जन्य राष्ट्र शब्दाशीं दृढ आहे. रथ शब्द वेदांतच नव्हे तर अवेस्ता ह्या पारश्यांच्या प्राचीन ग्रंथांतहि प्रमुखपणें आढळतो. रथेष्ट्रा = क्षत्रियवर्ग असा अर्थ अवेस्तांत आहे. तसाच वेदांत इंद्रालाहि रथेष्ट = क्षत्रिय म्हटलें आहे. हिंदी आर्यांची वर्णव्यवस्था माणसालाच नव्हे तर वरतीं देवादिकांना व खालतीं पशूना व निर्जीवांनाहि लागू होती हें श्रौत, स्मार्त व पौराणिक वाङ्मयावरून भरपूर आढळतें.
जुजोषदिंद्रो दस्मवर्चा नासत्येवं सुगम्यो रथेष्टा:
अतिशय शक्तिमान् नासत्याप्रमाणें सहजगम्य रथामध्यें बसणारा (क्षत्रिय) असा जो इंद्र तो आमचा हवी सेवन करो. ह्या ऋचा प्रि. राजवाड्यांनीं दिल्या. त्यांचें मत असें आहे कीं, वेदांच्या प्राचीनतम ऋचांतून रथ हा शब्द रथी ह्या विशेषणार्थीं योजला आहे. रथो हिष: = तो इंद्र रथी (राजा) आहे. ह्या रथ शब्दाची व्युत्पत्ति रह् = गति पावणें, रम् = रमणें, थांबणें, विराम पावणें वगैरे आहे. पण रथ शब्दाचा राज धातूशीं संबंद कोठेंहि लावण्यांत आलेला नाहीं. अर्थात् अंमल करणें ह्या अर्थानें मानवी समाजाची उत्क्रान्ति होण्यापूर्वींच रथाचा म्हणजे चक्रमय वाहनाचा शोध लागला नसल्यास रथाची व्युत्पत्ति राज् धातूंत शोधणें अशक्य नाहीं. तें कसेंहि असलें तरी रथ ह्या विशेषणार्थी शब्दाचा द्राविडी अपभ्रंश ऊर्फ विकास रट्ट असा होणें द्रावीड भाषांच्या नियमाला धरून आहे. तामीळ भाषेंत मुळांत ह हा महाप्राण नाहीं. जेथें थ तेथें ट्ट जेथें ध तेथें ड्ड अगर द्द असा अपभ्रंश म्हणा अगर विकास म्हणा तो होणें साहजिक आहे. ह्यावरून रथ शब्द जरी स्वत: वैदिक भाषेंतला असला तरी तो रट्ट ह्या स्वरूपांत द्राविडांनीं आपल्या प्रचारांत घेतला असणें असंभवनीय मुळींच नाहीं हें दिसतें.
येथवरील भाषेच्या संशोधनावरून पुढील अत्यंत मनोरंजक समस्या (Problem) आपल्यापुढें स्पष्ट होत आहे. रट्ट हा वंशवाचक हल्लींचा शब्द मूळ रथ धातूपासून किंवा राजन् ह्याची प्रथमा राट्पासून अथवा राष्ट्र ह्याच अपभ्रंश रट्टपासून आला असावा, किंवा रट्ट हा मूळ शब्दच अतिप्राचीन एखाद्या द्रावीड ऊर्फ दुराणी (तुराणी) भाषेंतील असावा. पुढील द्वित्त अक्षराचा कर्कशपणा काढून कोमलपणा आणतांना मागील उपांत्य –हस्व स्वर दीर्घ होतो, हा भाषाविकासाचा नियम भाषापंडितांना माहित आहेच. ह्या न्यायानें: [१] रट्ट ह्या मूळ तुराणी धातूचा विकास राट् ह्या रूपानें इराणी (आर्य) भाषेंत झाला: [२] किंवा उलट दिशेनें राष्ट्र ह्या आर्य शब्दाचा अपभ्रंश पालींतील रट्ट शब्दांत झाला; [३] किंवा पुन्हा मूळ रट्ट ह्याच तुराणी शब्दाचें राष्ट्र असें अभिजात संस्कृतांत संस्कृतीकरण झालें. ह्याचा निर्णय लावण्यास तूर्त तरी कांहींच साधन दिसत नाहीं. इतकें मात्र शंका घेण्याला स्थान दिसत आहे कीं, राज् हा शब्द छांदस् भाषेंत जितका पुरातन आहे तितका त्यापासून साधलेला राष्ट्र हा शब्द पुरातन नसावा. तेव्हां रट्ट हा शब्द ‘राष्ट्र’चा अपभ्रंश असावा, किंवा ‘रथ’चा अपभ्रंश असावा किंवा हे सर्वच शब्द मूळ रट्ट ह्याच परकीय धातूपासून असावेत, हा मोठा प्रश्न येथें असाच सोडणें बरें. ‘रट्ट’ ह्याच स्वरूपांत हा शब्द जुन्या छांदस् भाषेंत नाहीं व तामीळ भाषेंत तरी आहे कीं नाहीं हें माहीत नाहीं. त्या अर्थीं हा वाद येथेंच सोडणें भाग पडत आहे. मात्र राट्टि = बाहु, हात असा शब्द शुद्ध कानडींत आहे; पण त्याचा संदर्भ येथें रट्ट अथवा राट्टी ह्या जातिवाचक शब्दांशीं लागत नाहीं.
