स्वराज्य आणि स्वाराज्य

स्वराज्य हा शब्द अलीकडे महशूर झालेला आहे. स्वाराज्य ह्याचा अर्थ मात्र पुष्कळांस कदाचित माहीत नसेल. स्वाराज्य म्हणजे स्वर्गीय राज्य. स्वर्ग म्हणजे परलोक, पुढील काळाशी त्याचा संबंध, त्याचा विचार आता कशाला ? असे कदाचित कोणी म्हणतील तर त्यांना एवढेच उत्तर की, मी स्वर्ग म्हणजे प्रस्तुतचाच काल व प्रस्तुतचेच ठिकाण समजतो. झेंदावेस्तात सुमनाला स्वर्ग म्हटलेले आहे, व कुमन तो नरक होय. सुमन म्हणजे शोभन मन, सुविचारांनी भरलेले. कठोपनिषदात “यदेव इह तदन्यत्र यदन्यत्र तदिह” असे म्हटले आहे. इथला वाईटपणा, तोच स्वर्गातील वाईटपणा. इथल्या वाईटपणामध्ये व स्वर्गातील चांगल्या-वाईटपणामध्ये काही भेद नाही, पूर्ण ऐक्य आहे. तेव्हा ह्या केवळ पुढच्या गप्पा आहेत, असे आजच्या विषयासंबंधाने वाटू देऊ नये. स्वर्गाचा काही अंश आहे. तो नसेल, तर स्वर्ग पुढेही असणे अशक्य आहे असे मी म्हणतो. स्वर्ग म्हणजे चांगल्या कल्पनांचा समुदाय. त्याच्याच आधारे भावी स्वर्गाची कल्पना करता येते. असो;--
सर्व काँग्रेसमध्ये गेली काँग्रेस श्रेष्ठ, त्यातील सर्व भाषणांमध्ये अध्यक्षांचे भाषण श्रेष्ठ, त्यातही पुढील वाक्य श्रेष्ठ. ते आपल्या मुख्य प्रधानांच्या तोंडचे आहे. Good government is no substitute for self government. म्हणजे चांगले राज्य हे स्वराज्याचा मोबदला नव्हे. स्वराज्याचा मोबदला सुराज्याने होणे नाही. आजच्या व्याख्यानात स्वराज्य आणि सुराज्य ही परस्परविरुद्ध आहेत, ह्यांच्यात चिरविरोधच आहे, की ती तशी नसून परस्परांना दुजोरा देणारी, एकच आहेत, म्हणजे त्यांचे सहकार्य, ऐक्य आहे, ह्याचा विचार करणे आहे. आणि प्रयत्न असा करावयाचा आहे—व्याख्यात्यांनीच नव्हे, तर देवाच्या घरात जे बसलेले आपण, त्या श्रोत्यांनीही—की ती एकच आहेत. माझ्याकडे फक्त निकाल उघड करण्याची कामगिरी आली आहे. पण (फुट नोट- इंदूरास दिलेल्या व्याख्यानाचा सारांश. सुबोध पत्रिका १२-०५-१९०७) आपण सर्वांनी मनात विवेचन करून पडताळून पहायचे आहे. स्वराज्याचा अर्थ वर्तमानपत्रातून केला जातो की आमच्या लोकांचे राज्य. अरे पण आमचे लोक ते कोणते ? कोणाला म्हणायचे आमचे लोक ? आमच्या लोकांची कल्पना कोणती ? हे आमचे लोक व हे परकीय असे कसे निवडून काढायचे ?

ब-याच देशांचे इतिहास ब-याच सुव्यवस्थित रीतीने उपलब्ध आहेत. इजिप्शियन, असिरिअन, बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन ह्या लोकांनी राज्य केले, बळ गाजविले, ते ते स्वराज्य होते काय ? ग्रीसचे एक उदाहरण घ्या. किती लोकांचे स्थानांतर झाले, नव्या लोकांनी जुन्या रहिवाश्यांना जुलमाने आपल्यात घेतले. त्यात पुनः स्पार्टन, अथिनियमन, कॉरिथियन निराळे. आपण ज्या राज्याकडे पाहून स्वराज्याची कल्पना बांधितो, ते ब्रिटिश हे नाव तरी संमिश्रणाचे नाही असे तरी कोणी म्हणेल काय ? अँग्लो-सॅक्शन्समध्ये अँगल्स निराळे व सॅक्सन्स निराळे. ह्यावरून हे दिसून येईल की कोणता भाग आमच्या बाहेर टाकावयाचा हे ठरविणे कठीण आहे. सर्वत्र लोक एकमेकांत मिसळत चालले आहेत. ह्या वाढत्या विकासात अशी पायरी सांगता येते काय की तेथे स्वराज्य दृष्टीस पडेल. आम्हांस स्वराज्य पाहिजे असे म्हणताना लोकसत्तात्मक राज्य पाहिजे असे म्हणण्याचा सध्या इरादा नसतो. आम्हांला आमचे राज्य पाहिजे असा हेतू. पण असे पहा, असे कधी झाले आहे काय ? ह्या हिंदुस्थानातच पुष्कळांनी पुष्कळ राज्ये केली आहेत. पण ती आपली नव्हती. कोणी तरी येऊन राज्य केलेल, पण त्याच्या संबंधाने त्यावेळी लोकांची आपलेपणाची सीमा वाढलेली असे.  हा आपलेपणा असीम, खरोखर निराधार आहे.

