धर्म ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या जीवनातील मूलभूत प्रेरणा होती. त्यांचे सारे जीवनच ह्या मध्यवर्ती प्रेरणेने घडविलेले आहे. परंतु त्यांची धर्मासंबंधीची कल्पना परंपरागत कल्पनेपेक्षा वेगळी होती. त्यामुळे त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही पुष्कळसे वेगळे होते. महर्षी शिंदे ह्यांनी आयुष्यभर धर्म, जीवन आणि तत्त्वज्ञान ह्यासंबंधी जे चिंतन केले आहे ते ह्या ग्रंथामध्ये एकत्रित स्वरूपामध्ये प्रथमच प्रसिद्ध होत आहे.
जीवनातील तीन कालखंड
महर्षी शिंदे ह्यांच्या जीवनाचा एकत्रित विचार केला तर ढोबळ मानाने त्यांच्या जीवनाचे तीन कालखंड दिसतात. १९०३ ते १९१६ पर्यंत त्यांनी मुख्यत: धर्म, अध्यात्म ह्यासंबंधी चिंतन केले आहे. त्यांचे ह्या प्रश्नाबाबतचे लिखाण प्रामुख्याने ह्याच कालखंडातील आहे. १९१७-१८ नंतर त्यांचे लक्ष वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय व आर्थिक चळवळींकडे जाऊ लागले. १९३५ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या चळवळींमध्ये आघाडीवर राहून भाग घेतला. ह्या काळात त्यांनी इतिहास, भाषाशास्त्र, आर्यपूर्व संस्कृती, भारतातील भक्तिसंप्रदाय इत्यादीसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. ह्या काळात त्यांनी सामाजिक तत्त्वज्ञानाचा अधिक विचार केला. ह्या कालखंडातच १९२३ ते १९३५ ह्य काळात अधिक सातत्याने लेखन, वाचन व चिंतन केले. हा त्यांच्या जीवनातील दुसरा कालखंड होय. १९३५ नंतर त्यांच्या जीवनातील तिसरा कालखंड सुरू झाला. ह्या काळात ते आजाराने अथरूणावर खिळूनच होते. १९३५ ते १९४४ पर्यंत त्यांना त्यामुळे फारसे क्रियाशील जीवन जगता आले नाही. तरी देखील ह्या तिस-या कालखंडातही आणि आजारीपणातही त्यांनी थोडे फार लेखन व चिंतन केले आहे.
भागवत धर्माचे संस्कार
महर्षी शिंदे ह्यांचा धर्मशील पिंड त्यांच्या कौटुंबिक जीवनातच तयार झाला. त्यांचे आई-वडील हे वारकरी संप्रदायाचे एकनिष्ठ अनुयायी होते. घरामध्ये सतत धार्मिक वातावरण असायचे. वारकरी मंडळींची भजने व इतर धार्मिक कार्यक्रम अव्याहत चालू असायचे. त्यांच्या संस्कारक्षम वयात भागवत संप्रदायासारख्या उदारमतवादी धर्मपंथाचे त्यांच्यावर जे संस्कार झाले त्यातून त्यांचा पुढील मन:पिंड तयार झाला. महर्षी शिंदे ह्यांच्या मनावर आगरकर, भिल्ल, स्पेन्सर ह्यांच्या विचाराचे संस्कार झाले होते. त्यामुळे १८९१ ते १८९७ ह्या काळात त्यांचे मन नास्तिकवादाकडे झुकू लागले होते.
धर्म भावनेचा बळकट आधार
ते ह्या काळात फर्ग्युसन कॉलेजचे (पुणे) विद्यार्थी होते. आगरकरांचा “सुधारक” ते अगोदरपासूनच वाचीत होते. त्यामुळे कॉलेजमध्येही त्यांचा हा कालखंड पुष्कळच वेगळा होता. परंतु १८९७-९८ च्या सुमारास डॉ. भांडारकर, न्या. रानडे ह्यांच्या विचारांच्या सहवासात आले व पुन: ते धर्मभावनेकडे झपाट्याने वळू लागले. लहानपणी कुटुंबात झालेले धार्मिक संस्कार पुन: नव्या जोमाने वर आले. त्यामुळे ते प्रार्थना समाजाकडे आकृष्ट झाले. पुढे लौकरच ब्राह्मोसमाजाच्या वतीने इंग्लंडमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानातून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांच्या जीवनातील धर्मभावना अधिक दृढमूल झाली व सबंध आयुष्याला धर्म भावनेचा बळकट आधार मिळाला.
एकोणिसाव्या शतकातील उदार धर्म चळवळी
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परंपरागत हिंदुधर्मामध्ये महत्त्वाचे बदल झाले पाहिजेत म्हणून तीन चार प्रमुख चळवळी सुरू झाल्या. त्यांमध्ये प्रामुख्याने राजा राममोहन रॉय ह्यांनी सुरू केलेला ब्राह्मोसमाज, स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी सुरू केलेला आर्यसमाज, महात्मा फुले ह्यांनी स्थापन केलेला सत्यशोधन समाज, आणि डॉ. बेझंटबाईनी चालविलेली थिऑसाफिकल सोसायटी ह्यांचा उल्लेख करावा लागेल. त्या काळात ध्येयवादी तरूण ह्यांपैकी कुठल्या तरी धर्म सुधारणेकडे किंवा समाज सुधारणेच्या चळवळीकडे वळत होता. अशा ह्या काळात महर्षी शिंदे उदारमतवादी ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थना समाज ह्यांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते.
मी सुधारक म्हणूनच महर्षी शिंदे प्रार्थना समाजाकडे आकर्षित झाले ह्याचे कारण लहानपणी त्यांच्यावर झालेल्या भागवत संप्रदायातील संस्कारांमध्ये सापडेल. भागवत संप्रदायाकडून प्रार्थना समाजाकडे झालेला त्यांचा वैचारिक प्रवास पुष्कळसा स्वाभाविक होता. त्यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे प्रार्थना समाजात गेल्यामुळे ते सुधारक झाले नाहीत तर उलट ते आधी सुधारक होते, म्हणूनच ते प्रार्थना समाजात गेले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाजाची पुनर्रचना करावी म्हणून जरी सत्यशोधक समाज, ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थनासमाज, आर्यसमाज ह्यांची स्थापना झाली असली तरी त्यांच्या भूमिकेमध्ये महत्त्वाचा फरक होता. त्यांच्या प्रेरणा देखील पुष्कळ अंशी भिन्न होत्या.
सत्यशोधक समाज व ब्राह्मोसमाज
ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्या भूमिकेमध्ये एक मूलभूत फरक होता. ब्राह्मोसमाज जगातील सर्व धर्म पवित्र व श्रेष्ठ आहेत अशी भूमिका घेऊन प्रत्येक धर्मातील महत्त्वाचे काय काय आहे ह्याचा शोध घेतो. तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास यातूनच जन्माला आला आहे. सर्व धर्म परमेश्वराने निर्माण केलेले आहेत अशी ह्यामागे ब्राह्मोसमाजाची धारणा आहे. ब्राह्मोसमाज सर्व धर्मांमध्ये समन्वय निर्माण करण्याची भूमिका घेत आहे.
