ब्रिटिश पार्लमेंटपुढे लवकरच जगाच्या इतिहासात संस्मरणीय होणारा एक नमुनेदार खटला अव्वल सुनावणीसाठी येणार आहे. त्यातील वादीप्रतिवादी हे दोन व्यक्ती नसून दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. त्यांतील एक तत्त्व तारतम्य दृष्ट्या पाहू गेले असता नवीन असून दुसरे जवळ जवळ मनुष्य स्वभावाइतकेच किंबहुना त्याहूनही अधिक जुने आहे. पण त्या दोहोंमध्ये जो झगडा माजून राहिला आहे तो मुळीच नवा नाही. त्याचा इतिहास म्हणजे मनुष्यजातीचा सामाजिक इतिहासच म्हणावयाचा ! जगातील महायुद्धे आणि महत्त्वाचे तहनामे, मोठमोठ्या राज्यक्रांत्या आणि धर्मक्रांत्या, मोठमोठ्या युगकारी सुधारणांचे उगम आणि विलय इ. घडामोडी ह्या केवळ ह्या महाझगड्यातील आघात-प्रत्याघात होत. मनुष्यजातीच्या शिक्षणासाठी विश्वकर्मा हे जे महाकाव्य अनादी कालापासून रचीत आहे त्यातील एक पर्व होऊन रहाणार असा हा कज्जा ब्रिटिश पार्लमेंटपुढे सुरू होणार आहे, असे म्हणण्यास आम्ही फारशी अतिशयोक्ती करीत असू असे वाटत नाही.
पार्लमेंटपुढे जो खटला लवकरच चालणार आहे त्यातील वादी-प्रतिवादी दोन तत्त्वे आहेत, असे आम्ही वर म्हटले. ती परस्पर विरोधी तत्त्वे म्हणजे “हिंदी स्वराज्य” आणि “मानवी जातिभेद” ही होत. ह्या दोन तत्त्वांमध्ये पुरातन काळापासूनच विरोध वाढत आला आहे. आणि त्यामुळे इतिहासामध्ये वेळोवेळी क्रांत्या झाल्या आहेत. ह्याचे कारण एक तत्त्व मनुष्यजाती, विशेषतः हिंदी राष्ट्रास, उदयोन्मुख करणारे आहे व दुसरे त्यास आजपावेतो पराङ्मुख करीत आलेले आहे. हा विरोध नीट समजण्यास ह्या दोनही तत्त्वांची संक्षिप्त, स्पष्ट व्याख्या करणे जरूर आहे. “हिंदी स्वराज्य” ह्या शब्दांनी संबोधली जाणारी एक नूतन, सात्विक आणि पवित्र भावना भारतवर्षात उचंबळू लागली आहे. तिचा अर्थ नुसता हिंदी लोकांचे राज्य इतकाच खास नाही. एवढाच अर्थ असता तर भारतवर्षाच्या जवळ जवळ एक-तृतीयांश भागात म्हणजे (फुटनोट प्रभात, वर्ष ४ थे. अंक १-२.) हिंदी संस्थानांच्या राज्यकारभारात ह्या नवीन तत्त्वांची सरशी आहे, असे मानावे लागेल. कारण, ही सर्व संस्थाने अनेक दृष्टींनी पाहता हिंदी स्वराज्याचेच नमुने आहेत. नाही कोण म्हणेल ? तेथील राजे, प्रधानमंत्र्यापासून तो खेड्यातील पाटलापर्यंत सर्व अधिकारी हिंदीच आहेत. जमाबंदी, बजेटमंजुरी, शिक्षणखाते, स्थानिक स्वराज्य, लष्कर व पोलीस खाते, धर्मादाय आणि दरबारच्या इतर मामुली वहिवाटी ही निदान औपचारिक दृष्ट्या तरी अगदी पूर्वपरंपरेला धरूनच आहेत. मग ही सारी स्वराज्याची बाह्यांगे संस्थानांतून पूर्वीप्रमाणेच कायम असतानाही आधुनिक दृष्ट्या काँग्रेस लीगच्या योजनेत जी स्वराज्याची नूतन भावना रेखाटली आहे; ती काही कोठे ह्या संस्थानी स्वराज्यात दिसून येत नाहीत. बाहिरल्या नेणे उत्तम मुंडिले । अंतरी दंडिले नाही जेवी ।। ह्या वचनाप्रमाणे स्वराज्याचे अंतरंग, त्याचा आत्माच केवळ जी जबाबदार पद्धती ती वडिलार्जित स्वराज्याच्या पोषाखी कलेवरात मुळीच नाही, हे आधुनिक स्वराज्यवाद्याच्या कट्ट्या पुरस्कर्त्यांनाही कबूल करावे लागत आहे. आणि तसे ते सर्व स्पष्ट शब्दांनी वेळोवेळी कबूल करीत आले आहेतच. राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे चालविणारे अधिकारी पुरूष कोणत्याही जातीचे, धर्माचे व पंथाचे असोत, ते स्वकीय असोत किंवा परकीय असोत, त्याच्या कारभाराची अखेरची सूत्रे ज्या जनतेवर ते कारभार चालवितात, त्या जनतेच्या संमतीवर निखालस अवलंबून राहावी; हाच जबाबदार राज्यपद्धती ह्या शब्दयोजनेचा अर्थ आहे. आणि ह्याच पद्धतीला ‘स्वराज्य’ हे नाव सार्थपणे देता येईल. इतर स्वराज्ये, ती कितीही पुरातन काळापासून चालत आलेली असोत. ती नावाचीच समजावयाची. वर निर्दीष्ट केलेल्या खटल्यातील वादी जे हिंदी स्वराज्य त्याची एवढी व्याख्या तूर्त पुरे आहे.
