चैतन्य पंथाची भूमिका
द्राविड देशांत उत्पन्न झालेला नवीन भक्तिरसाचा लोट बंगाल देशांत पोंचावयास अवकाश लागला. कारण त्याला मध्यंतरीचे कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र हे देश भिजवावयाचे होते. रामानंद आणि कबिरानें वायव्येकडचे हिंदुस्थानी प्रदेशहि भिजवले. चहुकडची जमीन अशा आत्मिक द्रवानें द्रवली असतां, जात्याच मेण्यासारखी मऊ आणि भुसभुसीत अशी बंगालची जमीन आतां भिजल्याशिवाय कशी राहणार? बंगाल, बिहार, पंजाब, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, द्राविड इ. प्रांत हे केवळ भूगोलाचे निरनिराळे तुकडे नसून तीं परस्पर भिन्न ऐतिहासिक तुकडे ऊर्फ राष्ट्रें आहेत. त्यांची मनोरचना, ऐतिहासिक विकास, हीं परस्परांहून इतकीं भिन्न आहेत कीं, तितकी भिन्नता हल्लीं एकमेकांच्या छातीवर बसून एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास टपलेल्या इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि रशिया या यूरोपीय राष्ट्रांमध्येंहि नाहीं. विशेषत: बंगाल हें एक अगदीं भिन्न आणि ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीनें पाहतां एकजात विशिष्ट संस्कृतीचें स्वतंत्र राष्ट्र आहे. बौद्ध धर्माच्या संस्कृतीखालीं येण्यापूर्वीं बंगालची एक विशिष्ट संस्कृति होती. तिचा आर्यांच्या किंबहुना दक्षिणेच्या द्राविडांच्या संस्कृतीशीं फारच थोडा आनुवंशिक संबंध होता. बंगाल हें शाक्त धर्माचें व तज्जन्य संस्कृतीचें एक मोठें माहेरघर होतें. बंगालनें बौद्ध धर्म स्वीकारला, पण बुद्धानंतर पांचसातशें वर्षांनीं बौद्ध धर्माच्या महायान पंथाला बंगालनें पुन: आपलें शाक्त धर्माचें तांत्रिक स्वरूप दिलें. इतकेंच नव्हे तर हा सशक्त आणि भावनामय तांत्रिक स्वरूपाचाच हल्लींच्या अखिल भारतवर्षावर अल्पसंख्याक आर्यांच्या बुद्धिमय पण दुबळ्या मांत्रिक स्वरूपापेक्षांहि कितीतरी पटीनें अधिक जास्त परिणाम झाला आहे! आर्यांचें मानसिक लक्षण म्हणजे तात्त्विक आणि तार्किक बुद्धिवैभव, द्रविडांचें हिशेबी आणि व्यावहारिक बुद्धिवैभव, मोंगलांचें उज्ज्वल भावनावैभव, अशीं हीं आनुवंशिक राष्ट्रीय लक्षणें ढोबळ मानानें सहज दिसून येण्यासारखीं आहेत. दक्षिणेंतून आलेल्या भक्तीची ठिणगी बंगालच्या भावनामय सुरुंगावर पडल्याबरोबर जो एक सर्व बंगालला हादरून टाकणारा स्फोट उडाला, त्याचेंच नांव श्रीचैतन्यदेव ! हा सुरुंग कोणीं कसा उडवला होता?
बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम वगैरे ईशान्येकडील मानववंश हे सर्व मोंगली संस्कृतीचे आहेत. प्रत्यक्ष गौतमबुद्ध आणि महावीर वर्धमान हेहि थोडेबहुत ह्याच संस्कृतीचे होते. गौतम बुद्धानें टाकलेल्या ठिणगीनें ह्या प्रांतीं २५०० वर्षांपूर्वीं जो स्फोट झाला त्यानें सर्व जग हादरलें आणि सर्व जगभर भागवत धर्माचा ओघ लाव्हासारखा पसरूं लागला. तो थंड होण्याला १०००|१५०० वर्षें लागलीं. चैतन्यदेवाच्या उदयाचे पूर्वीं हा लाव्हाचा (तत्परस) ओघ अगदीं थंड होऊन जमिनीखालूनच वाहात होता. मुसलमानांच्या कापाकापीनें बौद्ध भिक्षु संघाची वाताहात झाली. मागें मात्र त्यांचे केवळ अत्यंत हीन परिणाम तांत्रिक वामाचाराच्या रूपानें समाजाच्या सर्व वर्णांमधून रोमरोमांत भिनून गेले होते. बंगालची स्थिति कमालीची केविलवाणी झाली होती. बुद्धि पूर्ण स्वार्थी झाली होती. एके काळीं पराक्रम गाजविलेल्या सेन घराण्याचा जरठ राजा लक्ष्मणसेन राज्य करीत असतां अवघ्या ५०० मुसलमानांच्या एका दरोडेखोर टोळीनें छापा घातला. तेव्हां त्याला तोंड न देतां लक्ष्ममसेन मागील दारानें परागंदा झाला, आणि त्याच्या मागोमाग स्वातंत्र्य आणि स्वराज्यहि पळालें, तें अद्यापि पूर्वस्थळाला आलें नाहीं. आतां परिस्थिति बदलत आहे. आजकालच्या हिदुंस्थानाला जें भावनांचें भातुकें मिळत आहे, तें बंगाल्यांतूनच येत आहे. राममोहन राय हा आजच्या भारताचा धार्मिक बाप असेल, तर श्रीचैतन्य हा आजा होय.