सार्वजनिक सत्य
महात्मा फुले ह्यांच्या सत्यशोधक समाजाची भूमिका मात्र मूलत: वेगळी आहे जगातील सर्व प्रचलित धर्म मानवी समतेचे शत्रू आहेत असे ते आवर्जून म्हणतात. “या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी धर्मपुस्तके केली आहेत, त्यांपैकी एकाही ग्रंथात आरंभापासून शेवटपर्यंत सारखे सार्वजनिक सत्य नाही.” ह्या संबंधीचे विवेचन करिताना सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात ते म्हणतात, “प्रत्येक धर्मपुस्तकामध्ये काहीएक व्यक्तींनी त्यावेळच्या प्रसंगास अनुसरून हेकडपणा केल्यामुळे, ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यास सारखे हितकारक न होता सहजच त्यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकांचा मनापासून हेवा व द्वेष करू लागल्या. (महात्मा फुले समग्र वाड़मय पृष्ठ ३५३)
सत्यशोधक समाज ही मूलत: समाजिक चळवळ
ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा फरक आहे. ब्राह्मोसमाज मुख्यत: आध्यात्मिक समाज आहे. परमेश्वराचे स्वरूप, द्वेतवाद, अद्वैतवाद, जीवनाचे अंतिम उद्दिष्ट, इत्यादी पारलौकिक मूल्यासंबंधी हा समाज अधिक विचार करितो आणि ह्याचा अनुषंगिक भाग म्हणून सामाजिक, आर्थिक चळवळींचा पाठपुरावा करितो. सत्यशोधक समाज ही मूलत: सामाजिक चळवळ आहे. पारलौकिक प्रश्नासंबंधी चर्चा गौण आहे असे सत्यशोधक मानितो. त्यामुळे महात्मा फुले ह्यांच्या विचारातून १९१७-१८ नंतर महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे राहिले. अशी सामाजिक चळवळ ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थना समाज ह्यांच्याकडून निर्माण झालेली नाही. सत्यशोधक समाजाने शेतकरी, सावकार, दुष्काळामुळे शेतीची विस्कटली गेलेली जीवनाची घडी, नोकरशाहीकडून गरिबांची होणारी छळवणूक इत्यादी प्रश्नांची पोटतिडिकीने चर्चा केली आहे. कारण ही चळवळ सामाजिक चळवळ होती. प्रार्थना किंवा ब्राह्मोसमाजात अशी चर्चा झाल्याचे दिसत नाही. ब्राह्मोसमाज व्यक्तिगत शुद्धता व व्यक्तिगत सुधारणा यांवर भर देतो. त्यामध्ये समाजाची अर्थव्यवस्था बदलावी, सामाजिक जीवनाचा पायाच बदलावा अशी चर्चा फारशी दिसत नाही. उलट सत्यशोधक समाजाचा भर सामाजिक व आर्थिक जीवनाचा पायाच बदलावा व समाजाची पुनर्रचना करावी यांवर आहे. व्यक्तिगत जीवनातील उपासना, सुधारणा ह्यांना फुल्यांच्या चळवळीत दुय्यम स्थान आहे. त्यामुळे महात्मा फुले ह्यांची सर्व चर्चा शिक्षणाचा पाया कसा बदलता येईल, सावकारी कशी नष्ट करिता येईल, अस्पृश्यता, जातिव्यवस्था कशी निपटून काढता येईल. ह्या प्रश्नासंबंधीच प्रामुख्याने आहे.
ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्यात आणखी एका प्रश्नाबाबत महत्त्वाचा फरक आहे. सत्यशोधक समाज एकाच कुटुंबात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहू शकतात असे मानणारा आहे. आज एका कुटुंबात समाजवादी, काँग्रेस, शेतकरी कामकरी पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्षाचे सभासद राहू शकतात. त्याच प्रमाणे एका कुटुंबात हिंदु, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम असे वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी राहू शकतील अशी फुल्यांची धारणा आहे. ब्राह्मोसमाजाला ही भूमिका कितपत पचू शकेल ह्याबद्दल शंका आहे. ब्राह्मोसमाजात वेगवेगळ्या धर्मपंथाचे लोक येऊ शकतात अशी त्यांची तात्त्विक भूमिका आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना ही भूमिका पचू शकली नाही. महर्षी शिंदे ह्यांनी कलकत्ता येथील ब्राह्मोसमाजाच्या १९२७ च्या माघोत्सवात ब्राह्मो मिशनरींच्या परिषदेत “मी बौद्ध आहे” अशी घोषणा केली तेव्हा कितीतरी खळबळ उडाली होती. (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १९८)
आर्यसमाज व सत्यशोधक समाज-
आर्यसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्या स्थापनेच्या प्रेरणाच भिन्न आहेत. वेद हे जगातले सर्वांत पवित्र ग्रंथ आहेत व वैदिक समाजाची पुन: स्थापना केली पाहिजे अशी भूमिका आर्यसमाजाची आहे. ह्यामुळे आर्यसमाज जातिव्यवस्था नाकारतो, पण चातुर्वर्ण्य गुणक्रमांनुसार स्वीकारतो. सत्यशोधक समाजाची भूमिका केवळ वेगळीच नव्हे तर संपूर्णपणे विरोधी आहे. समाजातील सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ वेदात आहे. त्यामुळे वेदांचे पावित्र्य नष्ट झाल्याशिवाय आणि वेदांचा प्रभाव नाहीसा केल्याशिवाय ह्या समाजाची प्रगती होणार नाही अशी भूमिका सत्यशोधक समाजाने घेतली आहे. ब्राह्मोसमाजिस्ट अंत:प्रामाण्य मानतो तर आर्यसमाजिस्ट वेद प्रामाण्य शिरोधार्य मानतो.
आर्यसमाज व सत्यशोधक समाज ह्यांच्या प्रकृतीमध्ये आणखी एक फरक जाणवतो. आर्यसमाज हा समार्थ्याचा उपासक आहे. ते सामर्थ्य संस्थेचे किंवा संघटनेचे असेल किंवा शस्त्रांचे असेल. परंतु सामर्थ्याचा पुजारी अशी त्याची भूमिका दिसते. उलट सत्यशोधक समाजाची मूळ प्रेरणा करूणा ही आहे. गरीब माणसाच्या डोळ्यांतील आसवे पुसणे हे उदात्त कार्य आहे अशी महात्मा फुले ह्यांची प्रेरणा आहे. अस्पृश्य, शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया इत्यादी त्यांच्या सर्व चळवळींचा केंद्रबिंदू ‘करूणा’ हाच आहे. गौतम बुद्धाच्या जीवनात जो करूणेचा प्रत्यय येतो तीच करूणा महात्मा फुले ह्यांच्या जीवनातील दिसून येते. अर्थातच गौतम बुद्धाचे विचाराचे क्षितिज फार विस्तीर्ण होते. त्या मानाने महात्मा फुले ह्यांच्या कार्याचा पसारा मर्यादित होता. परंतु करूणेची प्रेरणा मात्र दोघांमध्ये एकच होती.
आजचे जीवन समजावून घ्यायचे तर ब्राह्मोसमाज, प्रार्थना समाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज ह्यांतून निर्माण झालेल्या चळवळी आजच्या सामाजिक जीवनात फारशा प्रभावीपणे दिसत नाहीत. १९२० नंतर त्यांचा प्रभाव काही अंशी कमी झालेला आहे. तरी देखील आजचे महाराष्ट्राचे आणि सर्व देशाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक जीवन समजावून घ्यावयाचे झाले तर ह्या सर्व चळवळींचा मागोवा घेतला पाहिजे. कारण ह्या सर्व चळवळींचा प्रभाव आमच्या जीवनावर कमी जास्त स्वरूपामध्ये उमटलेला आहे. आजच्या आमच्या जीवनाचे वस्त्र ह्या चळवळींच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले आहे हे नाकारता येत नाही. ह्या चळवळींच्या अभ्यासाला त्यामुळे केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही तर सध्याचे जीवन समजावून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा असाधारण महत्त्व आहे.
ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थना समाज ह्यांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान हे परंपरागत धर्मविषयक कल्पनेपेक्षा पुष्कळअंशी वेगळे आहे. ह्यासंबंधी महर्षी शिंदे ह्यांनी आपल्या विस्तृत लेखांतून व भाषणांतून चर्चा केली आहे. त्यामुळे महर्षी शिंदे ह्यांची धर्मविषयक भूमिका इतरांपेक्षा कशी वेगळी आहे ह्याची कल्पना ह्या ग्रंथावरून येते.