आता प्रतिवादी जो जातिभेद त्याचे लक्षण ठरवू या. हिंदुस्थानात हल्ली जी जातीभेदाची पद्धची चालू आहे तिचा पूर्वइतिहास कसाही असो; तिचा परिणाम हिंदुस्थानात हल्लीचे निरनिराळे समाज राहत आहेत; त्यांच्या परस्पर संबंधावर अतिशय प्रतिकूल झालेला आहे, हे आता सर्व सूज्ञ लोक कबूल करू लागले आहेत. धार्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा औद्योगिक दृष्ट्या अद्यापि ह्या पद्धतीची तरफदारी कोणी कितीही करीत असला तरी आजकाल उचंबळत असणा-या आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या मार्गात ह्या जातिभेदाचा अडथळा येत आहे; निदान आणला जात आहे; ही गोष्ट ह्या जातिभेदाच्या पुरस्कर्त्यांच्या लक्षातही हळूहळू येऊ लागली आहे. आणि ते राजकीय हितासाठी तरी निदान जातिभेदाच्या सर्व सबबी बाजूला ठेवा असे आपल्या अनुयायांना उपदेश करू लागले आहेत. अशा वेळी जातिभेदाची कामचलाऊ व्याख्या थोडक्या शब्दात करावयाची झाल्यास ज्यास इंग्रजीत vested interest असे म्हणण्यात येते, तसले विशिष्ट साचलेले हितसंबंध अशी करता येईल. शरीराच्या एकाद्या भागाला मार लागून तेथे रक्त साचून शरीरातील रुधिराभिसरणाला अडथळा आल्यामुळे शरीराची जशी विकृत स्थिती होते; तशीच विकृत स्थिती वरील साचलेले हितसंबंध उर्फ जातिभेद ह्यामुळेही राष्ट्ररूपी शरीरामध्ये अवश्य होते हे निर्विकार दृष्टीने पाहणा-याला ताबडतोब दिसून येण्यासारखे आहे.
जातिभेदामुळे कोणाचेच हित होत नाही असे म्हणण्याचा इरादा नाही व प्रयोजनही नाही. जातिभेदामुळे संचित झालेले हितसंबंध हे राष्ट्राचे हितसंबंध खासच नव्हेत. एवढेच सांगणे आहे. असले संचित हितसंबंध विवक्षित जातीला साधक असले तरी इतर काही जातींना ते बाधक असतात. एका जातीला दान ते दुस-या जातीला ऋण असा हा नेहमी अन्योन्य संबंध असतो. ह्यामुळे ह्या संबंधांना राष्ट्रीय संबंध कधीच म्हणता येणार नाही. इतकेच नव्हे तर जेव्हा जेव्हा सर्व राष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी एकादी नवीन सुधारणा घडवून आणावयाची असेल तेव्हा ह्या जातिभेदरूपी संचित संबंधाचा पर्वत मध्ये आड आल्याशिवाय राहात नाही.
येणेप्रमाणे जबाबदार राज्यपद्धती म्हणजे हिंदी स्वराज्य आणि संचित हितसंबंध म्हणजे मानवी जातिभेद ही दोन लक्षणे वरील खटल्यातील वादी आणि प्रतिवादी झालेल्या दोन तत्त्वांची आहेत. हे नेहमी ध्यानात ठेविल्यास प्रस्तुत विषयाचा वादग्रस्तपणा ब-याच अंशाने कमी होण्याचा संभव आहे. स्वराज्याचा “जबाबदार राज्यपद्धती” हा अर्थ जसा सरकारपक्षास तसाच लोकपक्षासही मान्य आहे. तसेच “संचित हितसंबंध” हा जातिभेदाचा अर्थ सुधारक आणि उद्धारक, प्रागतिक आणि राष्ट्रीय, स्वातंत्र्यवादी आणि धर्माभिमानी ह्या भिन्नभिन्न पक्षालाही मान्य होईल, असा आहे आणि ह्या प्रकारे वादी-प्रतिवादी-भूत वरील जी परस्पर विरुद्ध दोन तत्त्वे हिंदी स्वराज्य आणि मानवी जातिभेद ह्यांच्या खटल्याची सुनावणी ऐकावयाला मनाची समतोल स्थिती होईल अशी आशा आहे.
ह्या खटल्याची पूर्वतयारी आतापर्यंत झाली. वादी-प्रतिवादी ह्यांचे मुख्य वकील आणि इतर कायदेशीर सल्लागार मंडळीही बहुतेक ठरल्याप्रमाणेच आहेत. ब्रिटिश पार्लमेंटचे दोन भिन्न भिन्न भाग आहेत. एक बडे लोकांची सभा व एक सामान्य लोकांची सभा. एकावर जातिभेदाचे निशाण फडकत आहे. तर दुस-यावर जबाबदार राज्यपद्धतीचे निशाण लावले आहे. प्रतिवादीचे वकीलपत्र बड्या लोकांच्या सभेमध्ये हिंदुस्थानला परिचित असलेले बडे गृहस्थ लॉर्ड सिडनहॅन ह्यांच्याशिवाय कोण घेऊ शकणार ? उलटपक्षी भारतमंत्री नामदार माँटेग्यूसाहेब हे जरी बडे गृहस्थ नसले तरी उदारमतवादी असल्यामुळे हिंदी स्वराज्याची वकिली ब्रिटिश पार्लमेंटच्या सामान्य लोकांच्या सभेमध्ये पत्करण्याचे कंकण त्यांनीच बांधले हे युक्त आहे. लॉर्ड सिडनहॅमसाहेब हे एक ब्रिटिश साम्राज्याचे संरक्षक आहेत. पाच वर्षे ह्या देशातील एका मोठ्या सुभ्याची वहिवाट केल्यामुळे त्यांना ह्या देशातील उणेपुरे सर्व अवगत झाले आहे. उलटपक्षी भारतमंत्री ह्यांनीही ह्या देशामध्ये एकदा सहज आणि एकदा मुद्दाम येऊन वाटेल तितका पुरावा मिळविला आहे. हिंदुस्थानातील परकीय भांडवलदार आणि इतर सुखवस्तू युरोपियन गृहस्थ, हिंदी इनामदार, जमीनदार व किताबवाले, तसेच पारशी, ख्रिस्ती, मुसलमान इत्यादी नवे जुने परधर्मी संघ आणि हिंदुधर्मातीलच निकृष्ट आणि मागासलेल्या कित्येक असंतुष्ट जाती ह्यांच्या सहानुभूतीवर, सल्लामसलतीवर आणि सहकार्यावर प्रतिवादीच्या वकिलाची मुख्य भर असणे साहजिक आहे. उलटपक्षी वादीचे वकील भारत मंत्री माँटेग्युसाहेब हे स्वतः उदारमतवादी असल्यामुळे आणि प्रत्यक्ष भारतवर्षाचे मीठ खात असल्यामुळे त्यांचा ओढा ह्या देशातील जनतेच्या आकांक्षा तृप्त करण्याकडे आणि पुढा-यांशी सहकार्य साधण्याकडे विशेष असणे साहजिकच आहे. कोर्टात दोन्ही पक्षांचे दोन मुख्य वकील असले तरी प्रत्यक्ष काम चालविण्यामध्ये अप्रत्यक्षरीतीने त्यांना मदत करण्यासाठी दुसरे कित्येक कायदेपंडित हाताशी तयार असतातच. अशा प्रकारचे मदतगार म्हणून काँग्रेस आणि होमरूल लीगने आपआपली शिष्टमंडळे पाठविण्याचे ठरविले आहे. वादीच्या वकीलास इंग्लंडातील मजूर पक्षाची मदत मिळण्याचा संभव