वादाच्या ह्या अनिश्चित स्वरूपांत एवढीहि गोष्ट सिद्ध होऊं शकेना कीं, रट्टवंश उत्तरेकडून दक्षिणेकडे आला किंवा दक्षिणेंतून उत्तरेकडे गेला? राठी नांवाची जवळ जवळ एक लाख लोकसंख्या पंजाबांत आहे. ती दक्षिणेकडून उत्तरेकडे गेली असण्यापेक्षां दक्षिणेंतील तामीळ मुलुखापर्यंत पसरलेली सव्वीस लाखांवरील रड्डी लोकसंख्या सर्व उत्तरेकडून दक्षिणेंत उतरली असणें अधिक संभवनीय आहे काय? असें मानण्यास निदान भाषाशास्त्राचा पुरावा काय आहे? चालीरीतीविषयक समाजशास्त्राचे जे पुरावे आहेत ते पुढें पाहतां येतील; पण ‘रट्ट’ शब्द द्राविडी भाषेंतला असण्याची जी शंका येते तिच्यापेक्षां भाषाशास्त्राचा अधिक पुरावा कांहीं मिळतो कीं काय तें आतां पाहूं.
येथवर मजल आल्यावर आणखी एक मोठी विक्षिप्त शब्दघटना आढळते; ती राठोड ही. हें काय प्रकरण आहे ! राष्ट्रकूट ह्या संस्कृत सामासिक शब्दाचा राठोड हा अपभ्रंश आहे असें सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होतो, तो साहजिक आहे. पण त्यानें कोणाचें समाधान होईल त्याचें होवो. मला तर राष्ट्रकूट हें ‘राठोड’ चें संस्कृतीकरण असावें. राठोड हा ‘राष्ट्रकूटा’ चा अपभ्रंश नसावा असें वाटतें. राष्ट्रकूट असा शब्दप्रयोग शिलालेखांत आढळतो असें कर्नाटक राजवटीचा संशोधक जे. एफ. फ्लीट म्हणतो. पण ते सर्व लेख दक्षिणेंतले आणि राठोडवंशानें दक्षिणेंत दिग्विजय करून प्रसिद्ध झाल्यानंतरचे आहेत. ह्या राठोडवंशांतील कित्येक राजांचीं नांवें आर्य भाषेशीं न जमण्याइतकीं कर्कश आणि कानाला द्राविडीप्रमाणें बेंगरूळ लागणारीं आहेत. इतकेंच नव्हे तर ह्या राजांनीं संस्कृत नांवें घेण्याची हौस दाखविली आहे; त्यावरून राठोड हेंच मूळ नांव आणि राष्ट्रकूट हें संस्कृतीकरण हा तर्क बळावतो. बड्डिग (अमोघवर्ष ३ रा), खोड्डिक कक्कल (अमोघवर्ष ४ था) शके ८९४, हीं राष्ट्रकूटांचीं नांवें; पुलकेशी, अय्यन व नुर्मडी हीं चालुक्यांचीं नांवें, धाडियप्पा, भिल्लम, राजगी, वेसुगी, जैतुगी, वाडुगी, परम्मा, मल्लुगी, बल्लाळ, सिंघण हीं यादवांचीं नांवें काय दाखवितात? ह्या नांवांची गोष्ट बाजूस ठेवून, प्रत्यक्ष राठोड ही शब्दघटनाच भाषेचा काय पुरावा सांगते हें पाहूं. राठोड = राठ+कूड (ऊड) असा समास आहे. दोन भिन्न भाषेंतील शब्दांचा समास होता नाहीं असा व्याकरणाचा एक नियम आहे. राठ हा शब्द इराणी (आर्य) असो अथवा तुराणी (द्राविडी) असो, कूड हा शब्द तर खास तामीळ आहे. कूड = जमविणें असा तामीळ धातु आहे. कूट असा