अद्वैतवादाला विरोध
भारतीय तत्त्वज्ञान गेली दोन तीन हजार वर्षे अद्वैतवादाच्या भोवती फिरत आहे. उपनिषद काळापासून अद्वैतवादाचा प्रभाव भारतीय मनावर खोलवर उमटलेला आहे. प्रत्येक व्यक्ती ही ब्रह्माची प्रतिकृती आहे. त्यामुळे ब्रह्म आणि प्रत्येक व्यक्ती ही एकरूप होऊ शकतात अशी अद्वैतवादाची भूमिका आहे. प्रार्थनासमाज ह्या प्रश्नाबाबत वेगळी भूमिका घेतो. त्याचा कल द्वैतवादाकडे आहे. मनुष्य हा परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो ही भूमिका त्यांना मान्य नाही. अद्वैतवाद आपल्याला का मान्य नाही ह्याची मीमांसा महर्षी ह्यांनी आपल्या काही लेखांतून केली आहे. ह्याबाबत त्यांनी मुख्यत: दोन कारणे पुढे केली आहेत. पहिले एक कारण असे की, परमेश्वर इतका अनंत, सर्वज्ञ व श्रेष्ठ आहे की, मर्त्य मानवाने त्याच्याशी तादात्म्य पावण्याची भाषा बोलणे म्हणजे ते एक प्रकारचे औद्धत्य आहे. त्याचे दुसरे कारण असे की, विश्वाचे ज्ञान सतत वाढत जाणारे आहे. अशा ह्या काळात ब्रह्मवादासारखी स्थितिशील भूमिका घेणे हे चुकीचे आहे. वाढते ज्ञान नाकारण्याचा किंवा गतिमान जगाकडे पाठ फिरवण्याचा तो प्रकार होणार आहे. ह्यासंबंधी मीमांसा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “तो (परमेश्वर) अनंत, आम्ही सांताहून सांत, तो सर्वज्ञ, आम्ही आपणास अल्पज्ञ म्हणविणे म्हणजेही आम्ही आमच्या ज्ञानाची घमड दाखविणे होय. तो सर्वसमर्थ, आम्ही त्याचे प्रेमास अपात्र, तो न्यायी आणि आम्ही अन्यायाकडे धावणारे असा त्यांच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदभाव आहे. हा भेदभाव ओळखून त्यास वचकून असले पाहिजे. त्याच्या पुढे जावयाचे तर अंत:करण शुद्ध करून, मलिन भाव शुद्ध करून आम्ही गेले पाहिजे. निदान अंत:करण मलिन आहे त्याजपाशी अनुतापपूर्वक कबूल केले पाहिजे. देवावर आमचे प्रेम पाहिजे. पण त्याच्यासंबंधाने आपल्या ठिकाणी आदरभाव पाहिजे. भीतीही पाहिजे. आमचा व देवाचा संबंध अवज्ञा करण्यापर्यंत केव्हाही येऊ नये.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. २२६-२७)
अद्वैतवादावर टीकेचे दुसरे कारण देताना महर्षी शिंदे म्हणतात, “वाढते ज्ञान हे दुसरे तत्त्व होय. आम्ही आपले ज्ञान वाढणारे आहे की नाही ह्याची नेहमी खबरदारी घेतली पाहिजे. अद्वैतवाद्यांचा अद्वैत सिद्धांत हे वाढते ज्ञान नव्हे. जे आहे ते एकच तत्त्व आहे असा एकदा मनाचा ग्रह झाला की, मनाची गती कुंठित होते. ह्या कारणामुळेच ब्राह्मी धर्मानुयायांच्या पसंतीस अद्वैतवाद उतरत नाही. नित्य नवे नवे जे अनुभव येतात आणि शोध लागतात त्यांची किंमत नाहीशी करून टाकाणारा अद्वैतवाद ब्राह्म्यास रूचत नाही. कारण व्यक्तीस येणा-या ह्या एकाद्या लहानशाही ताज्या अनुभवाची किंमत शिळ्या अद्वैतवादापेक्षा मोठी आहे.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. २२६-२२७)
अवतारवाद विकासाला मारक
अवतारवादावरही महर्षी शिंदे ह्यांनी कठोर टीका केली आहे. परमेश्वराने अवतार घ्यावा व मग सर्व मानवाचा उद्धार करावा ही कल्पनाच त्यांना मान्य नाही. ही कल्पना व्यक्तीचे कर्तृत्व, इच्छाशक्ती गलितगात्र करून टाकणारी आहे अशी त्यांची भूमिका आहे. प्रत्येक व्यक्तीमधील आत्मविश्वास वाढणे, तिच्यातील कर्तृत्व उमलणे म्हणजे अखेरीला समाजाचा विकास होणे आहे. लाखो व्यक्तींना पंगू बनविणारे अवतारवादाचे तत्त्वज्ञान समाजाला घातक आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. ह्याबाबत चिकित्सा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “आत्मैक आत्मनो बंधु” ह्या तत्त्वाचा स्वीकार करून आपण आपल्याच पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे व राहिले पाहिजे. मला इतकेही वाटते की, आज जी आमच्यात आत्मकला अंशभूत आहे. इच्छाशक्ती, बाहुबल, एकेक पाऊल स्वत:पुढे टाकण्याची शक्ती आहे ती जाऊन अवतारी व्यक्तीच्या विद्युत्कार्षणाने एकदम कामे फार होणार असतील तर तो अवतार नको व ती कामेही नकोत. विकासच झाला पाहिजे हे मी धरून बसेन. अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार अंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले, असला विषमभाव मला पसंत नाही. सर्वांची, सर्व बाजूंनी व तीही स्वत:च्या प्रयत्नांनी उन्नती होत जावी हेच श्रेयस्कर! अवतारांची गरज भासू लागल्यास समजावे येथे रोग आहे. स्वाभाविक स्थिती ही नव्हे, स्वत:चा दम संपला. स्वयंशक्ती हरपली. स्वत:चा जोर नाहीसा किंवा कमी झाला, पण चांगल्या सुदृढ राष्ट्रात स्वयंस्फूर्ती हा एक गुण असतो. म्हणजे कोणतेही कृत्य स्वत: आपल्यास कळलेल्या दिशेने करण्यास अंगावर घ्यावयाचे. त्या राष्ट्राच्या विभूतीच्या व सामान्य लोकांच्या मध्ये इतके अवाढव्य अंतर नसते हेही लक्षात ठेवले पाहिजे.” (जीवन व तत्त्वज्ञान पृ. १८१-८२)
निवृत्तिवाद म्हणजे नाश
भारतीय मनावर संन्यासवादाचा प्रभाव शेकडो वर्षे आहे. त्याच्या छायेखाली भारतीय समाजाने शेकडो वर्षे वाटचाल केली आहे. शंकराचार्याच्या उदयानंतर ह्या संन्यासवादाने भारतीय मनाची विशेष पकड घेतली. महर्षी शिंदे ह्यांना हा संन्यासवाद किंवा निवृत्तीवाद अमान्य आहे. ह्या जगाचे हे जीवन आपण चांगल्या प्रकारे जगले पाहिजे अशी त्यांची धारणा आहे. प्रवृत्तीवादाची भूमिका स्पष्ट करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “मी तरी समजतो, निवृत्ती म्हणजे नाश आहे. कृष्णाने अर्जुनाला अखेर निरोप अट्टाहासाने प्रवृत्तीविषयकच सांगितला आहे. तो त्याला म्हणतो, “अरे, ह्यापेक्षा तुला काय सांगू? मी जर अव्यक्त असून व्यक्त होत आहे. मी प्रवृत्त आहे, तो पर्यंत तू निवृत्तीची कथा सांगू नकोस.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १८१-८२)
