सही नाही, सहानुभूती !

ईश्वरी संकेताप्रमाणे ज्या लोकमान्य टिळकांशी आदरपूर्ण विरोध-भक्तीशिवाय माझा कधी फारसा संबंध आला नाही, त्यांच्या आठवणी मी इतक्या लवकर प्रसिद्ध करण्याने सामान्य वाचकांचा तरी निदान समजापेक्षा गैरसमजच जास्त होईल अशी मला भीती आहे. म्हणून रा. बापट ह्यांच्या चिकाटीस मी प्रथम बळी पडलो नाही. पण शेवटी त्यांच्या स्तुत्य हेतूपुढे हार खाऊन मी पुढील आठवणी देत आहे.
ह्या लेखात मी लाघवी स्तुती व मत्सरी निंदा सारख्याच दूर ठेवून सात आठवणींचे एकंदर दहा पॅरे लिहिले आहेत. उद्देश हा की, ह्या थोर पुरुषावर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी वेळी अवेळी दुर्गुणांचा आरोप केला ते सर्वच आणि सर्वांशी खरे नाहीत, हे मी समक्ष पाहिलेल्या उदाहरणांनी दाखवावे. टिळक राजकारणांध, समाजकारण विन्मुख, धर्मसुधारणेचे वैरी, इतर जातींचे द्वेष्टे, आपल्या चुका कधीच दुरुस्त न करण्याइतके हेकट व मठ्ठ डोक्याचे, दुस-याच्या सत्प्रयत्नांकडे नेहमी मत्सराच्या विषारी दृष्टीनेच पहाणारे इ. नैतिक दोषारोप ऐकून माझे कान किटले आहेत. ज्या प्रसंगी मी त्यांच्याकडे अत्यंत निरखून पाहात असूनही हे दोष अति सूक्ष्म प्रमाणात दिसले असे काही, अंशतः दिसले असे काही व मुळीच दिसले नाहीत असे काही प्रसंग मी निवडले आहेत. अर्थात सार्वजनिक गुणच त्यांच्यात अधिक प्रमाणात होते हे मी निराळे सांगावयास नकोच. एरव्ही त्यांच्या शत्रूंनीही त्यांची गणना थोर पुरुषात कशी केली असती बरे? आणि मी तरी या आठवणींची उठाठेव का केली असती!
(१) ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्माचे अध्ययनासाठी हिंदुस्थानातील ब्राह्मसमाजाच्या मार्फत पाठविण्याची इ. स. १९०१ मध्ये जेव्हा माझी निवडणूक झाली तेव्हा तिकडे जाण्यापूर्वी श्री. बळवंतरावजींचे दर्शन घेऊन त्यांचे प्रत्यक्ष विचार ऐकण्याची मला इच्छा झाली. त्यावेळी ते (फूट नोट – लो. टिळक ह्यांच्या आठवणी व आख्यायिका – खंड २ रा – पृष्ठे २०० ते २०६.)
लोकमान्य झाले होते, तरी लोकमान्य ही पदवी प्रचारात आली नव्हती. मी एक लहानसा अप्रसिद्ध विद्यार्थी, आचारविचार, ध्येय वगैरेत त्यांच्याशी माझे मुळीच साम्य ना संबंध, अशा स्थितीत त्यांच्याकडे जाण्यात मी धाडसच करीत आहे, असे मला वाटले. धर्माध्ययनासाठी विलायतेस जातो ही गोष्ट ऐकून तर ते खात्रीने नाकच मुरडतील अशी खूणगाठ बांधून मी गेलो तेव्हा ते अगदी जुन्या रीतीने जमिनीवरच बसले होते. जणू काय फार दिवसांचा लोभ आहे अशा सलगीने त्यांनी मला ओढून अगदी आपल्याजवळ बसवून घेतले आणि सामान्यतः उदारधर्मासंबंधी व तुलनात्मक विवेचनपद्धतीसंबंधी अगदी मोकळ्या मनाने व तज्ञपणाने आपले प्रागतिक विचार मजपुढे बोलून दाखविले, इतकेच नव्हे तर आमच्या प्रार्थनासमाजासंबंधी देखील काही बाबतीत त्यांनी आपली गुणग्राहकता प्रकट केली. आमच्या हिंदुतत्त्वज्ञानात द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत इ. पुढे जे तट आणि उपासनेत शैव, वैष्णव, शाक्तादी पंथ माजले. त्या योगे आपली दृष्टी विकृत होऊ न देता व त्यांचे ऐतिहासिक महत्त्वही पण कमी न करता उपनिषद काळात हिंदूंची जी निर्भय व स्वतंत्र दृष्टी होती तीच राखून पौरस्त्य, पाश्चात्य आचारविचारांची तुलना करण्यास शिका, असा त्यांनी प्रेमाचा इषारा दिला. मला सानंद आश्चर्य वाटले.
