ब्रिटिश म्युझिअम

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. ७-२-१९०२

‘कालो ह्ययं निरवधिविपुला च पृथ्वी’

ह्या विपुल पृथ्वीवर निरवधी कालातून ज्या अनेक सुधारणांचा आजवर अवतार झाला आणि समाप्ती झाली, त्या सर्वावर शिरोमणी होऊन बसलेली जी आधुनिक सुधारणा तिच्या साम्राज्याखाली आम्ही आहो. जगाच्या इतिहासात ज्यांनी हजारो वर्षे आपले प्रताप गाजविले, अशा गत सुधारणांपैकी काहींचे हल्ली फार थोडे अवशेष राहिले आहेत. काही नुसत्या नामशेष झाल्या आहेत, आणि काहींचा तर विस्मृतीच्या  अभेद्य अंधार-पटलातून अद्यापि पत्ता लागला नाही. मागील सुधारणा जगाच्या रंगभूमीवरील एकेका कोप-यात आपापले प्रकाश पाडून अस्तास गेल्या, पण हल्लीचा सुधारणा-सहस्त्ररश्मी सर्व भूगोलावर आपला प्रकाश पाडून वरती तारामंडलात चंद्र, मंगळ इत्यादी खगोलांकडे आपली किरणे सोडीत आहे. तथापि आमचे डोळे दिपून जाऊ नयेत. स्वकालीन सुधारणेविषयी पक्षपात घडून अंगी स्वयंमन्यता शिरू न दिली पाहिजे. कालचक्राच्या वाढत्या कलेकडे नजर दिली असता, शास्त्र, कला, वाड्मय इ. बाबतीत मागच्यात न सापडणारा असा एकादा जाज्वल्य विशेष गुण आधुनिकेत आहे, असे जरी म्हणता येत नाही, तरी एक भेद फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. मागील सुधारणांचा प्रदेश आकुंचित होता, इतकेच नव्हे, तर त्यास परस्परांची खबरच नव्हती. ऐतिहासिक-प्रवृत्ती आणि तुलनात्मक शास्त्रीय पद्धती हे दोन गुण हल्लीप्रमाणे व हल्लीच्या प्रमाणाने मागे नव्हते, असे म्हटल्यास आत्मस्तुतीच्या विशेष दोष घडेल असे वाटत नाही. ह्या प्रभेदाचे मूर्तिमंत स्वरूप पहावयाचे झाल्यास वर निर्दीष्ट केलेले ब्रिटिश म्युझिअम हे अत्यंत उत्तम स्थान आहे. तर ते आपण पाहू या.

लंडन शहराचे मध्यभागी ब्लूमसबरीमध्ये ब्रिटिश म्युझिअमची विशाल इमारत आहे. इमारत अत्यंत सुंदर व त्याहूनही अफाट आहे खरी, पण तिच्याकड पहाण्यास व तिचे मोजमाप घेण्यास आपणास सध्या वेळ नाही, तर आपण थेट मध्य दालनात जाऊ या. अगणित पैसा अगदी पाण्याप्रमाणे ओतून ह्या लोकांनी जे हे विचित्र आणि विविध विषयांचे अदृष्टपूर्व संग्रहालय करून ठेविले आहे, ह्याचा हेतू केवळ चार रिकामटेकड्यांनी येथे सहज वाट चुकून येऊन आपल्या आळसावलेल्या मनाची चार घटका करमणूक करून घ्यावी एवढाच असेल अशी कल्पनादेखील मनात आणू नका.

उलट ते पहा, मोठे मोठे प्राचीन इतिहासशास्त्री, शोधक, लेखक, पंडित एकेका कोप-यातून एकाद्या पदार्थाकडे किती खोल दृष्टीने टक लावून पहात आहेत! तर आपण त्यास कसलाही त्रास पोहोचू नये म्हणून पाऊल न वाजविता हळूच आत शिरू या. चित्त वेधून जाऊन अंत:करण तल्लीन होणे ही खरोखर ज्ञानप्राप्तीच्या वेळेची स्वाभाविक अवस्था होय. अगदी लहान मुले अशीच बिनश्रमाने पण मोठ्या कौतुकाने मानवी ज्ञानाचा मोठ्या महत्त्वाचा भाग केवळ पूर्ववयातच शिकतात. तशातलाच काहीसा (प्रकृतीच्या मानाने अर्थात कमी-जास्ती) प्रकार आपलाही येथे होईल, करमणूक तर होईलच होईल. पण नकळत ज्ञानप्राप्ती काय झाली, ते आपल्यास बाहेर पडल्यावर कळेल.

