मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. ७-३-१९०२
ह्या अफाट शहराच्या मध्यभागी गिल्डफर्ड रस्त्यातून एके दिवशी जात असता एक भव्य व जुनी इमारत दिसली. तिचे दारावर लिहिलेले वरील नाव वाचून मला आत जाण्याची इच्छा झाली. पण सोमवारीच हे गृह प्रेक्षकांकरिता उघडे असते म्हणून एका सोमवारी ओळखीचे पत्र वगैरे मुद्दाम काही न नेता बरोबर एका सोबत्यास घेऊन पहावयास गेलो. रस्त्यातील फाटक ओलांडल्यावर विस्तीर्ण आणि स्वच्छ पटांगण लागले. त्यातून चिटणीसांचे कचेरीत गेल्यावर आम्हांला सर्व गृह हिंडून दाखविण्याकरिता आम्हांबरोबर एका चौदा वर्षाच्या हुषार मुलास दिले. ह्या छोक-याने आम्हांस मोठ्या व्यवस्थेने चित्रांची खोली, कमिटी बसावयाची जागा, म्युझिअम इ. दाखविल्या आणि प्रत्येकाची थोडक्यात चटकदार माहिती दिली. कमिटीच्या खोलीतील एका मोठ्या सुंदर तसबिरीत ख्रिस्ताजवळ काही लहानलहान मुळे खेळत होती, तिचे खाली हे सोन्याचे वाक्य बायबलातून लिहिले होते. “लहानग्यास मजकडे येऊ द्या, कारण अशाकरिताच देवाचे राज्य आहे,” चित्रांच्या खोलीत हॅडल आणि हॉगर्थ ह्यांची प्रख्यात चित्रे ठेविली होती. म्युझिअममध्ये कित्येक मिशन-यांकडून मुलास नाताळ निमित्त बक्षिस देण्यास पुस्तके व इतर चिजा मिळालेल्या मांडून ठेविल्या होत्या. मध्यभागी एका गोल टेबलावर कोणा एका मोठ्या एडिटराने दिलेल्या बाहुल्या, फुले, माळा, खेळणी, कोनाकृती रचून ठेविल्या होत्या. ह्यानंतर आमच्या चिमुकल्या वाटाड्यने आम्हांस भोजनगृहात नेले. १०० मुले रांगेने दोन्ही बाजूने बसतील असे एक लांब टेबल होते. ५|७ मुले नाताळासाठी भोजनगृह सुशोभित करण्यात अगदी गर्क झाली होती. ती सर्वच आम्ही आत गेल्याबरोबर आम्हांजवळ आनंदाने हासत हासत आली. भिंतीवरच्या एका फळीवर जाड अक्षरांनी लिहिलेली १०-१२ नावे आम्हांला मोठ्या अभिमानाने दाखविण्यात आली. ती नावे दक्षिण आफ्रिकेच्या लढाईत बँड वाजविण्यास नुकतेच पाठविलेल्या ह्यांच्या बंधूंची होती. एका पोटी जन्मलेल्या भावांमध्येदेखील क्वचित बाबतीत असा अभिमान आढळणार नाही. ह्याच खोलीत एका कोप-यात मुलांच्या लक्षात सहज भरतील, अशा रीतीने मोठमोठ्या आश्रयदात्यांची नावे लिहिली होती.
एकंदर आश्रमाचे तीन भाग केले आहेत. ७ पासून १२ वर्षांच्या मुलांचा एक भाग. ७ पासून १५ वर्षांच्या मुलींचा दुसरा भाग. आणि ३ पासून ७ वर्षांच्या लहान मुला-मुलींचा तिसरा भाग. ह्यांस अनुलक्षूनच इमारतीच्या दोन उभ्या बाजू आणि मधली आडवी रांग अशी योजना केली आहे.
