डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. १०-४-१९०२

नाताळच्या खालोखाल ईस्टर हा ख्रिस्ती लोकांचा मोठा सण आहे. ह्याची गणना चांद्रमानाप्रमाणे होत असल्यामुळे सौर वर्षात ह्याची तारीख मागे पुढे बदलते. गुड फ्रायडे (चांगला शुक्रवार) पासून तो पुढच्या सोमवार अखेर, अत्यंत गरजेची-विशेषेकरून दारूची दुकाने खेरीज करून, बाकी सर्व दुकाने सर्वत्र ह्या चार दिवसांत बंद असतात. हा चांगला शुक्रवार येशू ख्रिस्ताची पुण्यतिथी होय. ह्याच दिवशी ज्यू लोकांनी त्यास सुळावर चढविले. पुढे तीन दिवसांनी आदित्यवारी तो थडग्यातून आपल्या जड शरीरासह उठला आणि आकाशात देवाच्या उजवीकडे बसला अशी जुन्या ख्रिस्ती लोकांची भोळी समजूत आहे. म्हणून शुक्रवार हा शोकाचा दिवस आणि  आदित्यवार हा आनंदाचा दिवस मानून देवळातील सर्व आराधनेचे प्रकार ह्या समजुतीस अनुरूपच होतात. चांगल्या शुक्रवाराच्या पूर्वीच्या सहा आठवड्यास लेंट (Lent) हे नाव आहे. हा शब्द सॅक्सन भाषेतील लेनटन् (Leneten) ह्या शब्दापासून आला आहे, लेनिटनचा अर्थ लांबणे व ह्या सहा आठवड्यांत दिवस अधिकाधिक लांबत असतो व रात्र कमी होत असते. ह्यावरून लेंटची संस्था ख्रिस्ताच्याही पूर्वीची असून नंतर तिला ख्रिस्ती धर्माचे स्वरूप आले ते असे,:-……जॉन दि बाप्टिस्ट ह्याने ख्रिस्तास बाप्तिस्मा दिल्यावर ख्रिस्ताने ४० दिवस वनवास भोगिला. चाळीस अहोरात्री त्याने उपवास केला. ह्या अवधीत सैतानाने त्यास अनेक प्रकारे भुलविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. ह्यानंतर ख्रिस्त, लोकांस उपदेश करण्या निघाला. हे चाळीस दिवस आता लेंट ह्या नावाने  पवित्र मानण्यात येत आहेत. हिंदू लोक जसे चातुर्मास साधला नही तरी शेवटची कार्तिकी एकादशी तरी पाळतात तसे इकडेही निदान गुडफ्रायडेच्या दिवशी पुष्कळ बायका, मुले व म्हातारी माणसे उपवास करितात. फराळाचे मुख्य जिन्नस म्हणजे मासे व अंडी हे होत. आमच्याकडे जसे एकादशीच्या दिवशी केळी, रताळी, भुईमूग इ. जिन्नस दोनप्रहरी अगदी महाग होतात. तसेच येथे (डेव्हनपोर्ट हे मासे धरण्याचे मुख्य ठिकाण असूनही) शुक्रवारी सकाळीच बाजारात मासा म्हणजे अगदी दुर्मिळ पदार्थ झाला होता, असे आमच्या घरवालीने सांगितले. अशा प्रकारची व्रते आणि धार्मिकपणा रोमन कॅथोलिक लोकांमध्ये फार आढळतो. संध्याकाळी एका कॅथोलिक देवळातून बाहेर पडल्यावर एका गृहस्थाशी बोलत असताना त्याने म्हटले, “हे प्रॉटेस्टंट लोक इतके उद्दाम आहेत की ते आजदेखील मांस खातात” मग मी त्यास विचारले तुम्ही मासे नाही का खात? ते धार्मिक गृह्थ म्हणाले, “मासे काय प्राणी आहेत?” हे ऐकून मी निरूत्तर झालो!

एकंदरीत हा सण शोकाचा व अनुतापाचा आहे. म्हणून क्वचित काही पापभीरू लोक कसलीही मौज, चैन अथवा करमणूक न करिता घरी स्वस्थ चिंतनात काल घालवितात, पण अशी उदाहरणे दिवसेदिवस दुर्मिळ होऊ लागली आहेत असे दिसते.

सुशिक्षित आणि फॅशनेबल लोकांत तर कोणत्याही प्रकारचे सण पाळणे म्हणजे गावंढळपणाचे लक्षण समजले जाते. हे राष्ट्र अत्यंत उद्यगी लोकांचे असल्यामुळे बहुजनसमाज सुट्टी मिळाल्याबरोबर सहजच ती चैनीत व करमणुकीत घालवितो. हा वसंत ऋतूचा काळ असल्यामुळे फुटबॉल, हॉकी इ. मोकळ्या हवेतले खेळ खेळणे व ते पाहणे ह्या मुख्य करमणुकीखालील वर्गाची मोठी करमणुक म्हणजे दारू पिणे. धर्माधिकारी ह्या सर्वच करमणुकी सरसकट बंद करण्याठी कंठशोष करितात म्हणून त्यांस कोणीही विचारीत नाहीत!