अंत:प्रामाण्य हेच श्रेष्ठ प्रामाण्य
ब्राह्म समाजाचा ग्रंथप्रामाण्याला किंवा इतर कोणत्याही ब्राह्म प्रामाण्याला विरोध आहे. अंत:प्रामाण्य हेच श्रेष्ठ प्रामाण्य आहे अशी त्याची भूमिका आहे. ह्या संबंधीची चर्चा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “ब्राह्म्यास त्याच्या बाहेर प्रमाणभूत वस्तू अशी काय ती एक ईश्वरच! त्याच्या प्रामाण्याचा बोध जो ब्राह्म्यास होतो, तो बाहेरून नव्हे, तर त्याच्या अंतर्यामातून आणि विवेकबुद्धीतून. ह्यावरून ब्राह्म्याना प्रमाणभूत असे काहीच नाही. ते स्वैर आहे असेही होत नाही. उलट ब्राह्म्याचे असे म्हणणे आहे की, ज्यांना हे अंत:प्रामाण्य मान्य नाही किंवा पुरेसे ते ज्यास भासत नाही तेच बाहेरच्या अनेकविध प्रामाण्यांच्या भानगडीत पडतात. आता जर कुणी ब्राह्म्यास विचारतील की, अंत:प्रामाण्यास सर्वत्र सारखेपणा व निश्चितपणा कोठे आढळतो? तर त्यांचे सांगणे असे पडते की, ब्राह्म पुस्तकात व आचारात आपल्याहून अधिक धरसोड, उडवाउडव आढळते व ती निवारण्यास पुन: आपल्यास शुद्ध व सात्विक बुद्धीचाच उपयोग करावा लागतो.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १८१-८२)
धर्मनिरपेक्ष राज्याचा तात्त्विक आधार
ब्राह्मोसमाजाने जगातील सर्व धर्म सारखेच आहेत अशी भूमिका घेतली आहे. आज आपल्या देशात आपण जी धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वाकारली आहे तिला पोषक अशी भूमिका ह्या धर्मपंथाने शंभर वर्षांपूर्वीच स्वीकारली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष राज्याचा तात्त्विक आधारच त्यांच्या विवेचनातून मिळतो, सर्व धर्म समान आहेत. ह्याची चर्चा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, ईश्वराच्या राज्यात हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती असा खात्रीने भेद होणार नाही. हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा भेद पाळण्यात येत नाही तर ईश्वराचे राज्य जे खात्रीने पवित्र असणार त्यात कसा पाळण्यात येईल? इंग्रज सरकार हे स्वत: ख्रिस्ती धर्माचे आहे व आपल्या धर्माची किंमत ते जाणत नाही, असे नाही. पण आजपर्यंतच्या अनुभवाने जर केवळ धर्म निराळा म्हणूनच एखाद्यास आपल्या दरबारात निराळीच जागा न देण्याइतके शहाणे झाले आहे, तर देव काय त्यापेक्षा कमी शहाणा असेल की, त्याच्या दरबारात असा भेदभाव होईल? मग स्वत: देवच जर धर्मभेद पाळीत नाही तर मनुष्याने तो पाळणे किती सत्यास धरून होईल बरे?” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १७७-७८)
“साधारण ब्राह्म समाज” च का?
ब्राह्मोसमाजाचे तत्त्वज्ञान जरी महर्षी शिंदे ह्यांनी स्वीकारलेले असले तरी ब्राह्मोसमाजामध्ये देखील वेगवेगळे विचारप्रवाह होते. महर्षी शिंदे ह्यांचा कल “साधारण ब्राह्मोसमाज” ह्या उपपंथाकडे होता. ब्राह्मोसमाजामध्ये एकोणिसाव्या शतकात ढोबळ मानाने तीन विचार-प्रवाह दिसून येतात. त्यांपैकी एक प्रवाह आदिब्राह्मो समाजाचा. ह्या विचार-प्रवाहचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्रनाथ ठाकूर ह्यांचा उल्लेख करावा लागेल. दुसरा विचार-प्रवाह नवविधान ब्राह्मोसमाज म्हणून ओळखला जातो. केशवचंद्र सेन हे ह्या दुस-या विचार-प्रवाहाचे जनक होत. ब्राह्मोसमाजातील तिसरा विचार-प्रवाह म्हणजे साधारण ब्राह्मोसमाज होय. ह्या तिस-या विचार-प्रवाहाची स्थापना कुचबिहारच्या राजकुमाराच्या लग्नानंतर झाली. आधीच्या केशवचंद्र सेन ह्यांनी स्थापन केलेल्या नवविधान ब्राह्मोसमाजापेक्षा ह्या नव्या साधारण ब्राह्मोसमाजाची दोन वैशिष्ठ्ये होती. पहिले वैशिष्ठ्य असे की, केशवचंद्र सेन ह्यांच्या काळात ब्राह्मसमाजात अंतर्गत लोकशाहीला वावच नव्हता. केशवाने सांगावे व इतरांनी निमूटपणे ऐकावे असे धोरण होते. वास्तविक ब्राह्मोसमाजानेच १९२८ पासून विचार स्वातंत्र्याचे वारे उत्तेजित करावयाला सुरूवात केली होती. पन्नास वर्षाच्या काळात ब्राह्मोसमाजानेच वाढविलेल्या ह्या विचारशक्ती बलशाली झाल्या. त्यामुळे केशवचंद्र सेन ह्यांच्या एकतंत्री कारभाराला विरोध होणे स्वाभाविक होते. अंतर्गत लोकाशाहीच्या प्रेरणेतून साधारण ब्राह्मोसमाजाचा जन्म झाला. ह्या प्रवाहाचे दुसरे वैशिष्ठ्य असे की, त्याने सर्व कौटुंबिक जीवनच बदलून टाकण्याचा प्रयत्न केला. पूर्वी कुटुंबातला प्रमुख पुरूषच ह्या प्रवाहात सामील झालेला असे. परंतु ह्या नव्या उपपंथाने कुटुंबातील पुरूषाप्रमाणेच स्त्रिया, मुले ह्यांनाही सहभागी करून घेण्याची नवीच पद्धती सुरू केली. ह्यामुळे कौटुंबिक सुधारणेचा नवा कालखंड सुरू झाला. ह्याशिवाय विचार आणि आचार ह्यांच्यामध्ये सुसंगती पाहिजे असा आग्रह ह्या नव्या उपपंथाने धरला. महर्षी शिंदे ह्यांना साधारण ब्राह्मोसमाजाची वरील तीनही वैशिष्ठ्ये अनुकरणीय वाटली व म्हणून ते साधारण ब्राह्मोसमाजात दाखल झाले. अखेरपर्यंत ते साधारण ब्राह्मोसमाजाचेच अनुयायी म्हणून राहिले.
एकेश्वरी धर्म परिषद
महर्षी शिंदे हे जरी साधारण ब्राह्मोसमाजाचे अनुयायी असले तरी ब्राह्मोसमाजाच्या ह्या तिन्हीही शाखांमध्ये सुसंवादित्व निर्माण व्हावे अशी त्यांची प्रामाणिक भूमिका होती. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. एकेश्वरी धर्मपरिषदेचा सूचिग्रंथ तयार करताना व सर्व शाखोपशाखांचे ऐक्य सांधण्याकरिता महर्षी शिंदे ह्यांनी तिन्ही ब्राह्मोसमाजातून निवडक व्यक्तींची एक समिती स्थापन करून एकेश्वरी धर्मपरिषदेला चालना दिली. महर्षींची जीवनातील मूलभूत भूमिका समन्वयवादाचीच होती, असेच ह्यावरून दिसून येईल.
महर्षी शिंदे ह्यांच्या व्यक्तिमहत्त्वाचे वेगळेपण
महर्षी शिंदे ह्यांचे धर्मविषयक विचार ढोबळ मानाने ब्राह्मोसमाजातील इतर अनेक सभासदांप्रमाणेच समान होते. परंतु सामाजिक, राजकीय, आर्थिक व संशोधनात्मक क्षेत्रांत मात्र त्यांची भूमिका इतरांपेक्षा बव्हंशी वेगळी होती. सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये त्यांचा सर्व कल सत्यशोधक समाजाकडे होता. राजकीय क्षेत्रात त्यांचा कल प्रारंभी टिळकांच्या जहाल राष्ट्रवादाकडे व नंतर महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनाकडे होता. आर्थिक क्षेत्रात शेतकरी वर्गाच्या दारिद्र्यामुळे ते अस्वस्थ झाले होते व त्याचसाठी शेतकरी वर्गाची आंदोलने उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांचा सगळा कल आर्यपूर्व संस्कृतीकडे होता. आर्यपूर्व संस्कृती ही प्रगत संस्कृती होती व आर्य संस्कृतीवरही तिचा प्रभाव पडला आहे. असे त्यांच्या संशोधनाचे सूत्र होते. त्याचप्रमाणे अवैदिक संस्कृतीही महत्त्वाची संस्कृती असून भारतीय जीवन तिच्यामुळे समृद्ध झाले आहे अशी त्यांची वैचारिक धारणा होती. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजातील इतर सभासदांपेक्षा महर्षी शिंदे ह्यांचे वेगळेपण वरील चारही क्षेत्रांत चटकन दिसून येते.
सत्यशोधक समाजाकडे कल
महर्षी शिंदे ह्यांचा सामाजिक क्षेत्रात वेगळेपणा असा की, त्यांचा सर्व कल पुढे पुढे सत्यशोधक समाजाकडे वळलेला दिसून येतो. प्रार्थना समाजामध्ये सत्यशोधक समाजाबद्दल एक प्रकारची आढी होती. ह्याचे कारण कदाचित् महात्मा फुले ह्यांची ह्या समाजावरील टीका असावी. १८८७ च्या सुमारास महात्मा फुले ह्यांनी प्रार्थना समाजावर कठोर टीका केलेली होती. प्रार्थना समाज म्हणजे ख्रिश्चन धर्मातील उष्टे-माष्टे गोळा करून तयार केलेला संघ आहे, अशाच प्रकारची टीका त्यांनी केलेली होती. स्वाभाविकच प्रार्थना समाजाच्या अनुयायांमध्ये सत्यशोधक समाजाबद्दल एक प्रकारची दूरता निर्माण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाबद्दल व्यापक दृष्टिकोनातून विचार करणारे नेते प्रार्थना समाजात मिळणे अवघड झाले होते. अशा ह्या काळात प्रार्थना समाजाचा पुरस्कार करून सत्यशोधक समाजाला जवळ करणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रमुख प्रार्थना समाजिस्ट म्हणून महर्षी शिंदे ह्यांचा उल्लेख करावा लागेल. महर्षी शिंदे हे जरी पुढे पुढे सत्यशोधक समाजाकडे जास्तीत जास्त आकृष्ट झालेले असले तरी त्यांच्या प्रारंभीच्या जीवनपटावरून सत्यशोधक समाजाबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते असे वाटत नाही. १९०३ साली हिंदुस्थानातील उदार धर्म असा एक अभ्यासपूर्ण निबंध त्यांनी ऑमस्टरडॅम येथील एका जागतिक परिषदेत वाचला होता. ह्या निबंधामध्ये त्यांनी आर्यसमाज, ब्राह्मोसमाज आणि थियॉसॉफिकल सोसायटी ह्यांचा उल्लेख केलेला आहे. परंतु महात्मा फुले ह्यांच्या सत्यशोधक समाजाचा त्यामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे ह्या काळात महर्षी शिंदे ह्यांचा व सत्यशोधक समाज ह्याचा परिचय झालेला असावा असे वाटत नाही. ह्याचे कारण आपण शोधले पाहिजे. १८९० साली महात्मा फुले ह्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सत्यशोधक समाज पुष्कळसा झाकाळला गेला. ह्या नंतरच्या काळात म्हणजे १८९१ साली महर्षी शिंदे पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले. पुढे सात-आठ वर्षे ते पुणे येथेच वास्तव्य करून होते परंतु ह्या काळात सत्यशोधक समाजाचा व त्यांचा संबंध आल्याचे फारसे कुठे दिसत नाही. पुढे ते धर्मशिक्षणासाठी ब्राह्मोसमाजाचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला गेले. त्यामुळे १८९१ ते १९०३ ह्या काळामध्ये त्यांचा व महात्मा फुले ह्यांच्या विचाराचा संबंध येणे शक्यच नव्हते. पुढे १९०६ साली महर्षी शिंदे ह्यांनी मुंबई येथे अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळ ही संस्था स्थापन केली. ही संस्था अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यासाठीच जन्माला आलेली होती व म्हणूनच भारतात अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यासाठी संस्थात्मक प्रयत्न करणारी ही पहिली व एकमेव संस्था होती. ह्या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी महर्षी शिंदे ह्यांनी जे भाषण केले आहे, त्यामध्ये महात्मा फुले ह्यांचा उल्लेख आहे, परंतु हा उल्लेखही ओझरता आहे. त्यामुळे ह्या काळात महात्मा फुले ह्यांच्या विचारांचा त्यांच्या मनावर खोलवर प्रभाव आहे असे वाटत नाही परंतु १९१६-१७ नंतर मात्र महात्मा फुले ह्यांच्या कार्याचा ते वारंवार गौरवाने उल्लेख करू लागलेले आहेत. ह्याच सुमाराला महाराष्ट्रात सत्यशोधक समाज हा पुन्हा प्रभावी बनू लागला होता, त्यामुळे त्यांनी ह्या समाजाची मूलभूत प्रेरणा व त्याने मानवी समतेच्या संदर्भात केलेले कार्य ह्यांचा सखोल अभ्यास केलेला असावा असे वाटते. १९१७-१८ पासून पुढे महात्मा फुले ह्यांच्या संबंधीचा त्यांचा आदर सतत वाढतच गेलेला आहे. १९३८ साली त्यांनी महात्मा फुले ह्यांच्यावर कलकत्ता येथील “इंडियन मेसेंजर” या नियतकालिकात दोन लेखही लिहिलेले आहेत. हे लेखांक वाचल्यानंतर तर महर्षी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे प्रवक्ते बनले असे वाटते. महर्षी शिंदे ह्यांनी लिहिलेले १९०३ सालातील लेख व १९३८ सालातील त्याचे हे दोन लेख वाचल्यानंतर महर्षी शिंदे ह्यांच्या जीवनातील बदलता चित्रपट डोळ्यांसमोर उभा रहातो. अशा प्रकारे महर्षी शिंदे ह्यांची जीवनाची सुरूवात निराळ्या मार्गाने झालेली असली तरी शेवटी त्यांची जीवननौका सत्यशोधक चळवळीच्या मुक्कामावर येऊन उभी ठाकली.
सार्वजनिक सत्यधर्म-सत्यशोधक समाजाचे बायबल
ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाज ह्या दोन्ही समाजाची प्रेरणा महर्षी शिंदे हे समजू शकले होते. परंतु महाराष्ट्राच्या संदर्भात ब्राह्मोसमाजापेक्षा सत्यशोधक समाजाचे कार्य अधिक उल्लेखनीय आहे असे त्यांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे. ह्या संबंधी विवेचन करताना ते म्हणतात, “महात्मा फुले हे एक असामान्य पुरूष होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात प्रार्थना समाजापेक्षा अधिक कार्य केलेले आहे. त्या समाजाचे ध्येय उच्च आहे. ज्योतिबाने लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचे बायबल आहे. हे पुस्तक आम्ही ब्राह्मोसमाजाच्या प्रार्तनेच्या वेळी घेतो. मी छातीला हात लावून सांगतो की, ज्योतिरावांच्या चरित्रात महाराष्ट्राचा इतिहास ग्रंथित झाला आहे. दांभिक देशभक्तापेक्षा त्यांची देशभक्ती वरच्या दर्जाची आहे. (धर्म, जीवन आणि तत्वज्ञान-लेखक महर्षी शिंदे पान ५४१).
