[रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे हे पुणे शहरातर्फे नव्या कौन्सिलमध्ये निवडून येण्याची खटपट करीत आहेत. त्यांनी ‘बहुजन पक्ष’ असा मथळा देऊन एक विस्तृत लेख बडोद्याच्या जागृती पत्रामध्ये प्रसिद्ध केला आहे. ह्या लेखामध्ये बहुजन समाजाच्या निरनिराळ्या हितसंबंधाचे रा. शिंदे ह्यांनी केलेले विवेचन बोधपर म्हणून पुढे दिले आहे............ संपादक.]
१ शेतकरी- ह्यात डोईजड जमीनदारांचा अथवा पिढीजाद जहागीरदारांचा समावेश मुळीच होऊ शकत नाही जो आपल्या मालकीचे अथवा कौलाचे शेत आपणच वाहतो, आणि त्या कामासाठी पुरेशा मजूरदारांना समान दर्जाचे योग्य वेतन देऊन सांभाळतो, तोच शेतकरी जाणावा. पाश्चात्य देशात अशालाच ‘पेझंट प्रोप्रायटर’ म्हणतात. तो जरी स्वतंत्र असला तरी, धन, विद्या अथवा अधिकार नसल्यामुळे अद्यापि मागासलेला राहिला आहे.
२ शिपाई- ह्यात सरदाराची गणना मुळीच नाही. कारण अधिकारबलामुळे त्यांचा समावेश पुढारलेल्या वर्गात करणे योग्य आहे. हितसंबंधाच्या विरोधामुळे बहुजन पक्षात हे सामील न होणे साहजिकच आहे. पण सामान्य शिपायांचे हितसंबंध आमच्या पक्षानेच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेले आहेत. कुणबी जसा सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार अथवा जहागीरदार हे केवळ पोष्य, तसाच हातावर शीर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय. तो केवळ पट्टेवाला, चपराशी नव्हे. त्याच्या बळावर किताब मिळविणारे व पिढीजाद पेन्शने झोडणारे सरदार हे जरी जातीने क्षत्रिय असले, तरी ते मागासलेले नसतात. म्हणूनच त्यांच्या हितसंबंधाची काळजी आमच्या पक्षाला वाहण्याचे कारण नाही. पण शिपाईगिरी मात्र आम्ही राखलीच पाहिजे.
३ शिक्षक वर्ग- ह्यात सोवळेशास्त्री हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी ह्याची गणना करिता येत नाही. वाड़मयाचे किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत, आपल्या वृत्तीला पिढीजाद हक्क न सांगता बाजार भावाप्रमाणे चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात, धर्म, देश काही असो, त्यांचे हितसंबंध त्या पक्षाने राखणे जरूर आहे. कारण तेही मागासलेलेच आहेत, व त्यांचे हितसंबंध हे राष्ट्रीय आहेत.
४. उद्यमी- सुतार, सोनार, साळी, शिंपी, गवळी, माळी, तेली, तांबोळी हेही राष्ट्राचे धारक असून ह्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई ह्यांच्यापेक्षा रतीभरही कमी नाही. ते मागासलेले आहेत. नाटकवाले, गोंधळी, शकून सांगणारे जोशी आणि पोवाडे गाणारे शाहीर, वैदू आणि पोरक्या मुलांना पाजणा-या दायांचीही जरूरी प्रसंगविशेषी ह्या बहुजन समाजरूपी बळीराजाला लागते. तर मग त्यांच्या हिताचा विसर त्याला कसा पडेल?
५. दुकानदार- ह्यात व्याज देऊन दुस-याचे भांडवल वळवून आणून त्यावर गब्बर होणारे पेढीवाले वर्ज्य आहेत, असे समजावे. परंतु उद्यमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्याने जी राष्ट्रीय संपत्ती शेतक-याने निर्माण केली व शिपायाने राखिली तिची देशभर वाटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांचीही तितकीच जरूरी आहे. तोही जोवर मागासलेला राहील तोवर त्याला पुढे आणण्यासाठी आमच्या पक्षाने झटणे अवश्य आहे.
६. मजूर वर्ग- ह्यात बाजार भावाप्रमाणे वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हे तर बुद्धिचातुर्य लढविणारे वकील, डॉक्टर ह्यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही जाऊन सहज बसतो. इतकेच नव्हे तर बहुजन समाजाचे पुढारीपणही त्याच्याच वाट्याला येते. आणि मग सगळीच कालवा कालव होते. असे लोक तत्त्वत: मजूर असले तरी वस्तुत: मागासलेले नसल्यामुळे त्याच्या हितसंबंधाची जोपासना करण्याची जबाबदारी दुर्बळ जनपद पक्षावर न ठेवता त्यांच्या स्वत:वरच ठेवणे अगदी योग्य होईल. बाकी उरलेल्या ख-या आणि अंगमेहनती मजुरांची दाद तर आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेच लागणे शक्य नाही. बाजार भावाप्रमाणे आपल्या मजुरीचे दर, कामाची वेळ, विश्रांतीच्या अटी, बाळपण, आजारीपण, म्हातरपण, कौटुंबिक आणि स्त्रीपणाच्या आपत्ती इत्यादी कारणावरून उदभवणारे हक्क वगैरेची मागणी करण्यास हा वर्ग मोकळा आहे, ह्याविषयी तर प्रश्नच नाही. पण ही मागणी राष्ट्राचे समवाय-हित सांभाळून ती पूर्ण रीतीने वसूल करून घेण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी येईल अशी संघशक्ती त्यांच्यामध्ये आणणे हे ह्या पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे जरूरीचे आणि कठीण असे कर्तव्य आहे. तथापि, हा पक्ष म्हणजे केवळ मजूर पक्षच नव्हे, तो जनपद पक्ष असल्यामुळे सर्व राष्ट्राचा पक्ष आहे. मजूर डोईजड झाल्यास त्याची समजूत करण्याचाही अधिकार सर्वापेक्षा ह्या पक्षाला जास्त आहे.
७. अस्पृश्यवर्ग- अस्पृश्यपणामुळे हा वर्ग मागासलेला आहे, इतकेच नव्हे तर चिरडला गेला आहे. धर्माची, परंपरेची, रूढीची अगर दुसरी कोणतीही खरी खोटी कारणे न सांगत बसता ह्या वर्गाची अस्पृश्यता व असाह्यता पूर्णपणे नष्ट करून त्यांना अगदी समान दर्जाने बहुजन समाजात एकजीव करणे हे ह्या पक्षाचे केवळ पवित्र काम आहे. ते तातडीने केले तरच धडगत आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादात, ढोंगी ठरावात आणि मतलबी सहानुभूतीत अगोदरच दवडली गेली असल्यामुळे त्या वर्गातील काही व्यक्तींना साहाजिकपणे भलतेच वळणही लागून चुकले आहे. ही ठेच खाऊनही आमच्या पक्षाचे डोळे उघडले नाहीत तर ते कायमचेच झाकलेले बरे, असे म्हणण्याची पाळी जवळ येऊन ठेपली आहे.
८. स्त्रीवर्ग- चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाचे हाती काहीच लाभले नाही म्हणून आमच्या पक्षाने हताश होण्याचे कारण नाही. उलटपक्षी आमचा पक्ष विद्वानांचा नाही, वक्त्यांचा नाही, ओरडणारांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारांचा आहे असे थोडेच होणार आहे! स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल हे आम्ही जाणून आहो.