समर्थ रामदासाविषयी आदरबुद्धी महाराष्ट्रामध्ये जी आहे तिच्यात जर भर पडावयास हवी आहे तर त्यासाठी ऐतिहासिक चर्चेच्या नावावर शिवाजीसारख्या थोर विभूतींना खाली ओढण्याची काय जरूरी आहे? रामदास व शिवाजी ह्यांची पहिली भेट केव्हा झाली हा वादग्रस्त प्रश्न आहे, परंतु ती राज्यस्थापनेनंतर पराक्रमामागून नावलौकिक झाल्यानंतर झाली असे म्हणावयास जागा असता शिवाजीच्या सर्व कर्तृत्वाचे, सर्व पराक्रमाचे, सर्व योजकतेचे, सर्व राजकारणी धोरणाचे श्रेय रामदासांना देऊन शिवाजीला त्यांच्या हातचे बाहुले करणे म्हणजे महाराष्ट्राचे मराठे म्हणविणा-यांचे मनात ब्राह्मणाविषयी अनादर भाव मुद्दाम वाढविण्यासाठी हा असा प्रकार सुशिक्षितांनी करण्याच्या भानगडीत पडणे आजच्या स्थितीत अत्यंत अनुचित होय. शिवाजीच्या कर्तृत्वाची साक्ष इतिहास देत आहे. त्यांच्या कर्तुत्वावर, त्यांच्या शौर्यावर, त्यांच्या योजना सामर्थ्यावर झाकण घालून समर्थांचे महत्त्व वाढविण्याचा काळ आता गेला. रामदासांचे महत्त्व वाढविण्यास त्यांचे मनाचे श्लोकही पुरेसे आहेत. रामदासाविषयी आदरबुद्धी वाढविण्यास दासबोध पुरेसा नाही काय? रामदासांची योग्यता त्यांची स्फुट प्रकरणे दाखवीत नाहीत काय? मग ऐतिहासिक सत्यसंशोधनाच्या मागे लपून शिवाजीसारख्या व्यक्तीवर शिंतोडा उडविण्याची काय जरूरी आहे?