परमार्थाची प्रापंचिक साधने-५

येउनि नरदेहा झाकितील डोळे| बळेंचि अंधळे होती लोक||
उजेडा सरशी न चलती वाट| पुढील बोभाट जाणोनिया||
तुका म्हणे जाऊ सादवीत वाट| भेटे तरी भेटो कोणी तरी||

मागे चार वेळां ईश्वरावरील श्रद्धा, भक्ती, त्याची उपासना आणि तद्वारा आपली मुक्ती ह्या चार परमार्थांची, अनुक्रमे मनुष्यमात्रासंबंधी आदरभाव, स्नेह, सेवा आणि मनाची प्रसन्नता ही चार प्रापंचिक साधने कशी आहेत, ह्याचा विचार केला. ह्याचा उद्देश प्रपंच आणि परमार्थ ह्यांची एकवाक्यता करणे हा होता. आता त्याच गोष्टीचा सामान्य विचार करू.

पुष्कळांना परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने करणे आवडत नाही. जुन्या लोकांना तर तो नास्तिकपणा वाटतो. आणि काही अहंमन्य लोकांना त्यात जडवाद दिसतो. तुकारामाच्या समकालीन साधूंचाही कल परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने करण्याच्या विरूद्ध असे. तुकारामाने मात्र काही अभंगांत परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने केला आहे. त्यापैकी वर लिहिलेला अभंग होय. त्याचा अर्थ ह्या जन्मामध्ये सर्व गोष्टी साधता येतात. प्रत्यक्ष प्रकाश ह्या नरदेहातच दिसतो. असा लाभ पुनरपि मिळणे शक्य नाही. पुष्कळ वळसे घेतल्यानंतर आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. आपण ह्या मार्गाने जात आहे हे लोकांना कळविण्याकरिता सादवीत म्हणजे आरोळ्या मारीत जाऊ. कोणी येवोत वा न येवोत. ‘संवसाराते तुझी आले हो आईका| तुटीचे ते नका केणे भरू||’ ह्याही अभंगात तुकाराम म्हणतात, ह्या संसाररूपी बाजारात खोटा जिन्नस भरू नका. खरे खोटे सांगणा-यांची मदत घ्या. वर वर चांगला दिसणारा माल साठवू नका. विसार देऊन उधार घेऊ नका. ह्या जन्माचा विचार पुढल्या जन्मी करू, असे म्हणू नका. रोख ठोक व्यापार करा. हे दोन आणि असे इतर काही थोडेसे तुकारामाचे अभंग अपवादादाखलच असल्यासारखे आहेत. एरवी त्यांनीही तत्कालीन ओघाला अनुसरून वेळोवेळी उद्गार आढले आहेत. ते एका अभंगात म्हणतात:

प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही| एकही निदानी न घडे त्यासी||
दोन्ही पेवांवरी ठेवू जाता हात| शेवटी अपघात शरीराचा||
तुका म्हणे तया दोन्हीकडे धका| शेवटी तो नरकामाजी पडे||
संसारसंगे परमार्थ जोडे| ऐसे काय घडे जाणते नो||

ह्याही अभंगात तुकाराम म्हणतात: गुरांनी खाऊन टाकलेल्या चिपाडामध्ये गोडी नसते किंवा ढेकणांनी भरलेल्या बाजेवर झोप येत नाही. त्याप्रमाणे ह्या संसारात राहून परमार्थ साधता येत नाही. संसारातून काखा वर करा, म्हणजे परमार्थाच्या गोष्टी समजतील. तुकारामाचाच काय, तर सर्व देशांतील सर्वकालीन धार्मिक लोकांचाही साधारण समज असाच असतो. पण साधू, भोंदू, साव, चोर ह्या सर्वांमागे संसार हा लागलेलाच आहे. माशाला पाण्याबाहेर रहाणे कदाचित शक्य होईल, पण मनुष्याला संसाराबाहेर राहता येणार नाही. म्हणून परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीनेच करणे हे अत्यंत जरूर आहे. ह्या प्रापंचिक दृष्टीच्या उलट असणा-या लोकांचे तीन प्रकार आहेत.

