शास्त्र आणि तत्त्वज्ञान-१

शास्त्र आणि जीवन प्रदेशामध्ये खोल शिरत जाणा-या त्याच्या असंख्य शाखा, ही आधुनिक युगाचे एक महत्त्वाचे लक्षण होय, हे अगदी निर्विवाद आहे. शास्त्रामुळे जी विशिष्ट फलप्राप्ती झाली आहे, तेवढाच काय तो त्याचा परिणाम, असे नव्हे. त्याच्या बाह्य कार्यामुळे विश्वाशी आमचा अधिक निकट संबंध जडला आहे, आमच्या जीवनाला अधिक विशदता आली आहे, आणि आमचे बुद्धिमांद्य कमी होऊन बाह्य वस्तूंवरचे आमचे स्वामित्व दृढ झाले आहे. म्हणून जीवनाची मीमांसा निश्चित करण्याचे कामी शास्त्राचाही हात असला पाहिजे आणि त्याच्या योगे मनुष्याची पदवी उन्नत होत असली पाहिजे ह्यात शंका नाही. शास्त्राने बजावलेली कामगिरी जीवन संसृतीच्या कसास लावून पाहताना अर्थात शास्त्रालाही अद्याप किती तरी बिकट प्रश्न सोडवायचे आहेत हे दिसून येते. भौतिक शास्त्राच्या कार्यामध्ये जी भव्य सिद्धी प्राप्त झाली आहे, तिच्या भरात त्याच शास्त्राच्या (जड) पद्धतीचा मोर्चा मानवशास्त्रावरही वळविण्याची लालसा सहज उत्पन्न होत आहे. आणि हल्ली जो निरनिराळ्या विशिष्ट शास्त्रांचा सुव्यवस्थित विकास होत चालला आहे आणि त्या सर्वांच्या विशिष्ट कार्याची एक समतोल सांगड जमत चालली आहे, तिला वरील दूषित लालसेमुळे व्यत्यय घडत हे. तथापि ह्या व्यत्ययाचा प्रतिकारही योग्य प्रकारे होत आहे आणि अशा प्रकारच्या लालसेमुळे अखेरीस ख-या शास्त्राचे काही एक वाकडे न होता, शास्त्राला केवळ लोकप्रिय करण्याचा जो (ग्राम्य) प्रयत्न चालू असतो त्यालाच बाधा पडते. दुसरा एक धोका आहे तो असा, शास्त्राला बाह्य जगामध्ये जी यशप्राप्ती झाली आहे, तिच्या लकाकीमुळे अंत:करण दिपून जाण्याचा संभव आहे. चैतन्यशक्ती आणि विशिष्ट शास्त्रांनी मिळवून आणलेल्या विज्ञानाची अंत:समष्टी ह्यांचे तेज फिक्के पडल्याचा भास होतो. उपलब्ध झालेल्या बाह्य पदार्थाच्या सामग्रीवरच ठराविक दिशेने ज्ञानाची इमारत उठविणे एवढीच जणू शास्त्राची इतिकर्तव्यता असे वाटण्याचा संभव आहे. तरीपण आंतरिक तत्त्व (ज्ञाता) स्वयंभू गितमय आणि विविधरूपी आहे, हेही निदर्शनास येऊ लागले आहे, आणि शास्त्राची दिशा ठाम ठरून त्याला केवळ एककल्ली हटवादाचे स्वरूप प्राप्त होईल अशी फारशी भीती उरत नाही. तिसरी अडचण येते ती विचार आणि जीवन ह्यांचे परस्पर जे नाते आहे त्यामुळे. उदाहरणार्थ विशेषेकरून आम्ही जर्मन लोक केवळ ज्ञान म्हणजेच बाह्याचे अंतरामध्ये समरस होणे असा भ्रम करून घेत असतो आणि खरे चैतन्यतत्त्व बाजूलाच पडून पांडित्यबाहुल्याचाच आम्ही पुरस्कार करू लागतो. पण खरे पाहता हा काही शास्त्राचा दोष नव्हे. बाह्य परिस्थितीच्या संस्काराचा ज ओघ आपल्यावर चालून येतो त्याला सामोरे पाठविण्याला जाच्याजवळ आर्द्र जीवन असे काहीच नाही, अशा मनुष्याचा हा (दारिद्र्य) दोष होय. म्हणून शास्त्राचे महत्त्व आणि त्याने संपादलेले यश ह्यासंबंधी हा शेवटचा आक्षेप आम्हांला घेता येणार नाही.

