रविवार ता. २ रोजी पहाटे गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे शिवाजी नगरातील आपल्या राहत्या घरी परलोकवासी झाले. अण्णासाहेबांच्या निधनाची दु:खद वार्ता सकाळी सर्व शहरभर पसरली. त्यांची स्मशानयात्रा दुपारी १ वाजता निघून ती शहरातील प्रमुख रस्त्याने ३ च्या सुमारास स्मशानभूमीत येऊन पोहोचली. त्या ठिकाणी डॉ. सर रघुनाथराव परांजपे, प्रि. कानिटकर श्री. शंकरराव चव्हाण, श्री. र. के. खाडीलकर, डॉ. नवले, प्रा. माटे, दिवाणबहादूर बी. पी. जगताप वगैरे मंडळीची अण्णासाहेबांच्या कार्यासंबंधी माहिती देणारी व गुणवर्मनपर अशी भाषणे झाली. त्यानंतर चारच्या सुमारास अण्णासाहेबांच्या पार्थिव देहाला अग्निसंस्कार देण्यात आला. व त्या ठिकाणी जमलेली वेगवेगळ्या पक्षांतील व जमातींतील ६००-७०० मंडळी दु:खद अंत:करणाने आपापल्या घरी परतली.
गेली ४-५ वर्षे अण्णासाहेबांची प्रकृती जशी निकोप असावयास हवी होती तशी काही नव्हती. मागील ७-८ दिवसांत तर त्यांच्या प्रकृतीत विशेष बिघाड होऊन वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचा शेवटी अंत झाला. अण्णासाहेब मूळचे जमखिंडी संस्थानातील रहाणारे. घरची अत्यंत गरिबी. परंतु अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढीत काढीत ते १८९८ साली बी. ए. झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ कायद्याचाही अभ्यास केला. परंतु विश्वविद्यालयीन शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी करून द्रव्यार्जन करण्याकरिता करावयाचा अशा प्रकारची अण्णासाहेबांची वृत्ती नसल्याकारणाने त्यांनी साहजिकच समाज सेवेकडे ओढा ठेवून त्या दिशेने आपल्या भावी आयुष्याची रूपरेषा आखली. ते स्वभावत: धार्मिक प्रवृत्तीचे असल्याकारणाने त्यांचा कल साहजिकच प्रार्थना समाजाकडे झुकला. याच समाजामार्फत ते धार्मिक क्षेत्रात उच्च शिक्षण मिळविण्याकरिता विलायतेस गेले व तेथून परत आल्यानंतर त्याच समाजामार्फत दलितोद्धाराचे कार्य त्यांनी हाती घेतले.
अण्णासाहेबांच्या आयुष्यातील मुख्य कामगिरी म्हणजे हरिजनोद्धार होय हे सांगण्याची आवश्यकता नाही. वस्तुत: त्यांनी आपले वास्तव्य खुद्द “महारवाड्यात” करून तेथेच त्यांनी त्यांच्या उद्धाराची कामगिरी केली व सारे आयुष्य त्या प्रीत्यर्थ वेचले, यात तिळमात्र शंका नाही. भरतखंडातील दलितबंधूंचा ज्या वेळी इतिहास लिहिला जाईल, त्यावेली गुरूवर्य आण्णासाहेब शिंदे यांच्या कार्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल यात मुळीच शंका नाही.
अण्णासाहेबांची सामाजिक क्षेत्रात जशी जहाल मते होती, तशीच राजकीय क्षेत्रातही होती. महाराष्ट्रातील बहुसंख्या मराठा समाज राजकारणात मागासलेला राहू नये म्हणून त्यांनी १९१७ साली “राष्ट्रीय मराठा पक्ष” स्थापन करून लोकमान्य टिळकांच्या बरोबर राजकीय क्षेत्रात सहकार्य केले.
