मंदिरें आणि मूर्ति
प्राचीन आर्यांमध्यें व द्राविडांमध्यें वास्तुशास्त्राचा आणि शिल्पशास्त्राचा प्रचार बराच होता. ऋभु नांवाच्या ब्राह्मण रथकारांना तर वेदकाळीं अगदीं देवासारखा मान होता. त्यांनीं इंद्रास पिवळ्या रंगाचे दोन घोडे करून दिले ( ऋक् १।७।३२ ). अश्विनीकुमारास एक हलकासा पृथ्वीभोंवतीं फिरणारा रथ करून दिला ( ऋक्. मं. १अ. १सू. २० ). ते मोठे कारागीर होते. “ उध्यानानि, विमानानि, दिवौकसां । यंत्रदुर्गाणि वाप्यश्च कवचान्यायुधानिच । वाजी कर्माणिमांसि चित्राणि विविधानिच । मृदश्च हेमकुप्यादि धातूनां विक्रियाः क्रियाः ।। ” ...... (विश्वंभर वास्तुशास्त्र). ह्या प्रकरणीं बाळशास्त्री क्षीरसागर ह्यांनीं ‘ विश्वब्रह्मणाचा इतिहास ’ ह्या नांवाचा जो एक अतिशय परिश्रम करून विस्तृत ग्रंथ लिहिला आहे, तो फार वाचनीय आहे. रुद्रयामल, सूर्यसिद्धान्त, शिल्पमयमत, विश्वकर्म शिल्प, इ. ग्रंथांतून शिवाय पुष्कळ स्मृत्या, पुराणें, व आगमांतून आणि तंत्रग्रंथांतून ह्या विषयाचें विस्तारपूर्वक विवेचन आहे. तथापि प्राचीन आर्यांना आणि प्रतिष्ठित द्राविडांना देवादिकांच्या बनावट मूर्ति करून पूजा करणें हें संमत नव्हतें, व उपासनेसाठीं त्यांचीं देवळेंहि नव्हतीं ही गोष्ट इतिहाससिद्ध आहे. आर्यांच्या उपासना आणि यज्ञयाग मोकळ्या मैदानांतून किंवा टेकडीच्या माथ्यावरून होत. द्राविडांचीं पूजास्थानें म्हणजे झाडीमधून वर्तुलाकार अखंड दगड रोवून तयार केलेलीं शिला-मंडलें असत. अथर्व वेदामधून मूर्तींचा प्रयोग होत असे, तो पूजेसाठीं नसून अभिचार म्हणजे जादूसाठीं होत असे. तो प्रतिष्ठित समाजांत निषिद्ध मानला जाई. तें कसेंहि असो; अशोकाच्या काळापूर्वीं भरतखंडांत मोठमोठीं दगडी देवळें असल्याचा पुरावा नाहीं. इमारती व शिल्पकला होती. पण सर्व कामें लाकडाचीं व धातूचीं असत; दगडाचीं नसत. बहुतेक शहरांची वस्ती नदीकांठीं असे. नद्यांचे प्रवाह वेळोवेळीं बदलत असल्यामुळें घरें उचलून दुसरीकडे न्यावीं लागत. अशोकानें साम्राज्य स्थापन केल्यावर त्याचें ऐश्वर्य वाढलें. पर्शियन बादशहाच्या थाटावर त्यानें पाटलीपुत्र येथें आपला दगडविटांचा भव्य वाडा बांधिला. तो इराणांतील सुसो एकबाटना येथल्या राजवाड्यापेक्षांहि अधिक भपकेदार होता, असें मेगास्थिनीसनें वर्णन केलें आहे. पुढें तर हा वाडा माणसांची कृति नसून दैवी प्राण्यांची सृष्टी होती, अशी लौकिक समजूत दृढ झालेली आढळते. भरहूत व सांची येथें जे अशोककालीन बौद्धांचे स्तूप, तोरणें, कठडे अद्यापि आहेत, त्यांच्यावरील शिल्पकाम ब-याच परिणत अवस्थेला पोचलेले असून तें एतद्देशीय आहे. विशेष इतकाच, अशीं कामें पूर्वीं लाकडांत होत होतीं, तीं अशोकानें दगडांत करण्यास सुरुवात केलीं. सामग्री बदलली पण घाट पूर्वींचाच होता. लाकूड हा टिकाऊ पदार्थ नसल्यामुळें पूर्वींचीं कामें राहीलीं नाहींत, दगडी कामें मात्र अद्यापि टिकून आहेत. कांहीं कारागीर इराणांतून आणिले असले तरी मुख्य शिल्पकार व त्याची निर्मिति पूर्ण आणि निर्भेळ एतद्देशीयच आहे, असा शेरा फर्ग्युसन आणि हॅवेल ह्या दोघांहि शिल्पज्ञांनीं दिला आहे.