रा. रा. रामराव बाबर ह्यांनी लहान मुलांकरिता ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्यांचे अल्पचरित्र लिहून प्रसिद्ध केले ह्याबद्दल माला आनंद वाटत आहे. राममोहन रॉयाशिवाय महाराष्ट्राबाहेरील दुस-या कोणाही ब्राह्मपुरुषांची चरित्रे मराठीत प्रसिद्ध झालेली माझ्या आढळण्यात नाहीत. एवढे लहानसे चरित्र तरी केशवचंद्र सेनाने ह्या पूर्वीच प्रसिद्ध व्हावयास पाहिजे होते ते रा. बाबर ह्यांनी प्रसिद्ध केले, ह्याबद्दल बालवर्ग त्यांचा आभारी होईल. ब्राह्मसमाजाचा धर्म मुख्यतः तुलनात्मक धर्माच्या पायावरच उभारलेला आहे. तो सर्वसंग्राहक असून विश्वधर्म होण्याला लायक आहे. संस्थापक, राजा राममोहन रॉय ह्यांनी त्याची जरी विचारात आखणी केली होती, तरी व्यवहारात खरी संघटना बाबू केशवचंद्र सेन ह्यांनीच केली. ह्या संघटनेला उदात्त भावनेचे बुरुज लावले. केशवचंद्र झाला नसता तर ब्राह्मसमजाला स्थाईक स्वरूप आलेच नसते. महर्षी देवेंद्रनाथ ह्यांनी मोठी कामगिरी केली खरी, तरी ती केवळ हिंदुधर्माच्याच शुद्ध स्वरूपाच्या पायावर उभी होती. भूत, वर्तमान, भावी सर्व धर्मांच्या अनुयायांना एकत्र यावयाला जर कोणी प्रशस्त भूमिका तयार केली असेल तर ती ब्रह्मानंदानीच केली, असे म्हणण्यात मी धाडस करीत आहे, असे वाटत नाही. पाश्चात्य देशांत ख्रिश्चन धर्माची सुधारणा करणारे युनिटेरियन व युनिव्हरसॅलिस्ट इत्यादी पंथांच्या हातूनही ह्या पूर्ण समन्वयाचे कार्य झाले नाही. इराणातील बहाई समाजाने महंमद पैगंबराच्या धर्माची मोठीच आघाडी मारली आहे खरी. तथापि तत्त्वज्ञान आणि भावना ह्यांचा समरस करून समन्वयाचे काम केशवचंद्राइतके कोणी केले नाही हे खरे ! असे असूनही काही व्यक्तिविषयक कारणांमुळे ब्रह्मानंदासारख्या थोर नेत्याला ब्राह्मांकडूनही विरोध होऊन त्यांचे नाव किंचित मागे पडले होते, तथापि गेल्या वर्षी त्यांच्या शतसांवत्सरिक जयंतिनिमित्त सर्व हिंदुस्थानभर व बाहेरही जो अपूर्व उत्साहपूर्वक गौरव करण्यात आला, त्यावरून भावी इतिहासात केशवचंद्र सेन आपले योग्य ते पद मिळवू शकेल (फुट नोट – ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्या पुस्तकाची प्रस्तावना १९३९.) अशी अशा वाटत आहे, ती खरी व्हवयाची असेल तर रा. बाबर ह्यांचेप्रमाणे माझ्या इतर मित्रांनीही अबालवृद्धांसाठी प्रचंड प्रयत्न केले पाहिजेत. परमेश्वर तशी प्रेरणा त्यांना करो !