(२) परत आल्यावर धर्म सुधारण्याच्या प्रयत्नाशिवाय अस्पृश्यता निवारणाचा विशेष प्रयत्न व त्यांची देशभर घटना करण्याचे काम मी चालविले. त्याला त्यांनी स्वतः कधी विरोध केला नाही, उलट प्रसंगविशेषी न मागता वर्गण्या पाठवून दुरून का होईना पण सहानुभूती राखिली होती. इ.स. १९०७ च्या सुमारास पुण्यास जी. रा. भाजेकर, डॉ. मॅन प्रभृतींनी मद्यपानाविरोधी पिकेटिंगची जोराची चळवळ चालविली होती, त्यात लोकमान्यांची पूर्ण मदत होती. ह्याचसंबंधी मुंबईस करीरोड स्टेशनजवळ गिरणी कामगारांच्या एका प्रचंड जाहीर सभेपुढे त्यांचे आवेशयुक्त भाषण झाले. दुसरेच दिवशी ते आमचे परळ येथील मिशन पहाण्यास येणार होते, पण लवकरच त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना सहा वर्षे कारागृही जावे लागल्याने तो योग आला नाही.

(३) पुढे इ. स. १९१६/१७ च्या सुमारास लखनौच्या काँग्रेसमध्ये हिंदु-मुस्लीम स्कीम पास झाली, त्यात रा. बळवंतरावजींचा पुढाकार होता. ह्या स्कीमला बहुजनसमाजाचा पुरस्कार नाही, केवळ वरिष्ठ वर्गातील चार सुशिक्षित चळवळ्यांनीच हे काहूर माजविले आहे असे अर्थाचे आक्षेप इंग्लंडातील सुधारणाद्वेष्ट्यांकडून घेण्यात येत होते. माँटेग्यूसारख्या सुधारणावाद्यांनाही अशा आक्षेपास हिंदुस्थानातील बहुजन समाजाकडून उत्तर जावयास पाहिजे होते. अशा आणीबाणीच्यावेळी मद्रासेकडील चळवळीच्या अनुरोधाने महाराष्ट्रातही ब्राह्मणेतर पक्षाची अगदी नवीन घटना चालू होती. पण ह्या पक्षाकडून राष्ट्रीय सभेला पाठिंबा मिळण्यासारखा नव्हता व ह्या पक्षाचे भावी सामर्थ्य व महत्त्व ओळखण्याइतकी दूरदृष्टी व भरीवपणा तेव्हाच्या कोणत्याही विद्येत पुढारलेल्या पक्षात आलेला नव्हता. म्हणून मागासलेल्या सर्व जातींना किंबहुना अस्पृश्य मानलेल्या वर्गातील सर्व जातींनाही तेव्हाच्या राष्ट्रीय मुहूर्ताचे महत्त्व समजावून देऊन स्वराज्याच्या योजनेला लहान-थोर सर्वांची सहानुभूती मिळविणे आम्हाला भाग पडले. ता. २६ ऑक्टोबर १९१७ रोजी सायंकाळी ५ वाजता शनिवारातील रा. बोमे पाटील ह्यांचे घरी "मराठा राष्ट्रीय संघाची" स्थापना झाली. संघाचे पहिले काम म्हणून गुरुवार ता. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाज्यासमोरील भव्य पटांगणात शहरात व भोवतालच्या भागात रहाणा-या सर्व जातींच्या, धर्माच्या व पंथांच्या लोकांची सभा भरली होती. लखनौ येथे राष्ट्रीय सभेने पास केलेल्या स्वराज्याच्या योजनेस पुष्टी देणे हा ह्या सभेचा उद्देश होता. सभेस सुमारे दहा हजारांपर्यंत लोकसमुदाय हजर असावा असा अंदाज आहे. रा. त्रिंबकराव आवटे वगैरे मंडळी लोकमान्यांकडे गेली. ही चळवळ तेव्हाच्या राष्ट्रीय पक्षाच्यामार्फत व्हावी असा मला लोकमान्यांचा रोख दिसला तो मला इष्ट वाटला नाही, कारण अशा ह्या चळवळीच्या बहुजनमान्यतेला व स्वतंत्रपणाला बाध येऊन तिने दिलेल्या स्वयंप्रेरित पाठिंब्यालाही उणेपणा येईल असे मी आपले स्पष्ट मत लोकमान्यांना कळविले. मराठे, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग, सुतार, सोनार, शिंपी, प्रभू, माळी, वंजारी, चांभार, कासार, कोष्टी, रामोशी, गवळी, परीट, गुजर, वारकरी संप्रदाय इतक्या १८ जातींचे व संप्रदायांचे प्रत्येकी दोन दोन असे वक्ते मुख्य ठरावावर बोलले. केवळ ब्राह्मणांचे प्रतिनिधी ह्या नात्याने लोकमान्यांनी बोलावे अशी मी ह्या सभेचा अध्यक्ष ह्या नात्याने विनंती केली व ती त्यांनी आपला पक्षाभिमान तात्काळ बाजूस ठेवून मान्य केली. "आता आपल्याला पूर्वीचे स्वराज्य नको असून पाश्चात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे आहे." असे सांगून ते म्हणाले, "आपल्या जातिभेदामुळेच येथे ब्रिटिश राज्य स्थापन झाले आहे व जातिभेद असाच पुढे चालू राहाणार असेल तर स्वराज्यातही आमची अशीच अधोगती होईल," असे स्पष्ट बोलून त्यांनी आपली समयानुकूलता प्रकट केली !
वरील उतारे मराठा राष्ट्रीय संघाच्या नियमाच्या पुस्तकातून घेतले आहेत.
(४) टिळक राजकारणात होते किंवा राजकारणाच्या देवीपुढे समाजसुधारणेचे वासरू मारण्याकरिता त्यांचा हात नेहमी वर होता असे नव्हे, हे दाखविण्याकरिता मी खालील आठवण देत आहे.
सन १९१७ साली राष्ट्रीय मराठ्यांची पहिली अखिल भारतीय परिषद आम्ही बेळगावास भरविली. अर्थात टिळकांचे बगलबच्चे व "ब्राह्मणाळलेले" ह्या आरोपाच्या आहेराची पुष्कळशी पार्सले आमच्याकडे आली. इतक्यात अथणीची जिल्हा परिषद थाटाने झाली, तेथे लोकमान्य होते. राष्ट्रीय मराठे ह्या दृष्टीने टिळक कंपूने त्यावेळी आमची किंचित जास्त बडदास्त राखली, हे खरे. मी तर त्यावेळी टिळकांचा पंचीप्याराच बनलो होतो ! पण मुद्द्याची गोष्ट पुढेच आहे. टिळकांचा राजकारणांधपणाचा नंबर कोणता लागतो हे पाहण्याची मी ह्यावेळी अमोलिक संधी साधली. त्यांना मी अगदी एकांतात नेऊन विचारले की, डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम सोडून देऊन मी स्वतःला केवळ राजकारणालाच वाहून घेऊ काय ? त्यांनी तात्काळ "नको" म्हटले ! कित्येकांना ह्या उत्तरातही अट्टल राजकारणाचाच वास येण्याचा पूर्ण संभव आहे. पण ह्या विषयावर मन मोकळे करून एक तासभर टिळक जे बोलले ते सारे मायावी म्हणण्याइतके शाट्य त्यांच्यात नव्हते, उलट होते असे म्हणणारातच ते असण्याचा संभव मला दिसू लागला. भाषणाचा तपशील देण्यात अर्थ नाही. डिप्रेस्ड क्लासेस मिशनवर केसरीकार म्हणून नसला तरी टिळक म्हणून त्यांचा विश्वास बसून चुकला होता, व तो त्यांनी खालील आठवणीत दाखविल्याप्रमाणे मिशनच्या परिषदेत भाग घेऊन व्यक्त केलाही.
