गेल्या ऑक्टोबरच्या ११ तारखेच्या तिस-या प्रहरी एक हिंदू विद्यार्थी मँचेस्टर कॉलेजचे दरा ठोठावीत होता. हा ह्या देशात एव्हा नुकताच आला असल्यामुळे, ह्याचे तोंडावर नवख्याचे प्रत्येक चिन्ह स्पष्ट दिसत होते. आगगाडीतून ऑक्सफर्ड विद्यापीठाचे दुरून दर्शन झाल्यापासून ह्याच्या मुद्रेत आदराची झाक कलेकलेने वाढत होती. मँचेस्टर कॉलेज पाहिल्यावर तर ह्याची भावना ह्यालाच कळेनाशी झाली! दाराजवळ पोहोचल्याबरोबर ह्यास सुंदर व सुवाच्य शिलालेख दिसला तो हा – ‘सत्य, स्वातंत्र्य व धर्म ह्यांस वाहिलेले!’ हे बाणेदार ब्रीद ह्यास पुढे कॉलेजातील भोजनालयाच्या व पुस्तकालयाच्या दारावरही कोरलेले दिसले. काही वेळाने देवडीवाल्याने ह्यास आत नेले. थोड्याच वेळाने वयाने व त्याहून अधिक विद्येने वाकलेली एक लहानगी आकृती ह्याजपुढे आली. अर्थात ती परमपूज्य डॉ. प्रिन्सिपॉल ड्रमंडसाहेबांचीच होती. भर्तृहरीच्या लक्षणाप्रमाणे हे खरोखरीच ‘नम्रत्वेनोन्नमंत: संत:’ आहेत, ह्यात अतिशयोक्ती अगर पक्षपात लेशमात्र नाही. ह्यावरही ज्यास वरील वचनाची शंका येत असेल, त्याचेच कमनशीब म्हणावयाचे! प्रिन्सिपॉलसाहेबांनी ह्या परक्या विद्यार्थ्याचे इतक्या कळकळीने स्वागत केले की, जणू ह्याची व त्यांची फार दिवसांची ओळख आहे. असो! पण हा हिंदू विद्यार्थी ह्या विलायतेतील धार्मिक कॉलेजाचे दार ठोठावीत का उभा आहे! भरतभूमी एकेकाळी सुवर्णभूमी होती, पण आता दुष्काळाचे माहेरघर झाली आहे म्हणून काही हिंदू विद्यार्थी कायदे, कला इ. ऐहिक विषय शिकण्यास इकडे आल्यास ते येणे साहजिक आहे. पण धर्माबद्दल आर्यांच्या कीर्तीचा नगारा परके देशांतदेखील हल्ली वाजत असता हा वेडा पीर येथे का? आर्यांच्या वंशजास बापुडे मँचेस्टर कॉलेज धर्म तो काय शिकविणार? काही दृष्टीने ही शंका अगदी यथार्थ आहे. धर्म ही बाब मुळी पढिक शिक्षणाची नव्हेच. येथे परमेशवरच गुरू, विश्व हीच शाळा आणि सृष्टी हेच पुस्तक, हे कोण सूज्ञ नव्हे म्हणेल? मनुष्य काय मनुष्यास धर्म देणार! ह्या दृष्टीने पाहता जेथे धर्म नाही, तेथे तो उत्पन्न करण्याचा स्वत: मँचेस्टर कॉलेजचाही इरादा नाही. दुस-या दृष्टीने पाहता धर्मशिक्षणात प्राणायाम कसा करावा, श्राद्धमंत्र कसे म्हणावेत, अगर बाप्तिस्मा अथवा होली कम्यूनियन कसे घ्यावे वगैरे प्रकारच्या गोष्टी येत असल्यास आर्यांच्या वंशजांस धर्म शिकविण्याची गोष्ट तर एकीकडेसच राहो, पण येथील ख्रिस्त्यांसही असला लौकिक ख्रिस्तीधर्म शिकविण्यास मँचेस्टर कॉलेज केवळ नालायक आहे, आणि ह्या नालायकीबद्दल कॉलेजास मुळीच वाईट वाटत नाही. ज्या धर्माचे उपदेशक तयार करण्यास्तव ह्या कॉलेजाची योजना आहे त्या धर्मातच अशा गोष्टीस थारा मिळत नाही. तर ह्या वरील कला शिकू इच्छिणारांनी मँचेस्टर कॉलेजाच्या वाटेस जाऊ नये हेच बरे! धर्माची देणगी देवाने माणसास आधीच देऊन ठेविली आहे व हल्लीही दरघडी तो ती देत आहे. पण ह्या बीजरूपी देणगीची लागवड करणे हे माणसाचे काम आहे आणि त्यातच दात्याने दिल्याचे चीज होणार आहे. देव देतो म्हणून गुडघ्यात डोके खुपसून बसणे केवळ नेभळेपणाचे लक्षण आहे. उत्तरोत्तर