ब्राह्म आणि प्रार्थनासमाज अशा नावाचे वरवर पाहता निरर्थक भेदाचे गौडबंगाल काय आहे, हे बाहेरच्यास समजणे कठीण आहे. किंबहुना नवीन भरती झालेल्या तरूणांनाही हे कोडे लवकर उकलणार नाही. ह्या दोन्ही नावांच्या समाजाचा धर्म जरी तंतोतंत एकमेवाद्वितीय आहे, तरी ह्या समाजांतील परस्पर भेद अर्थशून्य मुळीच नाहीत. जे समाज आपल्या तात्त्विक धर्माचे सामाजिक अनुष्ठान आपल्या नित्याच्या आणि नैमित्तिक प्रसंगी सहकुटुंब श्रद्धेने आणि निष्ठेने करतात, त्यांना ब्राह्म हे नाव आहे. ज्यांना हे धैर्य, निष्ठा आणि कळकळ नाही किंबहुना अश निष्ठा राखणे आपला धर्मच नव्हे, असे छातीला हात लावून सांगण्याचा कोडगेपणाचा आवाज प्रसंगवशात ज्यांच्या व्यासपीठावरून ऐकू येतो, अशांना प्रार्थनासमाज हे नाव आहे. केव्हा केव्हा मोठ्या समाजानी आपल्यास ब्राह्म हे सोन्यासारखे चकाकणारे नाव घेऊन आपले हसे करून घेतले आहे. अशा दृष्टीने पाहता मुंबई समाजाने आपले ‘प्रार्थनासमाज’ हेच नाव कायम ठेवून आपला निदान शहामपणावरील हक्क तरी शाबीत केला आहे, असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.
आधुनिक भारताचा जनक आणि महात्मा गांधीसारख्या थोरा-मोठ्यांनाही आजोबा शोभेल असा जो राममोहन रॉय ह्यांच्याही काळापासून ह्या पवित्र आर्मिक चळवळीवर स्वकीय व परकीय टीकाखोरांनी विषारी, कडक सौम्य परंतु गैरलागू आणि खरी व न्यायी अशा अनेक प्रकारच्या टीका केल्या आहेत. “भावी राजकारणी उंटाचे पिलू” असा आक्षेप आम्हांवर अगदी गेल्या पिढीच्य अखेरपर्यंत ऐकू येत होता. परंतु जेव्हा कर्झनशाहीच्या नीतीमुळे बेफाम झालेले काही माथेफिरू ब्राह्म तरूण खुनी खटल्यातही सापडले आणि बंगालच्य फाळणीसारख्या देशाभिमानी चळवळीच्या लाटांवर स्वार होऊन बंगालभर दौडत असलेले एकजात ब्राह्मसमाजाचेच पुढारी कर्झनसारख्या मदांधाच्याही डोळ्यांवर येऊन आदळू लागले आणि शेवटी कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाच्या मंदिरात जी एरवीदेखील गर्दीमुळे जागेची मारामार होते, तिच्यात सी. आय. डी. भक्त घुसल्यामुळे तेथे श्वास कोंडण्याची पाळी आली, तेव्हा कोठे हे कल्पित आक्षेपाचे राजकारणी “उंटाचे पिल्लू” ब्राह्मसमाजातून पळाले. ते अद्यापि कोठे दडले त्याचा पत्ता नाही.
मूर्तिपूजा ही जशी हिंदुधर्माची पहिली पायरी तशीच ब्राह्मसमाजही भावी ख्रिस्तांची पहिली पायरी असा आक्षेप उर्फ आशा धरून काही आशाळभूत ख्रिस्ती मिशनरी अद्यापि ब्राह्मांना खिजवीत असतील. पण महायुद्धामुळे बाहेरील मदतीची आयात. कमी झाल्यामुळे तेथे आजपर्यंत केवळ धंदा करून पोट भरणा-या वरील प्रकारच्या मिशन एजंटाची स्वदेशी निर्यातही जास्त जास्त होऊ लागली आहे. येणेप्रमाणे वरील दोन मुख्य आक्षेपांची वासलात होत आहे. तरीही ब्राह्मसमाजाचे उलट “मवाळाचा क्लब,” “रावबहादुरांचा आखाडा,” “नोकरीवाल्यांची पेढी,” “उतावळ्या नव-याच्या गुडघ्यावरले बाशिंग,” “मटण मार्तंडाचे रेष्टाराँ” इत्यादी अनेक भारदस्त नसले तरी चटकदार शब्दप्रयोग चव्हाट्यावरील भाषणात व कधी कधी तसल्याच लेखांतूनही चमकून तात्काळ नाहीसे होतात, त्याला इलाजच नाही. असले आक्षेप अलीकडे ब्राह्मसमाजाच्या उलट येत नसून प्रार्थनासमाजानाच अनुलक्षून असतात. शिमग्यातल्या शिव्या लागतील त्यांनाच लागू होतील अशा न्यायाने प्रार्थनासमाजाचे सभासदही, एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडण्याच्याच लायकीचे हे आक्षेप आहेत, असे समजून असतातहे बाहेरच्यांनी ध्यानात बाळगावे.