आता आपण मध्य दालनात उभे आहो. सभोवती प्रागैतिहासिक कालाचा देखावा पसरला आहे. ह्या कालाचे मुख्यत: चार भाग होतात.

(Palaeolithic Age) “पूर्वपाषाणयुग”- ह्या पहा आमच्या पूर्वजांच्या सापडलेल्या काही अत्यंत जुन्या वस्तू. आमचे बंधू जे इतर प्राणी त्यांच्यापासून आमचे पूर्वज येथे नुकतेच विभक्त झाले आहेत. संसारयात्रेत अगर जीवनकलहात त्यांनी आपल्या शरीराबाहेरची प्रथम जी उपकरणे उपयोगात आणिली ती हत्यारे ही होत. अर्थात ती दगडाचीच असावयाची. ही नदीच्या प्रवाहातून व गुहांतून सापडली आहेत. कारण आम्ही त्यावेळी गुहांतूनच राहत होतो. ही हत्यारे किती वेडीवाकडी ओबडधोबड आहेत! त्यातच पहा काही लहान मोठी हाडे मिसळून ठेविली आहेत. ती हल्ली लुप्तप्राय झालेल्या त्यावेळच्या पाणघोड्यांची व सांबरांची असावीत. हे लोक इंग्लंडात व वेल्समध्ये कोणकोणत्या प्रदेशात रहात होते, हे दाखविण्यासाठी तो पहा भिंतीवर त्यावेळचा इंग्लंडचा नकाशा टांगला आहे. आम्ही त्यावेळी भांडी वापरीत होतो की नाही, ते सांगता येत नाही. तसेच आमच्या हत्यारांस मुठीही नाहीत. थोडेसे पुढे चला, तुम्हांला मुठी दिसतील. शेवटी येथे पहा किती सुंदर हस्तीदंती व शिंगटांच्या मुठीत ही कट्यारे बसविली आहेत. ह्या मुठीवरून त्या त्या प्राण्यांची किती हुबेहूब चित्रे उठविली आहेत. ही ह्या युगातली नव्हेत बरे! ही पहा ह्या मोठ्या तावदानाच्या पेटीत आमच्या राहत्या गुहेची तळजमीन, जशीच्या तशीच आणून ठेविली आहे. ही फ्रान्सात सापडली.

(Neolithic Age) “उत्तर-पाषाणयुग”-येथील हत्यारे चांगली घासलेली पुसलेली पाणीदार आहेत. ज्या प्राण्यांची हाडे येथे दिसतात, त्यांपैकी काही अद्यापि सापडतात. येथे पहा काही हत्यारे करण्याचे कारखाने सापडले आहेत. कारण येथे अर्धवट बनविलेली पुष्कळ हत्यारे व हत्यारे बनविण्याची काही यंत्रे व सामान सापडले आहे. तशीच येथे थडग्यांत सापडलेली काही भांडी आहेत. बहुतकरून आत मृतांची राख असावी.

(Bronze Age) “काशाचे युग”- इतक्या प्राचीन काळी लोखंडाच्याही पूर्वी ही मिश्र धातू कशी आढळते, हा एक चमत्कारच आहे. येथे भांड्यांत व हत्यारांत पुष्कळ सुधारणा झाली आहे. त्यांचे कट्यारे, कोयते, सु-या, बर्च्या, तरवारी इ. अनेक प्रकार आढळतात. तसेच हे पहा सोन्याचे दागिने. पण रूपे मात्र अद्यापि नाही सापडले. ती पहा भिंतीवर टांगलेली काशाची सुरेख ढाल. तशाच येते काशाची हत्यारे बनविण्याच्या कितीतरी मुशी जमा करून ठेविल्या आहेत! इकडे पहा स्विट्झरलंड व सव्हाय ह्या देशांतील सरोवरांच्या मध्यभागी पाण्यात डांब रोवून त्यावेळी बांधलेल्या घरांचे काही अवशेष ठेविले आहेत. ही चटकन् पाहिजे तेव्हा मासे धरता यावेत म्हणून केलेली योजना बरे! ह्यावरून युरोपातील पूर्वीच्या लोकांची रहाटी कशी होती ते कळते. ह्या घरांचे अवशेष आतापर्यंत जसेच्या तसेच कसे राहिले, ह्याबद्दलचा चमत्कार ध्यानात ठेवण्यासारखा आहे, तो हा-ही घरे आगीने जळून ह्यातील धातूचे व दगडाचे सामान पाण्यात बुडून व चिखलात रूतून शोधकांस सुरक्षित सापडले आहे. प्रथम आगीची क्रिया घडून वर चिखलाचे दाट दडपण पडल्यावर मग त्यास वज्रलेपच झाला म्हणावयाचा!

(Early Iron Age) “लोखंडी युग”—ह्यात  आपल्यास माहीत असलेले बरेच पदार्थ आहेत. शिवाय आपण इतिहासाच्या अगदी जवळ येऊन भिडलो तर दुसरीकडे जाऊ या. हे पहा आंदमान आणि निकोबार बेटांतील रानटी माणसांचे हाडाचे दागिने व हार. ही हाडे यांच्या आप्तांची आहेत. ही वापरल्याने कित्येक आजार बरे होतात, अशी ह्यांची कल्पना आहे. येते भयंकर मुखवटे ठेविले आहेत. रोग्यास बरे करण्याकरिता सिलोनातील पंचाक्षरी हे मुखवटे आपल्या डोक्यावर घालून नाचत असत. रामबाण उपाय! दुस-या बाजूस ऑस्ट्रेलिया व आसपासच्या बेटांतील काही विक्षिप्त मुखवटे ठेविले आहेत. हे घातले असता त्यावेळी पारधीत हटकून यश येत असे! इकडे हे वैझान बेटातील देवाच्या मूर्ती, झगे व अक्राळ विक्राळ पिसांचे मुकुट ठेविले आहेत, ते पहावतदेखील नाहीत! तसेच मिशनरींनी दक्षिण पॅसिफिक महासागरातील दूरदूरच्या बेटांतून आणिलेल्या अनेक मूर्तींचा व चमत्कारिक पदार्थांचा बहुमोल संग्रह करून ठेविला आहे.

आता अमेरिकन दालनात चला, उत्तर अमेरिकेत वर अगदी थेट सरोवरापर्यंत अगदी प्राचीन काळीदेखील भांडी होती असे दिसते. दगडांची हत्यारे व भांडी यांचे प्राचीन युरोपच्या मासल्याशी किती साम्य आहे पहा! येथील प्राचीनांना तांब्याशिवाय दुसरी धातू माहीत नव्हती. त्याची घडीव भांडी थडग्यांतून व जुन्या इमारतीच्या पायाखाली सापडली आहेत. ही पहा शिंपांची नाणी, गारेच्या बर्च्या, बाणांची टोके-आणि विसरू नका-तंबाकूच्या चिलमी तावदानात सुरेख मांडून ठेविल्या आहेत. पण ह्या नव्या जगाचा जुन्या जगाशी पूर्वी कधीकाळी कसला तरी संबंध होता की नाही हे कोडे अद्यापि उकलले नाही.

