मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू देवळांतील अनीतिमूलक आणि बीभत्स प्रकार

हिंदू देवळांना लहान मुली वहाण्याचा किंवा हिंदू देवांशी त्यांचा विवाह करण्याचा जो चमत्कारिक प्रघात ह्या देशात पुरातन कालापासून चालत आला आहे, त्याचे मूळ काय आणि त्याची वाढ कशी झाली आहे ह्याविषयीचा इतिहास उपलब्ध नाही. बहुतकरून ही चाल वांझ बायका आपल्याला मुले व्हावीत म्हणून जे देवभोळेपणाचे नवस करीत असतात त्यामुळे किंवा तरुण आणि धर्मभोळ्या बायकांच्या धर्मवेडामुळे ही चाल बहुतकरून अस्तित्वात आली असावी. धर्माच्या इतिहासात काही प्राचीन राष्ट्रांमध्ये धर्माच्या नावाने व्यभिचार करण्याचा एक दुष्ट प्रकार होता, त्यामुळे ही चाल पुढे पडली असेल असे एकाद्या भावी इतिहास संशोधकाने शोधून काढीपर्यंत ह्या विचित्र चालीचे मूळ असे अज्ञात रहाणार आहे. एका ग्रंथकाराने म्हटले आहे “हिरॉडोटस आणि स्टॅबो ह्यांच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की मायलेटा (ग्रीक लोकांची अफ्रोडाइट) देवीच्या देवळामध्ये प्रत्येक तरुण मुलीने एकदा तरी व्यभिचार करावा अशी चाल आसिरिअन आणि बाबिलोनियन ह्या प्राचीन राष्ट्रांमध्ये होती”. ह्या चालीचे दुष्ट प्रकार आम्हांला हिंदुस्थानातील मोठमोठ्या देवळांतू आणि तेथून सर्व हिंदुसमाजामध्ये पसरत असलेले अद्यापि दिसून येतात. हे प्रकार इतर ठिकाणांपेक्षा मद्रास इलाख्यामध्ये फार आढळतात. अबेडुबॉय ह्याने आपल्या ग्रंथात (पान ५९२ ते ६०४) वर्णिलेले बीभत्स प्रकार हल्लीच्या सुधारलेल्या मनूमध्ये दक्षिण प्रांती अद्यापि किती चालले आहेत हे चव्हाट्यावर मांडण्याचे तिकडील लेखकाचे काम आहे. पश्चिम हिंदुस्थानात ही चाल दक्षिणेतूनच आली असावी. जरी इकडे तिकडच्या इतके दुष्ट प्रकार दिसून येत नाहीत आणि जे आहेत तेही हळूहळू कमी होत आहेत तरी पण तेवढ्यावरून समाजामध्ये ह्या बाबतीत जे दुर्लक्ष दिसून येत आहे, किंवा नुकत्याच सरकारने ह्या बाबतीत प्रसिद्ध केलेल्या पत्रव्यवहारामध्ये ‘चालले आहे ते ठीक आहे’, असा जो ध्वनी निघत आहे (फुट नोट- ऑक्टोबर १९०७ च्या प्युरिटी सर्व्हंटच्या मासिकात इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचे भाषांतर) तो क्षम्य आहे, असे होत नाही. काही सन्मान्य पुढा-यांनी ह्या बाबतीत जो सरकारकडे अर्ज केला आणि त्याला सरकारने ज्या अधिका-यांच्या मतामुळे बादशाही उत्तर देऊन वाटेस लाविले त्यापैकी पुढील एक मासलेवाईक मत पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने दिले आहे. ‘देवाला आपल्या मुली वाहण्याची चाल हिंदुसमाजाच्या खालच्या वर्गातच दिसून येत आहे, आणि ती देखील अर्जदार म्हणतात तितक्या मोठ्या प्रमाणावर नाही. गेल्या दहा वर्षांत मुरळ्यांची संख्या १००० वरून ३०० पर्यंत आली आहे असे सांगतात. शिक्षणाचे प्रमाण जसजसे वाढत आहे तसतसे ही चाल कमी कमी होत आहे. परंतु ज्या लोकांमध्ये ही चाल आहे त्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार फार हळू होत असल्यामुळे ही चाल हळूहळू कमी होत आहे. शिवाय हेही लक्षात घेण्यासारखे आहे की ही चाल खंडोबा आणि इतर अशी देवस्थाने ज्या भागात आहेत तेवढ्याच भागात चालू आहे. ह्यावरून हे उघड होत आहे की ही चाल बंद करण्यासाठी सरकारने तीव्र उपाय योजावे अशी हिची मोठी व्याप्ती नाही’.