ह्या सर्व समाजाचे खरे व्यंग म्हणजे पोकळ पांडित्यच होय. ही गोष्ट, प्रत्यक्ष कलकत्त्याच्याही काही पुढा-यांच्या मनावर जशी वठावी तशी वठत नाही. मग प्रार्थनासमाजाची तर काय कथा! ब्राह्मधर्म जो हल्ली ज्या प्रकारांनी प्रचारला जात आहे तो आणि त्याचे ते चाल प्रकार केवळ पंडित किंबहुना पंडितमन्य लोकांमध्येच आजवर खपण्याचा संभव होता. पण आजकाल ते प्रचार पंडितमन्यामध्येही खपेनासे होऊ लागले आहेत. पण हा चालू काळाचा महिमा आमच्या नजरेत अद्यापि भरावा तसा भरत नाही. ही मात्र चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. लक्ष्मी व सरस्वतीचे एकवेळ सख्य जुळेल....इतिहासात असले अपवित्र सख्य पुष्कळदा घडवून लक्ष्मीचे दिवाळे आणि सरस्वतीचे वैधव्य पुष्कळांनी पाहिले आहे. पण भरीव भक्तीचे व पोकळ पांडित्याचे एक क्षणभरही सूत जमणार नाही.
कलकत्त्याचे चालू साली निवडून आलेले अध्यक्ष पंडित सीतानाथ तत्त्वभूषण हे केवळ पोकळ पंडित नसून एक कर्मयोगी भक्तही आहेत. पण त्यांच्या प्रचाराचा सर्व पाया बहुजनसमाजाच्या गावीही नसलेल्या दुर्लभ पांडित्यावरच रचिलेला आहे. त्यांनी एका प्रचारक परिषदेत तोंड भरून स्पष्ट सांगितले की ब्राह्मधर्माचा प्रचार बहुजनसमाजात करू पाहणे म्हणजे ब्राह्मधर्माची अवनती करू पाहणेच होय. पंडित मजकुरांच्या म्हणण्यात पुष्कळ सत्य आहे हे मी जाणून आहे. ब्राह्मधर्माची घोषणा म्हणजे स्वातंत्र्याची घोषणा होय. शिस्तीची जबाबदारी खांद्यावर न घेता उठल्यासुटल्यांनी बहुजनसमाजात जाऊन स्वातंत्र्याची वल्गना केल्याने बहुजनसमाज वर न जाता ब्राह्मसमाज मात्र खाली येईल. पंडित मजकुरांच्या म्हणण्याचा अर्थ मी येणेप्रमाणे माझ्या मनाने करून त्यांचे समर्थन करीत आहे. त्यांना मुळीच दोष देत नाही. पण ब्राह्मसमाजाचे एक अतिपांडित्य हे एक व्यंग आहे एवढे खरे. ख-या भक्तीत स्वातंत्र्य आणि शिस्त ह्यांचा एकजीव समरस होत आहे. असा आत्मविश्वास नसल्यामुळे कदाचित ब्राह्म प्रचारकाकडून बहुजनसमाजाची धार्मिक सेवा व्हावी तशी आजवर झाली नसावी हा माझा तर्क चुकत असल्यास व कोणीतरी दुसरे कारण दाखवील तर मी आभारीच होईन.