लोकमान्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहालपणात यत्किंचितही कमीपणा आला नाही. १९३० साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सत्त्याग्रहाच्या लढ्यात वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी भाग घेतला व त्याबद्दल त्यांना ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षाही झाली.
अण्णासाहेबांच्या जीवनकार्याचा अशा प्रकारचा धावता आढावा घेतल्याने त्यांच्या कार्याची पूर्ण कल्पना दिल्यासारखे होणार नाही. परंतु तसे करण्याची आज आवश्यकताही नाही. अण्णासाहेबांनी माझ्या आठवणी व अनुभव म्हणून स्वत:चे चरित्र पुस्तक त्याने प्रसिद्ध केले असून त्याचा दुसरा भाग हस्तलिखित स्वरूपात तयार असल्याचे कळते. इतर काही मंडळीनीही त्यांची चरित्रे लिहून काढली आहेत. दलितोद्धाराच्या कार्याची माहिती देणारा ग्रंथ ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा त्यांनी स्वत:च लिहीला असल्यामुळे त्यांच्या कार्याचा परिचय कोणासही करून घेता येण्यासारखा आहे.
ही सर्व माहिती एकत्र केली तरी त्यावरून अण्णासाहेबांच्या स्वभावाचीकल्पना नीटशी येणे शक्य नाही. जुन्या पिढीत जी काही १०-५ अत्यंत बुद्धिवान व कर्तृत्ववान अशी माणसे महाराष्ट्रात निपजली त्यांत अण्णासाहेबांची गणना करावी लागेल. ते स्वभावाचे अत्यंत प्रेमळ गृहस्थ होते. अण्णासाहेबांकडे कोणीही मनुष्य गेल्यानंतर त्याला नि:स्पृह सडेतोड पण आपुलकीचा सल्ला मिळावयाचा हे अगदी ठरल्यासारखे होते. गेली ४-५ वर्षे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते घरीच असत. त्यांच्या कार्याचा त्या काळात ज्याप्रमाणे गौरव व्हावयास पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही. एवढेच नव्हे तर त्यांची उपेक्षा झाली हे कटु सत्य येथे नमूद केल्याशिवाय आम्हाला राहवत नाही. ज्या मराठा समाजात त्यांचा जन्म झाला. त्या समाजातील लोकांनी देखील अण्णासाहेबांच्या संबंधी आपली लेखणी व जिव्हा विटाळली हे आम्हास ठाऊक आहे. परंतु हा एक महाराष्ट्रात फार मोठा दुर्गूण आहे असे म्हणून त्याकडे कानाडोळा करणेच सर्वात उत्तम. अण्णासाहेबांनी स्वार्थलोलूप होऊन जर सरकारी नोकरी स्वीकारली असती तर ते आपल्या उतार वयात आज अनेक सेवानिवृत्तांप्रमाणे सुखासमाधानाने वावरताना दिसले असते. परंतु तो मार्ग अजिबात सोडून देऊन त्यांनी उभे आयुष्य दलितांच्या सेवेत घातले मग त्याबद्दल महाराष्ट्रीय जनता त्यांच्या पदरात कोमतेही माप घालो. त्याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. मराठा समाजात एवढा त्यागी व कर्तृत्ववान पुरूष गेया कैक पिढ्यात जन्मला नाही आणि तो पुढे लवकरच जन्मास येईल किंवा नाही याची जबरदस्त शंका वाटते. फावल्या वेळात बहुजन समाजाच्या उद्धाराच्या बाता झोकरणा-यांनी अण्णांसाहेबांचे चरित्र आपल्या डोळ्यांपुढे ठेवावे आणि त्यानुसार कार्यप्रवण बनावे अशी आमची त्यांना सूचना आहे. अण्णासाहेबांनी केलेल्या समाजकार्याचे ऋण फेडण्याचा हा एकमेव मार्ग असून ते किती प्रमाणात फेडले जाते यावरच बहुजन समाजाची प्रगती अवलंबून असून त्यामुळेच अण्णासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे.