ह्या विषयावर ‘स्पष्टवक्त्याने’ उपस्थित केलेल्या वादासंबंधी माझे मत आपण विचारून बरेच दिवस झाले. आज प्रसिद्धपणे ह्या विषयावर अशी वाच्यता करण्याची मला स्वतःला मोठीशी आवश्यकता दिसत नाही. तथापि तुमचा इतका सद्हेतुपूर्वक आग्रह आहे, ह्यामुळे फायदा होईल असे इतर काही मंडळीलाही वाटत आहे, आणि ह्यात फायदा नाही तरी तोटाही नाही असे स्वतः मलाही वाटत असल्यामुळे खालील चार ओळी आपल्याकडे पाठविल्या आहेत.
(१) समाज अप्रिय असल्यास तो का ? हा विषय घेऊन त्याचा खल करीत बसण्यापेक्षा समाजाची प्रगती होत नसल्यास ती का ? ह्या विषयाचा खल होणे अधिक योग्य व इष्ट होते असे मला वाटते. तथापि प्रस्तुतच्या वादात पहिल्या नावाखाली दुस-या विषयाचा बराचसा भाग येऊन गेला आहे. एकाद्या संस्थेची लोकप्रियता व तीची प्रगती ह्यांचा वस्तुतः अगदी आवश्यक कार्यकारणसंबंध असतोच असे नाही. ख्रिस्ती समाजाची गेल्या शतकात ह्या देशात आम्ही ह्या गोष्टीकडे किती जरी डोळेझाक केली तरी—पुष्कळ प्रगती निदान प्रसार तरी झाला आहे. ह्यावरून त्याची लोकप्रियता वाढली म्हणून प्रसार झाला असे मुळीच नाही. उलटपक्षी, राजकीय सुधारणा व काही अंशी सामाजिक सुधारणा इत्यादी गोष्टींची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे पण त्या मानाने त्यांची प्रगती होते असेही म्हणवत नाही. तिस-या पक्षी आर्यसमाज पूर्वीप्रमाणेच आताही अप्रिय आहे पण त्याची वाढ पुष्कळ झाली आहे. चवथ्या पक्षी केवळ लोकप्रियतेच्याच जोरावर भराभर वाढलेल्या पण दुसरे काही सत्त्व नसल्यामुळे आता हटत चाललेल्या ब-याच चळवळींचा उल्लेख करिता येईल. असो. एकंदरीत प्रियता व प्रगती ह्यांचे काही म्हणण्यासारखे साहचर्य नाही. म्हणून प्रगतीची बाजू अगदी एकीकडे ठेवून केवळ प्रिय व अप्रियतेचाच येथे मला विचार विषयाच्या नावामुळे नाईलाजाने करावा लागत आहे. (फुट नोट – सुबोध पत्रिका ८-४-१९०६)
(२) अप्रिय ह्या शब्दाने दोन अर्थ मनात येतात, एक समाजाचा लोक अगदी द्वेष करितात असा आणि दुसरा, समाज लोकांना प्रिय नाही असा. म्हणजे लोकांची समाजाकडे ओढ नाही असा. आणि दुसरा समाज लोकांना प्रिय नाही असा. पहिल्या अर्थान्वये समाज अप्रिय आहे असे माझ्या जरी अल्प अनुभवावरून दिसत नाही तरी काही अप्रबुद्ध विद्यार्थी व अशिक्षित माणसे प्रसंगविशेषी समाजाचा—त्यातील काही व्यक्तींविषयी तिटकारा दाखवीत असतील. मागे आरंभी समाजाचा द्वेष लोकांनी केला असेल, पण हल्ली केवळ द्वेषाचा प्रकार क्वचितच आढळतो. दुस-या अर्थाने समाज अप्रिय आहे व हे साहजिकच आहे.