संस्कृत अपभ्रंश होऊन हाच शब्द आतां संस्कृत कोशांतून उजळमाथ्यानें वावरूं लागला आहे; तरी राठोड ही शब्दघटना संस्कृतापेक्षां द्रावीड असण्याचा अधिक संभव आहे. राठोड म्हणजे राठी लोकांचा एखादा प्राचीन संघ असावा असा तर्क होतो, पण हें जर एका संघाचें नांव होतें तर त्यांत राठींच्या अथवा मराठ्यांच्या कोणकोणत्या कुळांचा समावेश होतो याचा इतिहासांत कोठेंच पुरावा कां मिळत नाहीं? उलट जे. एफ. फ्लीटनें राष्ट्रकूट शब्दाची एक नवीन व्युत्पत्ति दर्शविली आहे, ती मात्र मोठी चिंतनीय दिसत आहे. तो म्हणतो : “डॉ. बर्नेल राष्ट्रकूटांची व्युत्पत्ति द्रावीड समजतो, आणि ‘राष्ट्रकूट’ हा शब्द म्हणजे द्रावीड रट्ट ह्या नांवाचें राष्ट्र ह्या संस्कृतीकरणावरून झाला असावा असा तर्क करतो. राष्ट्रकूटवंश हा उत्तरेकडील आर्यवंश आहे किंवा दक्षिणेकडील द्रावीड राजवंश आर्यांत समाविष्ट केलेला आहे, हें ज्या डॉ. भूलरनें राष्ट्रकूटांच्या वंशावळीची प्रथम चिकित्सा केली त्याला ठरवितां आलें नाहीं. तरी अगदीं अगोदरच शिलालेखांवरून हा वंश उत्तरेकडून खालीं आला असावा असें दिसतें. त्याचें मूळ कसेंहि असो राष्ट्रकूट हा शब्द इतर घराण्यांच्या शिलालेखांतून राष्ट्रपति म्हणजे एका देशाचा पाटील अगर प्रांताचा देशमुख ह्या अर्थानें पुष्कळदा योजण्यांत आला आहे. ह्यावरून मला असें दिसतें कीं, स्वतंत्र राजपदाला अथवा सम्राट्पदाला पोंचण्यापूर्वीं ह्या घराण्यांतील लोक दुस-या कोणत्यातरी राजवटींत लहानसान देशमुख्या करीत असावेत.” (Dynasties of the Kanarese Distict – पान ३२.) ह्यावरून कूड अगर कूट हा शब्द संघ ह्या अर्थीं नसून (सारा) वसूल करणारा पाटील किंवा रिकूट भरती करणारा देखमुख अशा अर्थीं होता असें दिसतें. कांहीं असो. हा शब्दप्रयोग द्रावीड आहे हें सिद्ध होतें.
एकेकाळीं – तो अतिप्राचीन काळ असावा, द्रावीड राष्ट्र व भाषा सर्व हिदुंस्थानभर आसेतुहिमाचल पसरली होती; इतकेंच नव्हे तर आर्यांप्रमाणेंच द्रावीडहि वायव्येकडूनच आले असावे, असें आधुनिक विद्वानांचें मत होऊं लागलें आहे. द्राविडी भाषा सर्व हिदुंस्थानभर होती व तिची एक शाखा ब्राहुई ही अद्यापि बलुचिस्तानांत आहे, ह्यावरूनहि द्राविडांची पूर्वपीठिका बाहेरची आहे, असेंच दिसतें. मग राष्ट्रकूट आणि मराठ्यांचीं इतरहि घराणीं उत्तरेकडून दक्षिणेकडील देशांत आलीं काय किंवा आर्यांच्याहि पूर्वीं दक्षिणेंतच असलीं काय तीं आर्यच असतील असा कांहींच भरंवसा लागत नाहीं हेंच उगड होतें.
