समाज बंधू व इतर मित्रहो,
सेक्रेटरीने आता जो अहवाल वाचला त्यामध्ये ह्या संघाच्या उगमाचा जो इतिहास सांगितला आहे तो फारच अलीकडचा आहे. त्याची पाळेमुळे त्याहून फार खोल आणि लांब आहेत. महाराष्ट्राची लोकस्वातंत्र्याबद्दल ख्याती बौद्ध, जैन काळापर्यंत मागे पोहोचते. अनेक राज्यक्रांत्या झाल्या. धर्मक्रांत्या झाल्या. संस्कृतीचे वळसे बसले. दैवाचे फेरे फिरले. परंतु महाराष्ट्रातील खेडवळ जनता (शेतकरी/कुणबी) अद्यापि तशीच शिरसलामत आहे. ब्रिटिश रियासत झाली. तिचा पहिला गव्हर्नर एलफिनस्टनसाहेब ह्याची दृष्टी मर्मदर्शी खोल होती. त्याने त्यावेळच्या मराठा कुणब्याचे पुढील वर्णन केले आहे. तो कुणबी तेव्हाच्या गव्हर्नरासारख्यांनासुद्धा साध्या अंतःकरणाने आणि मराठी बोलीने अरेतूरे असे संबोधित असे. गेल्या बादशाहीपुढे व येणा-या बादशाहीपुढे त्याने आपली मान वाकविली नाही. (Give Ceaser his due and have done with him) ‘राजाला जे देणे आहे ते दे आणि मोकळा हो’ अशा बायबलातील म्हणीप्रमाणे मराठा कुणबी, करापुरता राजा आणि एरव्ही मी माझा अशा बाण्याने वागत असे. आपल्या घरगुती व्यवहारात आणि धर्मात तो भूपतीला मोजीत नसे किंवा वर्णगुरूला ओळखीत नसे. महाराष्ट्रात ३०० वर्षांपूर्वी जो भागवत धर्माचा प्रसार झाला, त्याचे श्रेय अठरापगड जातींतील प्रत्येक संताने उचलले आहे. आणि ह्याची ग्वाही महिपती स्वामीनी आपल्या भक्तिविजय ग्रंथात पुरेपूर दिलेली आहे. गेल्या शतकाचे शेवटी उत्तरार्धात महाराष्ट्रात धर्मसुधारणेची जी लाट उसळली तीतही जनतेने आपला प्रतिनिधी उभा केलाच. रानडे, भांडारकर, मोडक आणि चंदावरकर ह्या विद्वानांप्रमाणेच किंबहुना त्यांचेआधी स्वतंत्रपणाने धर्मस्वातंत्र्याचा दिवा महात्मा जोतीराव फुले ह्यांनी लावला आणि आपले नाव व आडनाव सार्थ केले. ह्या जोतीबा फुल्यांच्या शिकविण्याचा ठसा (फुट नोट – वाई प्रार्थना संघ (ब्राह्मसमाज) मंदिरप्रवेश समारंभाचे अध्यक्ष म्हणून केलेले भाषण, वाई ता. २४ मे १९३७.) प्रस्तुत प्रार्थनासंघामध्ये स्पष्ट आहे. तेली, माळी, मराठा, कुणबी, महार, ढोर ह्या सर्व बहुजनातील पुढारी समाजाने ह्या संघाची तळी आज उचलली आहे. आजच दोन तासांपूर्वी एका ढोर गृहस्थाचे घरी कौटुंबिक उपासना होऊन त्या सबंध घराण्याने ब्राह्मधर्माची दीक्षा घेतली हाच जोतीबाचा जयजयकार होय.
ह्या संघाच्या चालू इतिहासामध्ये तीन मुख्य टप्पे पडतात ते असे : (१) वर सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाजाच्या शिकवणीने सातारा जिल्ह्यातील खडकाळ जमीन नांगरली गेली. रूढीचे तण उपटले, भेदाचे खडक फोडले, अहंकाराची नांगी मोडली, नवीन पिकाची तयारी झाली; (२) अशा वेळी रिपोर्टात सांगितल्याप्रमाणे पुण्याकडील कौटुंबिक उपासनामंडळाने बी पेरले, आणि त्याचे अंकूर फुटल्यानंतर; (३) मुंबई व पुणे प्रार्थनासमाजाचे पुढा-यांनी योग्य वेळी पाणी शिंपले. ह्या तीन टप्प्यांचे महत्त्व सारखे आहे. आणि ज्यात आम्ही आज प्रवेश करीत आहो ते मंदिर ह्या तिन्ही टप्प्यांचे पहिले गोड फळ आहे. आपण येथे जमलेले वाईचे रहिवासी आणि बाहेरगावचे पाहुणे ह्या सर्वांचा ह्या फळावर आशीर्वाद असावा.
हे मंदिर केवळ वाई शहरापुरतेच नाही. सबंध तालुक्यातील खेड्याखेड्यातून ब्राह्मधर्माचा संदेश गाजवावा हा हेतू प्रथमपासूनच आहे. ह्या तालुक्यातील पंचक्रोशीचे हे केंद्र आहे. एका पिढीपूर्वी सातारा शहरामध्ये एक प्रार्थना समाज काम करीत होता. माझे मित्र परलोकवासी सीतारामपंत जव्हेरे व परलोकवासी रा. ब. काळे ह्यांची आज आठवण मला केल्याशिवाय रहावत नाही. त्यांचेप्रमाणे त्यांनी काढलेला समाजही आज स्मृतिवंश झालेला आहे. जिल्ह्याचे ठाणे हे आधुनिक संस्कृतीची पहिली पायरी. तेथून आधुनिक सुधारणेची इमारत वर सुरू होते. तालुक्याचे ठिकाण हे बहुजन समाजाच्या राहाटीची शेवटची पायरी होय, येथून खाली जनतेची राहाटी खेड्यापर्यंत पोहोचते. आमची महत्त्वाकांक्षा तूर्त तालुक्यापुरतीच आहे. ह्या आमच्या कार्यावर आपला आशीर्वाद असावा.
केंजळ खेड्यापासून मुंबई शहरापर्यंत, बेळगाव—कोल्हापूरापासून इंदूर—अहमदाबाद—बडोदा शहरापर्यंत बृहन् महाराष्ट्राची सहानुभूती आम्हांस मिळाली आहे. उच्चनीच सर्व जातीने आमच्याशी सहकार्य केले आहे. नाव ठेवण्यास कोठेच जागा नाही. हे मंदिर झाले नव्हते तेव्हा टिळकमंदिर व प्राज्ञपाठशाळा ह्यांच्या चालकांनी आम्हांला खुल्या दिलाने जवळ केले. टिळकमंदिरात भजन, व्याख्याने झाली. प्राज्ञपाठशाळेच्या पवित्र जागेत सहभोजने झाली. अस्पृश्यतानिवारण परिषदेच्या वेळी मंदिरप्रवेश झाला. महारमांगवाड्यात मुख्य कार्यक्रम झाले नाहीत असा आमचा एकही उत्सव झाला नाही. मग आम्हांला काय उणे पडले ? आज आपल्या येण्याने तर कळस झाला आहे.
पण जे आजवर झाले ती सुरुवातच आहे. कार्याचा डोंगर आता स्पष्ट दिसू लागला आहे. उपासनेला कायमचा आश्रय मिळाला. उपासनेच्या स्थळाला मुंबई प्रार्थनासमाजाच्या आद्य चालकांपैकी परलोकवासी वासुदेव बाबजी नवरंगे ह्यांचे नाव देण्याची सुसंधी आम्हांला मिळाली आहे, ह्याबद्दल त्यांच्या सूनबाई श्रीमती रमाबाई नवरंगे ह्यांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे. ह्यापुढे ह्या विस्तीर्ण वाड्यामध्ये निरनिराळ्या कार्याची उठावणी करावयाची आहे. आपल्या येण्याने त्याची जबाबदारी आपणावर सहजच येत आहे. सर्वारंभी ज्यांनी हा वाडा विकत देऊ केला आणि कित्येक विघ्ने आली तरी ती शांतपणे निवारून काल रोजी खरेदीखत रीतसर पूर्ण केले ह्याबद्दल श्री. बाबूराव पंडितांचे आभार मानतो. एकदोन किरकोळ गोष्टीं करावयाच्या आहेत त्या ते योग्यवेळी करतील अशी पूर्ण खात्री आहे. निधी जमविण्याचे कामी माझे मित्र श्री. यज्ञेश्वरपंत भांडारकर ह्यांनी प्रथम कंबर बांधली व एक हजार रुपये मिळविले. त्यानंतर डॉ. टी. सी. खांडवाला ह्यांनी आपली वार्धक्याने वाकलेली काया निधी जमविण्याकडे लावली. गावोगाव, घरोघरी जाऊन कार्य पूर्ण केले. त्यांना श्री. बी. बी. केसकर विशेषतः त्यांची पत्नी सौ. आनंदीबाई केसकर, श्री. भाऊसाहेब वैद्य, श्री. बी. बी. कोरगावकर ह्यांनी मदत केली. हया सर्वांचा आभारपूर्वक उल्लेख करणे भाग आहे.
शेवटी ह्या समाजाचे उत्साही तरुण सेक्रेटरी श्री. रामराव बाबर, श्री. शंकरराव जेजूरीकर आणि अनुभवी अध्यक्ष श्री. नारायणराव चव्हाण ह्यांच्या कामगिरीला तर दुसरी जोड नाही. खरे पहाता ह्या त्रिवर्गांना खरे श्रेय आहे. बाकी आम्ही सर्व सहाय्यक आणि हेच खरे कर्ते. परमेश्वर ह्यांना दीर्घायुष्य देवो आणि जोतीबा फुल्यांच्या इच्छेने पांग फिटो. सन १९३३ साली राममोहन रॉय शतसांवत्सरीच्या निमित्ताने मी व माझे मित्र श्री. केसकर येथे आलो होतो त्यावेळी ह्या संघाची पहिली घटना झाली. तेव्हाच ह्या संघाला ब्राह्मसमाज हे नाव द्यावे असा आग्रह येथील मंडळीचा पडला. मला त्यास थोपवून धरावे लागले ! ‘निदान पाच पाच तरी अनुष्ठानिक (मताप्रमाणे आचरणा-या) गृहस्थांची नावे मला मिळावीत म्हणजे...’ घटना करू असे म्हणताच पाच जणांनी आपली तयारी लेखी दिली. घटना झाली. अध्यक्ष नारायणराव चव्हाणांनी तेव्हा आपले नाव दिले नाही, पण परवाच त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांचा ब्राह्मविधिप्रमाणे येथे विवाह संस्कार होणार आहे. आता त्यांच्या अनुष्ठानिकपणाबद्दल काय शंका राहिली ? आणि ह्या समाजाला ब्राह्मसमाज म्हणून नाव ठेवण्याला काय हरकत ? तथापि तो नामकरणविधी योग्य वेळी साजरा होईल, त्याला कोण आड येईल ? आणि तेव्हाच माझे वृद्धमित्र श्री. बी. बी. कोरगावकर ह्यांचे नामकरणासंबंधी जे पत्र आले आहे, त्यास योग्य उत्तर दिले जाईल.
इतके सांगून ज्या जगन्नियंत्याच्या कृपेने हे सर्व घडले त्याचे मनःपूर्वक आभार मानून आपण सर्व आपल्या समोरील मंदिरात प्रवेश करू या. अशी अध्यक्षांनी विनंती केली आणि सर्व मंडळीने प्रवेश केला.