शासनयोग

ता. १९ आणि ता. २६ जून १९१० रोजी विनययोगावर विचार करतेवेली आपण दुस-याशी कसे वागावे आणि आपण दुस-यास कसे वागवावे असे वागणुकीचे दोन भाग करण्यात आले होते. पहिल्यास विनययोग व दुस-यास शासनयोग असे नाव देण्यात आले होते. आज दुस-या भागाविषयी थोडासा विचार करू.

मनुष्याने मनुष्यास कसे वागवावे हे पाहाण्याच्या पूर्वी मनुष्यास वागविण्याचा अधिकार मनुष्यास आहेकी नाही, ह्या गोष्टीचा विचार करावयास पाहिजे आहे. पण त्याच्याही पूर्वी म्हणजे मनुष्यास शासनाचा अधिकार आहे की नाही हे ठरविण्याच्या पूर्वी, जगतात मुळी शासन आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. संसारातील व्यवहाराचा पायाच जर कोणत्याही शासनावर अथवा नियमावर अवलंबून नसला, तर मनुष्याच्या व्यवहारापुरताच शासनाचा विचार करण्याची जरूरीच रहाणार नाही. ह्या बाह्य विश्वामध्ये सर्वत्र अबाधित आढळून येणा-या शासनाविषयी जरी निरनिराळ दर्शने आहेत, तरी थोडा विचार करून पाहता त्यामध्ये वस्तुत: विरोध नाही असे दिसून येईल. केवल नीतिनियमांचे अस्तित्व मानणारा कर्मवादी बुद्धादिकांचा एक पक्ष आहे. ह्या नियमांच्या मागे कोणी नियंता आहे, त्याची इच्छा म्हणजेच नियम असे मानणारे ईश्वरवादी आहेत. पण हे दोन्ही पक्ष सारखेच आस्तिक समजावयास पाहिजेत. व्यवहारात एकास नास्तिक व दुस-यास आस्तिक समजण्यात येते हे चुकीचे आहे. केवळ नियमांसच मानून नियंत्याविषयी उदासीन रहाणा-या ईश्वरवाद्यासही वरीलप्रमाणे अंशत: नास्तिक म्हणावयास पाहिजे. कारण, ईश्वरवादाचा मुख्य सिद्धांत सांगत आहे की, ‘अपिचेत् सदुराचारो भजते मामन्यभाक्| साधुरेव समन्तव्य: सम्यग् व्यवसितो हि स:||’ ह्यामध्ये धडधडीत नियमांचे उल्लंघन करणा-या दुराचार मनुष्यासही साधू समजण्याविषयी आज्ञा आहे. ह्यावरून नियमबंधनाविषयी हा पक्ष किती उदासीन आहे दिसते. उलटपक्षी, नियमवाद्यांचा असा आग्रह असतो की, आज आम्ही जे विचार मनात आणू त्यांचे पर्यवसान उद्या आग्रह असतो की, आज आम्ही जे विचार मनात आणू त्यांचे पर्यवसना उद्या कृतीत होणार, इतकेच नव्हे, तर आजचा विचार ती उद्याची कृती, उद्याची कृती ती परवाची सवय, परवाची सवय ते तेरवाचे शील, तेरवाचे शील ती शाश्वतची समाधी, येणेप्रमाणे पर्यवसानाची अबाधित परंपरा हा पक्ष मानतो. आणि ही परंपरा नियंत्याची इच्छा आहे की नाही, ह्याविषयीच्या विचारात तो पडत नाही. ह्याप्रकारे बोधिसत्व आणि भगवतभक्त हे सारखेच आस्तिक किंवा नास्तिक ठरतात. परंतु ज्याअर्थी दोघांचाही काही विधानांवर आधार आहे, त्याअर्थी दोघांनाही आस्तिक म्हणावयास पाहिजे.

