नीती-१

 

धर्माविषयातील वाद आणि गोंधळ ह्यांमुळे अगदी बेजारून पुष्कळ जिज्ञासू, नीतीचा प्रांत कमी वादग्रस्त आणि जास्त सुगम असेल अशा समजुतीने तिकडे वळतात. नीतीची अगदी मूलततत्त्वांचीही किंमत न ओळखणारे असे कोणी असलेच तरी फारच कमी निघतील. विश्वासघातापेक्षा प्रामाणिकपणा बरा. द्वेषापेक्षा प्रेम श्रेष्ठ ह्याविषयी मुळीच वाद नाही. पण हे मूलतत्त्वासंबंधी मतैक्य पुढे कोठपर्यंत टिकते व ख-या जिज्ञासूच्या मार्गात त्याला ह्या तात्त्विक समेटीचा कितपत फायदा मिळण्यासारखा आहे, ह्याविषयी जबर शंकाच आहे. अगदी सारख्याच आध्यात्मिक प्रगतीच्या दोन जरी भिन्न व्यक्ती घेतल्या तरी त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिविषयक व्यवहारात नैतिक मेळ बसविणे फार दुर्घट होते. केवळ नीतीलाच मानणारे जे काही थोडे अलीकडे नवीन समाज निघाले आहेत त्यांनी नीतीसंबंधी सामान्य सिद्धांत बसविण्याच्या भानगडीत न पडता नुसती व्यावहारिक नीती एवढेच काय ते आपल्या कर्तव्याचे क्षेत्र केले तर त्यांना कोणाचा विरोध फारसा येणार नाही. पण आम्ही जेव्हा व्यक्तिविषयक आचरणाच्या गोष्टीचे आलोचन समष्टीरूपाने करू लागतो आणि त्यांचा दृढ असा काही पाया असेल तो शोधू लागतो तेव्हा आमच्यापुढे एकामागून एक मोठे गूढ प्रश्न येऊन उभे राहतात आणि मग लवकरच असे उघड दिसून येते की, अखिल जीविताचे समष्टीरूप आणि अंतिम सत्याशी त्याचा तात्त्विक संबंध ह्यांविषयी आमच्या भावना दृढ झाल्याविना नीतीतत्त्वांना पायाच नव्हे तर त्यांची नुसती विशद कल्पनाही स्थिर राहू शकत नाही. जीविताचे समष्टीरूप आणि केवळ सत्याशी त्याचा संबंध ह्याविषयीच जर हल्लीचे काळी इतका धरसोडपणा आहे तर त्याचा परिणाम खास असाच होणार की, नीतिविषयी आमचे तात्त्विक विचार हल्लीप्रमाणे साशंक आणि अस्पष्टच राहावयाचे. खरा प्रकार पुढे वर्णिल्याप्रमाणे आहे:-

जिचा पाया अढळ आहे व स्वरूप निश्चित आहे अशा नीतीची आम्हामध्ये उणीवच आहे. स्वत: नीती म्हणजे काय हे शोधू गेल्यास संचित आणि क्रियमाण ह्यांचे ती एक अतिशय गुंतागुंतीचे जाळेच आहे असे दिसेल. त्यादृष्टीने पाहता आमच्यामध्ये जो साधनसंपत्तीचा अभाव व्यक्त होतो, तो लपविण्याकरिता बाहेरून केवळ बहुश्रुतपणा आणि पांडित्य ह्यांचा आम्ही आव घालतो. तो इतका की अंतरी अगदी लाजिरवाणे दारिद्र्य वसत असूनही बाहेरून आम्ही श्रीमंती मिरवीत असतो.

नीतीचे भिन्न भिन्न पाच प्रकार पुढे सांगितले आहेत. त्यांपैकी प्रत्येक आमच्या आत्म्याचा मार्गदर्शक होऊ पहात आहे. ह्या प्रत्येकामध्ये अंशत: काही सत्य आहे, पण कोणताही एकच प्रकार आमच्या आत्म्याचे शासन चालविण्यास सर्वस्वी पात्र ठरत नाही. प्रत्येकाची धाव विशिष्ट ठिकाणीपर्यंत पोहोचते आणि मग तेथे त्यांची हद्द संपली असे आम्हांस कळून चुकते. (१) पहिला प्रकार धार्मिक नीतीचा होय. त्यामध्ये आमचा संकल्प (प्रयत्नशक्ती) आणि आमची भावी प्रगती ह्या दोन्ही दैवी शक्तीवरच अवलंबून ठेवण्यात येतात. ह्यामुळे मनुष्याच्या आध्यात्मिक स्वातंत्र्याला मोठा धोका पोचतो आणि मनुष्य केवळ सहनशीलच होऊन राहण्याचा संभव असतो. इतकेच नव्हे तर त्या त्या प्रमाणाने त्या दीन धर्मावर अवलंबून राहणा-या नीतीची शक्ती आणि संसारनियामकता ह्याही क्षीण होऊ लागतात.