स्वराज्याचा दुसरा अर्थ घेऊ. आम्हांला लोकसत्तात्मक राज्य पाहिजे. म्हणजे १० ख्रिस्ती, १५ मुसलमान, २७ हिंदू असे मिश्रित, किंवा अमिश्रित लोकांचे राज्य असावे. ह्या अर्थाने तरी लोकसत्तात्मक राज्य इतिहासात झाले आहे काय ? काही अंशाने इंग्लिशांचे तसे आहे. पण त्या पूर्वीचे रोमन राज्य घ्या. त्याची सूत्रे फक्त रोमच्या रहिवाशांच्या हाती. ग्रीसचे घ्या. उदाहरणासाठी एक गोष्ट सांगतो, पोरीक्लिस म्हणून एक पराक्रमी ग्रीक मुत्सद्दी होऊन गेला. त्याचेवर त्याच्या बायकोचे वजन होते. बायको अगदी लहरी असे. तिचे लहरी प्रेम तिच्या कुत्र्यावर होते. तेव्हा विनोदाने असे म्हटलेले आहे की ग्रीसचे राज्यसूत्र एकेकाळी कुत्र्यावर अवलंबून होते. ह्यावरून हा साधारण नियम उघड होतो की चार पुढारी एकत्र होतात, ते टेहळतात, आपली व्याख्याने, आपले विचार लोकांस सांगत फिरतात, ह्यामुळे त्यांची लोकांवर छाप बसते व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्याचे सुकाणू फिरते. इंग्लंडात तरी पहा, लोकसत्तात्मक राज्य पुरे आहे काय ? तेथे बायकांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक, तरी बायकांना तेथे राज्य नाही. त्यांनी पार्लमेंटगृहात जाऊ म्हटले, तर पोलीस लोक त्यांस बाहेर ढकलून देतात. बाकीच्या अर्ध्यातून किंवा अर्ध्याहून कमीच लोकांतून गरीब लोक –की, ज्यांच्यापाशी एक पैसा किंवा एक पैही नाही व मिळविण्याचे सामर्थ्य नाही—वगळले पाहिजेत. बरे, अमेरिकेचे उदाहरण घ्या. तेथे तरी हीच त-हा ! बायकांस व निग्रोंस राजदरबारी मज्जाव, तेव्हा स्वराज्याच्या आतापर्यंत घेतलेल्या दोनही अर्थाने स्वराज्य आतापर्यंत नीट रीतीने झालेले नाही.

आता स्वाराज्य घ्या. आपल्याकडे रामराज्याची कल्पना आहे. राजाला कर नको आहे, लोक तो घ्या म्हणताहेत, देशामध्ये चोर नाही, म्हणून पोलीसही नाही, असे दंतकथेतील स्वाराज्य, तसेच पाश्चात्यांची “Utopia” युटोपियासारखी कल्पना म्हणजे भावी सुखाशेचे राज्य, शिवाय सोशियालिस्ट, कम्युनिस्ट ह्यांनी सध्या प्रयोगही करून पाहिले आहेत. तीही अशीच कल्पना की, उत्पन्नावर सर्वांचे हक्क सारखे असावेत. आमच्यामध्ये मताचे पंथ तर पाश्चात्यांत कृतीचे निघाले आहेत. पण ह्याही कल्पनेस, यश यावे अशी माझी, तुमची सर्वांची इच्छा आहे तरी, अद्यापि ते आले नाही. सात्विक कल्पना मात्र ही खरी की कधी कोणी कोणाशी वैर करीत नाही, कोणी कोणाचे मन दुखवीत नाही. सगळे बंधू, सगळ्या बहिणी, सगळी संपत्ती सर्वांची. राजा नाही, तेव्हा ह्याला राज्य म्हणावे की नाही ह्याची तरी शंकाच येते. पण असे जे स्वाराज्य, ते मागे कधी झाले नाही, ह्यापुढे तरी होईल कशावरून ? तेव्हा “न भूतो, न भविष्यति” असे काही तरी घेऊन रिकामा कंठशोष कशाला ?