“मी बौद्ध आहे”
महर्षी शिंदे ह्यांचे दुसरे वेगळेपण असे की, त ब्राह्मोसमाजाचे असूनदेखील आपण बौद्ध आहोत असे जाहीर रीतीने सांगीत होते. ब्राह्मोसमाजात राहून बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे सर्व भारतातील ते एकमेव ब्राह्मोसमाजवादी आहेत. महर्षी शिंदे ह्यांनी आपण बौद्ध आहोत असे सांगितल्यावर ब्राह्मोसमाजात खळबळ उठली होती. परंतु महर्षी शिंदे ह्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि आयुष्याच्या शेवटपर्यंतते बौद्ध धर्माचे प्रवक्ते राहिले.
ह्यासंबंधी एक गमतीदार प्रसंग महर्षी शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगितला आहे. या बाबतची आपली भूमिका स्पष्ट करिताना ते म्हणतात, “२४ जानेवारी पासून ६ फेब्रुवारी पर्यंत (१९२७) कलकत्ता ब्राह्मोसमाजाचा माघोत्सव होता. तेथे एक दिवस ब्राह्मोसमाजाच्या मिशनरींची परिषद झाली. त्यामध्ये भाषण करताना मी म्हटले, “मी बौद्ध आहे. आमच्या ब्राह्मोसमाजात निरनिराळ्या धर्मांतून माणसे येतात हे खरे ना? मग मी बौद्ध धर्मातून आलेलो असल्यास काय चुकले?” बौद्ध धर्माच्या विषयी लिहिताना महर्षी शिंदे पुढे म्हणतात, ब्रह्मदेशाला जाण्याचा माझा उद्देश बौद्ध धर्माचे जीवन प्रत्यक्ष पहावे आणि सत्य अनुभवावे हा होता. त्यासाठी बौद्ध धर्माचे जीवन पहाण्यासाठी विशेषत: एकांतवासात राहून त्या धर्माचे रहस्य अनुभवण्याचा विचार येऊन मी ही यात्रा करण्याचे ठरविले.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १९८)
महर्षी शिंदे ह्यांना १९३०-३१ साली कायदेभंगाच्या चळवळीत कारावास भोगावा लागला. त्यावेळी तुरूंगात जाताना त्यांनी जे धर्मग्रंथ बरोबर घेतले होते त्यामध्ये ‘धम्मपद’ हा ग्रंथ आवर्जून बरोबर घेतला होता. इतकेच नव्हे तर हा ग्रंथ महत्वाच्या सर्व प्रवासात त्यांच्याबरोबर असावयाचा. महर्षी शिंदे ह्यांनी वाई येथील ब्राह्मोसमाजाची स्थापना देखील बुद्ध पौर्णिमेला केलेली होती. अनेक महत्वाचे प्रसंग बोद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर करण्याकडेच त्यांचा कल होता. बौद्ध पौर्णिमेचा त्यांच्या जीवनावरील प्रभाव अनेक प्रसंगांतून प्रत्ययाला येतो.
बौद्ध धर्माचा पहिला अग्रदूत
महर्षी शिंदे ह्यांना बौद्ध धर्माचे आकर्षण त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धातच दिसून येते. १९०९ साली त्यांनी बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार हा लेख लिहिला व ह्या लेखामध्ये त्यांनी हिंदुस्थानात सामाजिक प्रबोधनासाठी बौद्ध धर्माचा पुन्हा जीर्णोद्धार झाला पाहिजे असे स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे. महर्षी शिंदे ह्यांनी बौद्ध धर्माचा पुरस्कार करताना बौद्ध धर्मामागील विशुद्ध मानवी समतेची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवली आहे असे वाटते. महर्षी शिंदे ह्यांच्यावरील बौद्ध धर्माच्या प्रभावाची बीजे कदाचित् ह्या पूर्वीच्या काळात शोधावी लागतील. १९०२-३ साली ते इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास करीत होते. त्यावेळी प्रो. कारपेंटर हे त्यांना हा विषय शिकवीत होते. त्यांच्या आत्मचरित्राचा अभ्यास केल्यास, ह्याच काळात महर्षी शिंदे ह्यांच्या मनात बौद्ध धर्माच्या आकर्षणाची बीजे पेरली गेली होती असे दिसते.
अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, जाती-पातीच्या भिंती पाडण्यासाठी, मानवी समतेचा प्रवाह आपल्या समाजात अखंडपणे खळाळून वाहत ठेवण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे असे सांगणारे महर्षी शिंदे हे महाराष्ट्रातील पहिलेच थोर समाजसुधारक आहेत असे वाटते. अर्थात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वाकार केला तो व्यक्तिगत पातळीवर केला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी १९५६ साली ह्या धर्माचा स्वीकार आपल्या लाखो अनुयायांसह केला. ह्या आंदोलनाचा मर्यादित अर्थाने का होईना, परंतु अग्रदूत म्हणून महर्षी शिंदे ह्यांचा उल्लेख करावा लागेल.
सर्वांगीण सुधारणावादाचे प्रवक्ते
महर्षी शिंदे हे प्रार्थना समाजाचे अनुयायी असूनसुद्धा त्यांचा सर्व कल लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादाकडे होता. त्या काळात प्रार्थना समाजाचे सर्व अनुयायी हे मवाळ राजकारणाचे पुरस्कर्ते होते. त्यांपैकी काहीजण तर सरकारी पक्षाला न दुखविता त्यांची मर्जी सांभाळत काम करणारे होते. अशा ह्या काळात जहाल राष्ट्रवादाला पुरस्कार करणारे महर्षी शिंदे कदाचित् प्रार्थना समाजात एकमेव जहाल राष्ट्रवादी होते. १९०८ साली लोकमान्य टिळकांना राजद्रोहाखाली सहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षी झाली, त्यावेळी महर्षी शिंदे ह्यांनी मुंबई येथील प्रार्थना समाज मंदिरातील प्रार्थनेच्या वेळी लोकमान्य टिळकांसंबंधी प्रार्थना केली. ह्यामधून महर्षी शिंदे ह्यांचा मन:पिंड दिसून येतो. १९२० पूर्वी ढोबळ मानाने महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात जे सुधारणावादी होते ते राजकीय क्षेत्रात मवाळ होते. उलट राजकीय क्षेत्रात जी जहाल होते ते सामाजिक क्षेत्रात मवाळ होते किंवा परंपरावादी विचाराचे पुरस्कर्ते होते. अशा ह्या काळात सामाजिक क्षेत्रात सुधारणावादी भूमिका घेऊन राजकीय क्षेत्रात जहाल भूमिका घेणा-या व्यक्ती फार थोड्या होत्या. महर्षी शिंदे हे त्यांपैकीच एक होते.