एका बाजूस मुलांची खाली जेवणाची जागा, वरती निजण्याची जागा व मागे शाळा आणि दुस-या बाजूस तशीच मुलींची व्यवस्था केली आहे. त्यांस एकमेकांत मिसळण्याची सक्त मनाई आहे. नंतर आम्ही शाळेत गेलो. एकंदर १०० मोठ्या मुलांचे वयाचे मानाने तीन वर्ग केलेले आहेत. तिन्हींचा अभ्यास चालला होता. मुख्य अध्यापकाने सांगितले की मुलांकडून शाळेतील अभ्यास अर्धा वेळ करून घेऊन बाकीच्या वेळात त्यास कसला तरी धंदा आणि विशेषेकरून बँड वाजविण्यास आणि कवाईत करण्यास शिकविले जाते. मुलींस सर्व घरगुती कामे करण्यास शिकवितात. १५ वर्षांनंतर मुलास बहुतकरून लढाईत बँड वाजविण्यास अगर कोणत्यातरी धंद्यात उमेदवारीस ठेवण्यास येते. मुलीस सभ्य कुटुंबात तिच्या हुषारीप्रमाणे नोकरी पाहून देतात, २१ वर्षांपर्यंत मुलां-मुलींवर गृहाची नजर असते. नंतर ती मुखत्यार होतात. अशा प्रकार ह्या गृहात अजमासे १०० मुलगे, १०० मुली आणि १०० लहान बालके इतक्या अनाथांची जोपासना होत आहे. ह्याशिवाय जन्मल्यापासून तो ३ वर्षांपर्यंतच्या सुमारे २०० तान्ह्या मुलांची जोपासना निरनिराळ्या खेड्यांतून गृहामार्फतच होत आहे.
ह्यानंतर मुलांस काही प्रश्न विचारल्यावर मग आम्ही बाहेरच्या पटांगणात आलो, इक्यात लहान मुलांचा वर्ग सुटला. दोन दोन मुले हातांत हात घालून रांगेने लांबवर लुटू लुटू चालू लागली. एक पोक्त बाई त्यांस हिंडवीत होती. ह्या चिमुकल्या पलटणीचा ड्रेस अगदी एकसारखा असल्यामुळे पुढे होणा-या लढायातील ह्यात योद्धा कोण होता व त्याची शुश्रुषा करणारी दाई कोण होती हे सहज कळत नव्हते. सर्वांची प्रकृती सुदृढ, चेहेरे प्रफुल्लित दिसत होते. ह्या बाईशी बोलत असता मुलांनी आम्हांभोवती गराडा दिला. सर्वांशीच हात हालविण्यास आम्हांस वेळ नव्हता म्हणून बाकीच्यांनी आम्हांस कोठे तरी नुसता स्पर्श करून आपली तृप्ती करून घेतली!
नंतर आम्ही प्रार्थनामंदिर पाहिले. हे मोठ्या थाटाचे असून ह्यात दोन तीन हजार लोक सुखाने बसतील अशी सोय केली आहे. निजवयाची जागा पाहिली, अगदी लहानापासून तो मोठ्यापर्यंत प्रत्येकास निराळी खाट आणि स्वच्छ, मऊ व उबदार गाद्या आहेत. मागचे बाजूस आजारी मुलांकरिता दवाखाना आहे.
गृहाचा इतिहास
फ्रान्स, हॉलंड देशांतून अशा प्रकारच्या संस्था पाहून येऊन लंडन येथे टॉमस कोरम् नावाच्या एका मोठ्या परोपकारी व्यापा-याने १७३९ त ही संस्था स्थापिली. प्रथम प्रथम जरी दोन महिन्यांच्या खालचीच मुले घेतली जात होती तरी दारावर मुले आणणा-यांची मोठी गर्दी जमू लागली व दंगे व मारामा-याही होऊ लागल्या. ह्याप्रमाणे पुष्कळ अर्भकांस नाइलाजास्तव परत पाठवावे लागत असे. म्हणून १७५६ मध्ये कमिटीने पार्लमेंटकडे मदतीबद्दल अर्ज केल्यावरून दहा हजार पौंडांची मदत मिळाली. येतील तितक्या सर्व मुलांस आत घ्यावे अशी पार्लमेंटची अट होती. म्हणून ह्या संस्थेचा