लौकिक व्यवहारामध्य काह सनद मानणारे व काही स्वामी मानणारे असे दोन पक्ष दिसून येतात. सनदपक्ष म्हणतो की, स्वामी असला तरी तो सनदी नियमांनी बांधलेलाच असणार व तो असावयास पाहिजे. म्हणून सनद हेच मुख्य ध्येय. स्वामीपक्ष म्हणतो की, सनद हे केवळ स्वामीचे दान म्हणून तेच मुख्य ध्येय. आध्यात्मात ब्रह्म हे ज्याप्रमाणे ‘शुद्धमपापविद्धं’ त्याचप्रमाणे व्यवहारातील स्वामी हाही A king can do no wrong ह्य म्हणण्याप्रमाणे गुन्हा करू शकत नाही. येणेप्रमाणे प्रपंचात आणि परमार्थात जरी वरवर पाहता दोन भिन्न पक्ष दिसतात, तरी त्या दोघांमध्ये खरा विरोध नाही. दोन्ही पक्ष सारखेच निष्ठावान आहेत. विचार करता दोघांच्याही ध्येयांचा अंतिम लय एकाच वस्तूत होतो.

पण तिसरा एक पक्ष असा आहे की, तो मनुष्याच्या मनाबाहेर नियमांचे अस्तित्व मानीत नाही. नियमांचे अधिष्ठान मनुष्याच्या अंत:करणात आहे असे त्याचे म्हणणे असते. तत्त्ववेत्ता Kant ह्यांचे Categorical Imperative आणि कविकुलगुरू कालिदास ह्यांचे ‘संतांहि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमंत:करणप्रवृत्तय:’ ही दोन्ही सूत्रे वरील स्वेष्टवादाचेच समर्थन करितात. पण हा स्वेष्टवादही शासन मानीतच आहे. ते शासन आतून असो किंवा बाहेरून असो ते आहे आणि मानले जात आहे हे खास.

चवथा पक्ष मात्र आत बाहेर कोठेच नियम मानीत नाही. खा, पी, चैन कर, कारण उद्या मरण येणार आहे, असे सांगणारा हा मात्र खरा आणि शुद्ध नास्तिक पक्ष होय. अशा वाममार्गी शाक्तांचा नाश झाल्यास कोणासही वाईट वाटणार नाही. नाश होतेवेळी स्वत: त्यांनासुद्धा वाईट वाटण्याचे कारण नाही. स्वत:च्या शक्तीशिवाय त्यांना बाहेर काहीच दिसत नसते म्हणून त्या शक्तीचा लय झाला असता मरण्यास त्यांनी खुषीने तयार असले पाहिजे, तरच ते शाक्त; नाहीतर त्या वेळेला जर बाहेरील शासनासंबंधी त्यांच्यात श्रद्धा किंवा भीती उत्पन्न होईल, तर ते शाक्त कसले? लोकायितक, चार्वाक इत्यादि मतवाद्यांचे काही युक्तिवादपूर्वक वाड्मय होते पण ते द्वेषाने नाहीसे केले असे सांगतात. पण ते उघडकीला येईतोपर्यंत तरी त्यांच्या नास्तिकपणाला बाध येत नाही.

असो. हा चवथा पक्ष शिवाय करून वरील तिन्ही पक्षांस, सृष्टीमध्ये शासन आहे, हे मान्य आहे. आता मनुष्यास शासन करण्याचा अधिकार आहे की नाही हे पहाण्यासाठी आजपर्यंत त्याच्याकडून हा अधिकार कसा बजावला गेला आहे ह्याचा इतिहास पाहू. मनुष्येच काय पण इतर प्राण्यांमध्येही शासनाचे दाखले दिसत आहेत. शासनाचा पहिला उद्भव मातेमध्ये दिसून येतो. अपत्य जन्मल्याबरोबर माता त्यावर प्रेम करू लागते.  इतकेच नव्हे तर त्यावर राज्यही करू लागते, प्रेमामुळे तिजवर शासनाची एक जबाबदारी येते. मुलाचे लाड करणे व कौतुक करणे एवढीच प्रेमाची लक्षणे नसून, अपत्याची जी इच्छा असेल त्या इच्छेला आपल्या शहाणपणाचा आळा ती सतत घालीत असते. मग ती माता मानवी असो किंवा खालील प्राण्यातील असो.

