चौदावें शतक
(३) इ. स. १४ व्या शतकाचा प्रारंभ हा ज्ञानेश्वरीचा उदय होऊन मराठीचा भाषा ह्या नात्यानें कानडीपासून स्वतंत्र होण्यानेंच महत्त्वाचा नाहीं, तर राजकीय इतिहासाच्या दृष्टीनें दक्षिणेंत जी मोठी राज्यक्रांति झाली तिच्यामुळेंहि महत्त्वाचा आहे. चालुक्यांचे मांडलिक देवगिरीचे यादव हे मराठी बोलणारे होते. आणि त्यांचेंच दुसरें महामंडलेश्वर म्हैसूरचें होयसळ घराणें कानडी बोलणारें होतें. हे दोघेहि चालुक्याच्या उलट बंड करून स्वतंत्र झाल्यावर लवकरच मुसलमानांची टोळधाड येऊन हिंदुपदपादशाहीला कायमचाच धक्का बसल्यामुळें यादवांचा आणि होयसळांचा नायनाट झाला आणि जरी लवकरच त्या भयंकर यज्ञकुंडांतून ओरंगळच्या राजवटीचें रूपांतर होऊन विजयनगरचें नवीन राज्य उदयास आलें तरी कर्नाटकाची उत्तर सीमा जी आतांपर्यंत गोदावरीचें दक्षिण-तीर होती ती ह्यानंतर कृष्णेचें दक्षिण-तीर होऊन प्रत्यक्ष राजधानी तर तुंगभद्रेच्याहि दक्षिण-तीरावर प्रतिष्ठित झाली. इ. स. १५६५ तील तालीकोटच्या लढाईंत ह्या शेवटच्या हिंदुपादशाही वरून मुसलमानांचा वरवंटा सफाईनें फिरला आणि कर्नाटकाच्या राजवैभवाची जी अगदीं मिणमिणीत मेणबत्ती कावेरीच्या तटावर जीव धरून होती ती देखील हैदर अल्लीनें इ. स. १८ व्या शतकांत फुंकून पार नाहिंशी केली.
(४) अशा रीतीनें राजकारणाच्या दृष्टीनें कर्नाटकाचा बुडता पाय जो उत्तरोत्तर खोलांत जाऊं लागला तो अद्यापि यावा तसा वर येत असलेला दिसत नाहीं. मुसलमानांच्या वरवंट्याखालीं, विशेषतः तालीकोटच्या निःपातानंतर, कानडी बोलणारे मराठे जे रेड्डी, राजू, होयसळ, पल्लव ऊर्फ पालवे, कदंब इ. ते कायमचे दबून गेले. पण देवगिरीचे जाधव, फलटणचे निंबाळकर, बदामीचे शिंदे आणि माने, वाडीचे सावंत, कोंकणपट्टींतले आंग्रे, मोरे, शिर्के इ. अनेक घराणीं जरी प्रत्यक्ष राजपदावरून चमकत नव्हतीं, तरी त्यांचीं वरून कोळशाप्रमाणें दिसणारीं द्रव्यें इतकीं सहज ज्वालाग्राही होतीं कीं, शहासूनु शिवरायानें फुंकर मारल्याबरोबर तीं मराठी स्वराज्याचीं होमकुंडें बनलीं. सतराव्या शतकांत नवीन महाराष्ट्र महोदधि जो उचंबळला तो उत्तरेस नर्मदेपासून तों दक्षिणेंत तुंगभद्रेपर्यंत पसरला; इतकेंच नव्हे तर तिच्याहि पलिकडे कावेरीच्या कांठीं तंजावरावर ह्याची ध्वजा लागली. एकंदरींत ह्या द्विगुणित राज्यक्रांतीमुळें, अगोदरच चौदाव्या शतकांत स्वतंत्र झालेली जी मराठी भाषा, तिला जरी शिवपूर्वकालीं मुसलमानी राजकारणाचा आणि फार्सी भाषेचा सासुरवास सोसावा लागला तरी शिवोत्तरकालीं तिला राजकारणाची अपूर्व जोड मिळाल्यामुळें ती एखाद्या महापुरानें बेफाम झालेल्या नदीप्रमाणें गोदावरीचा किनारा हा आपला मुख्य प्रदेश ओलांडून स्वस्थ न बसतां कृष्णेच्या पलीकडील व तुंगभद्रेच्या उत्तरेकडील कानडीचाहि प्रांत जी एकदा बळकावून बसली आहे, ती तो अद्यापि परत करण्याचीं कांहींच चिन्हें दिसत नाहींत. ज्या प्रदेशाला खरोखरी उत्तर-कर्नाटक म्हणावयाला पाहिजे त्याला आम्ही आतां दक्षिण-महाराष्ट्र म्हणत आहों.