सर्वांस योग्य फायदा मिळावा ह्या हेतूने सर्व देशभर जाहिराती दिल्या आणि प्रांतनिहाय मुले जमा करण्याकरिता योग्य स्थळांची योजना केली. हॉस्पिटलच्या दारावर एक टोपली टांगलेली असे. कोणीही मुलास टोपलीत ठेवून वर्दीची घंटा वाजवून चालते व्हावे असा क्रम चालला. पहिल्याच दिवशी (ता. २ जून १७५६) ११७ मुले सापडली! डिसेंबर ता. ३१ पर्यंत १७८३ मुले आली!! पुढल्या वर्षी ३७२७ मुले जमली!!! अशा दूरदर्शी औदार्याचा काय परिणाम व्हावयाचा तो लवकरच झाला. ह्या व्यवस्थेने पापाचरणास मोठे उत्तेजन मिळाल्यासारखे झाले. शिवाय अशा कोवळ्या वयातील इतक्या मुलांची योग्य व्यवस्था ठेवणे गृहास न साधल्यामुळे पुढील ३ वर्षे १० महिन्यांत जी एकंदर १४,९३४ मुले सापडली त्यांपैकी १०,३८९ मुले बाळपणीच वारली! काही प्रांतांतील कंगालखान्यातील अधिका-यांनी आपला खर्च कमी करण्यास लबाडी अगर जबरी करून बरीच मुले गृहात पाठविली! कित्येक चांगल्या पण दरिद्री आईबापांनी केवळ आपल्या मुलांच्या स्मशानयात्रेचा खर्च वाचविण्यास आपली मरणोन्मुख मुले टोपलीत टाकली!! शेवटी १७६० त पार्लमेंटास ही अट काढून घ्यावी लागली व तिने आपली मुलेही बंद केली. तथापि एकदा आत घेतलेल्या मुलांची अखेर वाताहात होईपर्यंत (१७७०) सर्व खर्च पार्लमेंटास द्यावा लागला. ह्यापुढे गृहाच्या बाणेदार चालकांनी केवळ लोकाश्रयावर नियमात योग्य फेरफार करून हे गृह चालविले.
सांप्रतची व्यवस्था
मूल हवाली करण्यास स्वत:आईनेच आणले पाहिजे. तिला झालेला सर्व खरा प्रकार निवेदन करावा लागतो. काही लटपट केल्यास अर्ज नामंजूर होतो. मूल जन्मेपर्यंत अगर जन्मल्यावर १ वर्षावर अर्ज घेण्यात येत नाही. बाईची इतर बाबतीत वर्तणूक चांगली आहे, हल्ली तिची दशा कठीण आहे, ज्या पुरूषाने तिजवर हा प्रसंग आणिला त्याने तिला फाटा दिला आहे वगैरे नाजूक गोष्टींची पूर्ण चौकशी केल्यावर कमिटी अर्ज मंजूर करिते. आणि असे केल्याने केवळ मुलाचेच प्राण वाचवून त्याची जोपासना करिते असे नव्हे तर त्या बाईलाही सन्मार्गास लावून समाजात मिसळविते. ही सर्व नाजूक कामे पोक्त व थोर अशा माणसांची कमिटी स्वत:च सक्तपणे करिते. मुलास फुकट घेण्यात येते इतकेच नव्हे तर, गृहाच्या कोणत्याही अधिका-याने कसलीही फी अगर खुशी घेतल्यास त्यास बडतर्फ करण्यात येते आणिती दिल्याबद्दल अर्जदाराचा अर्ज नामंजूर होतो. विवाहित स्त्रियांची अगर विधवांची मुले घेण्यात येत नाहीत. विधवा विवाहास येथे मुळीच प्रतिबंध नसल्याकारणाने हा नियम योग्यच आहे.
हल्ली गृहात मुले-मुली मिळून ३२३ आहेत व निरनिराळ्या खेड्यांत २१९ तान्ही मुले दायांजवळ ठेविली आहेत. सर्दावर्दीने प्रत्येक मुलामागे एकंदर खर्च सालीना २९ पौंड १४ शिलिंग ११ पेन्स येतो. १९०० साली ५५३ मुलांपैकी खेड्यात ६ वारली, गृहात दोन वारली आणि दोन त्यांच्या आप्तांनी नेली.