विकास पावणा-या मानवी शक्तीच्या साहाय्याने व बदलणा-या परिस्थितीस अनुसरून, श्रेष्ठाने कनिष्ठांस, जाणत्याने नेणत्यांस, पवित्राने पतितांस ह्या देणगीचा फायदा दिला नाही आणि स्वत: आपल्यामध्ये ती वाढविली नाही, तर धर्माची मूळज्योत विझली आहे असे समजावे. ह्या शुद्ध बुद्धीच्या काळात श्रद्धेची बाजू उदार धर्माने बरीच राखिली आहे. आणि शुद्ध बुद्धीच्या पायावर धर्मशिक्षण येथल्याप्रमाणे इतर थोड्याच ठिकाणी मिळत असेल.
ह्या कॉलेजातून विद्यार्थी बाहेर पडल्याबरोबर त्याच्या अंगी धर्माचा दिग्विजय करण्याची पात्रता येते असा मुळीच अर्थ नव्हे. ती त्या त्या व्यक्तीच्या बळावर अवलंबून आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, श्रुतिग्रंथ, तुलनात्मक टीका, धर्मोपदेश आणि शुद्ध खासगी वर्तन इ. अकद्वारा धर्मशिक्षणाचे काम हे कॉलेज नि:पक्षपाताने, कळकळीने, दक्षतेने, धैर्याने आणि शांतपणे बजावीत आहे. आर्याचा वंशज असो की आफ्रिकेतील शिद्दी असो, कॉलेजाची द्वारे दोघांसही सारखीच उघडी आहेत. दोघांसही शिकविण्यास कॉलेजाचा अधिकार आहे. शिकणा-यात शिकण्याचीच पात्रता आहे की नाही ही शंका शोभेल, पण वरील शंका शोभत नाही.
ह्यावरून इतके तरी दिसून येईल की, हा हिंदू विद्यार्थी येथे आला ही काही वावगी गोष्ट झाली नाही. तशात ह्या कॉलेजात आलेला हा पहिला विद्यार्थी नव्हे. ह्याचेमागे तीन विद्यार्थी येथे आले असून ते आता बंगाल्यात धर्मप्रचाराचे काम मोठ्या आस्थेने बजावीत आहेत. शिवाय हल्ली जपानातूनही एक जपानी विद्यार्थी ह्याच हेतूने ह्या कॉलेजात उदार धर्माचे शिक्षण मिळवीत आहे. ह्या सुधारलेल्या शतकात केवळ भौतिक सुधारणाच होत आहे, जडवाद माजत आहे, धर्माची ग्लानी होत आहे वगैरे निराशेचे उद्गार शहाण्या लोकांच्या तोंडातूनही कधी कधी ऐकू येतात, ते केवळ त्यांचे लक्ष ह्या नवीन धर्मजागृतीकडे जावे तितके न गेल्यामुळेच होय. १९ व्या शतकापासून सर्व सुधारलेल्या जगात धर्मविचार, आचार आणि संस्था ह्यांत जी हळूहळू उत्क्रांती घडत आहे, तिची लाट हिंदुस्थानातही ब्राह्मसमाजाच्या रूपाने उसळली आहे. अर्थात निरनिराळ्या ठिकाणी उदात्त हेतूने प्रेरित होऊन काम करणा-यांमध्ये परस्पर सहानुभूती उत्पन्न होणे साहजिक आहे, आणि वर सांगितल्याप्रमाणे ह्या कॉलेजात पूर्वेचा व पश्चमेचा जो संबंध घडत आहे तो ह्या सहानुभूतीचाच परिणाम होय. अशा रीतीने परस्परांस परस्परांची नीट समज पडून, सर्वात एकच तत्त्व मंगलकार्य घडवीत आहे ह्याची प्रचीती पटली, परमेश्वराने समग्र मानवजातीस जगाच्या इतिहासात जो वारंवार उपदेश केला आहे, जे पवित्र आत्मे पाठविले आहेत व जो अनुभव दिला आहे ती सर्व जगाची समाईक संपत्ती आहे. तिचा माझे तुझे न करता गोडीगुलाबीने उपभोग घेण्यास आम् शिकलो तर वावगे होईल काय? मँचेस्टर कॉलेज तर ह्याहून दुसरे काही शिकवीत नाही. अशा उदार प्रयत्नाने जर का एकाद्या धर्माच्या संस्थेस खरोखरच धक्का पोहोचत असेल, तर ती संस्था चोरांच्या किल्ल्याप्रमाणे जितक्या लवकर ढासळेल तितके बरेच म्हणावयाचे! आणि ती तशी ढासळल्यास चोरांशिवाय इतरांस वाईटही वाटणार नाही!!
