प्रेमसंदेश

आजच्या व्यख्यानाच्या विषय प्रेमसंदेश हा आहे. प्रेमाचा संदेश म्हणजे काय हे भाषेने स्पष्ट करून सांगणे कठीण आहे. एकादे लहान मूल रस्त्यामध्ये रडत असता आपण त्याला म्हटले मुला रडू नकोस, मी तुझा मित्र आहे, बंधू आहे तर त्याला ते काही समजणार नाही. पण त्यालाच जर आपण वर उचलून कडेवर घेतले, त्याच्या अंगावरून हात फिरविला तर त्याला समजून येते की आपण त्याच्यावर प्रेम करणारे आहो. फुलाला भाषा बोलता येत नाही. पण एकादे सुंदर फूल आमच्या हृदयाला आकृष्ट करून बोलते. लहान-लहान पक्षी कित्येक वेळा आपल्या भाषेच्यायोगे आपले सुख किंवा दु:ख आपणास व्यक्त करतात. एकदा रात्री माझ्या घरामधील एका पक्षाने भयसूचक शब्द काढला व तो तसा असावा हे आम्हास समजले. बाहेर जाऊन पहातो तो खरोखरच एक श्वापद तेथे आले होते व त्यायोगे त्या पक्षाला भीती वाटत होती. ह्याचप्रमाणे मनुष्याच्या अंत:करणाचीही एक भाषा आहे. एकाद्याचे कोणी जवळचे मृतप्राय झाले असता त्याजपाशी जाऊन न बोलूनदेखील आपल्या डोळ्यांतून अश्रू आले असता त्या मनुष्याच्या लक्षात येते की, त्याजविषयी सहानुभूती बाळगणारे आपण आहो. मातेचे आपल्या बालकावरचे प्रेम भाषेने सांगता यावयाचे नाही. अशाप्रकारे जे प्रेम त्याचा संदेश म्हणजे काय? एकादा चपराशी एका मनुष्याची चिठ्ठी दुस-यास नेऊन देतो. त्या चिठ्ठीच्या योगाने पहिल्या मनुष्याचा निरोप दुस-यास समजतो. त्याचप्रमाणे आपला संबंधी मनुष्य कितीही दूर अंतरावर असला तरी तारेयोगे त्याची हकीकत आपणास कळते. असेही मानसिक यंत्र आहे की त्यायोगे एका मनाची भावना दुस-या जागी दुस-या मनाला समजते. बिगर तारेनेही एक मजकूर दुस-या जागी जाऊ शकतो. ह्याचप्रमाणे ह्या संसारामध्ये आत्मा व परमात्मा ह्यांच्यामध्ये परस्पर प्रेमाच्याद्वारे नित्यश: संवाद होत असतो. हा जो संवाद तो प्रेमसंदेश होय. एकाद्या बिलोरी काचेच्या तुकड्यातून सूर्याकडे किंवा इंद्रधनुष्याकडे पाहिले तर सात प्रकारचे रंग दिसतात, नुसत्या काचेचा रंग शुभ्र आहे. त्याचप्रमाणे नुसत्या प्रेमाकडे पाहिले तर ते एक आहे. पण संसारामध्ये तेच प्रेम पाहिले तर त्याचे सात रंग करता येतील. मातेच्या अंत:करणामध्ये आपल्या मुलाविषयी एक प्रकारचे प्रेम असते. त्यायोगे ती अनेक प्रकारचे कष्ट सोसून रात्रंदिवस अनेक खस्ता खाऊन त्याचे पालनपोषण करते. ते आजारी पडले असता स्वत:च्या जिवाकडे न पाहता त्याची शुश्रूषा करते, त्याला यत्किंचितही दु:ख आले असता तिचे हृदय उद्विग्न होते. त्याचे लालनपालन करण्यामध्ये तिचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो.


तिच्या मनाचा स्वाभाविक भाव जे प्रेम त्या प्रेमामुळेच ती असे करीत असते.

