विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती

[१९१९ च्या राजकीय सुधारणांच्या कायद्यानुसार प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका १९२० च्या नोव्हेंबरात  व्हावयाच्या होत्या. त्या जिंकण्यासाठी निरनिराळ्या राजकीय पक्षांनी कंबरा कसल्या. राष्ट्रीय पक्ष, नेमस्त पक्ष, ब्राह्मणेतर पक्ष ह्यांची खलबते सुरू झाली. अशा समयी अस्पृश्योद्धाराचे कार्य करीत असलेले विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी आपण पुणे शहराच्या जागेकरिता  निवडणुकीस उभा राहणार असल्याने जाहीर केले. ते कळल्यावर, सरकारने मराठ्यांसाठी ज्या सात राखीव जागा ठेविल्या होत्या, त्यांपैकी एका जागेसाठी ब्राह्मणेतर पक्षातर्फे त्यांनी उभे रहावे असे त्यास मराठा मंडळीकडून सुचविण्यात आले. पण, त्यांनी “त्या राखीव जागेसाठी मी उभा रहाणार नाही. त्यातील जातीयवाचक तत्त्वाच्या मी विरूद्ध आहे.” असे स्पष्टपणे बोलून दाखवून मराठे मंडळीची सूचना मान्य केली नाही. ‘ब्राह्मणेतर पक्ष’ हे नाव त्यांना पसंत नव्हते. सर्व पक्षांचे साहाय्य मिळवून ‘उघड्या जागे’साठी आपण उभे रहावे असा त्यांचा मनोद्य होता. त्याप्रमाणे त्यांनी आपण ‘बहुजनां’साठी उभा राहू इच्छितो, असे जाहीरही करून टाकले. आपल्या जाहिरनाम्यात त्यासंबंधी त्यांनी खालीलप्रमाणे लिहिले होते.

“हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीय दृष्ट्या दोन मुख्य भाग पडत आहेत. (१) विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबल ह्याने पुढारलेला वर्ग, (२) आणि दुसरा ह्यातील कोणतेच बळ अंगी नसल्याने व नाइलाजाने मागासलेला वर्ग किंवा बहुजनसमाज. ह्या दुस-या वर्गातच अत्यंत तिरस्कृत अशा अस्पृश्य वर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लीच्या राजकीय सुधारणांचा अरूणोद्य होतो न होतो तोच ह्या दोन भागांत मोठा विरोध भासू लागला. आणि ह्या विरोधानुसार बहुजन समाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक नवीन पक्षच होऊन चुकला आहे. ह्यालाच ब्राह्मणेतर पक्ष असे नाव दिले जाते. पण नाईलाज आणि बलहीनता ही जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणे ती ह्या वर्गाच्या पक्षास ‘ब्राह्मणेतर पक्ष’ असे जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाहीत. म्हणूनच ह्या नवीन पक्षास ‘बहुजन पक्ष’ अथवा ‘जनपद पक्ष’ असे अगदी सार्थ व निर्विकल्प नाव दिल्याने त्यावर कसलाही आक्षेप आणण्यास जागा नाही.”

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुण्याच्या भवानी पेठेत बडोद्याचे खासेराव जाधव ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक जाहीर सभा भरली. तीत प्रांतिक कायदेमंडळातील ह्याच जागेसाठी उभे राहिलेले नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी भाषण केले. त्यात ते ...... “माझे वाडवडील शेतकरी होते. मी ‘मराठा’ पत्राचा संपादक होतो. म्हणून मी मराठाच आहे.” असे बोलले. केळकरांचे हे बोलणे कोल्हापूरचे शाहू महाराज ह्यांच्या कानावर गेले. केळकरांच्या ह्या बोलण्याचा शाहू महाराजांना राग आला. त्यांनी शिंदे ह्यास खालील एक विस्तृत पत्र व लगोलग दुसरे दिवशी आणखी एक छोटे पत्र धाडले......
संपादक]
रायबाग, कंप
२९/८/२०.

सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही वि. की मला मनापासून आपले अभिनंदन करण्याची परवानगी द्या. आपण पुणे शहरातर्फे निवडून यावे अशी माझी आशा आहे व खरोखरच यावे. आपले ध्येय व माझे ध्येय एकच आहे. जात नसावी पण वर्ग जरूर पाहिजेत व वर्ग जरूर राहणारच. सर्व पाश्चिमात्य देशांतही ते आहेत. नरसिंह चिंतामण केळकर म्हणतात की, “मी मराठा आहे. मी शेतकरी नाही व शइपाईही नाही तर वि. रा. शिंद्यांना न निवडता मला निवडून द्यावे. कारण माझी आणि त्यांची सामाजिक स्थिती एक आहे.” कोठे विठ्ठल रामजी शिंदे व कोठे नरसिंह चिंतामण केळकर? कहां राजा भोज व कहां गंग्या तेली? कुठे इंद्राचा ऐरावत व कुठे शामभटाची तट्टाणी? वि. रा. शिंदे जातिभेद व जातिमत्सर विसरून आपली धनदौलत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा| तोचि साधु ओळखावा||१|| शिंदे (असे) आपले वर्तन आहे. मी स्तुती करतो असे नाही. इलेक्शनमध्ये निवडू येण्याकरिता केळकरांसारख्या मनुष्याने वि. रा. शिद्यांचे किंवा डोमकावळा व मोराची पिसे ह्या गोष्टीतल्याप्रमाणे वि. रा. शिंद्यांचे सोंग काढू पाहिले तर निदान आता तरी लोक इतके धूर्त व चतुर आहेत की, हे शिंद्यांचे सोंग आहे असे ओळखतील. मग इतक्या नित्कृष्टावस्थेत जाऊन एन. सी. केळकरांना असे वाटते का की, आपण कट्टे चातुर्वर्ण्यं धर्मवादी असून रोटीबेटी व्यवहारास कबूल नव्हे, तर स्पर्शास्पर्शास कबूल आहे असे म्हणण्यास लाज वाटते.

त्यांनी शिंद्यांची बरोबरी कशी करावी? बरोबरी होणे शक्य नाही. मी म्हणे ‘मराठा’ वर्तमानपत्र चालविले. त्यांच्यावर मी म्हणतो की, माझ्या बैलाचे नाव मी ‘ब्रिटानिया’ ठेवले. माझ्या आवडत्या घोड्याचे नाव ‘टर्किश फ्लॅग’ ठेवले. माझ्या गार्डचे नाव ‘जपान’ ठेवले. म्हणून मी जपानी अगर तुर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल? किंवा ते मला कबूल करतील कां? अर्थातच नाही. वि. रा. शिंदे मराठा वर्गापैकी आहेत. जपानातील लोकांप्रमाणे व त्यातील सामुराई वर्गाने आपले उच्चस्थान सोडून सर्व लोकांना आपल्या बरोबरीने केले व देशोन्नती केली, त्याप्रमाणे अवलंबन केले आहे. एन. सी. केळकर रोटीबेटी व्यवहार करण्यास कबूल नाहीत. इतकेच नव्हे तर स्पशास्पर्श करून गरीब लोकांशी बोलण्यातही त्यांना कमीपणा वाटतो. अशा स्थितीत मी ‘मराठा’ वर्तमानपत्र चालवितो म्हणून लोकांना फसविण्यास प्रवृत्त होणे किती तरी शरमेचे आहे. “ज्याचे त्याला व गाढव ओझ्याला” ह्या नियमाप्रमाणे ‘मराठा’ हे नाव वर्तमानपत्रात देऊन मराठा व ब्राह्मणेतर ह्या वर्गाचे काय कल्याण केले? मुळीच नाही. मग कशाला ‘मराठा’ ह्या पत्राचे नावाखाली दडायचे? इतकी मी आपली स्तुती केली ही काही कारणाने केली असे आपल्याला वाटत असेल, परंतु, तसे मात्र नाही. परंतु एक विनंती आपल्याला करणेची आहे. इतके दिवस गणेश उत्सव, शिवाजी महाराज ह्यांच्या नावाखाली दडून टिळकांनी आपला नावलौकिक केला. गणेश उत्सव काढून काही वर्षापूर्वी मोहरमच्या छातीवर बसविला. शिवाजी उत्सव करून ब्राह्मणेतरात थोरवी मिळविली. परंतु त्या शिवबाचे मात्र कोणीही चरित्र लिहिले नाही. शिंदे, आपण त्या शिवबाचे गोड व सुरस चरित्र लिहून त्या शिवाजीची सेवा केल्याबद्दलचे यश आपण घ्यावे अशी माझी इच्छा आहे. माझे वडील चौथे शिवाजी यांच्याबद्दल टिळक-आगरकर तुरूंगात गेले. परंतु त्या दुर्भागी राजपुत्राचे कोणी पुस्तक लिहून छापले काय? नाही. ते मेले व टिळक आगरकर लोकप्रिय झाले. आपल्यास पाहिजे ती रेकॉर्डची माहिती देऊन ह्या दोन राजपुत्रांचे पुस्तक लिहिण्यास मी विनंती केल्यास आपल्याला फार त्रास दिल्यासारखा होणार नाही असे वाटते. मी पुण्यास लवकरच येणार आहे. भेटीअंती सर्व खुलासा. परमेश्वर आपल्याला ‘इलेक्ट’ करो अशी परमेश्वराची प्रार्थना करून पत्र पुरे करतो.