पम धर्माशी ज्या गोष्टींचा मुळीच संबंध नाही अशांमुळे ख-या धर्माच्या मार्गात ह्या सुधारलेल्या काळात अद्यापिही अडथळे येत आहेत. आमचा देश बोलून चालून पुराणप्रिय, अवजड आणि न हालणारा. परंतु वा-याच्या वेगाने प्रगतीच्या वाटेने धावणा-या इकडील राष्ट्रांत तरी काय विशेष आहे! सबंध युरोपात मँचेस्टर कॉलेज हे एकच आणि तेही एकलकोंडे. पाखांड्यांचे कॉलेज म्हणून त्यावर जो एकदा शिक्का बसला आहे तो अद्यापि पुसला गेला नाही. ऑक्सफर्डच्या विद्यापीठात नावडतीच्या पोराप्रमाणे त्याची हेळसांड होत आहे. ह्या सोवळ्या युनिव्हर्सिटीत अद्यापि ह्या कॉलेजाचा विटाळ खपत नाही. तथापि सुधारणेची साथच अशी काही तीव्र आहे की, ह्या कॉलेजची उदरा मते नकळतच इंग्लंडच्या सा-या चर्चमधून झिरपत आहेत! त्यामुळे युनिटेरिअन धर्माचा प्रसार दलदलीत पडलेल्या पावसाप्रमाणे, वर दिसावा तितका दिसत नाही. धर्माच्या इतर कॉलेजांतील अध्यापकांस व विद्यार्थ्यांसही ख्रिस्ती शकाच्या तिस-या व चवथ्या शतकांत मतांचे जे एकदा जुने नमुने ठरून गेले आहेत त्यांप्रमाणे आपला विश्वास आहे अशी उघडपणे प्रतिज्ञा घ्यावी लागते. असल्या फार्सात ह्या कॉलेजास काही करमणूक वाटत नसल्यामुळे ते येते घडत नाहीत. ह्या कॉलेजाबाहेर उदार मतच नाही असे म्हणणे म्हणजे ब्राह्मसमाजाबाहेर हिंदुस्थानात सुधारणाच नाही असे म्हणण्याप्रमाणे चुकीचे होईल. पण आधुनिक शास्त्रास व तत्वज्ञानास पटेल अशा प्रकारचे धर्माचे उदार मत उघडउघड प्रथिपादणे ह्या समाजाच्या सर्व दर्जात ते पसरविण्यास उपदेशक व आचार्य तयार करणे हे काम मात्र ह्याच एका कॉलेजात होत आहे.