पहिला प्रकार विज्ञानवादी लोकांचा. ह्या लोकांना कोणत्याही गोष्टीचा विचा साध्या व्यावहारिक दृष्टीने करण्यात मोठा हलकेपणा वाटतो. एकदा एका मनुष्याने झाडाच्या एका बुंध्यावर बसलेली खार पाहिली. ती लगेच बुंध्याआड झाली म्हणून तिला पुन: पाहण्यासाठी तो बुंध्याभोवती वळसे घेऊ लागला. भीतीमुळे ती खारही बुंध्याला वळसे घालू लागली. ह्याप्रमाणे दोघांनीही झाडाभोवती कितीही फेरे केले, तरी त्या मनुष्याला ती खार काही दिसेना. हा प्रकार चालला असता त्या ठिकाणी चार विज्ञानवादी शहाणे जमले. आणि त्या मनुष्याची त्या खारीभोवती प्रदक्षिणा झाली किंवा नाही, ह्याविषयी त्यांच्यामध्ये मोठ्या कडाक्याने वाद सुरू झाला. एक पक्ष म्हणे ज्यअर्थी एकदा दिसलेली खार त्या बुंध्यावर फिरत होती आणि मनुष्य हा बुंध्याभोवती घिरट्या घालीत होता, त्याअर्थी एकदाच काय पण पुष्कळ वेळां त्याच्या तिच्याभोवती प्रदक्षिणा झाल्या. अशा रीतीने वाद मिटणे काय पण पुष्कळ वेळां त्याच्या तिच्याभोवती प्रदक्षिणा झाल्या. अशा रीतीने वाद मिटणे अशक्य झाले. कारण दोघांचीही दृष्टी व्यावहारिक नव्हती हे होय. प्रदक्षिणा ह्या शब्दाचा अर्थ खार स्थिर असताना तिच्या पूर्व, उत्तर, पश्चिम, दक्षिण बाजूने जाणे असा घेतला तर त्या माणसाची प्रदक्षिणा झालीच नाही. पण तिने व्यापलेल्या प्रदेशाच्या भोवती जाणे ह्या अर्थाने पाहता प्रदक्षिणा पुष्कळ झाल्या. ह्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा निर्णय करण्याला तिच्यापासून आपल्यास व्यावहारिक कोणता फायदा, गैरफायदा व्हावयाचा आहे ह्याकडे लक्ष पुरवावयास पाहिजे. जेथे हे धोरण नसते आणि केवळ मोघम सत्य स्थापित करण्याची सवय लागलेली असते, तेथे निर्णय होत नाही. किंबहुना निर्णयाची खरोखर जरूरीच नसते, अशा प्रकारच्या अव्यवहार्य विज्ञानवादाने फुरसतीच्या वेळी मानवी मनास केव्हा केव्हा व्यायाम आणि एक प्रकारचे सुखही होते. पण व्यावहारिक रीतीने आणि व्यावहारिक सत्य शोधून काढण्याच्या कामी ह्या व्यायामाचा आणि सुखाचा काहीच उपयोग होत नाही. युरोप, अमेरिका इत्यादी सुधारलेल्या पाश्चात्य देशांमध्ये प्रो. जेम्स आणि शिलरप्रभृती तत्त्वज्ञ लोकांनी ह्या अव्यवहारी विज्ञानवादावर अलीकडे मोठा जोराचा हल्ला चालविलेला आहे. हा मोघम विज्ञानवाद खोटा आणि निरूपयोगी आहे, संसारातील सर्व गोष्टींचा साधकबाधक दृष्टीनेच विचार करावा आणि सत्याचाही शोध ह्याच मार्गाने लागेल, अशा अर्थाचे निनिराळ्या भाषेमध्ये त्यांचे मोठमोठाले सुंदर ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. ह्या नवीन दर्शनाची “Progmatism, Humanism” इ. नावे आहेत. ईश्वरावर विश्वास ठेविल्याने मनाला तात्काळ शांती मिळते. व्यावहारिक फायद्याकडे पोहोचविण्यात कोणत्याही प्रकारचा हलकेपणा नाही. उलट, “ब्रह्मज्ञान्याघरी भक्तीचा दुष्काळ| शब्दांचा सुकाळ खटाटोप|” ह्या वचनामध्ये तुकारामानेही आपला कल व्यावहारिक दृष्टीकडेच दाखविला आहे. मोठमोठे शब्द आणि कल्पनाही शून्याहीपेक्षा कमी आहेत. विज्ञानाच्या भपक्याने आमचे व्यावहारिक हितसंबंध निस्तेज झाले आहेत, ते पुन: सतेज केले पाहिजेत. दूरच्या गोष्टींचा मोघम विचार करणा-यांच्या हातून हिसकावून घेऊन, ते आमचे हितसंबंध व्यावहारिक दृष्टीने विचार करणा-यांच्या हाती दिले पाहिजेत. धर्मगुरू आणि मठाधिपती हे आपल्या मतलबासाठी ह्याच्या आड येतील पण त्यांना जुमानू नये. आम्ही प्रापंचिकांनी विज्ञानाला कायमचा नमस्कार ठोकला तरी बरेच.

दुसरा प्रकार दैववादी लोकांचा. ह्यांना स्वत्वाची किंवा व्यक्तिस्वातंत्र्याची चाड नसते. पराधीनपणात त्यांना सुख आणि समाधान वाटते, आणि आपल्यावरील कर्तव्य-जबाबदारीचा बोजा उतरला असे वाटते. हरी असेल तर देईल म्हणून ते खाटल्यावर स्वस्थ बसलेले असतात. जणू काय आपले अस्तित्व स्थापन करण्याची जबाबदारी राखण्यासाठी ह्या परपुष्ट लोकांना खुष ठेवणे हरीलाच जरूर आहे. दैववादी नुसते आळशीच असतात असे नाही, तर काही अगदी भोळे असतात. त्यांना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणे म्हणजे ईश्वराचे अपार सामर्थ्य न ओळखून त्याचा एक अपराध करणेच आहे असे वाटते पण ही मोठी चूक आहे.