(३) आता ह्या अप्रियतेच्या कारणासंबंधी ज्या कोट्या नेहमी लढविण्यात येत आहेत त्या मला स्वतःला अगदी व्यर्थ दिसत आहेत. त्यांत दोन मुख्य आहेत, त्या ह्या. समाजाचे विचारविधी, अध्ययन, अध्यापन, उपदेशाचे वेळी घेतलेले वेचे ह्यांमध्ये देखील परावलंबीपणा व परकीयानुकरण आहे म्हणून समाजाकडे लोकांचे मन घेत नाही. ही कोटी दोन्ही बाजूंनी बरोबर नाही. एक तर वस्तुस्थिती अशी आहे की, समाजातील स्वकीय आणि परकीय विचारांच्या विधींची आणि वेच्यांची जर खरोखर गणती केली तर पहिली बेरीज दुसरीपेक्षा कितीतरी मोठी होईल ! इतकी की समाजाने जरी सार्वत्रिक धर्म स्वीकारला आहे तरी व सर्व साधू व सर्व धर्मपंथ समाजाला सारखेच मान्य असावयाला पाहिजेत तरी, संवय, परिस्थिती, शिक्षण, आनुवंशिक संस्कार इ. च्या जोराने समाज ह्या बाह्य गोष्टीत अद्यापि केवळ हिंदूच आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे ब्राह्मधर्म जरी सनातन व सार्वत्रिक आहे तरी हिदुस्थानातील ब्राह्म लोक अथवा इंग्लंडातील युनिटेरियन लोक ह्यांच्या सामाजिक पद्धती व गृहकर्मे ही तद्देशीयच आहेत व तसे नसणे शक्यही नाही. इंग्रजी वाङ्मयाची व शिक्षणपद्धतीची छाप सर्व हिंदुराष्ट्रावरच बसून गेल्यामुळे इतर बाबतींप्रमाणे समाजरचनेतही एक दुस-याचे अवलंबन कदाचित जास्त करीत असेल. तथापि दोन्ही देशांतील उदार धर्माचे समाजात अद्यापि पुष्कळच एकदेशीयता आहे. नुकताच युनिटेरियन लोकांच्या इनक्वायरर पत्रात, उपासनेच्या वेळी जे पीठावरून पवित्र ग्रंथांतील उतारे वाचावयाचे ते बायबलातूनच घ्यावेत की दुस-या कोणत्याही प्रासादिक ग्रंथातून घ्यावेत अशाविषयी पुष्कळ पत्रव्यवहार होऊन शेवटी बहुमताचा कल हल्लीची एकदेशीयता सोडली पाहिजे असे जोराने प्रतिपादण्याकडेच होता. दुस-या बाजूने ह्या कोटीचा पोकळपणा असा दिसून येतो की समाजात जे वेचे घेण्यात येतात किंवा विवेचन करण्यात येते त्यांत समाज स्वकीयांचे अनुकरण करीत आहे की परकीयांचे ही काही ऐकणा-यांनी शोधून पहाण्याची मुख्य गोष्ट नव्हे. तर समाज केवळ नक्कल करीत आहे की मनोभावाने म्हणा किंवा प्रसंगवशात प्रेरित झाला आहे ही आहे. केवळ नक्कलच असल्यास ती स्वकीय काय परकीय काय, जुनी काय नवी काय, सारखीच अप्रीतीला कारण झाली पाहिजे.
पण उलट जर ख-याखोट्याचा विचार न करिता केवळ स्वकीय परकीयावरच प्रीती अप्रीतीचे तरंग उठू लागले तर तो दोष वस्तुस्थितीचा नसून लोकदृष्टीचा म्हणावा लागेल, किंबहुना स्पष्टवक्त्यांच्या कोटीचाही म्हटल्यास चालेल. ह्या प्रकारचा समाजावर जो अनुकरणाचा आक्षेप आहे तो वस्तुतः व विचारतः दोन्ही दृष्टीने माझ्या अल्पमतीला बरोबर पटत नाही.
