सर्व व्यापक, सर्वशक्ती, सर्वज्ञ, परमपवित्र, दयानिधी, विश्वश्रेष्ठा, अव्यंग अनादिअनंत असा जो एकच अद्वितीय परमेश्वर त्याची उपासना ह्यास्थळी प्रतिदिवशी निदान प्रति आठवड्यास करण्यात येईल. कोणत्याही सृष्ट पदार्थाची उपासना येथे करता नये. कोणी मनुष्य अथवा इतर प्राणी किंवा बहिरींद्रिय गोचर पदार्थ हा ईश्वरच किंवा ईश्वरासारखा किंवा ईश्वराचा अवतार असे समजून येथे त्याची उपासना करिता नये आणि परमेश्वराशिवाय दुस-या कोणाचीही अथवा दुस-या कोणाच्याही नावे येथे प्रार्थना करण्यास अथवा गीत गाण्यात येऊ नये. कोणत्याही पंथाच्या लोकांनी आजपर्यंत कधी पूजेसाठी अथवा कोणत्या एका गोष्टी (वृत्ता) च्या स्मरणार्थ जिचा उपयोग केलेला असेल किंवा ह्यापुढे करण्यात येईल अशी कोणतीही कोरीव किंवा रंगीत प्रतिमा अथवा बाह्यचिन्ह येथे बाळगू नये. कोणताही प्राणी येथे बळी देता कामा नये. जेवणखाण, मद्यप्राशन, अथवा कोणत्याही प्रकारची मौज किंवा चैन येथे करू देता नये. जी कोणतीही पंथाच्या लोकांनी पूजिला असेल अथवा यापुढे पूजिला जाईल त्याचा येथे होणा-या उपासनेत उपहास किंवा निंदा करिता नये. कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणित, सर्वांशी प्रमाण (निर्बाध) असे मानिता नये किंवा तसे मानून त्याविषयी पूज्यभाव धरिता नये. तथापि कोणताही ग्रंथ आजपर्यंत कधी कोणच्याही पंथाच्या लोकांनी सर्वांशी प्रमाण (निर्बाध) मानलेला असेल किंवा पुढे मानण्यात येईल. त्याचा उपहास किंवा निंदा करिता नये. ह्या स्थळी प्रार्थना, उपदेश किंवा भाषण करावयाचे अथवा गीत गावयाचे ते कोणत्याही प्रकारचे सृष्ट पदार्थ (मूर्ति) पूजन, मत, विशेषाभिमान किंवा पाप ह्यास उत्तेजन किंवा आश्रय मिळेल अशा प्रकारचे असू नये. परमेश्वराची उपासना ह्या ठिकाणी अशा वृत्तीने व अशा प्रकारे करण्यात आली पाहिजे
(महर्षी अण्णासाहेब शिंदे वाई ब्राह्मसमाजाचे ट्रस्टी होते, त्या ट्रस्टडीड मधील महत्त्वाचा उतारा पृ. ४ व ५ स. १९३६).
की, जेणे करून आपण सर्व एका कुटुंबातील माणसे आहोत. असा परस्पर भाव वागविणे, सर्व प्रकारची भ्रांति व पातक ह्यांपासून दूर रहाणे आणि ज्ञान, भाव, व पुण्यशीलता उत्तरोत्तर वृद्धिप्रत नेणे ह्यांविषयी सर्व पुरूष व स्त्रिया त्यांची जात, वर्ण, प्रापंचिक व पारमार्थिक स्थिती कोणतीही असली तरी समर्थ होतील. कोणत्याही जात, वर्ण धर्म आणि दर्जाच्या पुरूषास किंवा स्त्रीस वरील उद्देशास व वरील तत्वास बाध न येता होणा-या भजन, पूजन. उपासना प्रार्थनेच्या प्रसंगास हजर रहाण्याचा अधिकार आहे आणि ह्यास कोणी हरकत केल्यास ती सदरहू ट्रस्टींनी चालू देऊ नये.