इतका वेळ पाहिलेल्या गोष्टींवरून प्रागैतिहासिक सुधारणांची थोडी तरी कल्पना तुमचे मनात आली असेल. आता आपण ऐतिहासिक कालाकडे वळू या. ह्या ठिकाणी मिसर, आसिरिया, बाबिलोनिया, ग्रीक, रोमन इत्यादी गतराष्ट्रांच्या सुधारणांचे अवशेष राखून ठेविले आहेत. ही ह्या सुधारणांची जणू प्रेतेच आहेत! काहींचे बरेच भाग शाबूत आहेत. काही काळरूपी गिधाडाने अगदी छिन्नविच्छन्न करून टाकिली आहेत. ही पहा इजिप्शिअन ग्यालरी. आपण वेदांस अती प्राचीन मानितो, किंबहुना जगाच्या सुधारणेस येथूनच आरंभ झाला असे म्हणतो. इतकेच नव्हे तर वेद अनादि आहेत असे मानण्यापर्यंतही आमची मजल जाते. पण ह्या बाबतीत ज्यांनी परिश्रम केले आहेत ते वेदांस ख्रिस्ती शकापूर्वी १५०० वर्षांपेक्षा अधिक मागे नेत नाहीत. त्यांचे म्हणणे खरे असेल तर आम्हांपासून वेदांचा उदय जितका दूर आहे, तितकाच जवळजवळ इजिप्शिअन सुधारणेचा उदय वेदापासून मागे दूर आहे असे म्हणावे लागते. कारण ख्रिस्तीशकापूर्वी ४५०० वर्षांच्याही मागचे इजिप्शिअन लेख आणि राखून ठेविलेली प्रेते आढळतात. इजिप्तच्या प्राचीन इतिहासात जे राज झाले त्यांची एकंदर तीस घराणी आहेत. ह्यांनी इ. स. पूर्वी ४४००-३४० पर्यंत राज्य केल्याचे लेख आढळतात. प्राचीन शाही (इ. स. पूर्वी ४४००-२४६५), मधली शाही (इ. स. पूर्वी २४६५-१२००), नवी शाही (इ. स. पूर्वी १२००-३४०) असे ह्याचे भाग पडतात. पहिल्या तीन घराण्यांतील राज्यांची नुसत्या नावापलीकडे काही माहिती मिळत नाही. चौथ्या घराण्याने आपल्या वैभवाची कायमची स्मारके करून ठेविली आहेत. दुसरा राजा खुफू (इ.स. पूर्वी ३७३३-३७००) याने गीझे येथील (Great Pyramid) मोठा मनोरा बांधिला. त्याचे काही दगड उत्तरेकडील खोलीत ठेविले आहेत. पहिल्या खोलीत कालानुक्रमाने ममी व ममीच्या पेट्या मांडून ठेविल्या आहेत. ममी म्हणजे इजिप्शिअन लोकांनी पुरातन काळी अनेक प्रकारचे मसाले तयार करून त्यात सुरक्षित स्थळी राखून ठेविलेली प्रेते होत. ह्या लोकांमध्ये ही चाल इ. स. पूर्वी ४५०० (कदाचित ह्यापेक्षाही पूर्वी) वर्षापासून इ. स. नंतर ५०० वर्षांपर्यंत होती. निजलेल्या मनुष्याचा आत्मा जसा पुन: परत येतो तसा मृत शरीरातही आत्मा परत येणार आहे अशी ह्य लोकांची समजूत होती. म्हणून इतके श्रम करून व अक्कल खर्चुन ते आपल्या नातलगांची प्रेते जपून ठेवणे हे आपले कर्तव्य मानीत ममी करण्याच्या निरनिराळ्या त-हा होत्या. प्रेताची आतडी बाहेर काढून एका घटामध्ये घालून त्याच्या शेजारी ठेवीत, आणि प्रेतास प्रथम अनेक प्रकारच्या क्षारांचे आणि अत्तरांचे लेप देऊन वर सुरेख तागाच्या पट्ट्यांनी त्यास लपेटीत. कधी-कधी ४०० यार्ड लांब पट्ट्या लागत असत! गुंडाळताना प्रेतास सपशेल उताणे निजवीत. ममी तयार झाल्यावर त्यास त्याच्याच आकाराच्या लाकडी अगर दगडी पेटीत घालून ती बंद करीत, वरती रंग देऊन प्रेताचे चित्र काढीत, व लेख खोदीत. ब-याच पेट्यांवरचा रंग व चित्रे अद्यापि जशीया तशीच आहेत. पिवळा रंग हा ह्यांचा मोठा आवडीचा दिसतो.