कॉलेज म्हणजे ५-७ प्रोफेसर असावयाचे. त्यांनी एकाद्या युनिव्हर्सिटीत होणा-या परीक्षांकरिता दरसाल २००-३०० विद्यार्थ्यांस ठराविक पुस्तकातील विषयात ठराविक पद्धतीने तयार करावयाचे, व शिकणा-यांनीही परीक्षेच्या धोरणाने संधान बांधावयाचे, इ. इ. कल्पना आमच्या लोकांच्या मनांत साहजिक येतात, पण वरील कॉलेजाचा ह्या कल्पनांशी फार थोडा मेळ बसतो. हे कॉलेज मागे सांगितल्याप्रमाणे केवळ धार्मिक अध्यापनाकरिता असून ह्याचा बहाणा अट्टल सुधारकी असल्यामुळे कोणत्याही बुढ्ढ्या युनिव्हर्सिटीस ह्याचा संसर्ग सोसत नाही (आणि ह्या कॉलेजासही त्याविषयी पर्वा नाही) म्हणून अर्थात कॉलेजातील अध्ययनाचा युनिव्हर्सिटीच्या परीक्षांशी कसलाही संबंध नाही. शिवाय कॉलेजाचा उद्देश उमेदवारांस सुधारकी पदव्या देण्याचा नसून, उदार व जिवंत धर्माचा समाजात सतत प्रसार करण्यासाठी दरवर्षी ताज्या दमाच्या तरूण उपदेशकांचा पुरवठा करण्याचा आहे.
अठराव्या शतकात युरोपात आधुनिक शास्त्राचा बहार अगदी नवा होता. तेव्हा जुना धर्म व नवे शास्त्र ह्यांमध्ये मोठा लढा पडला होता. ह्या दोहोंमध्ये कधी समेट होणे शक्य नाही अस सुशिक्षितांना वाटू लागले होते. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हेच धर्माचे लक्षण आणि जड वस्तू व जड चमत्कार ह्यांची वरवर मीमांसा करणे हीच काय ती शास्त्राची इतिकर्तव्यता असा जोपर्यंत समज आहे, तोपर्यंत वरील दोन्ही तत्त्वे परस्परविघातक आहेत अशी तर्कप्रिय माणसास भ्रांती पडणे अगदी साहजिक आहे. पण मँचेस्टर कॉलेजच्या संस्थापकांना तर्कच केवळ प्रिय नव्हता आणि वरील दोन्ही तत्त्वांची विलक्षण लक्षणेही त्यांना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगी म्हणजे इ. स. १७८६ साली हे कॉलेज काढले. वास्तविक पाहता ही संस्था इ. स. १७५७ साली वॉरिंगटन अँकॅडमी ह्या नावाने वॉरिंगटन येथे स्थापना झाली होती, हिचे पुढे स. १७८६ साली मँचेस्टर कॉलेज असे रूपांतर झाले. ह्या क्रांतीच्या काळी संस्थापकांचा धर्म व शास्त्र ह्या दोहोंवरही सारखाच विश्वास होता. म्हणजे ह्यांचा धर्म शास्त्रीय होता व ह्यांचे शास्त्र धार्मिक होते. म्हणूनच केवळ असली अद्वितीय संस्था तशा काळी उद्भवली. जुना धार्मिकपणा व नवी रहाटी ह्या दोन कुबड्यांवर चालू पहाणारे सभ्य गृहस्थ हल्लीच्या प्रगतीच्या काळीही काही कमी सापडतील असे नाही, पण ह्या कॉलेजच्या चालकांच्या अंगी तेव्हापासून आतापर्यंत आपल्या पायांवरच कुबड्यांच्या साहाय्यावाचून चालण्याइतकी सचोटी आणि बळ ही दोन्ही आहेत, इतकेच नव्हे, तर व्यायामामुळे ही दोन्ही सारखी वाढत आहेत. वॉरिंगटन अँकॅडमीतील धर्मशास्त्राचे (Theology) पहिले अध्यापक (१७५७-१७६१) डॉ. जॉन टेलर हे वर्षारंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी खालील चार तत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनांवर पूर्ण ठसवीत असत:-
(१) सत्यदेवतेच्या नावाने मी तुम्हास बजावितो की, तुम्ही आताच्या व पुढच्या धर्माध्ययनात, श्रुतिग्रंथांतील साधकबाधक प्रमाणे आणि तुमची स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी ह्या दोहींकडे दक्षतेने, नि:पक्षपाताने व कसोशीने नेहमी लक्ष पुरवा, कल्पनेचा झपाटा आणि निराधार तर्क ह्यासंबंधी सावध असा;
(२) मी प्रस्थापिलेले कोणतेही तत्त्व अगर विचार ह्यांचा जो भाग तुम्हांस सप्रमाण दिसेल, त्यापेक्षा अधिक मुळीच पत्करू नका;
(३) मी हल्ली शिकविलेले व तुम्ही मानलेले कोणतेही तत्त्व तुम्हांस पुढे कच्चे अगर खोटे दिसेल, तर त्याबद्दल शंका बाळगा किंवा ते मुळीच टाकून द्या;
(४) आपले मन नेहमी मोकळे ठेवा, दुराग्रह व पक्षाभिमान ह्यांस थारा देऊ नका, आणि दुस-याच्या हक्काच्या आड तुम्ही जाऊ नका.