आहे हे पाहून प्रतिवादीच्या वकीलानेही इंडो-ब्रिटिश नावाचे एक नवीन स्वकीय-परकीयांचे मित्रमंडळ तयार केले आहे. पूर्वी अँग्लो इंडियन हा शब्द प्रचारात होता. त्याऐवजी आता इंडो-ब्रिटिश हा प्रचार सुरू झाला. एवढ्यावरून श्राद्धातल्या सव्यापसव्याप्रमाणे केवळ पोकळ सुताची घालकाढ एवढाच अर्थ आहे असा नव्हे, तर पूर्वी अँग्लो इंडियन समाजामध्ये जे थोडे मिश्रण दिसून येत असे ते आता इंडो-ब्रिटिश मंडळामध्ये स्वकीय-परकीयांचे जाडे मिश्रण दिसून येणार आहे. एकूण पूर्वतयारी तरी जय्यत झालेली आहे. ब्रिटिश पार्लमेंटपुढे अशा प्रकारचा कज्जा नवीन आलेला आहे असे नाही. आयरीश स्वराज्याचा कज्जा आज किती वर्षे तरी भिजत पडलेला असून ग्लॅडस्टन, ऑस्क्विथ प्रभृती महात्म्यांनी ज्यात हात टेकिले, तो निकालात जाण्यापूर्वीच त्याच्याहून अत्यंत विस्तृत परिणामकारी हा कज्जा दाखल करून घेण्याची पाळी ब्रिटिश पार्लमेंटवर आली आहे. महायुद्ध संपून गेले तरी त्याच्या खालोखाल महत्त्वाचे हे सनदशीर युद्ध जुंपणार म्हणून जगाचे डोळे त्याच्याकडे लागतील ह्यात संशय नाही. परंतु इतर जग केवळ तमासगीर म्हणून ह्या कज्जाकडे पाहील तर हिंदुस्थानच्या भावना नुसत्या कौतुकापेक्षा खात्रीने अधिक खोल असणार ! जीव धरून पुढे सरावे की मागे रेटले जाऊन मरून पडावे हा राष्ट्रीय जीवनमरणाचा प्रश्न ह्या सनदशीर झगड्यात आहे. ह्यापुढे प्रत्यक्ष महायुद्धही बापडे फिके आहे, असे हिंदुस्थानचे मीठ खाणा-या प्रत्येक देशनिष्ठास वाटले तर त्यात काय वावगे होईल ?
हे स्वराज्य-युद्ध नुसते पार्लमेंटच्या चार भिंतींच्या आवारामध्येच चालून संपणार आहे असे नाही. हल्लीच्या महायुद्धाचे खंदक जरी युरोप खंड आणि त्याच्या सीमेवरच आहेत तरी त्याचा व्याप सर्व जगभर पसरला आहे. त्याचप्रमाणे ह्या सनदी युद्धाचे खंदक जरी पार्लमेंटच्या आवारात असले तरी ह्याचा व्याप आणि ह्याची तयारी सर्व ब्रिटिश रामराज्यभर पसरल्याशिवाय रहाणार नाही. कारण जरी वादी हा हिंदुस्थानचा रहिवासी असला तरी प्रतिवादी सर्व ब्रिटिश साम्राज्याचा रहिवासी आहे. इतकेच नव्हे तर हा प्रतिवादी प्रत्यक्ष हिंदुस्थानातही आपले हातपाय पसरून व घर करून स्थावर पदाला पोहोचला आहे. ही गोष्ट लक्षात घेतली असता हे युद्धमान पक्ष मुळीच समानबळ नाहीत हे दिसून येईल. आणि त्याप्रमाणे वादी पक्षाने आपली साधनसामग्री व मनुष्यबळ हल्लीपेक्षा किती तरी अधिक वाढविले पाहिजे, आणि हे युद्ध किती दीर्घ काळ टिकणारे आहे हे दूरदृष्टीने नीट न्याहाळून त्याचप्रमाणे आपली धीरोदात्त आणि गंभीर वृत्ती कशी राखली पाहिजे हेही ध्यानात आणणे भाग आहे. शेवटी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती अद्याप सांगावयाचीच उरली आहे. ह्या सनदशीर युद्धातील योद्धे भारतमंत्री आणि लॉर्ड सिडनहॅम अगर त्यांचे सल्लागार हे नव्हेत. हे केवळ सरकारपक्ष आणि प्रजापक्ष ह्यांचे फार तर वकील आहेत, इतकेच म्हणता येईल, किंबहुना खरे युद्ध सरकार आणि प्रजा ह्यांमध्ये माजलेले नसून वर सांगितलेल्या दोन तत्त्वांमध्ये