नांवांच्या पुराव्याचा हा भाग संपविण्यापूर्वीं आणखी दोन प्रसिद्ध नांवांचा विचार संक्षेपानें का होईना, पण करणें येथें अवश्य आहे. दक्षिणदेशांत मराठ्यांना ‘आरे’ आणि ‘बर्गे’ अशीं दोन जातिवाचक नांवें आहेत. पहिलें कानडी प्रांतांत आणि दुसरें तेलगू प्रांतांत आणि बंगाल्यांत प्रचारांत आहे. ‘आरे’ म्हणजे आर्य हा अर्थ उघड आहे. पण ‘बर्गे’ ह्याची व्युत्पत्ति विद्वानांनीं दोन प्रकारें केलेली आढळते. एन्थोव्हेननें “Tribes & Castes of Western-India” ह्या आपल्या संशोधनात्मक पुस्तकांत बर्गे म्हणजे वडूगर किंवा बर्गी अशी दोन प्रकारें व्युत्पत्ति लावण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वडूक’ म्हणजे उत्तरेकडचा असा तामील शब्द आहे; आणि ‘बर्गी’ म्हणजे घोडेस्वार असा फारशी शब्द आहे. वडुक हा मूळ तामीळ शब्द संस्कृत भाषेंत उदीचि अशा रूपानें गेला किंवा उदीचि हा मूळ वैदिक शब्ध वडूक ह्या अपभ्रंशानें तामीळमध्यें गेला हें ठरविणें कठीण आहे. उदीचि ह्याचें मूळ उत् म्हणजे वर आणि अंच म्हणजे जाणें अशा वैदिक धातूशीं भिडविणें अशक्य नाहीं. प्राची (पूर्वदिशा) ह्या शब्दाची व्युत्पत्ति अशीच लागूं शकते. कांहीं असो, वडुक म्हणजे उत्तरेकडचा हा तामीळ अर्थ बरोबर आहे व बर्गी हा फारशी शब्दहि उत्तर दिशा दाखवितो. ह्या दोन्ही व्युत्पत्तींवरून मराठ्यांचा मूळ वंश जरी निर्णित होत नाहीं तरी त्यांची मूळ दिशा ध्वनित होते. आरे म्हणजे आर्य हा अर्थ स्पष्टच आहे. कर्नाटकी भाषेंत आरे नांव मराठ्यांनाच लागतें. ब्राह्मणांना लागत नाहीं. ब्राह्मणांना कानडींत ‘हारु’ हें नांव आहे. त्यावरून प्रथम मराठ्यांनीं कर्नाटकांत वसती केली व त्यांनीं जसे इतर बारा बलुते आपल्या ग्रामसंघटनेंत वसाहत करण्यासाठीं आणिले तसें ब्राह्मणांनाहि बरोबर आणिलें. म्हणून मुख्य राज्यकर्ते, जमिनीचे मालक व वसाहतीचे चालक ह्यांनाच ‘आर्य’ ऊर्फ ‘आरे’ हें नांव पडून, त्यांच्या इतर आर्य आश्रितांना तें नांव पडलें नसल्यास कांहीं नवल नाहीं. पण येवढ्यावरूनच मराठ्यांचा वंश आर्य असावा, शक ऊर्फ सिथियन पार्थ, अगर दुसरा कोणता नसावा, असें निर्विवाद सिद्ध होत नाहीं. ज्यांनीं त्यांनी आर्य हें नांव दिलें, त्यांना आर्य आणि शक अथवा इतर उत्तरेकडील खानदानी जाती ह्यांत भेद दिसला नसावा, किंवा नुसता श्रेष्ठ ह्या विशेषणार्थी त्यांनीं प्रथम आर्य हा शब्द योजून पुढें त्याच्या प्रचाराचा विस्तार सर्वच मराठा समूहाच्या जातिवाचक अर्थामध्यें झाला असावा.