इजिप्शिअन लोकांची अत्यंत पुरातन थडगी म्हणजे मास्टाबा अथवा पिरामिड (मनोरे) हे होत. खाली प्रथम देवळाच्या आकाराची एक खोली करून तिच्या एका भागात मयताची मूर्ती बसवीत. तिच्याच खाली जमिनीत तळघर करून त्यात त्याची ममी ठेवीत. कित्येक ठिकाणी खडकातून अशी पुष्कळ घरे खोदून त्यात एका कुटुंबातील अगर घराण्यातील सर्व ममींची योजना केली जात असे. ह्या घरांच्या भिंतीवरून मयताच्या करमणीसाठी त्याच्या चरित्रातील घरगुती आणि सामाजिक प्रसंगांची सुंदर चित्रे काढीत. उत्तरेकडील दालनात ह्या भिंतीवरचे पदर चित्रासकट जसेच्या तसेच काढून लाविले आहेत ते पहा, म्हणजे ५-६ हजार वर्षापूर्वीची इजिप्शिअन राहाटी तुम्हांला कळेल. त्याच भिंतीवर ‘एबिडॉस’ची फळी लाविली आहे. तिच्यावर इ. स. पूर्वी ४४००-१३३३ पर्यंतच्या सर्व राजांची नावे कोरली आहेत. हा एक फार महत्त्वाचा ऐतिहासिक देखावा आहे. तसेच मयतासाठी त्याच्याजवळ मद्य, खाद्य व अंगाला लावण्यास उटी वगैरे जरूरीचे पदार्थ निरनिराळ्या पात्रांत भरून ठेविलेले असत. नंबर ४ च्या खोलीत कित्येक सुंदर खुजे, पेले, वाडगे ठेविले आहेत. कित्येकांवर त्यांच्या मालकांची अगर तत्कालीन राजांची नावे आहेत. ह्यांपैकी जेव्हा काही पात्र सापडली तेव्हा अद्यापि त्यांतील पदार्थ द्रवस्थितीत सापडला! ह्याशिवाय मयतांच्या आवडीची वाद्ये व इतर जिनसा आणि त्याच्या नातलगांच्या व मित्रांच्या देणग्याही सर्व ते आपल्या जवळच ठेवती. मेन-काऊ-रा नावाच्या न्यायी आणि द्याळू राजाच्या ममीवर पुढील शब्द लिहिले आहेत-‘ऑसिरिस, उत्तर दक्षिणाधिपति चिरंजीव स्वगोत्पन्न “दैवी चमत्कार”’ ह्या रूपाने तुझी आई नट ही तुजवर पसरली आहे. हे मेन-काऊ-रा, तू अजातशत्रू देव होशील असा तिने आशीर्वाद दिला हे. ह्या खोलीच्या शेवटी अखेरच्या न्यायप्रसंगाचे चित्र दाखविले आहे ते पहाण्यासारखे आहे. वर सर्व देव आपापल्या दर्जाप्रमाणे न्यायासनावर बसले आहेत. त्यांच्यापुडे मयत जो अनी त्याच्या अंत:करणाचे (Conscience) वजन करण्याचे काम चालले आहे. एका पारड्यात एक लहानसे पीस ठेविले आहे. व दुस-यात अनीचे अंत:करण आहे. हलक्या पिसाशी तुलना होणार मग अर्थात न्याय कसोशीने होईल यात शंका नाही. अँन्युबीस तराजू पारखीत आहे. समोर विधी उभा आहे, मागे नशीब व जन्मदेवता अगर सटवाई उभी आहेत, डावीकडे स्वत:अनी नम्रपणे उभा आहे, उजवीकडे थॉत् निकाल नमूद करीत आहे. पाठीमागे अमिमाईड राक्षस गिळण्यास टपला आहे. त्याचे डोके सुसरीचे, मध्यभाग सिंहाचा आणि मागील बाजू गेंड्याची आहे. हा देखावा पाहून जो पाप करील तो मात्र खरा निगरगट्ट म्हणावयाचा!

