सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी ह्या आध्यात्मिक चळवळी असतात. आपण कोठूनही सुरूवात करा, आपण एकाच उगमापाशी जाऊन पोचतो आणि तो उगम म्हणजे आध्यात्मिक होय. मी ब्राह्म समाजाच्या तत्त्वावरील आपल्या अलिकडील व्याख्यानात महात्मा गांधी ह्यांना हिंदुस्थानातील नवयुगाचे जनक जे राजा राममोहन रॉय त्यांचे नवीन अवतार म्हणून संबोधीत असतो. करिता आपण राजा राममोहन रॉय व महात्मा गांधी ह्यांचे चरित्र व चारित्र्य ह्यांकडे दृष्टी द्या म्हणजे माझ्या विधानातील भावार्थ आपल्या बरोबर लक्षात येईल. राजा राममोहन रॉय ह्यांनी धर्मापासून प्रारंभ करून शेवटी व्यवहार्य धर्माचे सार जे उच्च राजकारण त्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्राचा शेवट केला; उलटपक्षी महात्मा गांधीनी प्रथम राजकारणाच्या प्रवाहात उडी घातली, पण शेवटी ते प्रस्तुत काळातील जो उच्चतम धर्म त्याच्या कडेस लागलेले आहेत. ध्येयात्मक प्रयत्नांचे अशा प्रकारे ऐक्य झालेले आहे.
परंतु समाजसुधारणेचे कार्य आमच्या देशात जे इतक्या सावकाशीचे व अल्पप्रमाणात प्रगती करीत आहे त्याच्या आणखी एका कारणाचा (माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या अशा कारणाचा) अद्यापही उल्लेख करावयाचा आहे. आणि ते म्हणजे शुद्ध सामाजिक सुधारणेचे म्हणविले जाणारे कार्य अद्यापही बुद्धिपुरस्सर धर्मापासून अलिप्त ठेवले आहे, हे होय. कै. आगरकरासारखे जुन्या परंपरेतील समाजसुधारक ह्या कार्याची उभारणी अद्यापही उपयुक्ततावाद युक्तिवाद, भूतद्या वगैरे दुस-या कोणत्याही तत्त्वावर करण्यास तयार असतात. पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्यास तयार नाहीत. त्यांना एक तर अशा प्रकारच्या धार्मिक मनोवृत्ती नसतात किंवा असलय् तरीही त्यांच्या उपयोग करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. आणि अशा त-हेची ही धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकामध्ये असावी ही अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे, इतके तरी निदान म्हटल्यावचून माझ्याचाने रहावत नाही.
सांप्रदायिक अस्पृश्यता
साता-याच्या प्रांतिक सामाजिक परिषदेमध्ये अध्यक्षांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधाने अधिकारयुक्त विवेचन केले. जोतिराव फुले ह्यांनी हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेपुढे प्रथम जरी ठेविला असता तरी अलिकडच्या वीस-पंचवीस वर्षातील काळात ह्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार करून लोकांमध्ये जागृती उत्पन्न केल्याचे श्रेय जर कोणा एका व्यक्तीस देत येत असले तर ते शिंदे ह्यासच दिले पाहिजे. अस्पृश्य लोकासंबंधाने होत असलेला अन्याय किती थोर आहे हे त्यांनीच दाखवून दिले असून ह्या विषयाची जागृती त्यांनीच सर्व हिंदुस्थानात प्रथम केली. त्या दृष्टीने पहाता त्यांच्या पुढील उद्गारास महत्त्व फार आहे. (संपादक.)
ह्या विशिष्ट प्रकारच्या अन्यायाला जे बळी पडलेले आहेत त्यांच्यामध्ये याबद्दलची जी जाणीव व जागृती उत्पन्न व्हावयास पाहिजे, ती उत्पन्न करण्याचे प्राथमिक काम बहुतेक यापूर्वीच होऊन चुकले आहे.