समाजाचा अधिकाधिक विकास होऊन अनेक कारणांमुळे इतरांपेक्षा एका व्यक्तीमध्ये जेव्हा धन, बल, बुद्धी इत्यादी एक किंवा सर्व गुणांचा जास्त संचय होतो, तेव्हा त्यांच्यामध्ये साहजिक आढ्यता उत्पन्न होऊन तिच्या जोरावर तो इतरांचा पुढारी होऊन त्यांवर शासन करू लागतो. हे बळ मजमध्येच आहे, इतरांमध्ये नाही, हे कार्य मजसारखे आजपर्यंत करीत आलेले आहेत, मी आता न करणे म्हणजे मानहानी होणार आहे अशा प्रकारच्या राजसी विचारांमुळे क्षत्रियांची उत्पत्ती आणि वाढ होऊ लागते, म्हणून आढ्यता हे शासनाचे दुसरे कारण होय. वत्सलतेमुळे होणा-या शासनाचा परिघ साहजिकच अल्प असणार. अपत्यसंबंधापलीकडे त्याचा वाव नसतो. केवळ वत्सलतेमुळेच ज्या स्थितीत शासन चालू असते ती समाजाची आद्य स्थिती. पुढे आढ्यतेमुळे व्यक्तीचे आणि व्यक्तिसमूहाचे इतर व्यक्तींवर किंवा इतर व्यक्तिसमूहावर जे राज्य चालू होते ती समाजाची दुसरी स्थिती ह्या आढ्यतेच्या जोरावर अद्यापिही शासन चालले आहे आणि पुढेही ह्या शासनाचा विस्तार अधिकाधिकच चालू रहाणार.

शासनाचे तिसरे कारण कर्तव्य हे होय. समाजाचा विकास अधिकाधिक झाल्यानंतर सात्विक माणसांनी इतरांवर शासन करणे हा एक त्यांच्या सात्विकपणाचा भाग आहे अशी कर्तव्यबुद्धी जागृत होते. कमी सुसंस्कृत माणसांवर किंवा जातींवर अधिक सुसंस्कृत माणसांनी किंवा जातींनी शासन चालविणे ही हक्काची गोष्ट नसून उलट कर्तव्याची गोष्ट आहे. अडाणी माणसांवर बुद्धिवानाने, अडाणी माणसांच्या हितासाठी राज्य करणे हा बुद्धिवानाचा हक्क नसून अडाणी माणसाचा बुद्धिवानावर हक्क आहे आणि बुद्धिवानाचे हे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे मातापित्यांनी अपत्याचा सांभाळ करावा हे मातापित्यांचे कर्तव्य आणि अपत्याचा हक्क आहे त्याप्रमाणे सुसंस्कृतांनी असंस्कृतांचे नियमन करावे हे सुसंस्कृताचे कर्तव्य योग्य होय. हे कर्तव्य बजाविले जात असताना शास्त्यांचा सात्विकपणा तीव्र कसाला लागतो आणि ज्या ज्या मानाने तो ह्या कसोटीला उतरतो त्या त्या मानाने त्याचे ते शासन, कर्तव्याचे म्हणजे तिस-या कोटीतले आणि ज्या ज्या मानाने ते उतरत नाही त्या त्या मानाने ते आढ्यतेचे म्हणजे दुस-या कोटीतील समाजावे. एकंदरीत वत्सलता, आढ्यता आणि कर्तव्यता ही शासनाची तीन निरनिराळी कारणे आहेत.