वरील मुद्दा पांडित्याचा झाला. मुंबई प्रार्थनासमाजाचे आद्य प्रचारक परलोकवासी सदाशिवराव केळकर हे एक अत्यंत प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ व स्वार्थत्यागी गृहस्थ होते. त्यांनी तर ह्या पांडित्याच्या मुद्द्यावरच शोक करून करून प्राण सोडला. त्यांचे सर्वात लहान चिरंजीव माधवराव केळकर हे आपल्या बापाप्रमाणे करारी व तत्त्वनिष्ठ आहेत. दोघाही पितापुत्रांना पांडित्याची बाधा झालेली नव्हती आणि नाही. हल्ली मुंबई प्रार्थनासमाजात रा. माधवरावांनी एक धामधूम चालविलेली दिसते आणि इतर काही सदगृहस्थांनी विवाहविधीवर चर्चा चालविलेली आहे. जणू काय सामाजिक आणि धार्मिक जीवनाचे महत्त्व केवळ विवाहावरच अवलंबून आहे आणि तसे असले तरी विवाहाचे पावित्र्य जणू बाह्य विधीमूळेच अडून राहिले आहे. एकंदरीत केळकरांना आणि इतर विवाहविधीवाल्यांना मुंबई प्रार्थनासमाजाची एक नवीन सुधारलेली जात बनवावी असे वाटू लागले आहे, असे दिसते. आश्चर्य मात्र हे की, जातिभेद मोडण्यासाठीच केवळ ही नवीन जात बनविण्याची युक्ती ह्यांना सुचली आहे. पण काट्यांनी काटा काढण्यासाठी ही जी एक नवीन काटेरी झाडांची लागवड चालू आहे ती यशस्वी झाल्यास, पुढे जे काटे मोडतील ते काढण्यास काय उपाय योजावा. हा प्रश्न शिल्लक उरतोच.
ते कसेही असो. पण विशेष मनोरंजक ह्याही पुढेच आहे. गेल्या सुबोध पत्रिकेत “जातिभेद कसा मोडता येईल” ह्याविषयी उपाय सुचविताना माधवरावांनी एक चमत्कारिक वाक्य लिहिले आहे. ते हे “पण जोपर्यंत आम्ही जातिभेद मोडण्यास तयार नाही व तो मोडण्यास काही उपाय करीत नाही तोपर्यंत आमच्या समाजात खालच्या जातीचे, मुसलमान व ज्यू धर्माचे लोक सभासद करून घेणे चूक आहे.” जणू काय मुंबईचा समाज “खालच्या” जातींना व परकीयांना बळेच आत ओढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे व असे लोक बेसुमार त्याच्या आत घुसतच आहेत! बरे खरोखरीच असा प्रकार घडलाच तर जाती मोडण्याच्या बाबतीत केळकर म्हणतात त्याप्रमाणे तो अपायकारक होईल की उलट एक प्रकारे उपकारच होईल? भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची (Depressed Classes Mission of India) पहिली शाळा परळ येथे उघडण्याच्या समारंभ सन १९०६ त झाला. त्यावेळी परलोकवासी सदाशिवराव केळकरांनी आपल्या जाहीर भाषणात अस्पृश्यता निवारण्याचे कामी “अस्पृश्यांची उन्नती होईल की ती करू पहाणाराची अवनती होईल” अशी एक सहानुभूतीपूर्वक शंका काढली होती. तिला उत्तर देताना सर नारायण चंदावरकर ह्यांनी “अस्पृश्यांच्या उद्धारातच स्पृश्यांचा उद्धार आहे” अशी समजूत घातली होती. पण मला वाटते अशा सर्व चर्चेत केवळ अतिपांडित्यच भरलेले असते. पांडित्याला मग ते खरे असो, खोटे असो, भरीव असो, पोकळ असो ख-या धर्मात किंवा परोपकारात जागाच नाही. माझा अल्पानुभव असा आहे की, एका दाराने अतिपांडित्य आत शिरू लागले की, सेवा आणि भक्ती ही केव्हाच दुस-या दारांनी बाहेर पडलेली त्याला आढळतात म्हणून मी असे विनवितो की, रा. माधवरावांनी जाती मोडण्यासाठीदेखील नवी जात काढू नये.
महार, मांग, भंगी, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी फार तर काय आपण नास्तिक आहे असा स्वत:चा गैरसमज करून घेणारे अलीकडचे सर्व पोषाकी विद्वानही आत आले तरी त्यांना सभासद म्हणूनही येऊ द्यावे. केवळ मूर्ती फोडणे किंवा जाती मोडणे हा शब्दप्रयोगच मुळात भ्रामक आहे. आमच्या समाजानी हा भ्रम सोडावा. स्वातंत्र्य, शुद्धी आणि मैत्री ह्या भावना जेथे जेथे आहेत, तेथेच ब्राह्मसमाज आहे. इतरत्र कितीही सुंदर इमारती दिसल्या किंवा मधुर गाणी ऐकू आली तरी तेथे ब्राह्मसमाज नसून तेथे कदाचित ब्राह्मसमाजाची पूर्वतयारीच चालू आहे असा धीर आम्ही सर्वांनी राखावा. सत्य संकल्पाचा दाता भगवान आहे. आतून त्याचा आवाज ऐकू येतो. तिकडेच आम्ही कान द्यावेत. टीकाकार काही म्हणोत बापुडे!