पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली

ऑक्सफर्ड

मुलांनो, दगडी कोळसा तुम्हांला पाहून, निदान ऐकून तरी माहीत असेलच. लोखंड आणि दगडी कोळसा म्हणजे इंग्रज लोकांचे हाड आणि मांस असे म्हणण्यास काही हरकत नाही. ह्या कोळशाच्या खाणी सुदैवाने ह्या लहानशा बेटात इतक्या विपुल पसरल्या आहेत की, ह्या राष्ट्राच्या जगड्व्याळ गरजा भागूनही त्या दरवर्षी अगणित खंडी बाहेरदेशी पाठविता येतात. आफ्रिकेतील हि-यांच्या खाणी घेऊन येथील कोळशाच्या खाणी घ्या, असे कोणी म्हटल्यास हे लोक कबूल होणार नाहीत! तर अशा ह्या अमोल द्रव्याची एकादी खाण आपण पाहू चला.

आपण सध्या मँचेस्टर शहराच्या उत्तरेकडे सुमारे ५ मैलांवर आलो आहो. हे पहा एक मोठे आवार आणि त्यातील पटांगण. मधोमध सुमारे २०-२५ फूट उंचीवर एक भले मोठे चक्र उभे फिरत आहे. त्या चक्रावरून भली भक्कम लोखंडी काढणी पृथ्वीच्या पोटात गेली आहे. बरोबर त्या चक्राच्या खाली जमिनीत सुमारे १० फूट लांब, रूंद, चौकोनी आडाप्रमाणे एक खळगा आहे. एकंदरीत हा सर्व देखावा एकाद्या साधारण रहाटगाड्यासारखा दिसतो. त्याशिवाय सभोवती ह्या पटांगणात दुसरे काहीच विशेष दिसत नाही आणि मी तर तुम्हांस येथे कोळशाची एक आश्चर्यकारक खाण दाखविण्यास आणिले! मुलांनो, निराश होऊ नका. आपल्या पायाखालीच पृथ्वीच्या पोटात सुमारे पाव मैलाखाली एक ३-४ मैल लांबीची भली मातब्बर खाण पसरली आहे बरे! ती पहा, आपणांस खाली नेण्याकरिता पाताळातून एक पिंज-यासारखी खोली आडाच्या तोंडाशी आली. मी तुमच्यासाठी मॅनेजर साहेबांच्या परवानगीची वगैरे सर्व व्यवस्था केली आहे. पहा, आम्ही परकीय पाहुणे म्हणून येथील लोक एकादी गोष्ट किती आदराने दाखवितात. आमचेबरोबर सांभाळण्यास एक स्नेही व स्वत: मॅनेजरही खाली उतरत आहेत, तर तुम्हांस भिण्याचे काही कारण नाही. पण थांबा, उतरण्यापूर्वी आधी तुमचे चांगले कपडे काढून जुने कपडे चढवा. कोळशाच्या धुळीमुळे ते खराब झाले तरी हरकत नाही. तुमच्या जवळ आगकाड्या अगर दुसरा कसलाही ज्वालाग्राही पदार्थ असल्यास तो वरच ठेवा. तो खाली तुमच्याजवळ निघाल्यास खाडकन् सर्वास कैदेची शिक्षा होईल हो!

चला, तर आपण पिंज-यात जाऊ. हे पहा आता ७ वाजून १५ मिनिटे झाली आहेत. आमच्यासकट एवढा मोठा पिंजरा, एकादा धोंडा जसा पडावा, तसा एका मिनिटात खाली जाईल. पहा, आपल्यास हा वेग दु:सह होऊ लागला आहे नव्हे! पोटात कालवते, उरात धस्स होते, डोके भणभणते, आमच्यात एकादी मुलगी असती, तर तिने किंकाळीच फोडली असती, आता आम्ही तळाशी पोहोचलो देखील! घड्याळात पहा ७-१६ मिनिटावर थोडी सेकंदे झाली आहेत! तरी आम्ही नवखे असल्यामुळे, पिंज-यास तितका वेग दिला नव्हता. कानात कशा कळा येऊ लागल्या आहेत, ऐकू अगदीच कमी येते! काते समजले काय! आम्ही पृथ्वीवर होतो, त्यापेक्षा आता १३२० फूट खाली आल्याकारणाने कानातील पडद्यावर हवेचे तितके जास्त दडपण पडत आहे व एका मिनिटातच हा फरक पडल्यामुळे किंचित कळा येऊ लागल्या आहेत. लवकरच ह्या दडपणाची सवय होऊन पूर्ववत ऐकू येईल.