ह्यानंतर वंशावळी आणि कुळी ह्यांच्या तपासाकडे वळणें योग्य आहे. मराठा समाजांत ह्या दोन्ही गोष्टींचें जीतकें प्रस्थ आहे तितकें महाराष्ट्रांतील दुस-या कोणत्याहि जातींत आतां उरलें नाहीं व पूर्वीं कधींहि नव्हतें. मुख्य वंश तीनच; सूर्य, चंद्र आणि नाग. यदु आणि अग्नि असे दुसरे दोन वंश मानण्यांत येतात; पण ते निराळे नाहींत. यदूंचा चंद्रवंशांत समावेश होतो. अग्निवंश केवळ काल्पनिक आहे असें संशोधक चिं. वि. वैद्य ह्यांनीं चांगलें दाखविलें आहे. बाकी उरले तीन वंश; तेहि केवळ काल्पनिकच आहेत; खरोखरीच कोणी सूर्यावरून खालीं उतरले किंवा शेषापासून उत्पन्न झाले असें नव्हे. सूर्य, चंद्र आणि नाग हीं ह्यांचीं मूळ उपास्य देवकें असलीं पाहिजेत. एरवीं त्यांच्यांत ऐतिहासिक असा कांहींच अर्थ नाहीं. सर्व मनुष्यजाती प्राथमिक युगांत कोणत्या ना कोणत्या तरी भूतपदार्थांची पूजा करीत असलेल्या आढळतात. मग त्या आर्य, शक, मोगल, द्रावीड, सेमेटिक अगर इतर कोणत्याहि वंशांच्या असोत. Totemism म्हणजे देवकपूजा ही मनुष्यमात्राच्या पांचवीला अगदीं पुजलेलीच आहे. आर्य म्हणून कोणी ऐतिहासिक अथवा केवळ काल्पनिक वंश असो वा नसो, ‘आर्य’ ह्या नांवाखालीं जे लोक हल्लीं अथवा पूर्वीं मोडत होते, त्यांच्यांत सूर्य चंद्र हीं देवकें प्रसिद्ध होतीं. मात्र हीं देवकें फार प्रतिष्ठित असल्यामुळें क्षत्रिय अथवा राजवंशाशींच ह्यांचा संबंध प्राचीन पुराणांतून दाखविण्यांत येत होता, तसा ब्राह्मणांशींहि दाखविण्यांत येत नव्हता; पण आर्यांशिवाय आर्येतरांचाहि संबंध ह्या देवकांशीं आहे, हें मानववंशशास्त्रज्ञांना सांगावयास नकोच. जपानी लोक मोगल असून आपल्यास सूर्यवंशी समजतात, तसेंच तुर्की ऊर्फ तुराणी आणि ईजिप्त ऊर्फ मिश्र देशांतील लोकहि स्वत:स सूर्यवंशी समजत होते. अद्यापि इराणच्या राष्ट्रीय निशाणावर सूर्याचें चिन्ह आहे, चांद नाहीं. उलटपक्षीं आरबी लोक चंद्रचिन्हांकित आहेत, म्हणून ते चंद्रवंशी आर्य असें म्हणणें शोभणार नाहीं. एफ्. ई. पार्जिटर-कलकत्ता हायकोर्टचे माजी जज्ज एक प्रसिद्ध संशोधक होते. त्यांनीं ‘Ancient Indian Historical Tradition’ ह्या आपल्या बहुमोल ग्रंथांत भारतवर्षीय अतिप्राचीन पुराणांचें अवगाहन करून शेवटीं असा सिद्धान्त रचिला आहे कीं, प्राचीन भारतांतील सूर्यवंशी क्षत्रिय आणि त्यांचे आश्रित अस्सल ब्राह्मणहि वंशानें द्रावीड होते; आणि ऐल किंवा चंद्रवंशी जे क्षत्रिय मागाहून भारतांत आले तेच तेवढे वंशानें आर्य होते. ऐल हें विशेषण इला = इरा ह्या शब्दापासून साधित झाल्यानें इराण अथवा आर्यान् अशी व्युत्पत्ति भाषाशास्त्रानेंहि सिद्ध होते; पार्जिटरांनीं आपला सिद्धान्त भाषांच्या पुराव्यांवर रचलेला नसून पौराणिक वाङ्मयांतील वंशावळी आणि इतर विधानें ह्यांच्यावर रचलेला आहे म्हणून त्यांचे सिद्धान्त अधिकच विचारार्ह आहेत.