मुरळ्यांची संख्या पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने वर सांगितल्याप्रमाणे खरोखर १००० पासून ३०० वर आली असली, तरी दुस-या नावाने इतर देवळांत वाहिलेल्या इतर असंख्य बायकांचा प्रश्न शिल्लक राहिलाच.

धंदा १९०१ १८९१ वाढ
कसबिणी
१,७५,२८४  १,१६,८८८ 
५८,३९६
कुंटणी 
८,१९७
  ४,७६५    
३,४३२
इतर   ८,१४१       ४५,९८०     ६१,८२८
एकंदर दुराचारी स्त्रिया
१,९१,६२२
१,६७,६३३ १,२३,६५६

   आता ह्या चालीची व्याप्ती आणि धर्माच्या नावाने दुराचार करणा-या बायकांची नक्की संख्या हे सांगणे कोणाही खासगी गृहस्थाला शक्य नाही. तो अधिकार खानेसुमारीच्या खात्यासच आहे. पण ह्या ठिकाणी लक्षात ठेवावयाची गोष्ट ही आहे की, अशा बायकांना मुरळी हेच नाव नाही. निरनिराळी नावे धारण करून निरनिराळ्या देवळांशी संबंध असणा-या किंवा कोणत्याही देवळाशी संबंध नसणा-या असंख्य बायका आपले निरनिराळे संप्रदाय चालवीत आल्या आहेत. महाराष्ट्र, कारवार, कोकण आणि कर्नाटक ह्या भागांतील किती मोठ्या प्रदेशात ही चाल चालू आहे, हे खालील कोष्टकावरून कळून येईल.  

वाहिलेल्या मुलींच्या वर्गाचे नाव देवता    क्षेत्र    जिल्हा
मुरळी     खंडोबा        जेजूरी पुणे
मुरळी जोतिबा कोल्हापुराजवळ कोल्हापूर
जोगवीण अंबाबाई तुळजापूर निजामचे संस्थान
भावीण रवळनाथ खानापूर बहार
नायकीण भूतनाथ मालिगाव कोकण
कलावंतीण महाबळेश्वर गोकर्ण कारवार
बसवी दारेश्वर      कुमठा        कारवार
देवदासी गुट्यम्मा शिरशी कानरा
देवळी यल्लमा सौंदत्ती बेळगाव
जोगती दुर्गव्वा कणकेरी बेल्लारी
       मातंगी        द्यामव्वा      गुड्डूर        गदग
       शरणी             मारुती           

 