तत्त्वज्ञानाची परिस्थिती वेगळी आहे. विश्वविद्यालयातील काही विशिष्ट बौद्धिक शिस्तीलाच केवल भुलून न जाता ज्याला म्हणून खरोखर सर्वसाधारणपणे विश्वविद्येचीच अपेक्षा असेल त्याला तत्त्वज्ञानाची हल्लीची अवस्था पाहून असमाधान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचे जे प्रस्तुत तत्त्वज्ञानविषयक प्रयत्न चालू आहेत; त्यांचा सर्वसामान्य असा कोणताही एक हेतूच नाही किंवा आधुनिक युगाची खरी आंतरिक गरज कोणती आहे ह्याचेही भान नाही. हल्लीच्या विचारसृष्टीमध्ये जो सर्वत्र गोंधळ गाजत आहे त्यातून सुटण्याची कोणी पर्वाच करीत नाही. आधुनिक युगामध्ये तत्त्वजिज्ञासेची जी एक मोठी लाट उसळली तिचा अखेरीस एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील तार्किक ज्ञानामध्ये लय झाला. त्यानंतर ह्या महोदयाचे एक दोन लहानसहान तरंग पसरून गेल्यावर आता कोठे तेच महाकार्य नवीन जोमाने पुन्हा हाती घेण्याची आम्हांला आकांक्षा वाटू लागली आहे. परंतु अद्यापि आम्हांला अंत:स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही म्हणून सावरासावर करण्याच्या धांदलीत आम्हांला अजून आधुनिक युगाला काही निश्चित असे वळण लावण्याचे सामर्थ्य आलेले नाही. तसेच गतकाळापासून चालत आलेल्या अनेक असंबद्ध विचारविलयाचे जाळे जे आम्हाभोवती गोवले गेले हे त्यातूनही आमची अद्यापि सुटका झालेली नाही.

वर सांगितलेले अंत:स्वातंत्र्य जेव्हा विचारजगताला प्राप्त होईल, तेव्हाच हल्लीच्या अवनतीतून सुटका होईल. हे स्वातंत्र्य हल्लीच्या आध्यात्मिक प्रवृत्तीला विसंगत असू नये आणि त्याच्यामुळे जुन्या व नव्या अनुभवांना बाधा येऊ नये. म्हणून खालील तीन मुख्य मुद्द्यांना प्राधान्य दिले पाहिजे.

(१) तत्त्वज्ञानाची प्रधान भूमिका जीवन अथवा संसार हीच असली पाहिजे. ह्या संसाराच्या पलीकडे असलेले कोणते एकादे तत्त्व ते ज्ञातरूपाचे असो किंवा श्रेयसाचे असो (त्याचे नाव ब्रह्म असो की माया असो) त्यास आपले मूलस्थान करून तत्त्वज्ञानाचे चालावयाचे नाही. आत्मा, जगत् आणि ब्रह्म ह्या सर्वांची उत्क्रांती व्हावयाची असल्यास ती ह्या संसारक्षेत्रातच होणे शक्य आहे. तशीच ह्या तिन्ही तत्त्वांची स्थिती प्रवाहमय (अथवा विकासमय) असल्यामुळे त्यांचा परस्परांमध्ये हल्ली भासविण्यात येतो तितका विरोध वस्तुत: मुळीच नाही. ह्या संसारक्षेत्रात काही एक निश्चित असे समष्टी स्वरूप आकलिता आल्यास तत्त्वज्ञानाचा ह्यातूनच उगम होऊन त्यास इतर विशिष्ट शास्त्रापेक्षा अधिक स्वतंत्र अशी स्वत:ची पदवी प्राप्त होईल, आणि केवल्यासंबंधी आमची भावना अधिक खोल आणि पायाशुद्ध होईल. (२) वर निर्दिष्ट केलेले संसाराचे समष्टीरूप मनुष्याच्या बदलत जाणा-या अवस्था आणि लहरीपलीकडे  असावयास पाहिजे आणि इंद्रियातील स्वयंभू आध्यात्मिक जीवनाच्या साक्षात्काराशिवाय ह्या समष्टीरूपाचे आकलन होणे शक्य नाही. केवळ व्यक्तिविषयक अनुभव आणि मते ह्यांच्या गोत्यातून सुटका व्हावयाची असल्यास अशा आध्यात्मिक जीवनावाचून गत्यंतरच नाही. (३) येणेप्रमाणे एका दृष्टीने आध्यात्मिक जीवन म्हणजे एक अनिवार्य आपत्ती भासते, तर दुस-या दृष्टीने पाहता आध्यात्मिक जीवन म्हणजे एक अनंतकालाची कामगिरी आहे असे दिसून येते. ख-या विधेययात्मक तत्त्वज्ञानाचा केवळ चिकित्सेचा नव्हे-प्रादुर्भाव व्हावयाचा म्हणजे तत्पूर्वी मानसिक जीवन हे चांगले नावारूपाला आले असलेच पाहिजे. अशा तत्त्वज्ञानाला जी काही खरी फलप्राप्ती झाली आहे तो त्याचा जीवनाशी निकट संबंध राहिल्यानेच झाली आहे, जीवनापासून अलिप्त राहिल्याने ती कधीच झाली नसती.