कसरतीच्या खेळामध्ये एकादा डोंबारी आपण उताणा पडून आपल्या हातापायांवर दोघाचौघांना सावरून धरून त्यांच्या खांद्यावर दोन-चार मुले देऊन एक मनुष्यप्राण्याची अजब इमारत आपल्या अंगावर तोलून धरलेली अशी दाखवितो. पण ती माणसे सर्वांचे खाली पडलेल्या डोंबा-याच्या आधीन असतात. एकादा इंजिनियर दगडाची एक मोठी इमारत रचून आपण वेगळा झालेला असतो. एकदा कळाशी साधल्यावर ते दगड इंजिनियरवर अवलंबून नसतात. ह्यावरून त्याच्यामध्ये डोंबा-याच्या हातापायांवर उभे राहिलेल्या माणसांहून अधिक स्वाधानता असते. एकदा माळी लहानमोठ्या झाडांची एकदी सुंदर बाग निर्माण करतो. पाणी घालून एकदा वाढवून दिल्यावर ती झाडे पुढे आपल्याच वाढीने वाढू लागतात, म्हणून त्यांच्यामध्ये वरील इमारतीच्या दगडांहूनही अधिक स्वाधीनता असते. एकाद्या गुरूकुलामध्ये अनेक शिष्य काही काळपर्यंत गुरूच्या हाताखाली शिकून तयार होऊन पुढे ते पूर्ण स्वाधीन सदगृहस्थ बनतात. ह्या चार उदाहरणांवरून आपल्या आश्रितांना स्वाधीनता देण्यामध्ये
डोंबा-याहून इंजिनियर श्रेष्ठ, त्याहून माळी श्रेष्ठ आणि सर्वांहून गुरू श्रेष्ठ हे उघड होते. आता सर्व गुरूंचा जो आदि गुरू अखिल विश्व चालविणारा विश्वेश्वर तो ह्या डोंबा-याहून कनिष्ठ किंवा ह्या गुरूहून श्रेष्ठ म्हणावयाचा? आम्ही सर्वस्वी पराधीन व्हावे अशी त्याची इच्छा असल्यास तो डोंबा-याहून कनिष्ठ आणि अंती आम्ही स्वतंत्र अथवा मुक्त व्हावे अशी त्याची इच्छा आणि धोरण असल्यास-आणि ते तसेच खास आहे-तर तो सर्वांहून अनंतपटीने श्रेष्ठ असा आहे.

तिस-या प्रकारचे लोक वैतागी असतात. गृहकलह, देशकलह, राष्ट्रकलह, यशापयश, अनेक खासगी आणि सार्वजनिक निराशा आणि अपमान इत्यादिकांमुळे त्यांची मने भंडावून गेलेली असतात, आणि त्यांची आयुषअयात अरूची झालेली असते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार मिरविणे म्हणजे त्यांच्या दु:खावर डाग देण्यासारखे त्यांना होते. तथापि ही त्यांची वृत्ती सत्याची खूण नव्हे. ती आमच्या स्वाभाविक स्थितीचे द्योतक नव्हे. संसारात कितीही हालअपेष्टा आल्या तरी आपल्यामध्ये जी एक साहजिक विनोदवृत्ती असते, तिला बाधा येऊ देऊ नये. लहान मुलांमध्ये उचंबळणारा आनंद, त्यांचा कौतुकी स्वभाव आणि साहजिक सहनशक्ती आपण होता होईतो कायम ठेवीत गेले पाहिजे. निदान आपल्या व्यक्तिविषयक वैतागाच्या पायावर आपले तत्त्वज्ञान रचू नये, आणि कोणी तसे ते रचल्यास इतरांनी त्यास का उगाच बळी पडावे?

आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून आम्ही ज्या प्रपंचामध्ये वावरत आहो, त्याची थोरवी आणि पवित्रता ध्यानात येईल. प्रपंच म्हणजे बेडी किंवा बंदिवास नव्हे. प्रथमपासून शेवटपर्यंत गर्भवासाच्या पूर्वापासून स्मशानयात्रेच्या पलीकडे हा अनंतमार्गाचा प्रपंच म्हणजे आमच्यापुढे ईश्वरानेच आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उभारलेली एक शिडी आहे. तिच्यातील कोणत्याही पायरीची अवहेलना करणे म्हणजे ईश्वरी योजनेसंबंधाने आक्षेप घेणे होय, मग सर्वच शिडीविषयी तिरस्कार दाखविणे म्हणजे धर्माच्या नावावर धर्मलंडपणा माजविणे होय. प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नाही. ती शब्दांनी मात्र भिन्न, पण वस्तुत: एकच व अभेद्य आहेत. ही द्वंद्वाची भाषाच आमच्या तोंडातून निघून गेली पाहिजे. धार्मिकांनी आपला सोवळेपणा टाकला पाहिजे. बाह्य सृष्टीभोवतालचा संसार, आणि आपले मन ही सर्व ईश्वरमय आहेत, ईश्वराच्या वस्तीने ती क्षणोक्षणी पवित्र होत आहेत असे जाणून आम्ही सदा नम्र आणि सुखी असले पाहिजे.