वर सांगितलेल्या खानेसुमारीच्या कोष्टकावरून दिसून येईल की, दुराचारी माणसांची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये शेकडा १३ नी वाढली आहे आणि कसबिणींची संख्या शेकडा ५० नी वाढली आहे. पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी वर सांगितल्याप्रमाणे मुरळ्यांची संख्या शेकडा ३० नी कमी झाली आहे व खानेसुमारीच्या वरच्या कोष्टकान्वये एकंदर वेश्यांची संख्या शेकडा ५० नी जास्त झाली आहे, तर ह्या दोन गोष्टींचा मेळ बसविण्याची जादू नुसत्या शिक्षणाच्या कांडीने कशी साधावी ! म्हणून मॅजिस्ट्रेटसाहेबांच्या सांगण्याविषयी जबर शंका येत आहे. शिवाय ज्यांना म्हणून हिंदुस्थानातील व्यभिचाराच्या कारणांची थोडीशी तरी माहिती आहे, त्यांना कळून येईल की मुंबई इलाख्यातील वेश्यांची एकंदर संख्या १,७५,२८४ आहे, त्यांपैकी ३०० पेक्षा जास्त मुरळ्या खात्रीने असाव्यात. शिवाय केवळ शिक्षणप्रसारानेच मुरळया नाहीशा होतील असे समजणे म्हणजे शिक्षणाने देशातील चोर भामटेही नाहीसे होतील, असे समजण्यासारखेच व्यर्थ आहे. पोलीस खात्याच्या ऐवजी केवळ शिक्षण खात्याचीच योजना करून जर चोरी आणि भामटेगिरी बंद करता येत नाही, तर त्या खात्याकडून बेकायदेशीर आणि अनीतिपर चाली व त्यामुळे उघड होणारा व्यभिचार तो कसा बंद होणार ! सर्वच व्यभिचार बंद करणे हे शक्य नाही, तरी पण त्याची जी कारणे बंद करण्यासारखी आहेत, ती करू नयेत असे होत नाही. तथापि “जोपर्यंत वेश्यांकरिता मागणी आहे तोपर्यंत ह्या चालीमुळे नाही तरी, दुस-या कारणावरूनच वेश्यांचा पुरवठा होणारच” असे एका फरडेशाही अधिका-याने आपले मत दिले आहे व तशाच मताचा परिणाम काही अंशी सरकारवर घडून त्यांनी वरील सन्मान्य अर्जदारांना जबाब दिला आहे असे दिसते. मागणीवरून पुरवठा होतो, हे जरी खरे आहे तरी पुरवठ्यावरून अधिक मागणी येते, हेही विशेषतः निदान ह्या बाबतीत तरी दुप्पट खरे आहे. आणि शिवाय वेश्या म्हणजे तिच्या बाहेरील मागणीसाठी करविला जाणारा केवळ निर्जीव मालच नव्हे, तर ती स्वतः सजीव मागणीही आहे. ती नवीन पुरवठ्याला उत्पन्न करिते. शिवाय देवाला वहाण्याच्या चालीचे अप्रत्यक्ष रीतीनेही दुसरे अनिष्ट परिणाम होतात. चांगल्या आईबापाच्या मुली देवाला वाहिल्यामुळे कसबिणी होतात. इतकेच नव्हे तर ज्या अगोदरच वेश्या होऊन बिघडलेल्या असतात. त्या आपला धंदा अधिक प्रतिष्ठित रीतीने चालावा मग तो खालच्या लोकांत का होईना आणि समाजामध्ये आपला अधिक राजरोसपणे शिरकाव व्हावा म्हणून त्या कोणताही विशेष प्रकारचा विधी न करता मुरळ्या बनतात. मुरळ्या वहाण्याच्या ह्या दुष्ट चालीच्या प्रतिकारार्थ इंडिअन पिनल कोडाची ३७२ आणि ३७३ ही कलमे असूनही ही चाल अद्याप राहू दिली गेल्यामुळे त्या चालीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुष्ट परिणाम झाले आहेत. ही चाल अद्याप तशीच राहण्याची दोन कारणे अशी आहेत की तिच्या उलट जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी सक्तीने होत नाही व ह्या चालीच्या उलट, जोराचे लोकमत प्रक्षुब्ध केले जात नाही. ही चाल केवळ खालील जातीमध्येच आहे म्हणून तिच्या संबंधाने काही तीव्र उपाय योजण्याचे कारण नाही असेही दाखविण्यात आले आहे. मुरळी अथवा जोगतीण ही स्वतः कदाचित खालील जातीतील बाई असेल पण तिच्या मोहपाशात सापडणारे किंवा तिचा फायदा घेणारे सर्वच पुरुष खालील जातीचे असतात कशावरून ! एका वेश्येमागे म्हणजे निदान पाच दहा बदफैली पुरुष हे प्रमाण उघडच आहे. ते सर्व खालील जातीतील असतीलच कशावरून ! आणि ते जरी असले तरी तेवढ्यावरून हे अरिष्ट कमी घातुक आहे हे कशावरून !