(२) दुसरा प्रकार संस्कृतीच्या नीतीचा होय. ह्याचा सर्व रोख मानवी प्रगतीची वाढ करण्याकडे असतो. ह्यामुळे आंतरिक आवडनावड ह्याना गौणत्व आणि बाह्य समारंभ व बाह्यसृष्टी ह्यानाच फाजील प्राधान्य मिळू लागते. बाह्य संकल्पाच्या अविश्रांत वाढत जाणा-या विस्तारामुळे अंतरात्म्याच्या एकंदरीत कल्याणाला ह्या नीतीमुळेही धोकाच पोचण्याचा संभव आहे. मनुष्य म्हणजे केवळ एक यंत्र आणि अनात्मिक अशा बाह्य संस्कृतीच्या विस्ताराचे एक साधन होऊन बसण्याचा मोठा धोका आहे. (३) तिसरा प्रकार सामाजिक नीतीचा होय. सामाजिक हित हेच काय ते ह्याचे मुख्य ध्येय सामाजिक ऐक्याविषयीच्या भावना बळावत जाऊन मानवी प्रयत्नाचे मान. पुष्कळ विपुल होते हे खरे पण एकंदर जीवित समष्टीची प्रमाणबद्धता कायम रहात नाही (व्यक्तीच्या विकासात मोठा व्यत्यय येतो). शिवाय ह्या प्रकारामुले जीविताच्या वरपांगी सुधारणांचे जास्त स्तोम माजविले जाऊन जीविताच्या रहस्याची अधोगती आणि अवनतीच होते. (४) काही जाड्या तत्त्ववेत्त्यांनी शुद्धबुद्धीची नीती म्हणून चौथा प्रकार सांगितला आहे. ह्या प्रकारामुळे केवळ अपयुक्तता आणि रमणीयता ह्यांचे जे ग्राम्य प्रांत असतील त्यातून मनुष्याचा उद्धार होऊन त्याला काही अंशी आंतरिक स्वातंत्र्यही मिळण्याचा संभव आहे, पण ह्या प्रकाराचे महत्त्व कसेही असो ते केवळ विचारजन्य आणि विशिष्टत्वहीन आहे ही गोष्ट एकपक्षी स्वत:सिद्ध आहे व इतरपक्षी अदृश्य आणि केवळ भावनामय जगाची ठाम निश्चिती प्रस्तुत काळी तर अद्यापि झालेली नाही म्हणून ह्या प्रकारच्या नीतीला सुरक्षित पायाच मिळणे तूर्त तरी सुलभ नाही. (५) शेवटचा प्रकार व्यक्तिविषयक नीतीचा होय. हा काही विशिष्ट रमणीय आत्म्याच्या अनुभवामध्येच आढळून येतो. अशा आत्म्याचे आचरणाचे ध्येय म्हणजे आपल्या स्वत:च्या विशिष्ट स्वभावाचा पूर्ण विकास करून घेणे व आपल्या अंत:करणामध्ये ज्या काही मूळ शक्ती असतील त्यांची सुव्यवस्थित आणि निर्धास्तपणे वाढ करणे हेच असते. परंतु अशा धन्य व्यक्ती सामान्यत: आमच्या आढळात येतात त्याहून फारच मोठ्या दर्जाच्या व विशिष्टशील संपत्तिशाली असावयास पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्या तशा असल्या तरी इतरांनी त्यांचेच अनुकरण करावे असा त्यांचा अधिकार असेल असे सांगवत नाही. कदाचित ह्या प्रकाराचेच पूर्णपणे अवलंबन करू गेल्यास तो एक शुद्ध आत्मरतीचा किंबहुना पोकळ आत्मप्रतिभासाचाच प्रकार होईल.

