विनोदाचे महत्त्व

स्थूल दृष्टीने पाहता जगामध्ये तीन प्रकारची माणसे आढळून येतात. अत्यंत मोठमोठे पुष्कळसे सदगुण अंगी असलेले काही महापुरूष असतात. त्याचप्रमाणे अत्यंत दुष्ट गुणांनी सडून गेलेले दुरात्मे असतात. पण ह्या दोन्ही कोटीतील माणसे अपवादात्मकच म्हणावयाची. तुम्ही आम्ही तिस-या साधारण कोटीतील माणसे, त्या आम्हांला वरील दोन्ही अपवादात्मक कोटीतील माणसाच्या गुणावगुणाविषयी विचार करून विशेष फायदा नाही. कारण, ती बोलून चालून अपवादात्मक कोटीतली. मनुष्यस्वभावरचनेचा जो साधारण इतिहास आणि नित्याचे नियम असतात त्यात काहीतरी ढवळाढवळ होऊनही अपवादात्मक माणसे उद्याला आलेली असतात म्हणून त्यांच्याविषयी आज आपल्यास काही कर्तव्य नाही.

साधारण कोटीतील माणसांचेही दोन प्रकार दिसतात. पहिल्या प्रकारची माणसे अशी असतात की त्यांच्यावर वेळोवेळी जे प्रसंग येतात त्याविषयी उगीच गंभीर विचार करीत बसण्याची त्यांना सवय असते. मागे आलेल्या आपत्ती आणि झालेल्या निराशा ह्यांविषयी ती ध्यास घेऊन बसतात, इतकेच नव्हे तर पुढे येणा-या अडचणीचीही त्यांना सारखी रूखरूख लागलेली असते. अशा त्यांच्या खोलगट स्वभावामुळे त्यांना रात्री अंथरूणात पडूनही जागण्याची व दिवसा कामाच्या वेळी पेंगण्याची पाळी येते. ह्या सर्वांचे कारण त्यांच्यातील विनोदाचा अभाव हे होय. विनोद ह्याचा अर्थ केवळ खुशमस्करी नव्हे. वेड्या-वाकड्या वाकुल्या दाखवून लोकांस हसविणे, किंवा कुत्र्याचे कान आणि माकडाचे शेपूट अशा काही तरी अकल्पित गोष्टी सांगून दुस-याचे मन रिझविणे हाही विनोद नव्हे, हा केवळ विदूषकपणा होय. विनोद म्हणजे संसारात येणा-या निरनिराळ्या प्रसंगांचा वाजवीपेक्षा जास्त चटका लावून न घेता, आपली संतोषित वृत्ती कायम ठेवणे हा होय. काही विशिष्ट प्रकारच्या वड्मयात दाखविलेला हा केवळ ग्रंथकाराचाच गुण नव्हे तर साधारण कोटीतील माणसांच्या नित्याच्या वृत्तीत कायमचा आढळून येणारा हा एक गुण आहे. ह्या गुणाने मंडित झालेली माणसे ही साधारण कोटीतील दुस-या प्रकारची होत.

ह्या गुणामुळे ही दुस-या प्रकारची माणसे नेहमी सुखी आणि आनंदी असतात. त्यांच्या मनोमंदिरामध्ये नेहमी विनोदाची हवा खेळून उबट ओलसरपणास जागा न राहिल्यामुळे क्लेश, चिंता इत्यादी कृमी त्यात साचत नाहीत. वरवर पाहताना ही माणसे केव्हा उथळ स्वभावाची दिसतात, परंतु खरा प्रकार हा असतो की त्यांना संसाराचे ओझे इतरांप्रमाणे वाटत नाही. ही माणसे स्वत:च सुखी आणि संतुष्ट असतात, इतकेच नव्हे, तर ह्यांच्याकडे जे जातील किंवा ही ज्यांच्याकडे जातील, त्यांच्याही सुखासमाधानास ही बरीच कारणीभूत होतात. हवेत उडणा-या आनंदी पाखराकडे पाहून जमिनीवर सरपटणा-या जड माणसाला जसे कौतुक आणि समाधान वाटते, तसेच ह्या दुस-या कोटीतील माणसाचे सुख पाहून पहिल्या कोटीतल्या माणसाचे दु:ख किंचित हलके होते. असा ह्यांच्या ह्या संतुष्ट वृत्तीच्या संसर्गाचा महिमा आहे.

पण ह्याहूनही थोर कामगिरी ह्या मंडळीकडूनच सहजच बजावली जाते, ती ही:- कोणतेही एकादे मोठे सत्कार्य निघाले तर त्याच्या सिद्धीचा पुष्कळसा अंश केवळ स्वयंसेवकावरच अवलंबून असतो. त्या कार्याचे उत्पादक, नेमिलेले अधिकारी आणि चालक ह्यांच्याकडूनच ते कार्य होण्यासारखे नसते. त्यांना हातभार लावावयास वेळोवेळी जी स्वयंसेवक मंडळी जमते ती ह्यावरील दुस-या कोटीतली विनोदी मंडळीच असते. मग हे सत्कार्य मोठे राजकार्य असो, किंवा एकादी सार्वजनिक हिताची गोष्ट असो, किंवा एकादा कौटुंबिक समारंभ असो त्याला मोठी मदत आणि शोभा येते, ती अशा विनोदी मंडळीकडूनच. ही जी मोठी मदत ह्या स्वयंसेवक मंडळीकडून होते ती इतक्या सहज रीतीने होते की, ती त्यांची त्यास देखील भासत नाही. सहज बसल्या बसल्या, बोलता बोलता जाता जाता ही मंडळी जो कार्यभाग उरकते, तो पहिल्या कोटीतल्या खोलगट माणसांच्या हातून पुष्कळ विचार करूनही होत नाही. दुस-याच्या कामी अशा रीतीने हात लावण्याच्या मार्गात ह्या खोलगट माणसांना स्वत:च्या स्वभावाचाच काय तो अडथला असतो. हा अडथळा विनोदी माणसांच्या मार्गात नसल्यामुळे त्यांच्या हातून नित्यश: लहानसहान सेवा भराभर कशी घडून येत असते हे त्यांचे त्यांना देखील समजून येत नाही.

आपण सुखी असणे, दुस-यास सुखी करणे, दुस-याच्या कामास हात लावणे आणि त्याचे मुळी श्रमही न वाटणे ह्या चार गुणांहूनही पाचवा मोठा गुण विनोदी माणसामध्ये आढळतो तो हा की, केव्हाही चालत्या गाड्यास जाणून अथवा नेणून त्याच्या हातून खीळ पडत नाही. हा गुण सर्वांत मोठा आहे. असे जामण्यापुरते ज्ञान आणि उघड म्हणण्यापुरते धैर्यही पुष्कळास नसते. जगाचे हित प्रत्यक्ष सत्कार्य करीत राहिल्यापेक्षाही कोणाच्या कसल्याही कामात अडचण आणि विरोधही न आणण्यात जास्त आहे हे थोडासा विचार केला असता कळण्यासारखे आहे, किंबहुना मनुष्यस्वभावामध्ये हा जो एकमेकांला अडथळा करण्याचा दुर्गुण जन्मत:च असतो, त्याचा प्रतिकार करण्यासाठीच आणि त्याचे दुष्परिणाम निवारण्यासाठीच जगातल्या मोठमोठ्या सुधारणांचा आणि परोपकारांचा उदय झालेला असतो. ह्या भाग्यवान विनोदी मंडळीने अशा प्रकारच्या अडथळ्यांना आपल्या वर्तनात कधीच वाव न ठेवल्यामुळे त्यांच्याकडून लोकहिताला मोठीच मदत होते असे म्हणावयास हरकत नाही. धर्म आणि कर्तव्य ह्यांविषयी आपली खोटीच समजूत करून घेऊन मनुष्ये वारंवार आपआपसांत तंटा माजवितात आणि त्यामुळे होणारे व्यक्तीचे आणि समुदायाचे नुकसान भरून काढण्यासाठी पुन: नवीन यत्न करावा लागतो, ह्या सर्वच खटाटोपाचे निवारण विनोदी माणसाच्या ह्या निर्विघ्नपणामुळे होते, ही गोष्ट एकदम कोणाच्या लक्षात भरण्याजोगी नसली, म्हणून तिचे महत्त्व कमी आहे असे नाही. एकाद्या महारोग्याला बरे केल्याबद्दल एकाद्या राजवैद्याची मोठी प्रसिद्धी होईल, एकादी दुष्ट चाल बंद केल्याबद्दल एकाद्या सुधारकाची कीर्ती पसरेल, परंतु शारीरिक आणि मानसिक रोगाला मुळी ठावच न दिल्याचे श्रेय ज्या कित्येक लहान माणसांना असते त्यांची नावे जगापुढे येण्यासारखी नसतात, तथापि ती कमी धन्य असे शहाण्यास म्हणता येणार नाही. ती जगापुढे आली नाहीत तरी देवापुढे येतातच.

नुकतेच परलोकवासी झालेले आमचे मित्र विश्वनाथपंत संत हे ह्यात दर्शविलेल्या दुस-या कोटीतील एक होते. त्यांच्यात तेथे सांगितलेले पाचही गुण ढळढळीत आणि नित्य आढळून येत असत. समाजात येणे जाणे, उपासना आणि अनुष्ठाने इत्यादी सभासदांची कर्तव्ये बजावणे, समाजाने प्रस्थापित केलेल्या मतांचा अभिमान बाळगणे आणि त्यांचा लोकांमध्ये प्रसार करणे इत्यादी गोष्टींच्या संबंधाने विश्वनाथपंतांचे वर्तन केवळ औपचारिक दृष्ट्या पाहू गेले असता मनात विशेष भरण्यासारखे होते असे मात्र म्हणता येणार नाही.