मनुष्याच्या विकासाचा इतिहास पाहिला असता वरील कारणांच्याद्वारे मनुष्याकडून जे शासन घडत आहे, त्याचे श्रेय मनुष्यशक्तीकडे आहे, किंवा मनुष्येतर कोणा श्रेष्ठ शक्तीकडे आहे ह्याच्याविषयी वाद पडतो. वत्सलता आणि कर्तव्यता ह्या सात्विक कारणांमुळे हे श्रेय श्रेष्ठ शक्तीकडे देऊ गेल्यास, त्याबरोबर आढ्यता ह्या राजसी गुणांचेही संशयित श्रेय त्याच शक्तीकडे जाईल. हा संभव टाळावा म्हटल्यास उलटपक्षी सर्वच श्रेय मनुष्यशक्तीकडे येते. मनुष्यशक्तीचा सर्व चांगला भाग श्रेष्ठ शक्तीकडे आणि अपूर्व वाईटाला मात्र मनुष्यास जबाबदार करणे ही मनुष्याविषयी सम्यग्दृष्टी होत नाही. आणि श्रेष्ठ शक्तीलाही अशा प्रकारच्या पक्षपाताची जरूरी नाही. काहीही असो, मनुष्याच्या द्वारा हे शासन घडत आहे. ह्य शासनाची त्याजवर जबाबदारी आहे. तिच्यापासून त्याची सुटका नाही. ह्या शासनाच्या जबाबदारीपासून आपली सोडवणूक करून घेणे ह्यात कोणताही सात्विकपणा नाही. ईश्वराला शरण जाणे हे भगवदभक्तीचे थोर लक्षण आहे. पण शरणतेमुळे ही शासनाची जबाबदारी चुकते असे होत नाही. शासनाविषयी ईश्वरी आज्ञा झाली असता तिच्यात कसुरी करून पुन: आम्ही शरण आहो असे. म्हणत राहणे हे शरणतेचे खरे लक्षण नव्हे ते कोडगेपणाचे लक्षण होय. कोणालाही शरण गेल्यास तो सांगेल ते काम करावयास तयार राहणे आणि ते करण्यातच आनंद आणि थोरवी मानणे हेच त्या शरण गेल्याचे खरे खरे लक्षण होय.

आता शासनाचे किती प्रकार आहेत हे पाहू: (१) आईबापांकडून मुलांवर घडणारे शासन, (२) गुरूकडून शिष्यावर घडणारे, (३) राजाकडून प्रजेवर घडणारे अशी तीनच मानवी शासने संभवतात. व्यवहारात त्याहीपेक्षा आणखी दोन शासने आढळतात. (१) धनी आणि नोकर ह्यांमधील आणि (२) पती आणि पत्नी ह्यांमधील. पण न्यायदृष्टीने पाहू गेल्यास, धनी आणि नोकर ह्यांचा संबंध शास्ते आणि शास्य असा मुळीच नाही. कचेरीतला चपराशी असो, घरातील बाल्या असो, गिरणीतील कामगार असो, किंवा नोकर कुणीही असो, त्याच्यावर राज्य करावे असा धन्याचा अधिकार नाही. धनी आणि नोकर एकाच करारनाम्याचे दोन सारखे उमदे पक्ष आहेत. दोघेही परस्परांचे सारखे ऋणको आणि धनको आहेत. असे असून घरोंघरी आणि शहरोंशहरी चाकर लोकांवर जी साम्राज्ये चालू आहेत ती केवळ ‘बली तो कान पिळी’ ह्या न्यायाची आहेत. अर्थात बळाचे हे तत्त्व जेव्हा धन्याकडून चाकराकडे कलते तेव्हा शासनाचे पारडे डळमळू लागते आणि जो घोटाळा उडतो त्यावरून वरील साम्राज्याचा पाया न्यायावर रचला नसून अन्यायावर रचला आहे हे उघडकीला येते. एकंदरीत हा संबंध शासनाचा नव्हे हे सिद्ध होते. ह्याहूनही विलक्षण प्रकार पतीपत्नी किंवा साधारण स्त्रीपुरूषांच्या संबंधात येतो. प्रत्येक कुटुंबात हे बायकांवरचे राज्य चालू असते. अर्धी मनुष्यजात ह्याप्रकारे मनुष्यजातीच्या दुस-या अर्ध्यावर सत्ता गाजवीत आहे. विवाहामध्ये यद्यपि एक पक्ष दुस-यास म्हणतो की, ‘माझे हृदय ते तुझे हृदय आणि तुझे हृदय ते माझे हृदय’ तथापि व्यवहारात ‘माझे ते माझे आणि तुझे ते माझे’ असा शुद्ध अद्वैतवाद माजलेला दिसतो. म्हणजे एका पक्षी दोन हृदये आणि दुस-या पक्षी काहीच नाही असा प्रकार होतो, हा न्याय नव्हे. कोणी म्हणतात, पती आणि पत्नी ह्यांमध्ये परस्पर शासन असावयास पाहिजे, म्हणजे पती पत्नीचा राजा आणि पत्नी पतीची राणी (राज्य करणारी) असे असावे. पण हाही भ्रम आहे. शासनाचा संबंध कधीच परस्पर असू शकत नाही. एकपक्षी शासन तर प्रतिपक्षी निष्ठाच असावयास पाहिजे. शासन आणि निष्ठा ही एकाच व्यवहाराची समकालीन आवश्यक अंगे होत. निष्ठेशिवाय शासन संभवत नाही आणि शासनावीण निष्ठा निराधार होते. शासन चालू असताना निष्ठा ही उलट दिशेने चालू असते. ह्यावरून दोन पक्षांमध्ये परस्पर शासनाचा संबंध मानणे ही विचाराची भ्रांती होय. एवंच खरी शासने तीनच आहेत, ती- (१) पितृशासन, (२) गुरूशासन आणि (३) राजशासन; आणि तदनुरूप (१) अपत्यनिष्ठा, (२) शिष्यनिष्ठा आणि (३) प्रजानिष्ठा ह्या तीन निष्ठा होत.

