श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका

[पत्रिकेच्या खास प्रतिनिधीकडून]

सुबोध पत्रिकेच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त डायमंड ज्युबिलीच्या खास अंकाकरिता काही संदेश देण्याविषयी रा. शिंदे ह्यांना आग्रह केला असता, त्यांच्याशी जे संभाषण झाले त्याचा सारांश थोडक्यात पुढील शब्दांत दिली आहे-

प्रार्थना समाजाच्या उदात्त तत्त्वाचा प्रसार करण्याचे कामी सुबोध पत्रिकेला आजपर्यंत जे यश प्राप्त झाले आहे, त्याचे बहुतेक श्रेय माझे मित्र रा. द्वारकानाथपंत वैद्य ह्यांनाच दिले पाहिजे. म्हणून माझ्या दृष्टीने व माझ्या प्रामाणिक समजुतीप्रमाणे मी स्पष्ट शब्दात असे म्हणतो की, रा. वैद्य ह्यांच्याच निष्ठापूर्वक, फलाशा न धरता कर्तव्यकर्म करण्याच्या धोरणामुळेच पत्रिकेला हे स्वरूप प्राप्त झाले आहे व तेव्हापासून आजपर्यंत रा. वैद्य हेच तिचे मराठी बाजूचे संपादक आहेत. त्यांनी अनेक संकटांतून, मोठ्या वादळातून, धैर्याने, चिकाटीने, सतत उद्योगाने, आपल्या खासगी गरजा व अडचणी ह्यांस न जुमानता, कोणत्याही प्रकारचे वेतन न घेता पत्रिकेस वाचविले आहे, एवढेच नव्हे तर पत्रिकेबद्दलची त्यांची तळमळ इतकी प्रखर आहे की एक कायमचा निधी जमविण्याच्या त्यांच्या कार्यास यश येत चालले आहे. शुद्ध, सनातन, शाश्वत तत्त्वाचा प्रसार करण्याचे साधन पत्रिका आहे हे जाणून ते पत्र चिरकाल टिकेल अशा प्रकारची व्यवस्था करण्याकरिताच वरील निधी जमविण्यात येत आहे हे रा. वैद्य व त्यांचे साहायक ह्यांना भूषणावह आहे.

दृढनिश्चयाने व नेटाने समाजाच्या उदार धोरणास अनुसरून पत्रिकेच्याद्वारे रा. वैद्य ह्यांनी जी लोकसेवा केली आहे, ती बहुमोल असून तिचे परिणाम फार हितकारक झाले आहेत व ते भविष्य काळीही टिकण्यासारखे आहेत. त्यांनी पत्रिकेत प्रसिद्ध केलेली निरनिराळ्या गंभीर विषयांवरील प्रचंड लेखमाला पाहिली तर त्यांच्या चिकाटीचे व दीर्घोद्योगाचे मोठे आश्चर्य वाटते. त्यांच्या लेखामध्ये त्यांच्या अंत:करणातील तळमळ दिसून येते. त्यांची गंभीर विचारसरणी, मुद्देसूदपणे विषयांची केलेली मांडणी व समतोल वृत्ती हे गुण त्यांच्या लेखामध्ये जागोजाग आढळून येतात.

गाजावाजा न करिता अगदी नियमितपणे, निश्चयाने व अविश्रांतपणे रा. वैद्यांनी जी ही समाजाची सेवा आज तीन तपे केली आहे, अशा प्रकारचे उदाहरण आपल्या ह्या हिंदुस्थानात तरी क्वचितच आढळते येतात.

गाजावाजा न करिता अगदी नियमितपणे, निश्चयाने व अविश्रांतपणे रा. वैद्यांनी जी ही समाजाची सेवा आज तीन तपे केली आहे, तशा प्रकारचे उदाहरण आपल्या ह्या हिंदुस्थानात तरी क्वचितच आढळते व हा विचार मनात आला म्हणजे अंत:करण भरून येते आणि हे देवाचे कार्य त्यांनी एकसारखे चालू ठेवले आहे, म्हणून त्यांच्याविषयी धन्योद्गार सहजपणे मुखातून बाहेर पडल्याशिवाय रहात नाहीत.

ह्यानंतर पत्रिकेच्या दुस-या कामगिरीविषयी काही सांगा असे रा. शिंदे ह्यांना विचारले असता, ते म्हणाले की, अशा प्रसंगी रा. वैद्य ह्यांच्या कामगिरी व्यतिरिक्त मी दुसरे काही सांगितले तर रा. वैद्य ह्यांची कामगिरी लोकांच्या दृष्टीआड होऊन तिचे महत्त्व कमी होईल म्हणून ह्यावेळी रा. वैद्य ह्यांची कामगिरीच स्पष्टपणे लोकांच्या ध्यानात यावी, हीच माझी इच्छा आहे, तेव्हा मी दुसरे काही सांगत नाही, मात्र, जगन्नियंत्या परमेश्वराजवळ माझी एवढीच प्रार्थना आहे की, त्याने रा. वैद्य ह्यांना उदंड आयुष्य व भरपूर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देऊन त्यांच्याकडून अशीच जनसेवा उत्तरोत्तर करवून घ्यावी!