[कोल्हापूरचे शाहू छत्रपती ह्यांचे चिरंजीव राजाराम महाराज ह्यांस लिहिलेले हे पत्र. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे चरित्र शिंदे ह्यांनी लिहावयास घ्यावे अशी शाहू महाराजांची फार इच्छा होती. परंतु ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ च्या कामाच्या धबडग्यात त्यांस, महाराज विद्यमान असता, सवड होऊ शकली नाही. १९२३ साली ते ‘मिशन’ च्या कामातून निवृत्त झाले. लेखनकार्य हाती घेण्यास त्यांस आता वेळ भरपूर होता. त्यांच्या डोक्यात ज्या काही ग्रंथांच्या योजना घोळू लागल्या होत्या त्यापैकी ‘श्री शिव छत्रपतींचे चरित्र’ लेखनाची योजना ही एक होती.........संपादक ]
पुणे, १९२३
श्रीमच्छत्रपती श्रीक्षत्रिय कुलावंतस राजाराम महाराज सरकार, कोल्हापूर, ह्यांचे चरण सेवेसी अत्यंत नम्रतापूर्वक विज्ञापना ऐसीजे.
मी केव्हातरी एकदा कोल्हापूरास यावे अशी महाराजांनी आज्ञा केली होती व परलोकवासी श्री शाहू महाराजांनी तशी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु अलीकडे माझ्या मिशनमध्ये काही ब्राह्मण सभासदांनी काय गोंधळ माजविला आहे हे ‘विजयी मराठा’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ ‘लोकसंग्रह’ वगैरे पत्रांवरून सहज समजण्यासारखें आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे मला पुणे सोडून कोठेही बाहेर जाणे अगदी अनिष्ट झाले. येत्या १५ तारखेसच ह्या शाखेची साधारम सभा आहे. अस्पृश्य वर्गाच्या हातात मी मिशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला ब्राह्मण सभासद अकल्पित विघ्ने आणीत आहेत. त्यांच्या बाजूची वर्तमानपत्रे खोट्या बातम्या पसरवीत आहेत. व दुसरी बाजू दाबून ठेवीत आहेत. अशा वेळी कोल्हापूर येथील मराठा बोर्डिंगकडून शिवजयंतीचा मोठा उत्सव ता. १८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यात व्याख्यान देण्यासाठी मला आमंत्रण आले आहे. पण ता. १५ एप्रिलच्या सभेचे काम न संपल्यास व काही गडबड झाल्यास माझे येणे होणार नाही. तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात सावचितपणे आपल्या दर्शनास येण्याचा विचार करीत आहे. त्याचवेळी दोन दिवस अधिक राहून महाराज फर्मावतील ती सेवा आनंदाने करीन.
सोबत कै. महाराजांच्या एका पत्राची प्रत पाठविण्याची परवानगी घेत आहे. त्यात श्री शिवाजी महाराजांचे चरित्र मी लिहावे अशी त्यांनी फार इच्छा दाखविली होती. महाराजांच्या विचारे तेही काम कसे काय होण्यासारखे आहे ते पाहीन. म्हणून मी कोल्हापूरास केव्हा आलो असता महाराजांचे निवांतपण दर्शन घडून सर्व गोष्टींचा नीट विचार होईल आणि महाराज फर्मावतील तर मी कोल्हापुरास काही दिवस राहवे काय, तेही सर्व मला लवकर पत्रोत्तरी कळेल तर मी महाराजांचा फार ऋणी होईन.
महाराजांचे उत्तर आल्यावर, कोल्हापूर येथील शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष रा. आर. पी. सावंत, बी. ए. ह्यांस लिहिणार आहे. म्हणून तातडीने उत्तराची वाट पहात आहे. अधिक लिहिल्याची सेवकाला क्षमा व्हावी. कृपेची वृद्धी व्हावी ही विज्ञापना.
आपला नम्र सेवक,
विठ्ठल रामजी शिंदे.
(विठ्ठलराव शिंदे हे जरी ब्राह्मसमाजाचे सभासद होते, तरी सांप्रदायिक वृत्तीचे नव्हते. जगातील प्रमुख धर्माचा अभ्यास ते पूर्वग्रहविमुक्त मनाने करीत व त्या त्या धर्मातील ज्या काही चांगल्या गोष्टी त्यास आढळत त्यांची ते मोकळेपणाने प्रशंसाही करीत. १९२५-२६ साली त्यांनी बौद्ध धर्माचा विशेष अभ्यास केला. ह्या अभ्यासामुळे त्यांच्या विचारात बरेचसे परिवर्तनही घडून आले. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ (पृष्ठ ३७०) ह्या ग्रंथात ते लिहितात... पुढे पुढे ते स्वत:ला बौद्ध म्हणवून घेऊ लागले. अशाच एका जयंती समारंभाच्या प्रसंगी प्रसिद्ध बौद्ध आचार्य धर्मानंद कोसंबी यास निमंत्रण दिले ते.....)