गांधीजी-सामाजिक सुधारणा व राजकीय जहालवादांचा संगम
टिळकांच्या काळात जरी त्यांचा जहाल राष्ट्रवादाकडे कल असला तरी १९२० नंतर गांधी युगात महात्मा गांधीच्या राजकारणाशी ते अधिक झपाट्याने एकरूप झाले. महात्मा गांधीमध्ये सामाजिक सुधारणा आणि राजकीय जहालवाद ह्यांचा सुरेख संगम झाला होता. राजा राममोहन रॉयनंतर महात्मा गांधीमध्येच त्यांना सर्वांगीण सुधारणावादाचा उद्रेक आढळून आला. त्यामुळे टिळकांच्या राजकारणाकडे जरी प्रारंभी त्यांचा ओढा होता तरी ख-या अर्थाने ते गांधींच्या राजकारणाशी पूर्ण समरस झाले. लोकमान्य टिळकांशी सामाजिक प्रश्नाबाबत त्यांचे १९१७-१८ नंतर अधिक मतभेद झाले. त्यांच्या आत्मचरित्रातही आपल्याला ह्याचा प्रत्यय येतो. १९२० नंतर महात्मा गांधींच्या आंदोलनात भाग घेणारे महाराष्ट्रातील ते प्रार्थना समाजाचे कदाचित् एकमेव प्रमुख अनुयायी असतील.
मंदिर प्रवेश का?
महर्षी शिंदे ह्यांनी १९२८ साली पुणे येथील पर्वती सत्याग्रहात भाग घेतला. त्यापूर्वी १९२३-२४ च्या सुमारास व्हायकोम (केरळ) येथील मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहातही भाग घेतला. प्रार्थना समाजाचा मूर्तीपूजेला विरोध होता. त्यामुळे मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करणे योग्य नव्हे अशी जवळजवळ सर्व प्रार्थना समाजवाद्यांची भूमिका होती. त्यामुळे महर्षी शिंदे ह्यांची ही सत्याग्रहाची भूमिका प्रार्थना समाजाच्या अनुयायांना मान्य नव्हती. त्यांनी त्यांच्यावर अडून-दडून तशी टीकाही केली. परंतु महर्षी शिंदे ह्यांची ह्या बाबतची भूमिका अधिक व्यापक व मूलगामी स्वरूपाची होती. हा प्रश्न मूर्तीपूजेचा नव्हता, तर मूलत: हा अस्पृश्यता निवारण्याचा होता, सामाजिक समतेचा होता. महर्षी शिंदे ह्यांनी ही भूमिका एका भाषणातून स्पष्ट केलेली आहे.
शेतक-यांच्या चळवळी
वरील क्षेत्रात महर्षी शिंदे ह्यांचे वेगळेपण दिसून येते. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे. १९२८-२९ साली महाराष्ट्रातील शेतक-यांची स्थिती दयनीय झालेली होती. ह्याच सुमारास जागतिक मंदीची लाट आली होती व शेतक-यांची अर्थव्यवस्था पुष्कळशी विस्कटली गेली होती. ह्याच काळात शेतक-यांवरील शेतसारा वाढविण्याचा ठराव मुंबई विधीमंडळात आला होता. शिवाय जमिनीवर तुकडेबंदीचे बिल त्यावेळच्या सरकारने मांडले होते. जमिनीचे ५-७ एकरांखालील लहान-लहान तुकडे शेतीच्या व्यवसायाला किफायतशीर ठरत नाहीत. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हे तुकडे अयोग्य आहेत अशी भूमिका घेऊन सरकारने लहान जमिनी काढून घेऊन शेजारच्या मोठ्या शेतक-यांच्या जमिनीत विलीन करण्याचे धोरण सुरू केले होते. ह्या तुकडेबंदीमुळे महाराष्ट्रातील सुमारे ४० टक्के शेतकरी हे आपल्याच शेतीवर शेतमजूर बनणार होते. शेतक-याला शेतमजूर करणारे हे बिल शेतकरी वर्गाला अतिशय मारक आहे अशी भूमिका महर्षी शिंदे ह्यांनी घेतली होती. त्यासाठी शेतक-यांच्या अनेक परिषदा त्यांनी जागोजागी घेऊन शेतक-यांत मोठी जागृती निर्माण केली होती. शेतकरी हा महाराष्ट्राचा पोशिंदा आहे, शेतीची अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, अशा निष्ठेतून महर्षी शिंदे ह्यांनी ह्या प्रश्नाचा पोटतिडिकेने अभ्यास केला होता. शेतक-यांचा जिवंत प्रश्न घेऊन त्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करणारे नेते त्या काळात प्रार्थना समाजात असणे अवघडच होते. अशा ह्या काळात प्रार्थना समाजात राहून शेतक-यांचे आंदोलन उभे करणारे महर्षी शिंदे हे एकमेव पुढारी प्रार्थना समाजात असल्यास त्यात आश्चर्य कसले!
आजचे मराठी अबालबोध बनत आहे
महर्षी शिंदे ह्यांनी मराठी भाषेसंबंधी जे विचार मांडले आहेत ते आजच्या परिस्थितीच्या संदर्भातून अतिशय उदबोधक व मार्गदर्शक ठरणारे आहेत. मराठी भाषेच्या प्रवासाचे वर्णन करिताना त्यांनी असे सूचित केले आहे की, गेल्या ७-८ श वर्षात मराठी भाषेच्या विकासाचे दोन प्रवाह दिसून येतात. एक प्रवाह येथील अस्सल, स्वाभाविक मराठी भाषेचा. सामान्य माणसाला ही मराठी अधिक जवळची आहे. किंबहुना मराठी हीच सामान्य माणसाची बोली आहे. येथे मराठी भाषेच्या प्रवाहाला दुसरा प्रवाहही आहे. या प्रवाहामध्ये येथील मराठी अधिक कृत्रिम व अधिक संस्कृतप्रचुर बनली. त्यामुळे अशाप्रकारची मराठी सामान्य माणसापासून दूर गेली. पहिल्या मराठी भाषेच्या प्रवाहाचे प्रतिनिधी म्हणून महर्षी शिंदे ह्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, लोकमान्य टिळक ह्यांचा उल्लेख केलेला आहे. तर मराठी भाषा कृत्रिम बोजड करणा-या विचार प्रवाहाचे प्रतिनिधी म्हणून कवी मोरोपंत, विष्णूशास्त्री चिपळूणकर, आगरकर ह्यांचा उल्लेख केला आहे. आजची मराठी अधिक स्वाभाविक, सामान्य माणसाला जवळ करणारी अशी ठरविली पाहिजे, आणि यासाठी ज्ञानेश्वर, तुकाराम ह्यांच्या मराठीची परंपराही आपण सांभाळली पाहिजे असे त्यांनी अधिक आग्रहाने सांगितले आहे. महर्षी शिंदे ह्यांची ही मीमांसा मूलगामी स्वरूपाची व अंती अंतर्मुख करणारी आहे. ह्या प्रश्नाची मीमांसा करताना महर्षी शिंदे म्हणतात, “हल्ली आम्ही इंग्रजी शिकलेले लोक मराठी भाषा म्हणून जी भाषा बोलतो व लिहितो ती अशिक्षित बहुजन समाजास, विशेषत: खेड्यांतून रहाणा-यास कळत नाही. ह्याचे कारण आमचे शब्द जरी मराठी असले तरी विचार इंग्रजी किंवा संस्कृत असल्यामुळे आमची एकंदर वाक्यरचना व संप्रदाय केवळ परकीय व अबालबोध असतात. अबालबोध हा अवघड शब्द आम्ही मुद्दाम वरील दुबळेपणाचे उदाहरणार्थ योजिला आहे. खरी मराठी भाषा ज्ञानेश्वरापासून तुकारामपर्यंतच होती. ती प्रथम मोरोपंतांनी बिघडविली. बिघडता बिघडता लोकहितवादी व ज्योतिबा फुले ह्यांच्यापर्यंत ती कशीबशी जीव धरून होती. पण चिपळूणकरांनी व आगरकरांनी तिचा गळाच चेपला. टिळकांनी व हरिभाऊ आपट्यांनी तोंडात शेवटचे दोन घोट सोडले पण ते शेवटचेच ठरले. आजकाल चिपळूणकरांच्या इंग्रजी, संस्कृतचा कित्ताच आम्ही सर्वजण अधाशासारखे गिरवीत आहो. त्यामुळे आम्ही एकाद्या खेड्यातील पिंपळाचे पारावर आमच्या मराठीचा हार्मोनियम सुरू केल्याबरोबर खेडवळ समाज अर्थ न कळल्यामुळे आम्हाला पाहून आपल्या कानापेक्षा डोळ्यांचेच पारणे अधिक फेडतो व ते आम्हाला कोणी सुचविले तरी आम्हाला समजत नाही”.