तिस-या खोलीत काही जनावरांच्या ममी करून ठेविल्या आहेत, बैल, सुसर, कुत्री, माकडे इ. प्राणी देवादिकांना फार प्रिय झाल्यामुळे, कालंतराने ते स्वत:च पूज्य होऊन बसले, अर्थात त्यांच्याही ममी करणे भाग पडले. कानडी मुलखात जसे ‘बसवण्णाचे’ फार माहात्म्य आहे तसे इजिप्तची पहिली राजधानी मेफिस् येते ऍफिस् वैलाची मोठ्या थाटाची पूजा होत असे. ज्यू लोकांच्या सैन्याच्या वासराची उत्पत्ती या ऍफिसपासूनच झाली असावी.

असो, ह्याप्रमाणेच असिरियन, बाविलोनियन, ग्रीक, रोमन, फिनिअन व एद्रुस्कन वगैरे राष्ट्रांचे गतवैभव येते साक्षात दिसत आहे. तसेच निरनिराळ्या दालनांतून हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती, महमदी व यहुदी धर्मांचे प्रदर्शन केले हे. आमच्या तेहतीस कोटी देवता, पुराणांतील कथाप्रसंग, पूजेचे संभार, तुलसीवृदांवने आदिकरून हिंदू धर्माची सौम्य, मधूर, उग्र, अशी सर्व स्वरूपे येते एके ठिकाणीच दिसतात. ह्या प्रकारे आपण प्रागैतिहासिक कालातून प्राचीन कालात व प्राचीनातून अर्वाचीनात हिंडता हिंडता शेवटी खालच्या अवाढव्य पुस्तकालयात उतरतो. हा जगातील एक अत्यंत मोठा ग्रंथसंग्रह. येथे केवळ छापील पुस्तकांची संख्या वीस लक्षांवर आहे. हस्तलिखित पुस्तकात हिंदू, अरबी, फारशी, चिनी, जपानी, इ. ५०,००० प्रतींचा संग्रह आहे. चिनात छापण्याची कला कशी उद्भवली व नंतर तेथे आणि दुसरीकडे तिचा हळूहळू कसा विस्तार झाला, हे दाखविण्यासाठी त्या त्या काळाची छापील बुके अनुक्रमे लावून ठेविली आहेत. पंधराव्या शतकापासून तो अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत पुस्तक बांधण्याच्या कलेचा कसा विकास झाला, हे दाखविण्याकरिता शेवटच्या सहा कपाटांत निवडक बांधणीची मोठमोठी पुस्तके जुळवून ठेविली आहेत. मध्यभागी सहा कपटांत इ. स. पूर्वी ३०० वर्षांपासून तो इ. स. नंतर १५०० वर्षांपर्यंत लेखनकलेचा इतिहास दाखविण्याकरिता त्या त्या काळच्या हस्तलिखित प्रती अनुक्रमे मांडून ठेविल्या आहेत. प्राचीन काळी इजिप्त देशात पेपिरस नावाच्या बोरूच्या झाडाच्या सालीचा एक प्रकारचा कागद बनवीत असत. इजिप्तचे प्राचीन लेख ह्याच कागदावर लिहिले आहेत. सर्वात जुना उपलब्ध लेख इ. स. पूर्वी ३५०० वर्षांचा आहे!...... ह्याशिवाय वर्तमानपत्रे आणि मासिके ह्यांची एक निराळी खोली आहे. नवीन होणा-या पुस्तकांचा  ह्या संग्रहात समावेश व्हावा म्हणून संयुक्त राज्यातील प्रत्येक प्रकाशकाने आपल्या नवीन पुस्तकाची एकेक प्रथ एडिंबरोची लायब्ररी, आणि ब्रिटिश म्युझिअम येथे पाठवावी, असा पार्लमेंटाने सक्तीचा कायदा केला आहे. ह्याप्रकारे म्युझिअम पाहून दारात आल्यावर तोंडातून आपोआप उद्गार येतो की “कालो ह्ययं निरवधिविपुला च पृथ्वी”.