सूर्य आणि चंद्रवंशींसंबंधीं विचार झाला; पण नागवंशाचा आर्यांशीं कांहींच संबंध नाहीं. नाग हा एक क्षात्रवंश ‘आर्य’ म्हणविणारे लोक भारतवर्षांत येण्यापूर्वींच चहूंकडे पसरला होता. पूर्वेस मणिपूर आसामाकडे, पश्चिमेस सिंधमध्यें व दक्षिणेकडे कोकणपट्टी आणि खालीं कन्याकुमारीपर्यंत मलबारांत नागपूजा आणि नागलोकांचे इतर सामाजिक अवशेष आढळतात. हा नागवंश मराठ्यांत मोठ्या मान्यतेला चढलेला पूर्वींपासून म्हणजे शककर्त्या शालिवाहनापासून तरी अलीकडे आढळत आहे. इत्यादि विवेचनावरून सूर्य, चंद्र आणि नाग त्या तीन वंशांच्या मिषानें द्रावीड, आर्य आणि नाग त्या तीन जातींच्या लोकांचा समावेश हल्लींच्या मराठा समजांत झाला असणें मुळींच असंभवनीय दिसत नाहीं.
वंशावळीनंतर मराठ्यांतील ‘शाण्णव कुळीं’ चा थोडक्यांत विचार करूं. बाकीचे पुरावे कसेहि असोत, मराठ्यांच्या शेंकडों कुळ्या आज पुरातन काळापासून चालत आल्या आहेत, त्यावरून मराठा हा एक राष्ट्रवजा वंश अगर वंशसंघ आहे, असा एक जादा पुरावा वंशशास्त्रज्ञांपुढें आहे. राजपुतांत पूर्वीं त्या कुळ्या ३६ होत्या, नंतर ५४ झाल्या, त्या आतां मराठ्यांत ९६ आणि वस्तुत: त्याहूनहि जास्त आढळतात. ह्यावरून मराठा हा उत्तरोत्तर वाढत जाणारा वंशसमूह किंबहुना अमेरिकेंतील वसाहतीप्रमाणें दर शतकाला वाढत जाणा-या राष्ट्राचें हें एक मायपोट असावें असें दिसतें; परंतु दुर्दैवानें ह्या ‘शाण्णव’ कुळींच्या ज्या निरनिराळ्या प्रती हल्लीं उपलब्ध आहेत, त्यांत परस्पर मेळ कांहींच दिसत नाहीं. पाटणकरकृत एक ‘शाण्णवकुळी’ संशोधक एन्थोव्हीनला मीळाल्याचें तो सांगतो. श्री. नरोत्तमानंद सरस्वतीची एक प्रत. मुंबईच्या जगदीश्वर प्रेसमध्यें V. V. Pathak ह्यांनीं छापलेली दुसरी, आणि राजापूरचे राव साळुंके ह्यांनीं आपल्या ‘क्षत्रिय मराठ्यांचा इतिहास’ ह्या पुस्तकाला जोडून प्रसिद्ध केलेली ‘प्राचीन अस्सल वंशावली’ तिसरी, इतक्या माझ्या पाहण्यांत आहेत. पण ह्यांपैकीं एकीचीं विधानें दुसरीशीं न जुळल्यामुळें संशोधकाची मोठी निराशा होते. ह्यामुळेंच कंटाळून एन्थोव्हीनसारख्या परकीय संशोधकाला ह्या सा-याच वंशावळ्या बनावट असाव्यात आणि मराठे मोठ्या पदावर चढल्यावर आपल्या पूर्वपीठिकेचा गौरव करण्याच्या हेतूनें त्यांनीं हें कांहींतरी भारूड रचिलें असावें असें त्यानें म्हटलें आहे ! पण संशोधकानें एकाएकीं असें वर्दळीला येऊन चालत नाहीं. कुळीची मूळ गादी, बीजमंत्र, देवक, घोड्याचा व आबदागिरीचा रंग, गोत्र वगैरेंचे बाड बनावट असलें, तरी तेवढ्यावरून ह्या कुळ्याच स्वत: बनावट असणें शक्य नाहीं. त्यांची परंपरा इतिहासांत शिलालेखांच्या काळाच्याहि मागें लांबवर पोंचते. मराठ्यांचीं जीं आज शेंकडों आडनांवें आहेत, त्यांतून गांवांवरून, धंद्यांवरून व इतर नैमित्तिक कारणावरून पडलेलीं पडनांवें वगळलीं तर कांहीं अस्सल कुळींची यादी शिल्लक उरते. स्वत: एन्थोव्हीननेंच ५४ नांवांची यादी अस्सल मराठ्यांची म्हमून स्वीकारली आहे. त्यातून ज्यांच्या राजवट्या महाराष्ट्राच्या व हिंदुस्थानाच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत, अशा कांहीं घराण्यांच्या नांवांचा तपशील पुढें कोष्टकांत दिला आहे, त्यावरून बराच बोध होतो.