पुरस्कार

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या लेखांचा “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न” हा पहिला लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. महर्षी अण्णासाहेब शिंदे ह्यांनी १९०३ ते १९३८ ह्या काळात अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत जे संशोधनपर लेख लिहिले ते सर्व प्रथमच एकत्रित स्वरूपात ह्या ग्रंथामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्यामध्ये त्यांचे प्रकाशित साहित्य जसे समाविष्ट केलेले आहे तसेच काही दुर्मिळ, अप्रकाशित लेखही संपादित केलेले प्रथमच पहावयास मिळतील. महर्षी शिंदे ह्यांनी आयुष्यभर अस्पृश्यतेच्या प्रश्नांचे संशोधन व चिंतन केलेले आहे. म्हणूनच “अस्पृश्यतेचा छडा लावण्यात – निवारणाचा भाग तर राहू द्या – मला स्वत:ला जो जन्मभर अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षात घेता मला आणखी जन्म मिळाले तरी ते ह्याच शोधनात आणि सेवाशुश्रुषेत खर्चीन,” (शिंदे लेखसंग्रह: पृष्ठ १२१ : संपा. डॉ. मा. प. मंगुडकर) असे उद्गार त्यांनी काढले आहेत.

 “धर्म, जीवन व तत्त्वज्ञान” हा महर्षी शिंदे ह्यांच्या लेखांचा दुसरा खंड आज प्रसिद्ध होतो आहे. धर्म, जीवन व तत्त्वज्ञान ह्यासंबंधी महर्षींनी आयुष्यभर जे मनन आणि चिंतन केले; जे अनुभविले आणि आचरिले ते बहुतांशी सर्व या ग्रंथात समाविष्ट केलेले आहे. धर्म ही त्यांच्या जीवनातील मूलभूत प्रेरणा होती. ह्या प्रेरणेचा एक आविष्कार म्हणजे महर्षी शिंदे ह्यांचे जीवनकार्य होय. अर्थात त्यांची धर्मासंबंधी कल्पना परंपरागत कल्पनेपेक्षा पुष्कळशी वेगळी आहे. त्यांचा समाजिक आशय व्यापक आहे. त्यांची विचाराची झेप शुद्ध मानवतेची आहे. ह्या ग्रंथात धर्म, जीवन व तत्त्वज्ञान ह्यासंबंधीचे लेख एकत्रित केल्यामुळे त्यांची जीवनविषयक कल्पना येण्यास मदत होईल. महर्षी शिंदे ह्यांचे हे चिंतन आजच्या परिस्थितीच्या संदर्भात देखील महत्त्वाचे ठरेल ह्यात तिळमात्र शंकाच नाही.

महर्षी शिंदे ह्यांनी धर्म म्हणजे काय ह्यासंबंधी केलेली चर्चा किती मार्मिक आहे हे पुढील अवतरणावरून दिसून येईल. “धर्म म्हणजे सबलांनी दुर्बलांना, वरिष्ठांनी कनिष्ठांना सत्तेमध्ये, ज्ञानामध्ये सहभागी करून घेणे होय. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला बलशाली करणारा हाच खरा धर्म होय. उत्तरोत्तर विकास पावणा-या मानवी शक्तीच्या साहाय्याने व बदलणा-या परिस्थितीस अनुसरून श्रेष्ठांने कनिष्ठास, जाणत्याने नेणत्यास, पवित्राने पतितास ह्या देणगीचा फायदा दिला नाही व स्वत: आपल्यामध्ये ती वाढविली नाही तर धर्माची मूळ ज्योत विझली आहे असे समजावे.”

आजचे अस्पृश्य व मराठा समाज ह्यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे; इतकेच नव्हे तर मराठे व महार हे मूळचे एकाच वंशातले होत, असे त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ ह्या आपल्या लेखामध्ये म्हटले आहे. आपला हा विचार मांडताना महर्षी अण्णासाहेब शिंदे म्हणतात, “महाराष्ट्रातील महारांची भाषा पाहिली असता त्यांचे उच्चार, त्यांचे स्वर व एकंदर त्यांची बोलण्याची ढब मराठी कुणब्यासारखीच आहे असे दिसून येते. त्यांच्या देव्हा-यावर खंडोबा, बहिरोबा, भवानीआई वगैरे मराठ्यांच्याच देवतांच्या मूर्ती दिसतात.

नासिक, त्र्यंबक, पैठण, पंढरपूर, तुळजापूर इत्यादी क्षेत्रांच्या ठिकाणी इतरांबरोबर त्यांचीही गर्दी जमते आणि वारकरी, कथेकरी, भाविणी, वाघे वगैरे धर्म संप्रदाय मराठ्यांप्रमाणे त्यांच्यातही पूर्वापार चालू आहेत. महाराष्ट्रातील महारांमध्ये मराठ्यांच्या अस्सल शहाण्णव कुळांपैकी ब-याच कुळांची नावे आढळून येतात ती – जाधव, साळुंखे (चालुक्य), पवार, मोर (मौर्य) गाईकवाड, शेलार, साळवी, सुरवशे (सूर्यवंशी), इत्यादी होत.” [ह्या शिवाय चव्हाण, जगताप, आंबवले, आंभोरे, वानखेडे ही नावेही मराठा-महारात समान आहेत.] वरील सर्व पुराव्यावरून महर्षी शिंदे असे सूचित करितात की, आजचे महार हे मूळचे मराठेच असले पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनीही अशाच त-हेचे विचार ‘गुलामगिरी’ या ग्रंथात व्यक्त केलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनानंतर “दि अनटचॅबल्स” या ग्रंथात “आजचे अस्पृश्य हे एके काळचे क्षत्रिय होते असा सिद्धांत मांडिला आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत ह्या तिन्हीही विद्वानांच्या विचारात किती साम्य आहे ! संशोधकांनी ह्याचा विचार करावा इतका मह्त्त्वाचा प्रश्न वरील विचारवंतांनी निर्माण केलेले आहे.

