“हिरा ठेविता ऐरणी| वाचे मारिता जो घणी||
तुका म्हणे तोचि संत| सोशी जगाचे आघात||”
गेल्या दोन खेपांस आपण नैराश्यवादाचे निरसन आणि आपल्या वाङ्मयामध्येही आनंदवादाची जी वचने आहेत त्यांचे अवलोकन केले. ह्या खेपेस संसारसुखाची साधने काय आहेत ते आपण पाहू. पहिले साधन विषयांची संपादणी होय, हे येथे स्पष्ट रीतीने सांगितले पाहिजे. आजपर्यंत धर्ममार्गातल्या माणसांनी सांसारिक विषयांची अवहेलना वाजवीपेक्षा अधिक केलेली आहे. विषय म्हणजे सर्वस्वी त्याज्य, केवळ दु:खावह असा साधारण समज करून दिला आहे. पण हा केवळ प्रत्याघाताचा प्रकार आहे. विषयातच सर्व पौरूषाचे पर्यवसान झाल्यामुळे तदितर जी सुखे आहेत त्यांच्यापासून मनुष्य दुरावतो, म्हणून नुसती विषयातिरेकाचीच अवहेलना व्हावयास पाहिजे, समूळ विषय तितके वाईट हा समज चुकीचा आहे. ईश्वराने बाह्य सृष्टीमध्ये रूपरसगंधादी अनेक सुंदर आणि सुखावह विषय उत्पन्न केले आहेत आणि त्यांच्या उपभोगासाठी आपल्यामध्ये चक्षुश्रोत्रादी पंचेंद्रियांची साधने दिली आहेत. ह्या ईश्वरी संकेतान्वये संसारात जेव्हा जेव्हा आमच्या इंद्रियांचा आणि बाहेरील अर्थाचा संनिकर्ष होतो तेव्हा तेव्हा आपल्याला जी अनुकूल संवेदना किंवा सुख होते ते खोटे किंवा वाईट असे म्हणणे हा नुसता भ्रम आहे, इतकेच नव्हे तर ही ईश्वराची बदनामी आहे. विषय सुखावह आहेत ह्याविषयी विशेष निरूपण करावयाला नको. हा अज्ञान माणसास आणि सर्व प्राण्यांसही नित्य घडून येणारा अनुभव आहे. पण ह्यासंबंधी वरील जी प्रत्याघाताची भावना होते आणि मनाची ह्याच्या उलट अतिरेकाची वृत्ती होते त्यामुळेच विषयाविषयी सम्यक् ज्ञान करून देण्याची जरूरी वाटली. विषय हा आमच्या जीविताचा पाया म्हणून त्याची संपादणी यथाशक्ती सर्व प्रयत्न करून केलीच पाहिजे. ह्यातून कोणीही आपल्याला सोडून घेऊ नये. “गृह त्यजे तो मठी बनावे उदिम त्यजे तो फेरी” ह्या दोह्यामध्ये कबीराने म्हटल्याप्रमाणे बैराग्यांनी जरी घराचा त्याग केला तरी त्यांना मठ बांधावा लागतो, आपला धंदा सोडला तरी भिक्षेसाठी फेरी करावी लागते. विषय काही कायमचे सुटत नाहीत. विषयाची संपादणी श्रमविभागामुळे व्यक्तिपरत्वे कमी अधिक होईल, परंतु त्याचा समूळ सर्वांनीच त्याग करून व्यवहार जसा चालणार नाही तसा धर्मही चालणार नाही. ह्याविषयी मनात कोणताही आडपडदा आणि भाषणात अर्धवटपणा न ठेवता सर्व धर्मोपदेशकांनी असे मोकळ्या अंत:करणाने प्रतिपादन केले पाहिजे की, शक्य ते प्रयत्न करून विषय संपादन करणे हा एक मनुष्याचा पवित्र पुरूषार्थ आहे व अशी धर्माची आज्ञाही आहे.
पण एवढ्याने आपल्या सुखाची पूर्थता होत नाही. ह्याहून सुखाची निराळी द्वारे आहेत. ह्या संसारात वारंवार आपणावर दु:खाची आपत्ती येते. क्रूर आणि अन्यायी पिता, कृतघ्न आणि कर्तव्यहीन पुत्र, जाच करणारी सासू, अपमान करणारी सून, जुलमी धनी, चुकार चाकर इत्यादी एकेक किंवा सर्व मिळून आपत्ती एकाद्या व्यक्तीवर एकदम येण्याचा संभव आहे. ह्या ठिकाणी प्रयत्नाचे काही चालत नाही. यत्नाचा हा प्रदेशच नव्हे. अशा प्रसंगी सहनच करणे जरूर असते. शांत आणि तेजस्वी वृत्ती ठेवून ह्या आपत्ती जर आपण आदराने स्वीकारू तर संसारातील सुखाचे द्वार जणू उघडलेले दिसेल.
ह्या आपत्तीच उलट आपल्या सुखाची सामग्री होते. सहन करण्याचे हे प्रसंग संसारातून अजीबात काढून टाकले तर आपल्या सुखाचा एक महत्त्वाचा भाग गळाला असे होईल, तेणेकरून आपल्या मानसिक शक्तीला व्यायाम नाहीसा होऊन ते दुबळे आणि नरम होऊन जाईल, इतकेच नव्हे तर आपल्या अनुभवालाही एकदेशीयपणा येईल. वरील विषयसंपादणीच्या बाबतीतही हा व्यायामाचाच भाग प्रधान असतो. अमुक विषयांची जोड मिळाली ह्यातच सुख नसते तर ते ते विषय मिळविताना आपण जे प्रयत्न करतो ते प्रयत्न्ही सुखावह असतात. प्रयत्नाने मिळविलेली संपत्ती वारसाने मिळविलेल्या संपत्तीपेक्षा अधिक प्रिय वाटते. तर ज्याअर्थी शारीरिक व्यायामापेक्षाही मानसिक व्यायामाची सुखावहता अधिक आहे, व ज्या ज्या मानाने आपत्ती अधिक येऊन ती सहन करण्यामध्ये आम्हांला यश येईल त्या त्या मानाने आम्ही सुखाचे अधिक वाटेकरी होऊ.
पण ह्यावरून आम्ही मुद्दाम आपत्ती हुडकीत जावे असे समजू नये. क्रूर पित्यापेक्षा मायाळू पिता आणि कृतघ्न पुत्रापेक्षा निष्ठावंत पुत्र अधिक वाईट अशातला अर्थ नाही. वरील आपत्ती सहज आलेल्या ब-या, आपल्याला सहन करण्याचे सुख मिळावे म्हणून त्या ओढूनताणून आणणे बरे नाही.
वरील आपत्ती आल्यास त्या सोसाव्या, एवढ्यावरून त्या टाळण्याचा प्रयत्न करू नये असे नव्हे. त्या जर आपल्या दोषांनी येत असल्या तर सहन करण्याचा मुळी प्रश्नच उरत नाही. परंतु त्या जर दुस-याच्या दोषाने येत असल्या तर ते दोष निवारण्याचे प्रयत्न करीत असणे हे सुखाचे तिसरे साधन होय. आपले आप्त, इष्टमित्र किंबहुना शत्रूदेखील ह्यांच्या दोषांचे सात्विकपणे निवारण करण्यातही एक प्रकारचे श्रेष्ठ सुख आहे. श्रीकृष्णाने सांगितलेल्या वृत्रइंद्राच्या गोष्टीत वरील दोनच सुखे सांगितली आहेत. वृत्राला विषयातून हुसकावून लावून ती सुखाची शुद्ध साधने होतील असे करणे आणि त्याने आपल्या आत्म्यात आश्रय घेतला असता तेथूनही हुसकून लावून आत्म्यासही सुखाचे शुद्ध साधन करणे ह्या दोन गोष्टी झाल्यावर तिसरे मोठे साधन म्हणजे आपल्या शत्रु-मित्राच्या आत्म्यातूनही वृत्राला म्हणजे सुखाच्या अडथळ्याला हुसकून लावणे हे होय. वेदकाळी नुसते पहिलेच साधन साधले गेले. श्रीकृष्णाच्या काळी दुस-या साधनाची जोड मिळाली. आधुनिक काळी विचाराची आणि अनुभवाची पायरी ह्याहूनही पुढे गेली असल्यामुळे ह्या तिस-या साधनाची जोड मिळालेली आहे. आता मनुष्य केवळ व्यक्तिश: मुक्तीने किंवा पूर्णावस्थेने तृप्त होऊ शकत नाही. व्यक्तीचे विचार आणि अनुभव सर्व पूर्णावस्थेने तृप्त होऊ शकत नाही. व्यक्तीचे विचार आणि अनुभव सर्व समाजाच्या किंबहुना मनुष्य जातीच्या विचारात व अनुभवात मुरून गेलेले आहेत. पूर्णावस्था व्हावयाची ती सर्व जातींची आणि तद्वाराच व्यक्तीची होत असते अशी ही आधुनिक विकसित भावना आहे.