मंत्र कमी आणि थुंकी जास्त
धार्मिक जीवनात जाहिरातीला जागा नाही. धर्माच्या प्रकाशाला मापट्याखाली झाकू नका. असे जरी ख्रिस्ताने म्हटले तरी ह्या उक्तीचा उपयोगापेक्षा दुरुपयोग होण्याचा आजकाल अधिक संभव आहे. प्रचारकांनी ज्याप्रमाणे आपली स्वतःची दुःखे वेशीवर टांगू नयेत त्याचप्रमाणे धर्माचा प्रकाशही, एकाद्या केरोसीन दिव्याप्रमाणे, टांगण्याला वेशीवर जाऊ नये. बगदादमध्ये जाऊन जीव धोक्यात घालण्यापेक्षा कलकत्त्यासारख्या सुंदर शहरात दीर्घायुषी झाला असता तर गृहस्थाच्या दृष्टीने बळदेव अधिक शहाणा ठरता. काही गृहस्थ बगदादला जाणे ही जाहिरात ठरवितील, तर काही प्रचारक कलकत्त्यास चिकटणेची जाहिरात ठरवितील. आपले धनमान सांभाळण्याचा हक्क गृहस्थांनी राखून ठेविल्यास आणि उलटपक्षी आपले जीवित लांब आणि रुंद करावे की ते तीव्र आणि आखूड करावे हे ठरविण्याचा हक्क प्रचारकांनी आपल्याकडे ठेविल्यास अशा प्रचारकांवर तरी निदान जाहिरातीचा आरोप न यावा, हे बरे. युरोप, अमेरिकेचे प्रचारक हिंदुस्थानात येणार म्हणूनच केवळ आम्ही जावे असे नाही. हे केवळ अनुकरण होईल. हे जाहिरातीहूनही कमी फलदायी आहे. केवळ कर्तव्यासाठी प्रत्यक्ष जीवाची पर्वा न बाळगणारे प्रचारक ब्राह्मसमाजात कमी होऊ लागले म्हणूनच आमच्या समाजात धर्म कमी आणि वावदूकपणा जास्त वाढू लागला आहे. ‘मंत्र कमी आणि थुंकी जास्त’ अशी एक गावठी म्हण कानडी भाषेत वाईट ब्राह्मणाला लागू आहे. ती आम्हांला न लागो, म्हणजे मिळविली. लो.अ. ही वि.
करी प्रभुराय सखा
मनास प्रभू पटत नाही तर त्या प्रभूला सखा तो कसा करणार ? मनुष्याची मजल इतकी गेली पाहिजे की, मनुष्याची करमणूक वगैरे साधारण जीवनाचा दर्जा चढून गेल्यावर मानवी जीवन मिळविले पाहिजे. जीवनाचे दोन भाग करता येतील. एक पशुजीवन व दुसरे मानवीजीवन. खाणे पिणे ह्याच्या पलीकडे विचार नसणे ह्याला पशुजीवन म्हणण्यात येते. पशुदेखील (फुट नोट – सुबोध पत्रिका, मुंबई २९ जुलै १९२८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पत्राचा उतारा.) पशुजीवनापलीकडे आपला व्यवहार करितात. आफ्रिकेसारख्या दाट वनात जाऊन त्या ठिकाणी पशू कशा त-हेने वागतात हे पाहण्यासाठी तेथील लोक जात असतात. रानात हिंस्र पशू असतात. हे भयंकर ठिकाण आहे अशी आपली समजूत झालेली असते. पण तसा सर्वस्वी प्रकार नसून उलट मनुष्याची पहिली कोटी—पहिली पायरी म्हटली म्हणजे पशू. ते खाण्यापिण्यापलीकडे सात्विक विहार करीत असतात. त्या ठिकाणी जिब्रा, कांगारू, हरीण अशासारखे वनस्पतीआहारावर राहणारे गरीब, सुंदर पशू सात्विक क्रीडा करीत असतात. आपल्या मुलांचे कौतुक करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. एवढे कशाला ? आपण जर दिवाणखान्यात बसलो असता आपल्या घरातील मांजर आपल्या पोरांसह तेथे येऊन खेळते किंवा आपण कोचावर किंवा कशावर तरी बसून आपल्या पोरांचे खेळ बघत बसते. ह्यावरून त्यांचे प्रेम दिसून येते. शरीराचे दास्य करून न राहता आध्यात्मिकाचे पहिले जीवन जे सात्विक करमणुकीत असते ते स्वीकारले पाहिजे. जिवंत असलेला प्राणी असा कोणता आहे की ज्याला करमणूक नको. शरीराचे पोषण व संरक्षण करण्यापलीकडे जे कार्य केले जाते ते आध्यात्मिक होय. ह्या सात्विक करमणुकी करीत असता पुढे वरिष्ठ प्रकारचे ज्ञान, वरिष्ठ प्रकारचे प्रेम व वरिष्ठ प्रकारचा यत्न व्हावयास लागून परिघ वाढत वाढत जातो.
दुःसाध्य रोग झाला असता प्रभुराज सखा करावा. साधे रोग पाहिजे तो बरा करील, पण महाभयंकर रोग बरे करण्यास तसाच वैद्य पाहिजे. असा वैद्य प्रभुशिवाय कोणी नाही. मनुष्य मनुष्याचा सखा होऊ शकत नाही. कारण तोही रागावतो, पतन पावतो. सखा परमेश्वर आहे तर त्यालाच सखा करा व आपले सार्थक करून घ्या. (फुट नोट – मंगळवार ता. ८ मे १९१२ रोजी कोल्हापूर येथील ब्राह्मसमाजाच्या तिस-या वार्षिकोत्सवात दिलेल्या व्याख्यानाचा गोषवारा. सुबोध पत्रिका, मुंबई १२ मे १९१२.)