(४) दुसरा आक्षेप समाज मतांप्रमाणे कृती करीत नाही. म्हणून अप्रिय झाला आहे. ह्या बाबतीत मी समाजाची मुळीच तरफदारी करीत नाही व कोणी सभासदाने कधी केली आहे असे मला आठवत नाही. उलट मताबरोबर कृती न ठेवल्यास समाजाची प्रगती कधीच न होता कृतीविना उगाच मतांचाच गोंधळ माजविल्यास समाज नष्ट होईल हे तो जाणून आहे, व ह्या बाबतीत कोणी कितीही फुकाचे स्पष्ट भाषण करून काही अधिक मिळेल असे होणार नाही. पण मताप्रमाणे कृती अधिक केल्याने समाज लोकांत अधिक प्रिय होईल ही आशा मात्र मला व्यर्थ दिसते. वरच्याप्रमाणेच ही कोटी देखील मला विचारतः व वस्तुतः निराधार दिसते. चोरी करणे हे वाईट असे लोकांचे खरोखर मत आहे. मी उद्या चोरी करणे चांगले असे प्रतिपादू लागलो तर अप्रिय होईन आणि परवा जर खरोखरीच चोरी केली तर मी प्रिय होईन काय ? बरे जातिभेद मोडणे व चोरी करणे ह्या दोन गोष्टींत लोकमतांच्या दृष्टीने सादृश्य नाही असे म्हटले, कारण जातिभेद मोडणे चांगले एवढे म्हटल्याने कोण अप्रिय होत नाही, मात्र प्रत्यक्ष मोडू लागल्याने होतो तर तेथेही वरची कोटी कशी लागते ? ज्या लोकांना आमची मतेच अप्रिय आहेत त्यांना आम्ही कृतीने कसे प्रिय होणार ? त्यांची मतांसंबंधी अप्रीती खरी असेल तर आम्ही कृती करू लागल्यावर तर ते आमचा अगदी द्वेष करू लागतील. लोकांची अप्रिती जर खरी अंतःकरणापासून नसली, वरवर दाखविण्यातच असली तरीदेखील आम्ही कृतीने कसे जास्ती प्रिय होऊ ? ज्यांच्यात मतांबद्दल प्रीती दाखविण्याइतके धैर्य नाही किंवा सरळपणा नाही त्यांची कृती पाहून काय वाट होणार ? काय झाली त्याचा थोडासा अलीकडे अनुभवही आहे. आता जे लोक भित्रे आहेत पण सरळपणे आपला भित्रेपणा मनात किंवा जनात कबूल करतात अशांना समाज मुळी अप्रिय नाहीच. ज्या अंशाने समाजाची कृती त्या अंशाने हे समाजाचे अभिनंदन करतात व जेथे कृती होत नाही तेथे अनुकंपा दाखवितात. असो. एकंदरीत ह्या बाबतीत लोकप्रीतीचा हिशेब करीत बसणे अप्रयोजक आहे. आता वस्तुतः ही ह्या कोटीची निराधारता आहे ती अशी. प्रार्थनासमाजापेक्षा ब्राह्मसमाजात कृती अधिक आहे व अशी प्रसिद्धीही आहे म्हणून ब्राह्मसमाज बंगाल्यात अधिक प्रिय आहे काय ? उलट तो तिकडे किती अधिक द्वेषाला मात्र पात्र झाला आहे हे तिकडे त्यांची जी अप्रबुद्ध माणसांकडून नालस्ती करण्यात येते त्यावरून दिसते, व चांगल्या प्रबुद्ध माणसांचाही त्याच्यावर असा आक्षेप येतो की समाज कृती करून एकलकोंडा झाला हे फार वाईट झाले. तुकाराम म्हणतात, “लोक जैसा ओक धरिता धरवेना” हे खरे आहे. ह्यावरून समाजाने कृती करण्यात हेळसांड करावी असे माझे मुळीच म्हणणे नाही. कृतीवरच सर्व प्रगती अवलंबून आहे असे वर म्हटले आहेच. जसजशी कृती व सत्प्रयत्न जास्त करू तसतशी सभासदांची व हितचिंतकांची संख्या वाढेल म्हणजे समाज मोठा होईल किंवा प्रगती होईल की जशी आर्यसमाजाची होत आहे. पण ह्या पलीकडे बहुजनसमाजात तो कधी प्रिय होईल असा तूर्त संभव दिसत नाही.