माजलेले आहे. त्यातील वादीची म्हणजे नव्या स्वराज्य तत्त्वाची जुन्या जातिभेदाच्या तत्त्वावर जितक्या लवकर सरशी होईल तितका सरकारचा आणि प्रजेचा अधिकच फायदा होणार आहे. उलट तत्त्वाचा कायमचा पराजय होईल तर दोघांचाही तोटाच आहे. असे नसेल तर पार्लमेंटने हा कज्जा आपल्यापुढे मुळी येऊच दिला नसता. तथापि हे युद्ध तत्त्वांचे आहे म्हणून सरकार आणि प्रजापक्ष ह्यांनी ह्या युद्धाच्या नुसत्या तारा वाचीत व तमाशा पाहात बसून चालणार नाही. सरकारपक्षाने काय करावयाचे ते करावयाला सरकार दक्ष व तत्परच आहे. उलट प्रजापक्ष मात्र फार दुबळा आणि नवशिक्यांचा असल्यामुळे त्याने घ्यावी तितकी काळजी आणि खावी तितकी खस्ता थोडीच आहे. हिंदी प्रजेने विशेष ध्यानात ठेवण्याची जी गोष्ट ती ही की स्वराज्याचा खरा शत्रू जातिभेद हाच होय. जातिभेदाच्या पुरस्कर्त्याला इंग्रजीत ब्युरोक्राट हे नाव आहे. ह्या विचित्र प्राण्याचा सुळसुळाट जसा परकीयात तसा स्वकीयांतही आहे. हे आम्ही हिंदूंनी विशेष लक्षात बाळगले पाहिजे. नवीन स्वराज्य मिळविण्याच्या मार्गात जरी मुख्य अडचण परकीय ब्युरोक्राटांची आहे तरी हल्ली आमच्यावर स्वराज्यासाठी दात विचकण्याची पाळी आली आहे. ती आमच्यातील स्वकीय ब्युरोक्राटांमुळेच आली असे लोकमान्य टिळकासारखे स्वराज्यवादीही अलीकडे सांगू लागले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून तरी आमचे डोळे उघडून आमचा शत्रू बाहेर आहे की आत आहे हे आम्ही शोधून पाहिले पाहिजे. जातिभेदाचा पुरस्कार करणारा स्वकीय असो किंवा परकीय असो, काळा असो वा गोरा असो, स्वतःला उच्च म्हणवीत असो किंवा नीच म्हणवीत असो, तो कोणी असो आपल्या जातीचे हक्क सांगून राष्ट्रकार्याला विघ्न आणीत असेल तर तोच एक ब्युरोक्राट समजावा. आणि त्याच्या हातून जर काही होईल तर स्वराज्याच्या थडग्यावर मूठभर माती जास्तच पडेल. दुसरे काय होणार ? म्हणून आम्ही अंतर्मुख होऊन आमच्यातील जातिभेदांना ताळ्यावर आणल्याशिवाय आमच्या स्वराज्यवाद्यांना कायमचा जय मिळणार नाही. परकीय जातिभेदी उर्फ ब्युरोक्राट केव्हा केव्हा तर हिंदुस्थानातील जातिभेदामुळे गांजलेल्या लोकांची कीव करण्याचा आव आणून नवीनच निर्माण केलेले जातिभेदाचे एक अस्त्र स्वराज्याच्या किल्ल्यावर फेकतात आणि त्यांचा अनुवाद स्वकीय जातिभेदीही करावयास चुकत नाहीत. उलटपक्षी स्वराज्यवादाची तोंडपाटिलकी करण्यात प्रवीण पण आपआपल्या जातीच्या संचित हितसंबंधाला नुसत्या ठरावांच्या शब्दांचा चटका लागला तरी हाय हाय करणारे काही जातिभेदाचे गुप्त पुरस्कर्ते स्वराज्याच्या बाजूने लढण्याचा आव आणून आपली व इतरांची फसवणूक करीत असतात. कदाचित दोहों पक्षाकडील अशा गुप्त जातिभेद्यांचे संगनमत होऊन एकादा तह होण्याचा मोठा धोका आहे. हा तह म्हणजे स्वराज्य नव्हे तर स्वराज्याला पकडण्याला मांडलेला तो सापळाच म्हणावयाचा. स्वराज्य वाटेल तेव्हा मिळो, तूर्त ख-या स्वराज्यवाद्यांनी ह्या सापळ्यापासून तरी आपल्यास दूर सुरक्षित ठेवावे म्हणजे पुढच्या तयारीला बरे पडेल.