जहाल असोत किंवा मवाळ असोत, जपानी असोत किंवा टर्किश असोत, आमचे धोरण असेच असणेचे की, ज्यात जनतेचे धोरण त्याशी आम्ही साहाय्य करणेचे. हेच ना आम्ही आमचे ध्येय ठेवणेचे? ह्यात काय चूक असल्यास लिहून कळवावे. “सत्यंच सत्यंच” ह्या म्हणीप्रमाणे सत्य पक्षाला आमच्या पक्षाची नेहमी मदत करणेचे हेच ध्येय. असेच ना खरे? आपण वृद्ध अनुभवशीर आहात. म्हणून आपल्या उपदेशाची अपेक्षा मी करीत आहे. पत्राचे उत्तर जरूर येईल अशी आशा आहे. पत्र श्रीपतराव शिंदे, जेधे, काळभोर ह्यांना वाचून दाखवावे. कळावे बहुत काय लिहिणे लोभ असावा ही विनंती.

आमचा पक्ष सत्याचा आहे. आमच्या पक्षाचे सत्यपक्ष हे ध्येय आहे. आम्ही कुणातच मिळू इच्छित नाही. सत्य असेल तेथे मिसळल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हेच ना आम्ही मुलांनी ध्येय ठेवणेचे? कळावे बहुत काय लिहिणे लोभ करावा ही विनंती.
शाहू छत्रपती,
कोल्हापूर, ३०/८/१९२०

सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही वि. वि.

आपण आम्हा सर्वांचे विनंतीकडे लक्ष देऊन इलेक्शनला उभे रहाण्याचे कबूल केले ह्याबद्दल आम्हास आपले मोठे उपकार वाटत आहेत. आपल्यासारखे मोठे योग्य पुरूष मराठा समाजालाच काय तर कोणत्याही समाजाला लाभले तर फारच उत्तम आहे. इलेक्शनच्या कामी माझ्या हातून जी सेवा होईल ती मो मोठ्या आनंदाने करीन. कळावे लोभ करावा ही विनंती.
शाहू छत्रपती.

[शाहू महराजांनी शिंदे ह्यांस असे आश्वासन दिले असले, तरी त्याप्रमाणे त्याजकडून प्रत्यक्ष कृती घडली नाही. स्वतंत्र म्हणून उभे राहिलेले वासुदेवराव गुप्ते (दिवाण सर सबनीस ह्यांचे मेहुणे) ह्यास त्यानी पाठींबा दिला. स्वत:, महाराज आणि त्यांचे दिवाण रावबहूदूर सबनीस हे पुण्यास निवडणुकीच्या दिवसांत तळ देऊन बसले होते. शिंदे ह्यास दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न वागता त्यांच्या प्रतिस्पर्ध्यास साहाय्य करण्यास महाराजांनी उभे रहावे, हे पाहून आश्चर्यच वाटते. पण त्याला तसेच एक निमित्त कारण झाले होते. महाराजांनी त्या सुमारास मराठा क्षात्रजगतगुरू नेमण्याचा विचार चालविला होता. शिंदे ह्यांचा ह्या नेमणूकीस विरोध होता. तो महाराजांस मानवला नाही. त्यांनी शिंद्यांकडे पाठ फिरविली व ते गुप्ते ह्यास पाठींबा देण्यास पुढे सरसावले. शिंदे ह्यास अपयश आले..... संपादक.]

शिरोळ कँप, १७/७/१९२१
सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही विनंती विशेष.

मी कोल्हापुरास असताना आपण एकदा इकडे येऊन जावे. हल्ली कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे चेअरमन हे अस्पृश्य जातीचे असून, म्युनिसिपालिटीत एक व्हटकर नावाचा क्लार्क वीस रूपये पगारावर अस्पृश्य जातीतील आहे. काम्युनल रिप्रेझेंटेशन अस्पृश्यांना व ब्राह्मणेतरांना दिल्याने हा त्यांना चान्स मिळाला आहे. सॅनिटेशनच्या पॉईंटवर आजवर ब्राह्मणाकडून अस्पृश्य मानलेल्यांना जो त्रास होत असे तोही आता नाहीसा झाला आहे. तेव्हा ही सर्व परिस्थिती आपम येऊन अवलोकन करून जाल, अशी आशा आहे.
कळावे, लोभाची वृद्धी व्हावी ही विनंती.
शाहू छत्रपती