(५) पुढील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरली. हिचे मूळ किंचित मनोरंजक आहे. डॉ. कुर्तकोटी हे करवीर पीठाचे शंकराचार्य असताना एकदा आपल्या लवाजम्यासह मुंबईतील कोल्हापूर महाराजांच्या पन्हाळा लॉजमध्ये येऊन उतरले. पूर्वाश्रमीचे ते माझे मित्र असल्याने, त्यांनी मला भेटीस बोलाविले. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर अस्पृश्यता निवारणीची एक परिषद मोठ्या प्रमाणावर भरवावी व सर्व हिंदुस्थानात स्वतंत्रपणे भटकत मी लोकमत अजमावून पहावे व ह्या बाबतीत काही प्रत्यक्ष पुरावा मिळवून दिल्यास आपण शंकराचार्य ह्या नात्याने आज्ञापत्र काढू, मात्र ह्या कामी लोकमान्याचे सहकार्य मी संपादन करावे असा त्यांचा सल्ला होता. शकराचार्यांच्या आज्ञापत्राची देशस्थ व कोकणस्थ ब्राह्मणांमधील बेटी व्यवहाराचे बाबतीत कशी वासलात लागली हे मला माहीत असल्याने अशा आज्ञापत्राचे मला महत्त्व वाटेना. लोकमान्यांच्या सहकार्याविषयीही शंका नव्हती. तथापि मोठ्या प्रमाणावर एक स्वतंत्र परिषद करून देशातील प्रांतोप्रांतींच्या सर्व जातींच्या वेचक प्रमुख गृहस्थांच्या सह्या एका स्पष्ट अखिल भारतीय जाहीरनाम्यावर घ्याव्या असे मला बरेच दिवस वाटत होतेच. मी ह्या कार्यास ताबडतोब लागलो. लोकमान्य त्यावेळेस इंग्लंडला जाण्याच्या गडबडीत होते तरी ते वेळात वेळ काढून एकदा मजबरोबर पन्हाळा लॉजमध्ये श्रींचे दर्शनास गेले. श्रींपुढे सुमारे २/३ डझन नारळांनी भरलेली ताटे ठेवून लोकमान्य आदराने बसलेले पाहून मला कौतुक वाटले. आमच्या तिघांच्या विचारे परिषद भरली. पण अखेरीस शंकराचार्यांना येण्याला अवसर मिळाला नाही. तरी परिषद यशस्वी रीतीने पार पडली. इतर कामाच्या गर्दीत लोकमान्यही पुण्याहून मुद्दाम मुंबईस जाण्यास काकू करू लागले. पण मी देणेक-याप्रमाणे धरणेच घेतल्यामुळे बिचारे करतात काय ? लोकमान्य होणे हे सुखाचे नाही. तो काट्याचा मुकूट डोईस कसा खुपतो, विशेषतः पुढे जाहीरनाम्यावर सही करण्याचे नाकारताना हा मुकूट त्यांच्या कपाळावर कसा रुतला हे माझ्या प्रत्यक्ष दृष्टीस आले, कारण केसरीकर्ता म्हणून नव्हे तर केवळ टिळक म्हणूनच मी परिषदेस येतो असे बजावून सांगण्यास लोकमान्य विसरले नाहीत.

काँग्रेसने अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी घेऊन आपल्या कार्यास त्यांचा पाठिंबा मिळवावा अशा अर्थाचा ठराव लोकमान्यांनी ता. २४ मार्च १९१८ रोजी सकाळच्या बैठकीत आणिला. त्यावेळी लोकसमुदाय ७००० वर जमला होता. मंडपाच्या बाहेरही सारखी रेटारेटी चालू होती. लोकमान्यांसही आवेश चढून त्यांच्या गर्जना मंडपाबाहेर रस्त्यातच नव्हे तर पलीकडील चाळीत राहणा-या लोकांच्या कानांवरही आदळत होत्या. "पेशव्यांच्या वेळीही अस्पृश्यांनी भरलेल्या पखालीतील पाणी ब्राह्मण प्याले".... अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्यास देवच म्हणणार नाही. (हे उद्गार ऐकून जो गजर उडाला त्यात मंडप कोसळून पडतोसे वाटले) ...... मी येथे जरी आज शरीराने प्रथमच आलो आहे, तरी मनाने ह्या चळवळीत नेहमीच आहे..... जुन्या काळी ब्राह्मणाच्या जुलुमाने ही चाल पडली, हे मी नाकारीत नाही. पण ह्या रोगाचे आता निर्मूलन झालेच पाहिजे. वगैरे त्यांच्या तोंडचे शब्द भावी इतिहासात दुमदुमत राहतील.
पुढे मी जाहीरनाम्यावर त्यांची स्वतःची सही घेण्यास गेलो. त्यावेळी सरदारगृहात लोकमान्य होते. भोवताली त्यांची प्रभावळ बसली होती. तात्यासाहेब केळकरच नव्हे तर दादासाहेब खापर्डे ह्यांनी देखील आपला नबाबी हुक्का एकीकडे सारून तात्काळ आपली सही केली. पण लोकमान्य कचरू लागले. एक वेळ ते पुढेही आले पण दादासाहेब करंदीकर आडवे आले. शेवटी लोकमान्य अगदी काकुळतीला येऊन उभे राहून त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेविले व आर्जवू लागले की, इंग्लंडातून परत येईपर्यंत तरी मी हा आग्रह सोडावा." मी त्यांना स्पष्ट बजावले की, सही न देण्याने त्यांना स्वतःलाच नव्हे तर त्यांच्या पक्षालाही खाली पहावे लागणार आहे. पुढे माझ्या समजुतीसाठी मला एकट्यालाच एका दालनात नेऊन सामाजिक सुधारणेशी आपला कसा संबंध आहे हे नागपूरच्या पहिल्या काँग्रेसपासून सुधारकांच्या कंपूतून आपण कसे फुटलो व का फुटलो तरी आपण सुधारकच कसे आहो वगैरे बराच चित्ताकर्षक खासगी वृत्तांत निवेदन केला. तो सर्व देण्याला येथे अवकाश नाही. पण अखेर सही दिली नाहीच. पुढे ह्या सर्व प्रकरणाला "जागरूक"कारने ही शिंद्यांची सर्कस अशा जाड्या टाईपातले नाव दिले ह्यात काय आश्चर्य !