प्रस्तुत काळी आमच्यामध्ये वर वर्णिलेल्या नीतीचे भिन्न भिन्न रोख आणि हेतू जे रूढ झालेले आहेत त्यांचा परिणाम काय झाला आहे हे पाहू गेले असता दिसून येईल की नीतीसंबंधाच्या आमच्या कल्पनांना एकप्रकारे क्षोभ आणि ऊत मात्र आला आहे एवढेच. त्यामुळे आम्हांला नीतिशास्त्राचे ठाम सिद्धांत मिळाले अशातला प्रकार नाही. प्रयत्नाची पुष्कळ द्वारे खुली झाली म्हणून एकाद्या सर्वसामान्य कर्तव्याचा साक्षात्कार झाला असे होत नाही. मात्र ह्या यत्नबाहुल्यामुळे व्यक्तीव्यक्तींमध्ये, पक्षपक्षांमध्ये, जीवनाच्या शाखाशाखांमध्ये हल्ली दुही वाढत आहे एवढाच काय तो ह्याचा परिणाम. त्यामुळे वर सांगितलेली दुही अंशत: तरी कमी होत जाऊन शेवटी केवळ मनुष्यजीवितापलीकडेही आमचे जे काही ध्येय असण्याचा संभव आहे त्या दृश्यातील ध्येयाला अनुसरून आपले प्रयत्नारंभ चालवावे अशी आमच्यामध्ये भावना उत्पन्न होईल असा काही अंदाज दिसत नाही. तर मग आम्हांला अशा काही एका नवीनच नीतीची जरूरी आहे की जी आमच्या अंतर्जीवनामधून उदयास येईल. आणि ही जरूरी आम्हांला भासते त्याहूनही वस्तुत: पुष्कळच अधिक आहे. कारण हल्ली ज्याच्या कसाला आम्ही आपले व्यक्तिविषयक सर्व प्रयत्न आणि संकल्प लावून पाहू असे कोणतेही एकादे सर्वसाधारण आणि सर्वमान्य असे धोरण ठाम ठरतच नाही. त्यामुळे जीवनामध्ये अनेक प्रकारची द्वैते माजत चालली आहेत. आणि जगताशी आमचा आध्यात्मिक संबंध अगदी तुटत चालला आहे. जगत म्हणजे आमच्या सभोवती एक तमोमय आणि अभेद्य असा नियतीचा पडदाच जणू पसरला आहे. ह्या संकल्पसमारंभातच आम्ही गुंतून गेल्यामुळे ह्या नियतीवर आमची काहीच सत्ता चालेनाशी झाली आहे. ती सत्ता पुन्हा संपादन करावयाची झाल्यास “ऊँ ओम् तत् सत्” ह्या वाक्याची आणि साक्षात्काराची पुनर्घटनाच करावयाला पाहिजे आणि तीही आमच्या स्वत:च्या कर्तृत्वशक्तीच्या जोरावरच केली पाहिजे. अनिश्चय आणि अविद्या ह्यांच्याशी आम्हांला दारूण युद्ध जुंपले पाहिजे, ह्या युद्धामुळे आमच्या सर्व संसाराचे शुभ आणि अशुभ, मित्र आणि वैरी असे भेद पडत जातील हे खरे, पण त्यामुळेच आमच्या जीविताला पूर्णपणे एक नवीन चेतना तरी प्राप्त होईल आणि संसार हे त्याचे नाव समर्थ होऊन विशाल आणि विश्वंभर अशा स्वरूपाला ते जाऊन पोहचेल. मानवी आत्मा म्हमजे कोणी केवळ साक्षीदार नसून ह्या विश्वरचनेच्या महत्कार्यामध्ये तो प्रत्यक्ष साहाय्यकारी आहे हे सत्य अनुभवास यावयाचे असल्यास त्याला मार्ग म्हमजे वर निर्दिष्ट केलेला युद्धारंभच होय. मानवी स्वभावाचे जे नैतिक (सात्विक संकल्पमय) स्वरूप आहे त्यावर ज्या ज्या म्हणून गोष्टींचे झाकण पडेल त्या सर्वाला एकच अविद्या हे नाव देता येईल. ह्या अविद्येमुळे मनुष्य केवळ नियतीचा दास बनून, घोर अचेतन कवचामध्ये कोंडलेल्या चैतन्याप्रमाणे लघुता आणि हीनता पावतो. काही विशिष्ट पक्षाचे आणि मताचे लोक ह्या दास्यस्थितीतच सुख मानून राहू शकतील, पण अखिल मनुष्यजात अशा कोंडमा-यात कायमची राहणे शक्य नाही. आपल्या जीविताचा काही गूढ अर्थ आहे व त्याला काही अंतिम मोलही आहे, अशी जी मनुष्यजातीची श्रद्धा आहे ती जर खरी असेल तर नीतीमीमांसेवर आजपर्यंत ज्या अनेक ब-यावाईट कोटिक्रमांचे कवच वाढले आहे ते सर्व फोडून टाकून नीतीच्या नवीन शोधाला पुन्हा एकवार लागल्याशिवाय मनुष्यप्राणी कधी राहावयाचा नाही.