सोमवंशीय सन्मार्दर्शक समाज

(सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाजातर्फे अस्पृश्य वर्गाची जाहीर सभा, पुणे.........एका कळकळीच्या भाषणातील काही भाग.)

ह्या समाजातील कामे करणारी सर्व तरूण मंडळी आमच्या पुणे येथील बोर्डिंगमध्ये शिकून मोठी झालेली आहेत. त्यांनी आपल्या जातीला सन्मार्ग दाखविण्याचे हे काम पत्करलेले पाहून प्रत्यक्ष त्यांच्या आईबापापेक्षा मला कौतुक वाटणे साहजिकच आहे. प्रथम निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे काम ह्या शहरात सुरू झाल्यापासून शिमग्यातील बीभत्स प्रकार बंद करण्यासाठी होलिका संमेलनाची योजना झाली. ह्या वेळी निरनिराळ्या जातींच्या पेठानिहाय मंडळ्या स्थापण्यात आल्या. अशाच मंडळीपैकी अस्पृश्यवर्गाच्या मंडळीनी, हा कायमचा समाज स्थापिलेला पाहून होलिका, संमेलनाच्या चालकांच्या उद्देश कल्पनेपेक्षाही अधिक सफल झाला म्हणावयाचा. अस्पृश्य वर्गाच्या काही काही वस्तीमध्ये शिमगा नसताही त्यातील बीभत्स प्रकार दिसून यावयाचे ते दिवस जाऊन आता काही शिकलेल्या तरूण मंडळीनी आपल्या जातीच्या उद्धाराने काम कायमचे पत्करले हे देशातील एक सुचिन्हच होय. येथे जो मोठा स्त्रीसमूह जमलेला आहे, त्यांना उद्देशून मला एवढेच सांगावयाचे आहे की, जर त्यांनी आपल्या ताब्यातील सर्व लहान मुलांना आमच्या शाळेत घातले तर थोडक्यात काळात आतासारखे समाज अधिक निर्माण होऊन जातींचे कल्याण हा हा म्हणता होईल. आमचे मिशन नुसते शाळेचेच काम न करिता त्याबरोबर इतरही कामे करीत आहे. उदा. आजचे अध्यक्ष डॉ. खेडकर हे मिशनने चालविलेल्या धर्मार्य दवाखान्यात रोज सकाळी एक तास येऊन औषधे फुकट देत असतात. तरी पुष्कळ भोळ्याभाबड्या बाया आपले स्वत:चे किंवा लेकरांचे आजार अद्यापि ह्यांना न दाखविता मांत्रिक, भगत व देवर्षी ह्यांच्या नादी लागून आपले पैसे व जीव धोक्यात घालतात. आजच्या प्रसंगी एका महत्वाच्या विषयावर अस्पृश्य वर्गाच्या जबाबदार पुढा-यांना दोन शब्द सांगणे मला जरूर आहे. हल्ली आपल्या देशावर मोठा आणीबाणीचा प्रसंग आहे. सार्वभौम सरकार चिंतामग्न झाले आहे. जनतेचे सर्व जातीचे पुढारी राजकीय हक्क साधण्यास सिद्ध झाले आहेत. अशा वेळी तुमच्यामध्येही झपाट्याने जागृती होत आहे, हे इष्टच आहे. जातवार प्रतिनिधित्वाचा हक्क मिळाला नाही म्हणून इतरांप्रमाणे तुम्हीही सरकारवर रूसून बसण्याची ही वेळ नव्हे, हे मला तुमच्या हितासाठी कळकळीने सांगणे आहे. काही झाले तरी सरकार तुमच्या बाजूस आहे. जातवार प्रतिनिधित्वाचाच हक्क देण्याच्या कामी सरकारने म्हटल्याप्रमाणे जरी अनेक अडचणी असल्या तरी कौन्सिलमध्ये तुमच्याच जातीचे थोडे खास प्रतिनिधी निवडून देण्याची तजवीज होईल, अशी मला अद्यापि बळकट आशा आहे. म्हणून मला तुम्हाला अगत्याचे सांगणे आहे की, त्यावेळी तुम्ही सरकारशी फटकून वागू नये., किंवा बेजबाबदारपणाने न समजताच काहीतरी टीका करू नये. राजकीय हक्क संपादण्याचा खरा मार्ग म्हणजे, सरकारास तन, मन, धन खर्च करून ह्या लढाईत शिकस्तीची मदत करणे हा होय. तुमच्या जातीची एक पलटण पूर्ण झालेली आहे आणि ती हल्ली बडोदा कँपमध्ये आहे, असे मला एका मित्राने सांगितले आहे. ते ऐकून मला अतिशय आनंद झाला आणि सैन्य भरतीच्या कामी हल्लीपेक्षाही अधिक जोराने प्रयत्न झाल्यास साम्राज्याचेच नव्हे तर तुमच्या जातीचेही कल्याण होईल.