बौद्ध धर्माविषयी
ब्रह्मदेशात गेल्यानंतर महर्षी शिंदे ह्यांची “उ-कोडण्णा’ ह्या बौद्ध भिक्षूची भेट झाली. तेव्हा महर्षी शिंदे म्हणाले, ‘उ-कोडण्णा’ ह्यांच्या भेटीने शांती व गंभीरपणा ह्यांचा परिणाम माझ्या मनावर झाला. ह्या विहाराचे वातावरणच आध्यात्मिक भावनेने भरलेले होते, इतके की आपणही बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी असे मला वाटू लागले. म्हणून मी त्यांना विचारले, बुद्ध सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि आणि संघम् सरणं गच्छामि. ही तीन शरणरत्ने आहेत खरी, पण बौद्धालाच तेवढे शरण जाऊन माझा बौद्ध धर्मात प्रवेश होऊ शकणार नाही काय? (माझ्या आठवणी व अनुभव पृष्ठ ३७०-७२) अशाप्रकारे बौद्ध धर्माविषयी महर्षी शिंदे ह्यांचा आध्यात्मिक भाव किती परिपक्व झाला होता ते ह्यावरून दिसून येते.
महर्षी शिंदे ह्यांच्या जीवनाचा साकल्याने विचार केला तर एक गोष्ट ठळकपणे नजरेसमोर येते, त्यांचा पिंड भागवत संप्रदायाच्या व प्रार्थना समाजाच्या तत्वज्ञानावर तयार झालेला होता. परंतु महाराष्ट्रातील इतर सर्व प्रार्थना समाजवाद्यांपेक्षा, समाजाच्या प्रवक्त्यांपेक्षा ते पुष्कळ वेगळे होते. परंपरागत मार्गाने न जाता सर्वच क्षेत्रात स्वतंत्रपणे वाटचाल करणारे असे ते व्यक्तिमत्व होते. ह्या ग्रंथातून महर्षी शिंदे ह्यांच्या ह्या वेगळ्या सामर्थ्याचा व व्यक्तिमत्वाचा प्रत्यय येईल ह्यात शंका वाटत नाही.
ऋणनिर्देश
महर्षी शिंदे ह्यांच्या लेखांचा हा दुसरा खंड प्रसिद्ध करिताना आम्हाला मनापासून आनंद होतो आहे. ह्या ग्रंथात महर्षी शिंदे ह्यांचे काही दुर्मिळ लेख समाविष्ट केलेले आहेत. बडोदे येथे महर्षी शिंदे ह्यांची अनेक व्याख्याने सयाजीराव महाराज गायकवाड ह्यांनी आयोजित केलेली होती. बडोदे संस्थानाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे समितीने बडोदे येथे जाऊन त्यांची कांही दुर्मिळ व्याख्याने मिळविली आहेत. कलकत्ता येथील ब्राह्मो समाजाच्या ‘इंडियन मेसेंजर’ ह्या नियतकालिकात त्यांचे लेख अधूनमधून प्रसिद्ध झालेले होते. महात्मा फुले ह्यांच्यासंबंधी त्यांचे लेख ह्याच नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले होते. हे लेख महाराष्ट्रात प्रथमच प्रसिद्ध होत आहेत. ह्याशिवाय त्यांचे इतर पुष्कळ दुर्मिळ साहित्य ह्या ग्रंथात प्रथमच प्रसिद्ध होत आहे. महर्षी शिंदे ह्यांचे हे साहित्य ही आमुची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे त्यांचे हे सर्व लेख ह्या ग्रंथात प्रसिद्ध करण्याची संधी संपादक मंडळाला मिळाली याबद्दल आम्हा सर्वांना आनंद आणि अभिमान वाटतो. ह्या कामी अनेकांचे आम्हाला साहाय्य झालेले आहे. वाई येथील ब्राह्मोसमाजाचे प्रमुख प्रवक्ते श्री. रा. ना. चव्हाण ह्यांचा आम्हाला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्यांच्यामुळेच महर्षी शिंदे ह्यांचे काही दुर्मिळ साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यांनी ह्या ग्रंथासाठी घेतलेले परिश्रम अतिशय उल्लेखनीय आहे. महर्षी शिंदे ह्यांचे कार्याबद्दल नितांत आदर बाळगणारे महाराष्ट्रातील ते त्यांचे श्रेष्ठ दर्जाचे अनुयायी आहेत. संपादक मंडळ त्यांचे अंत:करणपूर्वक आभारी आहे. श्री.रा.ना. चव्हाण ह्यांच्या प्रमाणेच बडोदे येथील महर्षी शिंदे ह्यांचे साहित्य मिळविण्यास जागृतीकार पाळेकर व नीळकंठराव चव्हाण ह्यांचे चिरंजीवांची आम्हास मोलाची मदत झाली. महर्षी शिंदे ह्यांचे जुने साहित्य आम्हाला तत्परतेने देण्याची महर्षींचे दिवंगत चिरंजीव प्रतापराव शिंदे व श्री. रवींद्र शिंदे ह्यांनी जी आस्था दाखविली, अगत्याने मदत केली ह्याबद्दल समिती त्यांचीही आभारी आहे त्याचप्रमाणे महर्षींच्या स्नुषा श्रीमती लक्ष्मीबाई शिंदे व श्रीमती सुशीलाबाई शिंदे ह्यांचेही समिती आभार मानीत आहे.
ह्या ग्रंथाचे महत्वाचे श्रेय समाज कल्याण खात्याचे मंत्री ना. अर्जुनराव कस्तुरे ह्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जाते. ना. कस्तुरे ह्यांनी ह्या समितीच्या कार्यात रस घेतला म्हणूनच हे कार्य सुलभ रीतीने होऊ शकले. ना. अर्जुनराव कस्तुरे ह्यांच्या सारखे मंत्री ह्या समितीला मिळावे हे एका दृष्टाने ह्या समितीचे भाग्यच म्हणावे लागेल. समिती त्यांची अत्यंत अंत:करणपूर्वक ऋणी आहे. कामाच्या व्यापातूनही वेळ, सवड काढून त्यांनी या ग्रंथासाठी पुरस्कार दिला ह्याबद्दलही आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभारी आहोत.
समाज कल्याण खात्याचे अवर सचिव व आमच्या समितीचे सदस्य मा.म.ब. मुळे व श्रीमती विजया जोशी यांचेही मोलाचे साहाय्य झाले आहे. समिती त्यांची आभारी आहे.
ह्या ग्रंथाची छपाई अतिशय चांगल्या प्रकारे करून देण्याचे काम अंगावर घेऊन ते पार पाडण्याच्या कामी श्री. स. आ. सप्रे, संचालक, शासन, मुद्रण व लेखन सामग्री, महाराष्ट्र राज्य मुंबई व श्री. बा. भा. मारणे व श्री. व. रा. जोशी, माजी व आजी व्यवस्थापक व कर्मचारी शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या हार्दिक सहकार्यानेच हा ग्रंथ या स्वरूपात आज प्रकाशित होत आहे. समिती आभारी आहे.
ह्याशिवाय आमच्या इतर अनेक मित्रांनी, स्नेह्यांनी साहाय्य केले त्या सर्वांचे आम्ही अंत:करणपूर्वक ऋणी आहोत.