आपुले स्वहित करावे पै आधी

मंगळवार तारीख १४ जून रोजी कै. वासुदेवराव नवरंगे ह्यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमित्त रात्रौ रा. रा. सत्यवंत वासुदेव नवरंगे ह्यांचे घरी रा. रा. शिंदे ह्यांनी कीर्तन केले.

आपुले स्वहित करावे पै आधी| विचारूनी बुद्धी समाधान||
नये मागे पाहो वाट फिरोनिया| दुसरा संगिया साहकारी||
आपुलीया बळे घालावी हे कास| न येणेची आस आणिकांची||
तुका म्हणे ब्रह्मरसी दयावी बुडी| वासना हे कुडी सांडुनिया||

या अभंगाच्या द्वारे विषयोपक्रम करताना सुधारकाने अर्थात आदेशाच्या पाठीमागे लागलेल्या मनुष्याने कसे एकाकीच एकसारखे पुढे पाऊल टाकीत गेले पाहिजे ह्याचे निर्भीड पण मनोरंजक रीतीने प्रतिपादन केले. ते मुख्यत: म्हणाले की, आपण जर आपल्या स्वहिताकडे लक्ष देऊन ते केले नाही, काहीतरी जीवनादर्श सतत डोळ्यापुढे ठेवून त्या बाजूने एकेक पाऊल पुढे घेत गेलो नाही तर इतर आपल्या व्यवहराचे स्वरूप कसे आहे हे दार कबीर ह्यांनी ‘चामडेकी पुतली तू’ ह्या पद्यात स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणतात की चामड्याची गाय, तिचे दूध दही हेही चामड्याचेच, ते खाणारे मूलही चामड्याचेच, हत्ती चामड्याचा, घोडा उंट चामड्यांचे, बाजा वाजचो तोही चामड्याचा, फार काय बादशाह चामड्याचा, वजीर चामड्याचा, सारी दुनिया चामड्याची आहे. म्हणजे सर्व जगभर एक मोठा थोरला चामड्याचा कारखाना चालू आहे. म्हणून उद्धार होण्याचा मार्ग ते उपदेशितात की, हे चामड्याचे पुतळी, तू ईश्वराचे भजन साधून घे. नंतर त्यांनी महाभारताच्या अनुभासन पर्वातील वृद्ध ब्राह्मणीचा मुलगा सर्पदंशाने मेला ती गोष्ट सांगून ते म्हणाले की, सध्या जे तत्वज्ञान प्रचलित होत आहे, तेही आपणास असेच सांगत आहे की, ज्याचे त्याचे कर्माचा परिणाम त्यास भोगावा लागतो. म्हणून आदर्शमय कर्माकडे नेहमी आपला रोख असावा. या संबंधात तुकोबांचा ‘धाई अंतरीच्या सुखे’ हा अभंग ध्यानात वागवावा. नाही तर आपले समाधान असते एकीकडे, स्वहित एकीकडे व कर्तव्य एकीकडे असे चाललेले असते. ह्यासाठी इतर कोणी साह्यकारी आहेत की नाहीत याची वाट न पहाता, सर्वाचे एकमत झाले आहे की नाही ते न पाहता, इतकेच नव्हे तर बहुमत निदान आपल्या कुटुंबातील माणसांचे तरी मत अनुकूल आहे की नाही ह्याचाही विचार करण्यास न थांबता स्वबुद्धिनुसार वागेल पाहिजे. असे न केल्यास आपण वेडे, बिचारे वेडे सुखी तरी असतात, आपण दु:खी ठरू. स्वमतानुरूप आचरण न केले तर कसे मूर्खपणाचे होईल पहा, चंदनाचे लाकूड जाळून रत्नखचित उंची भाड्यांत तिळाची पेंढ जाळणा-या किंवा सोन्याच्या नांगराने काय म्हणे तर रूईच्या मुळीसाठी जमीन उकरणा-या वा काद्रवाला कापराच्या तुकड्यांनी आळे घालणा-या मंदभाग्याप्रमाणे आपण हतभागी ठरू म्हणून वेळेचा, संधीचा दुरूपयोग करून नये. तर काय करावे? कबीरांनी उपदेशिल्याप्रमाणे ‘चामडेकी पुतली तू करले भजन’ हेच एक उत्तर.

भजन म्हणजे काय? भजन म्हणजे आदर्शाच्या पाठीमागे लागणे. पण आदर्शासंबंधाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आपला आदर्श आपणास दिसला, उद्दिष्ट कळले तरी सुद्धा श्रीगुरूदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘आवडतो प्रिय परि गवसेना’ आपणास स्वजनाहूनही प्रिय असा जो आपला देह तोही विटेल, कंटाळेल पण आदर्श काही विटत नाही. संपत नाही.

ईश्वर हा नेहमी अदृश्य आदर्श, स्वहित ईश्वर हा नुसता नामभेद आहे. कोणी कशाही दृष्टीने विचार करावा, वस्तु एकच. धार्मिकाच्या दृष्टीने जे ईश्वरभजन तेच काहीच्या भाषेने आदर्शाच्या पाठी लागणे किंवा स्वहित साधणे होय. ही वस्तु एका अर्थी प्राप्त होत नाही. प्राप्त होण्याचीच असते. आणखी एका अर्थी ही वस्तु म्हणजे आदर्श किंवा ईश्वर स्वहित ह्यांच्या संबंधीची कल्पना सफल झाली असे म्हणावयाचे केव्हा? तर त्या कल्पनेच्या पलिकडे आणखी उच्च कल्पना दिसू लागली असेल तेव्हा.

दार्जिलिंगच्या बाजूने हिमालयाकडे जावे तेव्हा वाटते की, आपण हिमालयावर आलो पण धवलगिरी नामक शिखर तेथे दिसावयास लागून हिमालय अद्यापि चढावयाचा आहे हे दर्शविते. ते चढून जावे व आता वरील हिमालयावर आलो असे वाटू लागते, इतक्यात पलिकडे मौंट एव्हरेस्ट किंवा कैलास पर्वत दिसू लागतो. सारांश हिमालयाच्या शिखराप्रमाणे एक आदर्श सिद्ध झाला किंवा होतासा वाटला तोच त्यातून दुसरा उच्चतर आदर्श उदित होतो. अशी आदर्शाची परंपरा लागलेली असते. म्हणून आपली आशा सदैव जागृत ठेवली पाहिजे असे कवीने म्हटले आहे.

“श्री. गुरूदास अनन्य घडे जरी| अनुभव तंतू कधीही तुटेना||

पण आपणापैकी बहुतेकांना हा अनुभव तंतू, ही आदर्श परंपरा तुटण्याची भीतीच वाटायला नको| असा हा अनुभव एका आदर्शासंबंधाने जरी घडून येईल तर मग पुढे तो असाच येत राहील काय अशी चिंता मनाला वाटणार.

एक आदर्श तरी कोणी नीट सांभाळून अनुसरला आहे? आपण तितके अनन्य असतो कोठे? अन्य गतीप्रत जायला प्रेम किती जिवंत, जाज्वल्य किती रसरसीत पाहिजे त्या संबंधाने अशी कविता आहे.
प्रेम पियाला जो पिये, सीस दक्षिणा देय|
लोभी सीस न दे सके, नाम प्रेमका लेय|
जा घट प्रेम संचरे, सो धर जान मसान|
जसे खाल लुहारकी, स्वास लेत बिन प्राण||
आणखी उद्दिष्टासाठी ज्याने सर्व त्याग केला तो खरोखरी फकीर. केशव. स्वामी म्हणतात:

“ऐसी फकीर नही रे भाई| येतो सालिम वे शरमाई ||धृ.||
चेलेके धर हात पसारे| दुनियादारकू मानत प्यारे ||१||
मै घर लडके मनमे घरना| बाहेर निमाज रोज करना||२||
कान खोलकर केशव बोले | गाफील अलबत खावे झाली||३||

तात्पर्य दुनियादारी ज्यांना करावयाची असेल त्यांनी तीत पडावे. त्यांनी वृथा फकिरीचा आव आणू नये आणि ज्यांना आपले स्वहित संपादन करावयाचे आहे, आदर्शाप्रमाणे वागावयाचे आहे, उद्दिष्टास एकसारखे अट्टाहासाने अनुसरावयाचे आहे अर्थात चामड्याच्या पुतळीच्या जन्मात ईश्वरभजन साधावयाचे आहे, त्यांनी स्वत:च्या सोज्वळ बुद्धीप्रमाणे वागून आत्मसमाधानात सर्व काही तुटी समजून घेतली पाहिजे. ह्या कामी इतर कोणी आपल्याबरोबर येतील अशी इतरांची वाट पहात बसणे, ही कोती बुद्धी होय. हिला त्यागून आपल्या एकट्याच्याच बळाने ब्रह्मरसी बुडी घालावयास पाहिजे असा तुकोबांचा तसाच इतर साधू संतांचा आशय आहे.