हे खाणीचे तोंड एकाद्या अवीट बोगद्यासारखे दिसत आहे. कामदार, मजूर, घोडी व खटारे ही सर्व सारखीच भासत आहेत. सूर्याची येथे खबरही नाही, तथापि त्यावाचून काही अडलेले नाही. चहूकडे ग्यासचे तोडे पेटले आहेत. त्या उजेडात भिंती आणि छत ह्यांचा, गुळगुळीत पांढ-या विटांनी मढविलेला अर्धगोल स्पष्ट दिसत आहे. एकंदरीत आपल्यास आज एका नव्याच सृष्टीचा शोध लागल्याचा भास होत आहे. बाजूच्या तबेल्यात जाऊन आपण मूळ खाणीकडे जाण्याची तयारी करू या. ह्या तबेल्यात हल्ली अठरा घोडे कामावरून येऊन चंदी चरत उभे आहेत. येथे अत्यंत अवश्य तितकाच प्रकाश आहे. भिंतीवर कायसे हालत आहे, ते पाहिले काय? अहो ती झुरळे! उबट हवा, अंधार, माणसांची फारशी वहिवाट नाही अशा ठिकाणी ह्या अमंगळ प्राण्यांचा सुकाळ असणारच. मुलांनो! आपल्या शरीरात आळश व मनात अज्ञान साचू दिल्यास त्यात ह्या प्राण्यांहून किती तरी जास्त अमंगळ विचारांची हेंदर वाढते बरे! असो. खाणीचा गर्भ येथून सुमारे २ मैल लांब आहे. येथून पुढे कोठेही तुम्हांला प्रकाशाचे एक किरण अगर आगीची एकादी ठिकगीही नजरेस पडणार नाही. कारण खाणीतील वातावरणात कोळशाचा पेट घेणारा वायू केव्हा केव्हा बराच मिसळत असल्यामुळे त्याचा यत्किंचितही अग्नीशी संयोग झाल्यास मोठा प्रळय घडेल. पण कामक-यास दिसले तर पाहिजच म्हणून प्रत्येकाजवळ एक बत्ती दिलेली असते. ती अशा सुरक्षितपणे कंदिलात बसविलेली असते की, आतील ज्योतीचा बाहेरील वायूशी संयोग होत नाही. कामदार लोकांजवळ वुल्फ लॅप नावाचा नवीन निघालेला कंदील असतो. एकादे ठिकाणी जर ग्यास बराच सुटला असला, तर ह्या कंदीलातील दिवा आपोआपच नाहीसा होतो. व त्याप्रमाणे खबरदारी राखण्यास सापडते. हा दिवा पुन: आपोआपच पेटण्याचीही त्यात व्यवस्था असते. पहा मुलांनो, पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, असली महाभूते हल्लीच्य काळी माणसांची अगदी खेळणी झाली आहेत!

आपणही प्रत्येकजण एका हातात एक कंदील व दुस-या हातात टेकण्यास आखुडशी एक काठी घेऊन निघू या. बोगदा पुढे अगदी लहान होईल. तेथे तर आपणांस अगदी ओणव्याने जावे लागेल, तेव्हा काठीचा उपयोग होईल. ह्या खाणीचे नाव ‘डो’. हिच्यातील कोळशाचा मुख्य थर आठ फूट जाड व ५६० यार्ड लांब आहे. कोळशाच्या गाड्या ओढण्याला वाटेने लोखंडी रूळ टाकले आहेत. खुणेची घंटा वाजवून पाहिजे त्या ठिकाणी वर्दी पोहोचविण्यास भिंतीवर विजेची तार आहे. समोर एक कोळशाची ट्रेन येत आहे, म्हणून आपण जपून एका बाजूस उभे राहू या. एका
खटा-यावर ३ घनफुटांची एक पेटी आहे. तीत सुमारे ७ हंड्रेडवेट कोळसा भरला आहे. असे १८ खटारे एकच घोडा रूळावरून ओढीत खाणीच्या तोंडाशी जात आहे. नंतर तितकेही खटारे आपण वर प्रथम पाहिलेल्या रहाटगाडग्याने वर ओढून घेतात. प्रत्येक रात्री अशा १८ खटा-यांच्या २६ सफरी होतात. दिवसा त्याच्या दुप्पट! आणि असेच नेहमी.

