पुणे शहरात म्युनिसिपालिटी व इतर परोपकारी संस्थांकडून अनेक स्तुत्य प्रयत्न चालले आहेत. पण सरकारी किंवा निमसरकारी प्रयत्नाला खाजगी प्रयत्नाच्या जोडीची आवश्यकता भासल्यावरून लष्करमध्येही असा प्रयत्न सुरू करून एक आठवडा झाला. औषधे, वैद्यांचा सल्ला, थोडीबहूत पैशाचीही मदत मिळते. पण स्वयंसेवकांचीच मदत मात्र मिळेनाशी झाली आहे. कारण लष्करात बकाली वस्ती असल्यामुळे अशा कामाचे येथे कोणास अद्यापि अंगवळण नाही. निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या खालील शाळांचे ठिकाणी (१) ६७०, ताबूत स्ट्रीट, (२) नवा मोदीखाना येथे म्यूलकोअरला लागून डॉ. मुदलीयारचे घराशेजारी, (३) नानाच्या पेठेतील भोकरवाडीच्या मैदानात आणि लष्कर येथील
कामाठीपु-यात, शिवाय (४) १२ वी गल्ली नंबर १४९६ येथे सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाजाच्या माडीवर, अशा चार ठिकाणी तूर्त औषधे ठेवण्यात आली आहेत. शिवाय ती स्वयंसेवक मिळतील तशी घरोघरीही पोहोचविण्यात येत आहेत. ह्याशिवाय कँटोनमेंट म्युनिसिपालिटीचे मार्फत ५ आय. एम. एस. ऑफिसर्स, बरोबर मजुरांच्या डोक्यावर औषधांच्या मोठ्या पेट्या घेऊन स्वत: रोग्यास पाहाण्यास घरोघर हिंडत आहेत. डॉक्टरांनी कोणा गरीबास घरी पाहण्याची आवश्यकता असल्यास त्यांची वर्दी मार्केटपुढील म्युनिसिपल दवाखान्यात किंवा ६७०, ताबूत स्ट्रीट मधील शाळेत सकाळी ८ च्या आत पोहोचल्यास अशा घाईत शक्य तेवढी तजवीज होण्याचा संभव आहे. रोगाचे मान हटत आहे. तरी अद्यापि घरोघर बरेच रोगी पडून आहेत. त्यांना वेळेवर मदतीची आवश्यकता आहे. औषधाशिवाय अगदी अनाथ आजा-यास दूध किंवा कांजीसाठीही मदत करण्यात येईल. अनाथ अथवा लाचार झालेल्या नातलगांच्या मृतासाठी मर्तिकाचे सामान फुकट देण्याचीही व्यवस्था होईल. पण अशासाठी योग्य दाखला खाली सही करणाराकडे मिळाला पाहिजे. म्हणजे शक्त्यनुसार मदत होईल.
अशा आपत्तीत देखील गरीब लोकांमधील अंधविश्वास, अंधसंशय आणि अंधभीती आणि बेपर्वाई इ. अडचणीची व्यंगे नाहीशी झाली नाहीत व ती एकदम नाहीशी होणेही कठीण आहे. म्हणून तोपर्यंत अशा समाजसेवेची अत्यंत जरूरी आहे, हे जाणून स्वयंसेवकांनी व धनिकांनी आपण होऊनच पुढे यावे व मदतीची याचना करण्यास आम्ही त्यांच्या दारी येण्याची वाट पाहू नये, अशी कळकळीची विनवणी आहे.
विठ्ठल रामजी शिंदे,
जनरल सेक्रेटरी,
निराश्रित साहाय्यकारी मंडळी.
६७०, ताबूत स्ट्रीट, पुणे लष्कर,
ता. १२ ऑक्टोबर १९१८.