पुन्हा मुलीच देवाला वहातात असे नाही तर मुलगेही वहातात. खंडोबाचा वाघ्या, अंबाबाईचा आराध्या, ध्यामव्वाचा पोतराज आणि यल्लमाचा जोग्या, ह्या सर्वांना लग्न करून इतरांप्रमाणे घरगुती पेशाने रहाण्याची सक्त मनाई असल्याने त्यांचे जीवित कमी अधिक प्रमाणाने बदफैली असते ह्यात नवल काय ? मात्र बायकांइतकी त्यांची संख्या मोठी नसते आणि त्यांच्या वागणुकीचा हलगर्जीपणाही बायकांच्या इतका नजरेत भरण्यासारखा नसतो. धड पुरुष नव्हे, धड बायको नव्हे अशा काही नपुंसक माणसांचा एक तिसरा वर्ग आहे. ह्या दुर्दैवी माणसांमध्ये अनीतीपेक्षा असभ्यतेचाच प्रकार जास्ती आढळतो आणि ते सहजच कुंटणपणाचे व इतर लांच्छनास्पद निंद्य धंदे करीत असतात, आणि त्यांना कित्येक सृष्टिनियमाविरुद्ध संवयीही लागलेल्या असतात. त्यांना काही दुष्ट हेतूने अशा स्थितीत टाकलेले असते की, ते जन्मतःच तसे असतात की नाही, हे सांगण्यास येथे अवकाश नाही. परंतु अंबाबाई, यल्लमा वगैरे देवींच्या देवळांशी त्यांचा कोणत्या तरी रीतीने संबंध जडलेला असतो. अशांची बरीच संख्या पुणे येथील ससून हॉस्पिटलजवळील बोलाईच्या देवळाभोवती नाचताना आणि टेहळताना दिसते. ह्यांना नपुंसकत्व कसे प्राप्त झाले आणि त्यांची अशी अवनीती कशी झाली ह्याविषयी शोध करण्यापलीकडे ह्यांच्या बाबतीत काही करता येईल, असे वाटत नाही, पण त्यांना व्यक्तिशः विशेष काही मदत करता आली नाही तरी त्या दुर्दैवी माणसांना सृष्टिदेवीने जो आधीच शाप दिला आहे त्याचे बीभत्स धिंडवडे आज समाजापुढे जे राजरोस चालू आहेत ते तरी कायद्याने आणि लोकमताने सहज बंद करण्यासारखे असताना ह्यांतील एकाद्या रीतीने का प्रयत्न होत नाही हे कळत नाही. ह्या बेकायदेशीर अनीतिपर आणि सृष्टिविरुद्ध देवळांतील प्रकारांचा केवढा मोठा व्याप आणि त्यांचे स्वरूप कसे अनिवार्य आहे हे ध्यानात आणून हल्लीच्या सुधारलेल्या काळीही शिक्षण आणि कायदा ह्यांना न जुमानता हे अरिष्ट कसे चालू आहे हे पाहिले असता कोणाही शुद्ध अंतःकरणाच्या न्यायी मनुष्याला ह्याची सक्त बंदी एकदम तीव्र उपायानेच झाली पाहिजे असे वाटल्याशिवाय रहाणार नाही. ह्या बाबतीत विलंब, वादविवाद आणि मीमांसा ह्यांची मुळीच आवश्यकता नाही. इतकेच नव्हे तर ही सर्व केवळ अक्षम्य आहेत असे कळून येईल.

अशा प्रकारे शेवटी हा आवश्यक प्रश्न कोणी आपल्या हाती तो कसा सोडवावा ह्या मुद्याला आपण येऊन पोहोचतो. हा घातुक प्रकार ज्या खालच्या जातीत आढळतो त्या ह्या भंडारी, कुणबी, धनगर, नाईक, कोळी, बेडर, डासर, कबलिगार, तळवार, महार, मांग, वगैरे. ह्या अडाणी जातींवर आधुनिक शिक्षणसंस्थांचा आणि आधुनिक सभ्यतेचा संस्कार होण्यासारखा नाही म्हणून ह्या बाबतीत राजसंस्था व धर्मसंस्था ह्यांच्याकडेच पहावे लागत आहे, पण दुर्दैवाने ह्या देशातील सत्त्वशील राजसत्ता आणि जिवंत (ख्रिस्ती) धर्मसंस्था ह्या दोन्हीही परकी आहेत. सरकाराने, बरोबर असो किंवा चुकीचे असो, आपले तटस्थपणाचे एक निराळेच धोरण ठेवल्यामुळे आणि ख्रिस्तीधर्माने आपल्या उलट आपल्या चमत्कारिक मिशनरी पद्धतीमुळे लोकांमध्ये दुराग्रह आणि अविश्वास ह्यांचा एक अवाढव्य ढीग साचू दिल्यामुळे ह्या सामाजिक सुधारणेच्या बाबतीत राजसत्ता आणि धर्मसंघ ह्या दोन्हीही शक्ती पंगू झाल्या आहेत. उलटपक्षी, एतद्देशीय धर्मसंस्था आणि लोकमत ह्यांचे तर ह्या बाबतीत नावच घ्यावयास नको, इतकी त्यांची ढिलाई आहे.

ह्या बाबतीत उपाय करावयाचे ते दोन प्रकारचे. एक प्रतिबंधक व दुसरा उपशामक. पहिल्या संबंधाने इंडियन पिनल कोडचे ३७२ व ३७३ ही कलमे करून सरकाराने आपले कर्तव्य बजाविले आहे. ह्यापुढे त्या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करून आणि ज्यांना देवास वाहण्यात आले आहे त्यांची सोडवणूक करण्याची कामगिरी सरकाराला वाजवीपेक्षा जास्त अंगावर घेता येत नाही व ती त्यांनी घेऊही नये. सरकाराने केलेल्या कायद्याचा फायदा घेण्यासाठीच नव्हे तर त्याच्या पुढील कामगिरी बजावण्यासाठी ह्या बाबतीत एकाद्या खासगी, परोपकारी मंडळीनेच संघटित स्वरूपाने पुढे आले पाहिजे. ही खासगी संस्था एकाद्या विशिष्ट पंथाची अथवा धर्मसंघाची असू नये. तर हल्लीच्या हिंदुस्थानातील मिश्र लोकसमाजाच्या निरनिराळ्या घटकावयवाचे प्रतिनिधी ह्या मंडळीमध्ये असले पाहिजेत. परंतु अशा घाटाची मंडळी मुंबईमध्ये आधीच होऊन चुकली आहे. म्हणून ह्या बाबतीत वायफळ तर्क वितर्क न लढविता किंवा भाविक सदिच्छा प्रकट न करता मी ह्या मंडळीच्या सेक्रेटरींनी काढलेले जाहीर पत्र खाली जसेच्या तसेच देत आहे. सरकार, मिशनरी, सुधारक, परोपकारी आणि नीतिशास्त्रवेत्ते ह्या सर्वांनीच ह्या मंडळीचे मनःपूर्वक स्वागत करून आपापल्या परीने शक्य तितकी मदत करावयास पाहिजे.

