पंथाचा प्रसार व अवनति
त्याच्या शिष्यांत सर्व जातींच्या विशेषत: खालच्या जातींच्या लोकांचा भरणा जास्त होता. हरिदास नांवाच्या मुसलमानाला जवळ जवळ त्याच्या पट्टशिष्याचा मान होता. ब्राह्मणांच्या चहाडखोरपणाच्या चिथावणीमुळें मुसलमानांनीं बौद्ध विहारांचा जो भयंकर विध्वंस मांडिला, त्यामुळें नामांकित विद्वान् भिक्षु आणि भिक्षुणी आपले मठ आणि विश्वविद्यालयें टाकून नेपाळ, तिबेट, आसाम, ओरिसा वगैरे दूरदूरच्या प्रांतांत पळून गेले होते. त्यांच्या मागून वरिष्ठ वर्गाचे गृहस्थाश्रमी बैद्धांनींहि ‘य:पलायति स जीवति’ हाच मार्ग स्वीकारला. मागें जे खालच्या जातींतले बौद्ध उरले त्या सर्वांना हिंदु धर्मांतील अस्पृश्य वर्गांचें मुकाट्यानें स्थान स्वीकारून नाइलाजानें जीव धरून गुजारा करावा लागला. अशा लोकांना चैतन्याच्या संन्याशी शिष्यांनीं भराभर आपल्या कळपांत ओढून आपापल्या मोठमोठ्या आश्रमांचें पूर्व आणि पश्चिम भागांत भलें विस्तीर्ण जाळें पसरलें. प्रत्यक्ष चैतन्याचेंच शुद्ध चरित्र, उज्वळ प्रेम, भक्तीचा साधा भाव, व्रतें, वैकल्यें, जातिभेदादि खुळांचा अभाव, त्यांच्या मठांची व्यवस्थेशीर घटना इ. अनेक कारणांमुळें चैतन्याच्या मागें हां हां म्हणतां त्याच्या पंथाचा विस्तार झाला; इतकेंच नव्हे, तर स्वत: चैतन्य म्हणजे विष्णूचाच अवतार, ही भावना बळावून त्याच्याच पूजेसाठीं मंदिरें उभीं राहूं लागलीं. जी स्थिति बौद्ध महायान पंथाची, ती चैतन्य पंथाची होऊन, दोन तीन शतकांनंतर ह्या पंथाच्या अवनतीलाहि सुरुवात झाली. एखाद्या थोर पुरुषासंबंधीं व्यक्तिविषयक भक्ति, त्यासंबंधीं अवतारवाद, त्याची मूर्तिपूजा, नंतर त्याच्या नांवानें मंदिराचा उठाव, इतकें झाल्यावर त्याच्या नांवानें पोटें जाळण्याचा धंदा, ही परंपरा हिंदुस्थानांतच नव्हे-तर सर्व जगांत सर्वत्र आढळते. श्रीचैतन्याचा पंथहि ह्या दूषित परंपरेचेंच एक उद्वेगकारक उदाहरण झालें, असें म्हटल्यावांचून गत्यंतर नाहीं.