पापी पण अनुतापी आईच्या पोटी यदृच्छेने आलेल्या इतक्या मुलांचे येथे पोषण व शिक्षण होते. वर सांगितलेल्या सुंदर भोजनालयात ह्यांच्यासाठी दर रविवारी उपासना होतात, त्यावेळी शेजारच्या भागातील भाविक सभ्य स्त्री-पुरूष उपासनेस येतात. उपदेशक पगारी आचार्य आहेत. प्रत्येक वेळी धर्मार्थ फंड गोळा होतो. ह्या प्रकारे धर्माचे खरे लक्षण जो निष्काम परोपकार तो येथे नित्य घडतो! आणि आमच्यासारख्या परस्थास ह्या लोकांची एका दगडासरशी दोनचार पांखरे पाडण्याची वेमालूम तोड पाहून भारी कौतुक वाटते. मुले काम करण्याच्या लायकीची झाली म्हणजे त्यांना योग्य कामे व नोक-या लावून देतात. आणि २१ वर्षांची होऊन मुखत्यार झाली म्हणजे वर्षातील एका नियमित रविवारी त्यांच्या आभार प्रदर्शनासाठी म्हणून एक थाटाची उपासना होते. त्यावेळी कोणा तरी नामांकित बिशपचा उपदेश होतो. मुलांच्यातर्फे आभार मानल्यावर त्यास बक्षिसे वाटून शिवाय चांगल्या वर्तणुकीबद्दल प्रेसिडेंटच्या सहीची शिफारसपत्रे मिळतात. गतसाली ड्यूक ऑफ पोर्टलंड (उपाध्यक्ष) ह्यांनी बक्षिसे वाटली. ह्या प्रकारे अत्यंत सोवळे धर्माधिकारी व बडेबडे जातिवंत मानकरी ह्यांनादेखील ह्या संस्थेशी प्रत्यक्ष संबंध ठेविण्यात मुळीच लांछन वाटत. नाही!! गृहाच्या म्युझिअममध्ये दोन..... हृद्यात बाणासारख्या घुसणा-या मूर्ती ठेविल्या आहेत, त्या अशा-प्रस्थापक परोपकारी टॉमस् कोरम ह्यांची वयाने वाकलेली गंभीर मूर्ती उभी आहे. त्यांच्या डाव्या हातात नुकतेच जन्मलेले बालक खेळत आहे. त्यांच्या पायाजवळ पश्चात्तापाखाली चुरडून गेलेल्या एका तरूण व मुग्ध पोरीने गुडघे टेकिले आहेत. तिने आपले शरमिंधे तोंड एका हाताने घट्ट झाकलेले आहे. कोरम साहेब मात्र दुस-या हाताने शेक हँड करीत आहेत! इकडे मुलाने कोरम साहेबांच्या वासकुटाची गुंडी घट्ट धरली आहे! जणू काय, त्यांच्या परोपकाराचा फायदा ते हक्काने मागीत आहे!!
असो, अशा संस्थांचा उत्कर्ष होणे इष्ट आहे असे मुळीच नव्हे. पण मानवी स्वभावाची पूर्णता होईपर्यंत ह्या संस्था सर्व देशांत अवश्य आहेत, असे कष्टाने म्हणावे लागते. विधवा-विवाहास पूर्ण संमती असूनही ह्या देशात असा संस्थांची गरज भासत आहे, हे सुधारकांनी ध्यानात घेण्यासारखे आहे. आणि नुसती गरज आहे असे म्हणून स्वस्थ न बसता आज शेकडो वर्षे ही एकच नव्हे तर अशाच दुस-या अनेक संस्था ह्या एका लंडन शहरात चालू आहेत, ही गोष्ट, बालविधवांनादेखील शास्त्रोक्त विवाह करण्याची जेते सक्त मनाई आहे, तेथील सदय धर्माभिमान्यांनी लक्षात आणावी.
जे का रंजले गांजले| त्यासी म्हणजे जो आपुले||
तुका म्हणे सांगो किती| तोचि भगवंताची मूर्ति||
कित्येक प्रत्यक्ष कृती करून तुकारामाचे भगवंत बनतात! कित्येक नुसता त्यांचा उपदेश ऐकून माना डोलवितात! कित्येक कसल्हाही भानगडीत पडत नाहीत! आणि कित्येक तर प्रार्थनासमाजाने असलीच एक संस्था पंढरपुरास चालविली आहे, म्हणून त्याच्यावर दात ओठ खातात!