पश्चिम हिंदुस्थानातील मुलांचे रक्षण करणारी संस्था   
संस्थेचे हेतू

(अ) मुलांची नीती बिघडविण्याचे होत असलेले प्रयत्न व ह्यांच्या बाबतीत खासगी रीतीने होणारे अन्याय ह्यांचा प्रतिकार करणे;
(ब) त्यांच्या संरक्षणार्थ कायद्याची अंमलबजावणी होईल अशी व्यवस्था करणे व इष्ट वाटल्यास अशा कायद्याची दुरुस्ती करून घेणे;
(क) वरील हेतू सफळ होण्याकरिता कामगार नेमणे;
(ड) वरील हेतू साधण्याकरिता दुस-या सर्व कायदेशीर गोष्टी करणे;
(ई) व्याख्याने, हस्तपत्रके वगैरेंसारख्या उपायांनी मुलांच्या शिक्षणाविषयीच्या व त्यांना योग्य वळण लावण्याविषयीच्या विचारांचा प्रसार करणे व न्यायास अनुसरून मुलांना वागविणे अशा प्रकारचे लोकमत तयार करणे.

सभासद
वार्षिक पाच रुपयांपेक्षा कमी नाही इतकी वर्गणी देणा-या कोणत्याही स्त्रीला अथवा पुरुषाला ह्या संस्थेचे सभासद होता येते. मात्र ह्या संस्थेच्या दोघा सभासदांनी त्याची किंवा तिची शिफारस करून मॅनेजिंग कमिटीमध्ये त्याची किंवा तिची निवड व्हावयास पाहिजे.

काम करण्याच्या रीती

पहिली—संस्थेच्या वरील (ई) कलमात सांगितलेल्या शिक्षणाच्या कामाकरिता जरूर वाटेल तेव्हा हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती किंवा पार्शी ह्यांना आपापल्या धर्माच्या लोकांपुढे व्याख्यान देण्यास सांगण्यात येईल, व्याख्याते इतर धर्माच्या श्रोतृवृंदापुढे आपल्या धर्माचे प्रवचन करणार नाहीत;

दुसरी—(अ) आणि (ब) ह्या कलमांत सांगितलेल्या कामाची अंमलबजावणी करताना कोणत्याही अज्ञान मुलास त्याच्या धर्माहून निराळ्या धर्माच्या मनुष्याच्या किंवा संस्थेच्या हाती दिले जाणार नाही;

तिसरी—एकाद्या अज्ञान मुलाच्या मार्फत ही संस्था जेव्हा त्याच्या फिर्यादीचे किंवा बचावाचे काम हाती घेईल तेव्हा ते मूल त्या धर्माहून निराळ्या धर्माच्या, संस्थेच्या प्रतिनिधीकडे असणार नाही. पंढरपूर, धुळे, अहमदाबाद येथील व लेडी नॉर्थकूट ह्या अनाथ बालकाश्रमांनी संस्थेच्या ताब्यात असलेल्या मुलांना आश्रमात घेण्याचे कबूल केले आहे;

चवथी—संस्थेच्या सर्व कामगारांना अशी सक्त ताकीद आहे की, त्यांनी आपला धर्म, अज्ञान मुलांच्या धर्माहून निराळा असेल, तर त्यांना त्याचा उपदेश करू नये.

कार्यकारी मंडळ

मुंबईचे बिशप—अध्यक्ष.
ऑनरेबल सर नारायण चंदावरकर, ऑनरेबल मि. जी.के. पारख; डॉ. मॅकिकन, सर भालचंद्र कृष्ण—उपाध्यक्ष.

एच. आर. एच. वुइलकिनसन, मुंबई स्कॉटिश हायस्कूलचे प्रिन्सिपॉल, वि. रा. शिंदे, एलफिन्स्टन रोड, मुंबई; बी.एन. भाजेकर, आंग्र्याची वाडी, गिरगाव—सेक्रेटरी.