हे जे मातेचे किंवा पित्याचे आपल्या बालकाविषयी प्रेम त्यास आपण वत्सलता म्हणू. लहान बालक मोठे होऊन जवान पुरूष झाल्यावर त्याचे लग्न होते. तो व त्याची स्त्री ह्यांचा परस्पर संबंध प्रेमाचा होतो. पती पत्नीकरिता व पत्नी पतीकरिता अतिशय कष्ट सोसतात. मातेच्या किंवा पित्याच्या प्रेमापेक्षा हे प्रेम निराळ्या प्रकारचे होय. त्याला आपण प्रणय म्हणू. तिस-या प्रकारचे प्रेम म्हमजे सख्यभाव होय.  एक मुलगा आपल्यावर किंवा शाळेतील सोबत्यावर प्रेम करतो. त्याला दु:ख झाले तर ह्याला दु:ख होते. त्याला सुख झाले तर ह्याला सुख होते. हा जो भाव तो सख्यभाव. चौथा प्रकार अनुकंपा. आपण रस्त्यातून जात असता एक गरीब मनुष्य कण्हत पडला आहे, त्याला उठवून घरी आणून अन्नवस्त्र दिले तर ही अनुकंपा होय. ह्या ठिकाणी पितापुत्राचा, मातापुत्राचा, स्वामीस्त्रीचा किंवा मित्रामित्राचा संबंध येत नाही. पाचवा प्रकार स्वदेश अनुराग. मनुष्य कोठेही गेला तरी त्याला स्वदेशाचा अभिमान असतोच. दुष्काळामध्ये आम्ही पुष्कळ मुले परदेशातून आणली पण दुष्काळ संपल्याबरोबर जो तो आपआपल्या देशाकडे बोट दाखवू लागला. अन्नवस्त्र देऊन येथेच रहा असे त्यांना आम्ही सांगत असताही ते ऐकेनात. हा जो स्वदेश अनुराग तो प्रेमाचा पाचवा प्रकार होय. प्रेमाचा सहावा प्रकार मैत्री. टिटॅनिक नावाचे मोठे जहाज बुडाले. १,५०० माणसे बुडाली. त्यामध्ये पुष्कळ ज्ञानी, श्रीमंत, गरीबही लोक होते. गरीबाकरिता इकडच्या लोकांनी फंड उभा करून पैसे पाठविले. आमच्या इकडेही जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा तिकडच्या लोकांनी एक वेळचा चहा बंद करून आमच्याकडे पैसे पाठविले. ही जी प्रेमाची भावना ती मैत्री होय. प्रेमाचा सातवा प्रकार भक्ती. आत्म्याचे परमात्म्यावरील जे प्रेम ती भक्ती. ह्या प्रेमाची खूण कोणती? एकाद्या कमळाचे फूल पाण्यामध्ये जन्म पावते. जलाचे अनेक तरंग इतक्या जोराने येतात की त्या कमळाचा देठ तुटून जाईल असे वाटते. पण ते कमळ आपले स्थान सोडीत नाही, त्याला च चिकटून राहते. त्याचप्रमाणे भगवद्भक्त जो आहे त्याच्यावर कितीही आपत्ती आल्या तरी तो ईश्वरास सोडीत नाही. उलट जास्त जास्तच ईश्वराला आपल्या हृदयामध्ये साठवितो. पाण्यात राहणारा मासा, ते पाणी पुष्कळ जरी वाढले तरी भीत नाही, उलट त्याला आनंदच होतो. त्याप्रमाणे भगवद्भक्तांची भक्ती सुखदु:खामध्ये वाढतच असते. चातक पक्षी दुसरे पुष्कळ पाणी मिळत असताही ते न पिता पावसाच्या पाण्याची अपेक्षा करीत आतुर झालेला असतो, त्याप्रमाणे भगवद्भक्ताचा प्राण परमेश्वराच्या भेटीविषयी व्याकूळ झालेला असतो. दूध विस्तवावर ठेवले असता पाणी ज्याप्रमाणे म्हणते की, प्रथम मी मरेन. त्याप्रमाणेच आपणही स्वार्थत्याग करून ईश्वरावर प्रेम करावयास पाहिजे. टिटवी रात्रभर ओरडत असते व सूर्योदय झाला म्हणजे तिला आनंद होतो, इतके तिचे सूर्यावर प्रेम असते. त्याप्रमाणे आपलेही ईश्वरावर असावे. पुष्कळ साधुसंत होऊन गेले आहेत, त्यांनी ईश्वरावर कोणत्या प्रकारे प्रेम केले आहे हे जाणून घून आपणही त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा.