संसार आणि तत्त्वज्ञान ह्यांचा परस्पर निकट संबंध हा काही नवा नाही. तो पुरातनच आहे. पण त्याकडे द्यावे तितके लक्ष मात्र दिले गेलेले नाही. ह्या निकट संबंधाकडे पूर्ण लक्ष देऊन पाहिल्यास नवीन ज्ञानाचा उगम होतो आणि तेव्हाच तत्त्वज्ञानाला स्वतंत्र पदवीही प्राप्त होते. ज्ञात्यापासून केवळ अलग अशा बाह्य जगतातच जर विचारांचे सर्व क्षेत्र गुरफटून राहिले तर ते केवळ सामान्य कल्पनांचे एक जाळे बनून वास्तविक जीवनाशी त्यांचा काही संबंध पोचणार नाही. उलटपक्षी स्वत: ज्ञात्यामध्येच सर्व विचारक्षेत्रात अधिक विविधता आणि विचित्रताही प्राप्त होईल. पण अमूक एक सत्य एकाद्या व्यक्तीपुरतेच आहे आणि अमूक सत्य एकाद्या व्यक्तीपुरतेच आहे आणि अमूक सत्य सर्व जातीला लागू आहे, ह्याचा निर्णय करणे जड जाईल, इतकेच नव्हे, पण सर्व जातीलाही घडून आलेला एकादा विविक्षित अनुभव समुच्चय घेतला तरी त्यातील कोणता भाग केवळ भासमय आहे आणि कोणता खरोखर ध्येयमय आहे, ह्याचा निर्णय करण्याला काही प्रमाण उरत नाही. येणेप्रमाणे एकपक्षी बाह्य जगासंबंधाची केवळ सर्वसाधारण मोघम कल्पना किंवा इतरपक्षी व्यक्तीचे विशिष्ट अनुभव ह्या दोनही भूमिका एकदेशीयच असल्यामुळे त्यामुळे कोणत्याही एकाच बाजूने ज्ञानाचा ओघ वाहू लागल्यास आध्यात्मिक संस्कृती पूर्णपणे बनून येणार नाही. पण आम्ही चालविलेल्या जिज्ञासेचा मुख्य रोख तर हीच संस्कृती आहे. आमची पद्धती केवळ मानसिक नाही किंवा नुसती भौतिकही नाही, ती वास्तविक आहे. म्हणजे मानवी जगामध्ये उल्हसित होणा-या आध्यात्मिक जीवनासंबंधी सर्व गोष्टींचा उलगडा आणि एकवाक्यता करणे हा आमच्या जिज्ञासेचा मध्यबिंदू आहे.
तत्त्वज्ञानासंबंधी वर सांगितल्या प्रकारच्या भावनेमुळे त्याचा व्यक्तीविषयक जीवन आणि तसाच अखिल इतिहासाचे उद्दिष्ट कार्य ह्यांच्याशीही निकट संबंध येतो आणि ह्या निकट संबंधाची एकदा खूण पटली म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये विविधता व पक्षभेद हीच का वारंवार आढळतात आणि वरवर पाहणा-यांना तत्त्वज्ञानामध्ये सुसंगती कशी बहुतकरून विरळाच दिसून येते, ह्याही गोष्टींचा उलगडा होतो. स्वयंभू आध्यात्मिक जीवनाच्या साक्षात्काराचे साम्राज्य जोपर्यंत अढळ राहते तोपर्यंत सर्व सत्यामध्ये ऐक्यच नांदत आहे, अशा भावनेला आणि तद्वत नवीन संशोधनाच्या धैर्याला बाधा म्हणून कधीच येणार नाही. येणेप्रमाणे आध्यात्मिक जीवनावरच विचाराची मदार रचल्यामुळे जो एक लाभ घडतो तो हा की, विचारांची काही प्रमुख अशी पृथक दर्शने आपल्यापुढे दिसू लागतात, नाहीतर एरव्ही जे आपल्या भोवती विचारांचे दुर्गम जाळे पसरते त्याला ना अंत ना पार असे होऊन जाते. ह्या दृष्टीने पाहता आमच्यापुढे खालील पाच मुख्य दर्शने दिसत आहेत:-
(१) प्रथमारंभीच असा प्रश्न उद्भवतो की, अखिल जीवनाची (संसाराची) एकवाक्यता संस्थापणेच मुळी शक्य असेल काय? सत्याच्या समष्टीस्वरूपासंबंधाने कोणते तरी अंतिम विधान करणे शक्य होईल काय? जो कोणी ह्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन परस्परविरोधी असे जे त्याचे चालू घडीचे अनुभव असतील त्यांनाच केवळ वश होऊन राहतो त्याला उदासी असे म्हणता येईल.
(२) समजा, वरील प्रश्नाला दुस-या एकाद्याने होकारार्थी उत्तर दिले, तर त्यापुढे पुन्हा असा प्रश्न उद्भवतो की ह्या संसार क्षेत्रामध्ये निसर्गाचे जे तत्त्व आढळून येते, त्याच्याशी प्रसंगानुसारे विरोध किंवा सहकार्य करणारे आध्यात्मिक असे दुसरे एकादे तत्त्व नांदत आहे? ह्या दुस-या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन जो कोणी केवळ निसर्गाचाच उपासक बनतो, त्याला जडवादी किंवा अनात्मवादी असे समजण्याचा प्रघात आहे.
(३) जो कोणी आत्मतत्त्वाचे प्रतिपादन करतो त्यास अध्यात्मवादी असे म्हणता येईल, परंतु अध्यात्मवाद नुसते हो म्हणून स्वस्थ बसता येण्याइतका सुलभ नाही. आत्म्याचे दर्शन झाल्याबरोबर त्याचे स्वामित्वही मानल्याशिवाय सुटकाच नाही, असे होते (आत्म्याला नुसते शब्दाने मानून त्याचे स्वामित्वाला वश न होणे अशा स्थितीला मुळी दर्शनच म्हणता येणार नाही) परंतु ह्यावर अशी शंका उद्भवते की, ह्या स्वामित्वाचे प्रतिपादन सोप्या आणि शांत रीतीने करता येणे शक्य आहे की तेथे मोठा विरोध जुंपतो? (ह्या विरोधाच्या दृष्टीने पाहता वरील आत्मवाद्याच्या पुन्हा तीन भिन्न जाती आहेत असे आढळून येते) ज्या कोणाला हा विरोध मुळी नाहीच किंवा असलाच तरी तो निवारता येईल असे वाटते त्याला केवळ ध्यानशील आनंदवादी असे म्हणता येईल. इतर आत्मवाद्यांना हा आनंदवाद पोकळ वाटू लागतो.
(४) उलटपक्षी हा विरोध अगदी जबर भासू लागला असता इतर आत्मवाद्यांचे दोन विभाग होतात. (स्वयंभू आध्यात्मिक जीवन अथवा परमात्मा आणि जिज्ञासू अथवा जीवात्मा ह्यांच्यामध्ये जुंपलेल्या वर वर्णिलेल्या प्रकारच्या विरोधाचा एकदाचा निरास होऊन स्वामित्वाचा उलगडा जोवर होत नाही तोवर एक प्रकारची आध्यात्मिक अवरोधाची अवस्था प्राप्त होते). ह्या घोर अवरोधाला जो बळी पडला व जो कोणी भ्रांत होतो किंवा हताश होते त्याला संशयवादी किंवा नैराश्यवादी अशी अनुक्रमे (पारिभाषिक) नावे आहेत.
(५) परंतु त्यातल्या त्यात उत्साह धरून जो कोणी अंत:प्रयत्नाच्या जोरावर जीवनक्रम पुन्हा आरंभितो त्याच्या त्या दर्शनास प्रयत्नवाद असे म्हणता येईल. ह्या शेवटच्या दर्शनाची विशेष मीमांसा आम्ही मागील एका भागात करून चुकलो आहो. उदासी, जडवादी, आनंदवादी, संशयवादी, आणि प्रयत्नवादी ह्यांच्यामध्ये परस्पर कसा विरोध आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. तथापि एवढे मात्र येथे निवेदन करणे अवश्य आहे की ह्या सर्व दर्शनांना तत्त्वज्ञानाच्या अगाध क्षेत्रामध्ये अवकाश मिळाला असता त्याचे सार्थक्य होण्यासाठी तत्त्वरज्ञानाचा जीवनाशी निकट संबंध राहावयाला पाहिजे आणि त्याचा पाया स्वयंभू आध्यात्मिक जीवनामध्ये खोल रोविला असलेला पाहिजे.