(६) लोकमान्य इंग्लंडाहून परत पुण्यात येतात तोच येथे सक्तीच्या शिक्षणाची धुमश्चक्री चालू होती. पुण्याच्या म्युनिसिपालिटीत महाजंगी वाद, सबकमिट्यांच्या बैठकी, आकडेमोड, नागरिक सभा इ. प्रकार होऊन शेवटी एके दिवशी बायकांची एक प्रचंड मिरवणूक निघून तिने म्युनिसिपालिटीत चाललेल्या एका साधारण सभेस गराडा दिला. अखेर शहराकडे रेक्लेम पाठविण्याचा विचार घेण्यासाठी विरुद्ध पक्षाने किर्लोस्कर थिएटरात एक जाहीर सभा बोलाविली. त्यावेळी बळवंतरावजी सिंहगडावर आजारी होते. तरी चालकांनी त्यांना सभेत मुद्दाम आणिले. मी त्यांचेजवळ बसलो होतो. त्यांनी ह्या दगदगीत पडावयाचे नव्हते, असे सांगून निदान त्यांनी ह्या खवळलेल्या वातावरणात बोलण्यास तरी उभे राहू नये म्हणून मी पुष्कळ विनवले. पण तरी ते बोलू लागताच मागून एक तरुणांचा तांडा तुटून आमच्या अंगावर बेफाम आला व पुढूनही अंड्यांचा आणि भज्यांचा मारा होऊ लागला. शेवटी लोकमान्यांना बाहेर काढून कशीबशी सभा मध्येच बंद करून चालकांना घरी जावे लागले.
(७) माझी त्यांची शेवटची भेट सोलापुरास गेल्या प्रांतिक सभेच्यावेळी झाली. तोही धामधुमीचाच प्रसंग होता. सक्तीच्या शिक्षणाचे बाबतीत मी ज्ञानप्रकाशात त्यांच्या विरुद्ध फार कडक लेख उघड सहीवर लिहिले. ह्याबद्दल ते मजवर फार रागावले होते, हे मला पुरे माहीत होते. तरी लवकरच एक अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत मोठे सहभोजन करण्याचा बेत काही पुढा-यांनी केला होता. अशा भोजनात मला स्वतःला काहीच महत्त्व वाटत नव्हते व अद्यापि नाही, तरी पण लोकमान्यांना अशा भोजनाला बोलवावे व ते काम मीच करावे अशी मला मंडळीने गळ घातली व मी त्यांच्याकडे गेलोही. लोकमान्य वरून कठोर पण आतून कोमल किती होते ते मला तेव्हा नीट नजरेस आले. सुरतच्या काँग्रेसमध्ये किंवा वर वर्णिलेल्या किर्लोस्कर थिएटरातील सभेत किंवा तशा इतर प्रसंगी विरूद्ध असलेल्या प्रचंड जनसमुदायापुढे ते कधी नमत नसत. जुलमी सरकारची ज्यांनी कधी भीड राखिली नाही तेच बळवंतराव एकाद्या लहानसहान प्रसंगी एकाद्या व्यक्तीच्या भिडेस पडून अगदी मवाळ होत ! ते कसेही असो. त्यांची रागाची पहिली तुफानी फैर मजवर झडून गेल्यावर ते लगेच शांत झाले, आणि सोलापुरासच काय पण प्रत्यक्ष पुण्यासही असे सहभोजन झाल्यास त्यांनी आनंदाने येण्याचे कबूल केले. जाहीरनाम्यावर सही न करण्याने त्यांच्यावर जे वर्षभर काहूर माजले होते ते सर्व ह्या सहभोजनात मिळून पचविण्याचा त्यांचा मुत्सद्दी विचार मला कळला. पण उपयोग काय ! काळाने त्यांच्यावर लवकर झडप घातल्याने सर्व ग्रंथ आटोपला, आता नुसत्या आठवणी उरल्या !