आता आम्हास सोडवावयाचा बिकट प्रश्न विचार प्रांतातला नसून तो इच्छा प्रांतातला आहे. आता ह्यापुढे ह्या प्रश्नाचा आणखी ऊहापोह व्हावयास पाहिजे अशातला प्रकार नाही. पण आमच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर कसे व्हावे हाच काय तो प्रश्न आहे. त्यासंबंधीचे आमचे विचार कितीही पूर्णत्वास पोहोचले तथापि त्यांच्या योगाने आमच्या हातून प्रत्यक्ष कृती घडण्यास जी इच्छाशक्ती अवश्य आहे, ती आमच्यात प्रादुर्भूत होईल असे म्हणता येत नाही. ह्यासंबंधाने विचार करिता अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की, लाला लजपतराय ह्यांच्यासारख्या प्रसिद्ध पुढा-याच्या नेतृत्वाखाली भरलेल्या हिंदुसभेतही हा प्रश्न निर्णयाकरिता अजूनही शास्त्रीपंडिताकडे सोपविण्यात यावा. ह्या प्रश्नाच्या निर्णयाला जर कोणी अगदी नालायक असेल तर ते हे शास्त्रीपंडितच होय. ह्यांच्या अंगचा मोठा गुण म्हटला म्हणजे त्यांची विद्वत्ता. पण हा प्रश्न तर पडला अत्यंत निकडीच्या व्यवहारातला, तेथे नुसती विद्वत्ता काय कामाची? शिवाय अशा प्रश्नांचा निर्णय करण्यास जी नि:पक्षपात बुद्धी असावयास पाहिजे ती त्यांच्या अंगी असणे शक्य नाही. त्यांच्या पोशिंद्याच्या पसंतीवर त्यांची सारी भिस्त असणार. दुसरे सांप्रतची कायदेकानूची पुस्तके वेगळी व ज्यांच्यावर ह्या शास्त्रीपंडिताची सारी मदार ते स्मृत्यादी ग्रंथ वेगळे. हे स्मृत्यादी ग्रंथ म्हटले म्हणजे त्या त्या प्राचीन काळी जे जे प्रघात अथवा रूढी प्रचारात असत त्यांच्या नोंदीची पुस्तके अगर पोथ्या, त्यांच्या अर्वाचीन कालच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या उलगड्यास उपयोग होण्याचा संभव बहुतेक थोडाच असणार. शेवटची मुद्याची गोष्ट ही की, ह्या दुर्दैवी अस्पृश्य वर्गाविषयी ह्यांना बिलकूल सहानुभूती नसून उलट आपले अभिप्राय त्यांना प्रतिकूल असल्याचे त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखविले आहे. अर्वाचीन कालची राजनीती नि:पक्षपाती म्हणतात, पण तेथेही पहावे तो न्यायाधिशाचा कल अनूकूल असल्याची शंका असल्यामुळे खटला वर्ग केल्याची उदाहरणे घडून आलेली आहेत. मी विचारतो की, हा अस्पृश्यांचा प्रश्न जर शास्त्रीपंडिताकडे सोपवावयाचा तर पतितपरावर्तन, हिंदुमुसलमानातील एकी, हिंदूंची संघटना इत्यादी प्रश्नही त्यांच्याकडेच निर्णयाकरिता का सोपवू नयेत? आपला इतका छळ होत असूनही आपल्याला आदिहिंदु म्हणवून हिंदुधर्माविषयीचा आपला आपलेपणा जे जाहीर करीत आहेत, त्यांना निदान ख्रिस्ती वगैरे अन्य धर्माचा आश्रय करणा-यांच्या बरोबरीने वागविणे हे आपले कर्तव्य आहे, इतकेही हिंदुसभेला वाटू नये काय? धर्मांतर केलेले आदिहिंदु आणि आपणास अद्याप हिंदु म्हणविणारे आदिहिंदु ह्यांच्या बाबतीत असा भेदभेद का करावा? तात्पर्य ह्या सर्व प्रकाराचे मूळ शोधू गेल्यास त्या बाबतीत आमच्या अंत:करणात उत्कट इच्छेचा पूर्ण अभाव आहे हेच कबूल करावे लागेल.
साता-याची प्रांतिक सामाजिक परिषद,-एक प्रतिक्रिया,
साता-यास भरलेल्या सामाजिक परिषदेसंबंधाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्यांपैकी एक विशेष गोष्ट म्हणजे रा रा. वि. रा. शिंदे ह्यांची अध्यक्षांच्या जागी झालेली नेमणूक ही होय.
साता-यासारख्या ठिकाणी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद जोरात आहे. ब्राह्मणेतर पक्षाचे एक वृत्तपत्र रा. शिंद्यांना ‘गुरूवर्य’ ह्या नावाने संबोधित असते व स्पृश्य व अस्पृश्य वर्गातील काही लोक त्यास कर्मवीर अण्णासाहेब शिंदे म्हणीत असतात. अशा ब्राह्मणेतर व्यक्तीस दोन * “नीच-हृदयी” चित्पावन ब्राह्मण अध्यक्षपदी विराजमान होण्याचे आमंत्रण देतात, ही गोष्ट ह्या दोघा व्यक्तींपैकी एका नीच-हृदयी ज्यात म्हटले होते असे पत्र प्रसिद्ध करणा-या संपादकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे.
सामाजिक परिषदेचे सेक्रेटरी-दादासाहेब करंदीकर नुकतेच सेक्रेटरी झालेले व पैसा आणि वर्ण ह्या पलिकडे न पाहाणारा असा माणूस ह्यामागील अंकात ज्यांनी लिहिले आहे ते.
रा. शिंदे ह्यांनी अल्पावकाशात आपले भाषण तयार केले व ते नेहमीच्या वहिवाटीप्रमाणे प्रचारातील विषयावर चार उत्तेजक विचारांनी सजविलेले असे न करिता विचारास चेतना देणारे असे केले ह्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.
बळी तो कान पिळी
गुलामांचा व्यापार, सतीची अमानुष चाल वगैरे बंद करण्याच्या कामी जसे कायद्याचे साहाय्य मिळाले तसेच ह्याही बाबतीत मिळवू म्हटले तर तोही मनु बहुतेक पालटल्यासारखाच दिसतो. इतकेच नाही तर वायकोम येथे घडलेला प्रकार मनात आणिता, कायद्याकडून नको त्या पक्षालाच साह्य मिळू पहात आहे. अशा स्थितीत अन्यायाला नाहक बळी पडत असलेला हा अस्पृश्य वर्ग व त्याचे प्रतिपक्षी ह्यांच्यातील लढा ‘बळी तो कान पिळी’ ह्या न्यायानुसार नुसत्या परस्परांच्या बाहुबलांच्या उणे अधिकपणावरच निकालात लावण्याचा प्रसंग आम्ही येऊ देणार काय?