आम्हांस कळविण्यास फार वाईट वाटते की, रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांचे तीर्थरूप रा. रा. रामजी बसाप्पा शिंदे ह्यांना आपल्या वयाच्या ७४ व्या वर्षी गेल्या सोमवारी तारीख २७ जून रोजी देवाज्ञा झाली. हे आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर काही दिवस हिंडत फिरत होते. परंतु नंतर त्यांची प्रकृती क्षीण होत जाऊन गेल्या सोमवारी त्यांचा अंत झाला. रा. रामजी बसाप्पा हे मूळचे अगदी जुन्या वळणातले. तरीपण आपल्या चिरंजीवाच्या विचारांचा त्यांचा मनावर इष्ट परिणाम इतका झाला होता की, त्यांची जुन्या विचारांवरील श्रद्धा उडाली होती. एवढेच नव्हे तर गेल्या एप्रिल महिन्यापर्यंत निराश्रित मिशनचे हिशेब ठेवण्याचे काम ते मोठ्या दक्षतेने करीत होते. त्याचप्रमाणे निराश्रित बायांना एकत्र करून त्यांस पुराण सांगणे व उपदेश करणे हेही काम ते वारंवार करीत असत. त्यांच्यासारख्या जुन्या वळणातील इसमाने ह्या कार्याला आपल्याला वाहवून घेणे ही एक विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. रा. विठ्ठलराव ह्यांच्या मातोश्री व तीर्थरूप दोन तीन महिन्यांच्या अंतराने परलोकवासी झाल्यामुले ह्यांच्यावर संसाराचा सर्व बोजा आता पडला आहे. रा. रा. रामजी बसाप्पा ह्यांच्या आत्म्यास शांती व त्यांच्या मुलास हे पितृवियोगाचे दु:ख सहन करण्यास बळ परमेश्वर देवो अशी आमची प्रार्थना आहे.