आज सारा  दिवसभर सर्व देवळांत उपासना चालू असतात. सकाळच्या उपासनेस येथील एका प्रॉटेस्टंट मुख्य देवळात गेलो. उपासकांची संख्या १० पुरूष, ३० बायका, १०० मुळे इतकी होती. नेहमी बायकापुरूषांचे प्रमाण बहुतेक असेच असते. कॅथोलिक देवळात पूजेचा संभार विशेष आणि आराधनाक अधिक थाटाचा असतो, तशात जवळच प्लिमथ येथे कॅथोलिक कथीड्रल म्हणजे मुख्य मठस्थान आहे, म्हणून तेथे संध्याकाळच्या मुख्य उपासनेस गेलो. कथीड्रलची इमारत जुनी आणि भव्य आहे. जागोजागी ख्रिस्ताच्या व ख्रिस्ती साधुसंतांच्या अनेक मूर्तींची स्थापना केली आहे. देवळात सर्वत्र शोकचिन्हे दिसत होती. मुख्य गाभा-यातील देव्हारा व त्यातील मूर्ती ह्यांवर काळ्या पडद्याचे झाकण होते. इतर मूर्तीपुढे नेहमी असणारा धूपदीप, पुष्पांचा थाटही आज नव्हता. ह्यामुळे देवळात शिरल्याबरोबर असा काही अवर्णनीय गंभीर देखावा दिसला की लवकरच अंत:करण खेदमय भावाने भरून गेले. पहावे तिकडे ख्रिस्ताच्या दु:खपर्यवसायी चरित्राचे असे प्रदर्शन होत होते की पुण्यशील आत्म्यास पश्चात्ताप घडावा! मग पाप्यांची काय कथा!

७|| वाजता उपासनेस प्रारंभ झाला. प्रत्येक स्त्रीपुरूष देवळात आल्याबरोबर देव्हा-यासमोर गुडघे किंचित वाकवून पुढे जाई. नेमिल्या वेळी बिशपचा छबिना आला. सर्वांपुढे वृद्ध आणि मौनव्रत धारण करणा-या बिशपची स्वारी, त्याच्या मागून ८|१० धर्माधिकारी व त्यांच्या मागून सुमारे ६० गाणा-या मुलांचा मेळा, अशा क्रमाने येऊन सर्व मुख्य गाभा-यात आपापल्या जागी बसले. दोन रांगांच्यामध्ये एका व्यासपीठावर बायबल ठेविले होते त्यातील निवडक भाग प्रत्येक धर्माधिकारी पुढे पूर्वेकडे तोंड करून म्हणजे इतर सर्व उपासकांकडे पाठ करून वाचीत असे. असे सर्व धर्माधिका-यांनी केल्यावर मुख्य कॅननचा उपदेश झाला. त्यात त्याने ख्रिस्तास सुळी देण्याच्या प्रसंगाचे वर्णन केले, त्याच्या रक्ताने भाविक मनुष्याच्या पापाचे क्षालन कसे होते, त्याप्रसंगी जे अनेक चमत्कार घडले ते सर्व अक्षरश: खरे आहेत, त्याविषयी जुन्या ज्यू लोकांच्या करारातही भविष्य आहे इ. इ. गोष्टी त्याने सांगितल्या. त्याचा पोषाक, पायघोळ पांढरी कफनी, छातीवर तांबडे वस्त्र, कंबरेस व दोन्ही बाजूंनी जरीकाठी काळ्या कापडाच्य पट्ट्या, डोकीस मुकुटाकृती काळी टोपी असा होता. व्याख्यानात जेव्हा ख्रिस्ताचे नाव येई तेव्हा तो आपली टोपी उचलीत असे व सर्व उपासक नमन करीत. व्याख्यान आटपल्यावर मेळ्यातील मुलांनी अत्यंत करूण व दीर्घ स्वराने काही गाणी म्हटली. आज कसलेही वाद्य वाजविण्यात आले नाही. ह्यानंतर ख्रिस्ताच्या प्राणोत्क्रमणाची वेळ आली. ह्यावेळी पृथ्वीवर चहूंकडे मोठा अंधार पडला, धरणीकंप झाला आणि मोठा आवाज झाला इ. वर्णन बायबलात आहे. म्हणून आता तसेच करण्यात आले. देवळातील सर्व दिवे ग्यासचे असल्याने ते एकदम नाहीसे केले. पाच मिनिटे चहूंकडे अंधार आणि सामसूम झाले. ह्यावेळी ह्या मोठ्या देवळात सुमारे ३०० लोक होते; पण कोणीही मोठ्याने श्वोसोच्छवास देखील करीना. शेवटी धरणीकंपाची नक्कल करण्यास्तव एका कोप-यातून धडधड असा बारीक आवाज झाला! मग सर्व दिवे एकदम लागले आणि उपासना आटपली!!

प्रॉटेस्टंट देवळात ह्या नकला होत नाहीत, पण व्याख्यानांचा सारांश बहुतेक असाच असतो. युनिटेरिअन देऊळ गुड फ्रायडेच्या दिवशी तर मुळी बंदच होते व इस्टरच्या आदित्यवारी त्यातील दोन्ही उपासना एका ब्राह्माने चालविल्या!