पण आता विधिबाजू घेऊन पाहू. मी म्हणतो की मनुष्याच्या सर्व खटपटीचा ओघ सनातन काळापासून, स्वराज्य आणि स्वाराज्य एक करण्याकडे चालत आला आहे. ब्राह्मसमाजाची मोक्षाची कल्पना काय आहे ? तर अनंत उन्नतीची. ही कधी झाली आहे काय ? नाही. पुढे होईल काय ? नाही. पण ह्याबद्दल अंतरीचा अनुभव, साक्षात्कार मात्र आहे की, आपली अनंत उन्नती होत रहाणार, तोच प्रकार येथे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले राज्य आपणावर केले पाहिजे, तेच खरे स्वराज्य—स्वाराज्य किंवा सुराज्यही पण तेच. तथापि सर्वांत श्रेष्ठ जी काँग्रेस, त्यातील भाषणात असे असावे की स्वराज्य व स्वाराज्य भिन्न नाही. जी गोष्ट आपणाला पाहिजे त्याच्याविषयी आपली शुद्ध कल्पना नको काय ? नाही तर स्वराज्य न देणा-याच्या मनात यावे की ह्यांना वाईट राज्य पाहिजे ते देऊ नये. मागणा-याच्या मनात आम्हांला आमचे राज्य पाहिजे. अशा गैरसमजुतीने कार्य कसे होईल ? बरे स्वराज्य एकेक व्यक्तीनेच करणे किती कठीण आहे ? आपणाशिवाय जगातील सर्व लोक नष्ट झाले असे समजून, आपण आपल्याच नियमांनी चालू असे ठरवून त्याप्रमाणे चालणे जर कठीण, तर आम्ही सर्व लोकांचे नियमन करू म्हणणे हास्यास्पद नव्हे काय ? तर प्रत्येकाने एवढी दृष्टी ठेवली तरी पुष्कळ काम झाले की जे सदाचाराचे नियम ते आपण आपल्या संबंधात अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. जे श्रेय तेच प्रिय करून घ्यायला पाहिजे, घेतले पाहिजे. ज्ञानदृष्टीने श्रेय, तेच खरोखर प्रिय व्हावे. गुरुत्वाकर्षण, रेषाकर्षण, परमाणु परमाणूंमधील आकर्षण ह्यांचे नियम जसे युक्तीने सिद्ध झाले आहेत, तसेच सात्विकपणाचे नियम सिद्ध झाले आहेत काय ? होय, झाले आहेत. “सर्वाणि भूताणि आत्मवत् पश्य ।” जे तुला प्रिय आहे, तेच दुस-याला प्रिय आहे असे समजून त्याप्रमाणे वाग. हा सदाचाराचा एक प्रमुख अढळ नियम. भौतिक नियमात पालट होत आहेत, पण धर्माचे, नीतीचे, आत्म्याचे जे काही नियम, ते त्रिकालसिद्ध होत. त्याबरहुकूम ज्याने त्याने स्वतःचे वर्तन ठेवणे ते स्वाराज्य होईल. हे नाही, तोपर्यंत एकाने आम्हांला स्वराज्य द्या म्हणावे व दुस-यांनी म्हणावे तुम्हांला स्वाराज्य देतो, ह्यापासून उद्दामपणा, अभिमान, अज्ञान दोन्ही पक्षांकडे अशुद्ध हेतू मात्र दृष्टीस पडतात. भांडणाचीच स्थिती कायम राहणार. “आपल्या मते पिसे । परि ते आहे जैसे तैसे ।।” ते ह्याची योजना आपल्याकडे सत्य, वास्तविक स्थिती ह्याअर्थी करतात. स्वराज्य व स्वाराज्य ही एक वास्तविक स्थिती आहे. अशा स्वराज्याचा व स्वाराज्याचा अनुभव साधुसंत सनातन काळापासून घेत आले आहेत. ज्याचा अधिकार असेल त्याला ह्यातील ऐक्य समजून येणार आहे. ज्याचा नसेल त्याला ते कधीच कळून येणार नाही.