(५) मग ह्या अप्रियतेचे कारण काय असावे बरे ? ह्यात काय मोठेसे गूढ आहे असेही नाही. ह्याची चर्चाही नको होती. आरंभीचा नेणतेपणामुळे जो द्वेष होता तो बहुतेक नाहीसा झाला आहे. मागे उरलेली पंगू अप्रियता अशी रहाणारच. तिचे कारण मानवी स्वभावाचा स्वयंभू सुस्तपणा हेच होय. समाज जसजसा आपली स्वतः सुस्ती टाकून प्रयत्न करील तसतसा तो स्वतः मोठा होईल, पण दिवा किती मोठा केला किंवा लहान केला तरी त्याने प्रकाशित केलेल्या प्रदेशापलीकडे जसे नैसर्गिक अंधःकाराचे अपार वलय रहाणारच. तसे ह्या समाजाभोवती ह्या प्राकृत अप्रियतेचे वलयही रहाणारच. आणि जेव्हा ह्या समाजाचाच जीवनाग्नी विझून जाऊन मागे, जसे उत्तरेस शीख समाजाचे व दक्षिणेस लिंगायत समाजाचे केवळ जड शरीर मात्र उरले आहे तसे ह्याचेही उरेल, तेव्हा तद्वतच हाही प्रिय आहे की अप्रिय आहे व तो का ? इ. सर्व वाद मिटून जाईल. बरे उलटपक्षी ह्याचा भडका हिंदुस्थानवर होऊन ईश्वरी योजनेने ह्याच्या जीवनज्वाला जरी चारी खंडांत पसरू लागल्या तरी म्हणजे हे अप्रियतेचे वलय नाहीसे होईल थोडेच. ख्रिस्ती समाजाचे उदाहरण आपल्यापुढे आहे व तो इतका जरी पसरला आहे तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या भोवतालच्या प्रदेशात तो अप्रिय असणारच व आहेही. तोच बुद्धधर्म बिचारा थंड झाला आहे, त्याचे कोणीही वाटेस जात नाही.
(६) ह्यावरून लोकप्रीतीचा मी वाजवीपेक्षा अधिक अनादर करतो असे नाही. उलट प्रत्येक व्यक्तीने आपल्या तत्त्वास व कर्तव्यास बाध न येईल अशा रीतीने शक्य तेवढी लोकप्रीती अवश्य संपादन करावी व हे ज्यांना साधते ते धन्य होत असे मला वाटते आणि ते न साधल्यामुळे ते उगाच लोकप्रीतीचा अनादर करतात किंवा अशा विरळा धन्य पुरुषाला नावे ठेवितात त्याचे करणे कोल्ह्याने द्राक्षे आंबट ठरविण्याप्रमाणेच होय हेही मी कबूल करतो. पण ही सर्व व्यक्तीची गोष्ट झाली. समाजाला, विशेषेकरून धार्मिक समाजाला असे प्रिय होणे शक्य नाही. एकादा गायनसमाज प्रिय होईल. एकादी साहित्यपरिषद प्रिय होईल. पण धार्मिक समाज प्रिय होणार नाही. कारण झाला तर तेवढा प्रीतीचा प्रदेश—ती प्रीती खरी असेल तर—त्या समाजात समाविष्ट होतो व त्याच्या भोवतालचे वलय पूर्वीपेक्षा अधिकच मोठे होते एवढेच मला म्हणावयाचे.
शेवटी माझ्या समाजबंधूंनी आपल्या अंतर्याम-देवतेने प्रकाशित केलेली पायवाट धीराधीराने क्रमीत पुढे जावे, भोवतालच्या तमोवलयाकडे पाहून उगाच वेळोवेळी आपले व आपल्या सोबत्याचे पाय गाळू नयेत किंवा ह्या रात्रीच्या विस्तीर्ण आकाशातील दूरदूरच्या मोहक ता-यांची गणना करण्यात किंवा तद्विषयक वाद माजविण्यात आपला अमोल वेळ दवडू नये ही एक विनवणी आहे.