जमीनदार वर्ग
वाळवें तालुका परिषदेंत मीं शेतक-याची स्पष्ट व्याख्या केली, ती अशी कीं, जो आपल्याला, व आपल्या आश्रितांना आवरेल इतकीच जमीन धारण करतो व ती वाहतो म्हणजे तिची स्वतः मशागत करून भरपूर उत्पन्न काढतो तोच शेतकरी, इतर कोणीहि नव्हे ! जमिनीची सात्त्विक मालकी सर्व राष्ट्राचीच असते. पण दुर्दैवानें राष्ट्राचा ताबा परकी सत्तेकडे गेल्यास ह्या तत्त्वास बाध येतो. अशा अपवादाचे वेळीं जमिनीची पूर्ण मालकी ती वाहणा-या कुणब्याकडेच येते. ही हिरावून घेण्यासाठीं कोणीं कितीहि चतुराईनें कायदे केले तरी त्यांना न्यायाच्या दृष्टीनें शेतांतील एका काडीचीहि किंमत राहात नाहीं. अशी परकीय सत्ता देशांत आल्याबरोबर ती प्रथम आपल्या पोषणासाठीं कुणबी व आपण ह्यांच्या दरम्यान जमीनदार नांवाचा एक मध्यस्थ वर्ग निर्माण करते. ‘ना मला आणि ना तुला तर द्याल कुत्र्याला’ ह्या न्यायानें अशा आपत्तीच्या काळीं जमिनीची मालकी ह्या वर्गाच्या दाढेंत जाते. मग तो वर्ग इतका डोईजड होतो कीं ही सत्तादेखील कमीअधिक मानानें त्यांच्या आहारीं जाते, मग कुणब्याचे हाल काय विचारतां ?