ही आरंभीच्या अध्यापकांची गोष्ट झाली. मध्यंतरी डॉ. मार्टिनो ह्या कॉलेजात पुष्कळ वर्षे अध्यापक होते. त्यांचे स्वत:चे धार्मिक अध्ययन ह्याच कॉलेजात झाले होते. इ. स. १८९७ साली त्यांचे ह्या कॉलेजातील अध्ययन संपून बरोबर ७० वर्षे झाली, म्हणून कॉलेजकमिटीने त्यांस अभिनंदनपत्र पाठविले, त्यास पाठविलेल्या उत्तरात मार्टिनोचे खालील सुंदर उद्गार आहेत:-
“ह्या कॉलेजने मला एक बोध दिला आहे, तो हा की मी नेहमी शिकत रहावे, आणि शिकवीत असताना तर विशेषेकरून शिकत असावे. हा बोध मजमध्ये पूर्णपणे बिंबला नसेल, तर माझा हा ७० वर्षांचा संबंध ह्या प्रगमनशील कॉलेजास, एकाद्या रिकामा पगार खात शिलकेत पडलेल्या पेन्शनदाराप्रमाणे, केवळ भारभूत झाला असेल. कॉलेज-शिक्षकांचा मी एका गोष्टीविषयी अत्यंत ऋणी आहे, ती ही की जी गोष्ट आपणास ‘एकदा..........खरी वाटली ती फिरफिरून दोनदा शिकविणे हा गुन्हा आहे, हे त्यांनी मला शिकविले,.........नवे विचार आणि ताजे वाड्मय ह्यांचा समाजात जसजसा प्रसार होईल, तसतशा आपण मागे बांधलेल्या विचाररचना विसकळून त्यांच्या पायांवर नव्या इमारती उभारल्या पाहिजेत. म्हणजेच शिक्षकांच्या मनावर गंज चढणार नाही व त्यांची गणना केवळ मोडक्या तोडक्या टाकाऊ सामानात होणार नाही.......’ ही मधली स्थिती झाली. हल्लीचे प्रिन्सिपॉल डॉ. ड्रमंड ह्यांनीही गेल्या वर्षाचे आरंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी आम्हांस मोठ्या कळकळीने सांगितले की, बाबांनो आम्ही जो तुमच्यापुढे कसलाही विचार करितो तो केवळ तुमच्या विचारास मदत व्हावी म्हणून होय, त्यावर जबरी करण्यासाठी नव्हे. तुम्हांस नापसंत झालेली आमची मते तर बाजूसच राहोत. पण जर एकादे मत आम्ही निरूत्तर प्रथिपादिले आणि त्याची सर्व प्रमाणे मिळाली असे तुम्हांस वाटले तरी तेवढ्यावरच तुम्ही तृप्त राहू नका. तुमचे व्यक्तिविषयक शोध नेहमी चालू असावेत, आमच्या प्रयत्नाने तुमचे शोध अडू नयेत किंवा आळसावू नयेत.”
ह्या प्रकारे स्वातंत्र्य आणि मोकळेपणा हे कॉलेजचे ब्रीद केवळ शब्दांतच नाही तर करणीतही आहे. कॉलेजचे एकंदर धोरण वा-याप्रमाणे मोकळे, निर्भय व नि:शंक आहे. ही गोष्ट प्रोफेसरांची जी नेमणूक झाली आहे त्यावरून दिसून येत आहे. हक्सले ह्यांनी मागे एकदा म्हटले होते की जर्मनी व हॉलंद ह्या दोन देशांखेरीज सा-या युरोपात कोठेही धर्मशास्त्राच्या अध्यापकास स्वतंत्र विचार व शोध करण्याची सवड नाही. (कारण जुन्या धर्माची जी काही ठराविक मते आहेत त्याबाहेर अध्यापक जाईल तर त्याची वरणी बंद होते.) हक्सलेसाहेबांस मँचेस्टर कॉलेजचा अपवाद आठवला नसावा. किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मोठे नाव व दुर्भेद्य दुराग्रह इकडेच त्यांचे सर्व लक्ष लागले असावे. ह्या कॉलेजातील अधअयापकामागे ही अडाणी दहशत मुळीच नाही. तथापि हे सुधारकी कॉलेज म्हणून ह्यातील सर्व अध्यापक जहाल सुधारक आहेत असेही नाही. तसे असल्यास ह्याची स्वतंत्रता केवळ एकदेशीय झाली असती. आणि अशा बेफाम स्वातंत्र्याचे तुफान-तारू कधीच एकाद्या खडकावर आपटून नामशेष झाले असते. पण वास्तविक प्रकार तसा नाही. हल्ली कॉलेजात पाच कायमचे व दोन हंगामी अध्यापक आहेत. कायमच्या पाचापैकी जुन्या कराराचे अध्यापक रेव्ह. अँडिस हे इतके जुन्या मताचे आहेत, की हे युनिटेरिअन आहेत, की नाहीत ह्याची पुष्कळ वेळां शंका येते. तथापि कॉलेजाकडून त्यास कसलीही उपाधी पोचत नाही. इतकेच नव्हे तर साप्ताहिक उपासनेत पाळीप्रमाणे ह्यांचीही उपासना होते. मात्र तेव्हा तरूण विद्यार्थ्यांत व गावातील काही युनिटेरिअन मंडळीत किंचित कुजबुज होते. (आमच्या प्रार्थना समाजातील व्यासपीठावरून एकाद्याचा नकळत अद्वैताकडे तोल गेल्याबरोबर समाजाची मंडळी लगेच कशी एकमेकांच्या कानांशी जाते ह्याची मला ह्या प्रसंगी आठवण झाल्याशिवाय राहत नाही.)
उलटपक्षी, तुलनात्मक धर्माचे अध्यापक प्रो. कार्पेंटर व तत्त्वज्ञानाचे अध्यापक प्रो. अँपटन् हे अगदी बावनकशी सुधारक आहेत. प्रि. परमपूज्य डॉ. ड्रमंड हे जणू तोल राखण्यासाठीच की काय, मध्येच मेरूप्रमाणे स्थिर आहेत. सुधारक, उद्धारक, नवे-जुने ही विशेषणे त्यास लागू नाहीत. ते आपल्या आध्यात्मिक तेजोबलाने द्वंद्वातीत आहेत. (येथे डॉ. भांडारकरांची आठवण होते.)
असो. ह्याप्रमाणे येथील हवा अगदी मोकळी व शुद्ध आहे. स्वातंत्र्याचा प्रकार पूर्ण व पवित्र आहे. पुष्कळ वेळां असे होते की स्वतंत्र्याची पताका खांद्यावर घेऊन नाचत सुटणारी मंडळी आपल्याच पायाखाली दुस-या मुक्या प्राण्याचे स्वातंत्र्य तुडवीत असतात, ते घाईत बिचा-यास कळतच नाही. तसे येथे होत नाही. स्वातंत्र्यामुळे पुरातन वस्तूसंबंधाने अनादर उत्पन्न होत नाही. तर त्या वस्तूकडे जाण्याची वाट मोकळी होते आणि तिचे साक्षात दर्शन होऊ लागल्यामुळे आदरबुद्धी वाढू लागते. जुन्या नव्याचा कलह मिटतो. असे का तर कॉलेजच्या दारावर ‘स्वातंत्र्य’ एवढीच अक्षरे नाहीत तर त्याबरोबर ‘सत्य’ व ‘धर्म’ हीही आहेत. ‘स्वातंत्र्य’ दारावरच नाही तर आतही आहे हे वर सांगितले. त्याप्रकारे ‘सत्य’ व ‘धर्म’ ह्यांचीही कार्ये घडत आहेत. ती कॉलेजातच नव्हे तर त्याद्वारे सर्व युनिटेरिअन समाजात घडत आहेत. कसे ते हळूहळू पुढे कळेल.