मनुष्याने शासनाचा अधिकार आपणाकडे घेण्यापूर्वी स्वत: विनयसंपन्न झाले पाहिजे. ह्या विनयाचा अष्टांग मार्ग पूर्वी सांगितलाच आहे. आढ्यतेमुळे जो मनुष्य शासन चालवीत असतो, तोच मनुष्य कर्तव्यतेमुळे शासनास उपयुक्त होतो, हा त्याच्या विनयसंपन्नतेचा प्रभाव होय, म्हणजे राजसी शासनातून सात्विक शासनाचा जो विकास होतो, तो शास्त्याच्या विनयामुळेच होतो, शास्ता मग तो राजा असो किंवा गुरू असो किंवा पिता असो-त्या सर्वांनी आधी विनययोगात सिद्धी मिळविलीच पाहिजे. ऐहिक राजशासनात देखील राजाच्या लहान मोठ्या अधिकारी मंडळींनी प्रजेशी विनयाने वागले पाहिजे असे राजकीय हुकूम सुटतात, तेही ह्याच शास्त्राधारे. राजाचे अधिकारी हे सभ्य गृहस्थ असतात म्हणून विनयाने वागणे हा त्यांच्या सभ्यपणाचाच एक भाग आहे. एवढ्यावरच अवलंबून राजा स्वस्थ बसत नाही, तर शासनाचा अधिकार विनयाशिवाय मिळत नाही व कायम रहात नाही म्हणून विनय हा व्यक्तिविषयक सभ्यतेचा भाग असो किंवा नसो, तो शासनाची आद्य तयारी आहे म्हणून आचरलाच पाहिजे अशी राजाज्ञा असते. मग तशी धर्माज्ञा असेल त्यात नवल काय?

येणेप्रमाणे पितृशासन, गुरूशासन आणि राजशासन ह्याबद्दल पृथक् पृथक् विचार निरनिराळ्या प्रसंगी पुढे केला जाईल आणि त्यावेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही| मानियेले नाही बहुमता|’ असाच मनाचा भाव ठेवला जाईल. बहुमताचा एवढा मोठा प्रचंड प्रभाव आहे की, ते ज्यास सुदैवाने अनुकूल होते त्याच्या मूर्ती मंदिरोमंदिरी स्थापल्या जातात आणि त्याचे शहरातील चौकात पुतळे उभारले जातात. पण दुर्दैवाने तेच बहुमत ज्यास प्रतिकूल होईल त्यास चव्हाट्यावर सुळावर चढावे लागते. एवढा मोठा प्रभाव असूनही त्या बहुमतास न मानता सत्य आणि असत्याचा शोध करावयाचा असल्यास शोधकांनी आपले मनच ग्वाही ठेवावे असे तुकाराम सांगातत ते आम्हांस मान्य केले पाहिजे.