चला आपण पुढे जाऊ. थोडे वर वळून पहा कोळशाचे कसे पहर सुटलेले आहेत! ते खाली कातरून पडू नयेत म्हणून भिंतीत भक्कम तुळ्या मारलेल्या आहेत. तथापि येथे कधी कधी कोण भयंकर अपघात होत असतील! आमच्या बरोबर असलेल्या स्नेह्याने आपल्यावर आलेल्या एका अरिष्टाचे नुकतेच वर्णन केले. ते कादंबरीकाराच्या कल्पनेतही येणार नाही. असो. आता येथे एक उंच डिगर लागली आहे. घोड्याचा येथे निभाव लागत नाही म्हणून खटारे पाठविण्याची कशी करामत लढविली आहे पहा. डिगरीवरून कोळशाच्या भरलेल्या गाड्या खाली धावत जाताना जी शक्ती उत्पन्न होते तिचाच उपयोग रिकाम्या गाड्या दुस-या बाजूने डिगरीवर ओढण्यात केला जात आहे. आणि ह्या प्रकारे ह्या  ३६ गाड्यांची घडोमोड एकटाच मनुष्य एका साध्या यंत्राच्या साहाय्याने मध्ये उभा राहून चालवीत आहे!

आणखी थोडे पुढे जाऊ या. येथे जागा फार कठीण आहे. घोडा फिरण्याला जागा नाही. वाफेचे यंत्र चालविणे म्हणून त्याहून धोक्याचे. म्हणून येथे एक मनुष्य पाण्याच्या जोराने यंत्र हाकीत आहे. आपण अंग सांभाळून ह्या कचाट्यातून पुढे थेट खाणीच्या गर्भात जेथे कोळसा उकरण्याचे काम चालले आहे तिकडे जाऊ या. आपल्या बरोबर खाणीतील दगाफटक्यासंबंधी जबाबदार तपासणीदार आहे. खाणीतील सुरूंग उडविण्याचेही काम त्याचेच आहे. इतरांनी खणून तयार केल्यावर हा तो भरून उडवितो. त्याचे आधी कोठे ग्यास बाहेर पडत आहे की काय, ह्याबद्दलची आपल्या दिव्याने तपासणी करतो. एका बाराने जवळ जवळ १० टनांचा कोळसा कातरला जातो. खाणीच्या मुळाशी काही विशेष पाहण्यासारखे काम चाललेले नसते. कोळसा उकरणे व भरणे, आणि निरूपयोगी जी भुकटी राहते ती वाटेतून दुसरीकडे रचणे ही खटपट चाललेली असते. पण ह्या चरकात जे प्राणी गुंतले असतात त्यांची स्थिती मात्र पाहण्यासारखी आहे. अंगावर केवळ लाज राखण्यापुरता कपडा, नखशिखांत कोळशाच्या भुकटीचा लेप, घामाच्या सारख्या धारा चाललेल्या. त्या रेघांतून ह्यांची जी अंगकांती, दिसते तेवढ्यावरूनच हे प्राणी, वरील जगात गाडीतून हिंडणा-या लॉर्ड साहेबांचे नातलग आहेत असे ओळखावयाचे.

मुलांनो, आमचे मानवी वैभव व ऐहिक ऐश्वर्य ह्यांची जी एकंदर इमारत आहे, तिचा पाया अशा काबाडकष्टाच्या आणि धोक्याच्या खंदकात रोविला आहे बरे! त्या पायाशी आम्ही नाही तरी आमचेसाठी दुसरे कोणी तरी निरंतर राबत असतात. आम्हीही आमचेपरी जर मनाने, नीतीने आणि शरीरानेदेखील असे न राबू तर आम्ही खातो ते अन्न आणि भोगितो ती सर्व सुखे निव्वळ हरामाची आहेत हे मी सांगावयास पाहिजे काय! ह्या खाणीत येऊन तुम्ही जे निरनिराळे सृष्टिनियमाचे व मानवी करामतीचे अदभुत चमत्कार पाहिले त्याबद्दल तुम्हांस आश्चर्य व आनंद झाला असेलच. पण त्यात काही विशेष नाही. ही दोन्ही जंगली माणसासही होण्यासारखी आहेत. पण अशी कृत्ये पाहून जर आम्हांस सर्व मानवी कुटुंबाबद्दल कृतज्ञता व धन्यता वाटली नाही आणि स्वत:ला नवा दम आणि ईर्षा आली नाही, तर आपण जगच्चालकाचे पदरी मोठे करंटेच म्हणावयाचे!

आता इतक्या खोलात, इतके विपुल जळण, तळघरात साठवून ठेवल्याप्रमाणे कोणी साठविले असावे, हे कोडे तुम्हांला पडले असेल. लक्षावधी वर्षापूर्वी पृथ्वीच्या पाठीवर जी दाट झाडी लागून गेली होती ती भूकंपाच्या जबर धक्क्यासरशी खाली खचून, अत्यंत दाबामुळे आता दगड होऊन राहिली आहे. ह्यासंबंधी माहिती मोठी चटकदार आहे. ती तुम्ही आपल्या वडिलास अगर शिक्षकास विचारा, सोडू नका.