महर्षी शिंदे ह्यांना बौद्ध धर्माचे आकर्षण १९१० सालापासूनच होते असे त्यांच्या ग्रंथावरून दिसून येते. १९१० साली पुणे येथे जॉन स्मॉल हॉलमध्ये महर्षी अण्णासाहेबांचे बोद्ध धर्मावर व्याख्यान झाले. त्यात बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार झाला पाहिजे असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. ह्या प्रश्नाचा तपशील देताना महर्षी म्हणाले, “एकंदरीत आता जो बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार व्हावा अशी आमची इच्छा आहे, तो हल्ली इतरत्र प्रचलित असलेल्या त्या धर्माच्या विधि-वैकल्याचा, टिळाटोपीचा किंवा निर्जीव आचारांचा नव्हे, तर ज्या उदार तत्त्वांच्या योगे मागील काळी मनुष्य जातीची उन्न्ती झाली, त्यांचा आमच्यामध्ये पुन: उद्धार होऊन आमच्या धर्मसमजुतीस सर्वदेशीयता व आचरणाला अधिक उज्ज्वलता येवो इतकीच इच्छा आहे.” [धर्म, जीवन तत्त्वज्ञान पृ. १९८]

१९२७ साली महर्षी अण्णासाहेब ब्रह्मदेशात गेले होते. ब्रह्मदेश हा बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र. म्हणूनच मुख्यत: ते ब्रह्मदेशाला गेले असले पाहिजेत. ब्रह्मदेशाच्या यात्रेविषयी लिहिताना ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, बौद्ध धर्माचे जीवन पहाण्यासाठी विशेषत: एकांत विहारात राहून त्या धर्माचे रहस्य अनुभविण्याचा विचार मनात येऊन मी यात्रा करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रस्थान ठोकले. एका बुद्ध विहारात उ कोडण्णा ह्या ब्रह्मी भिक्षूची भेट झाली. त्यांच्या भेटीने शांती व गंभीरपणा ह्यांचा परिणाम माझ्या मनावर फार झाला. ह्या विहाराचे वातावरणही आध्यात्मिक भावनांनी भरलेले होते. इतके की, आपणही बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी असे मला वाटू लागले इ. इ. (माझ्या आठवणी व अनुभव पृ. ३७०-७२).

असेच एकदा कलकत्ता येथील ब्राह्मसमाजाच्या उत्सवात “मी बौद्ध आहे” असे त्यांनी जाहीर करून टाकिले. वैशाखी पौर्णिमा म्हणजे भगवान बुद्धाचा महा परिनिर्वाण दिन. तो दिवस महर्षि शिंदे भक्तिभावाने साजरा करीत. त्यांनी वाई (जिल्हा सातारा) येथे १९३५ साली ब्राह्मोसमाजाची स्थापना केली. ती देखील वैशाखी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त साधूनच. पुढे येथील ब्राह्मसमाजाचा वार्षिकोत्सव दरसाल वैशाखी पौर्णिमेलाच साजरा होऊ लागला.

१९३० साली महर्षींनी गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. त्या प्रीत्यर्थ त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. तुरूंगात जाताना त्यांनी ‘धम्मपद’ हा पवित्र बौद्ध धर्मग्रंथ आपल्या बरोबर नेला होता. इतक्या जुन्या काळी अशा प्रकारे व्यक्तिगत पातळीवर बौद्ध धर्माचा मनाने स्वीकार करणारे व बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार झाला पाहिजे असे स्पष्टपणे जाहीर उद्गार काढणारे भारतातील ते एकमेव विचारवंत असावेत.

१९२६ साली पुणे येथे अस्पृश्यांची शेतकी परिषद भरली होती. तिचे अध्यक्षस्थान महर्षीनीच विभूषित केले होते. त्यांचे अध्यक्षीय भाषण अतिशय विचारप्रवर्तक व बोलके आहे. महर्षी शिंदे म्हणाले, “आजचा अस्पृश्य शेतमजूर हा एके काळी येथील जमिनीचा मालक होता. महाराष्ट्राची मूळ वसाहत करणारा महाराष्ट्राचा तो मूळचा शेतकरी होता. परंतु पुढे त्याला त्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करावे लागले. आता तो पुन: शेतमालक झाला पाहिजे” ह्या प्रश्नाविषयी मीमांसा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “मराठे आणि महार हे दूरचे चुलतबंधू असल्यासारखे आहेत. त्यात महारांना थोरल्या घरचे हे नाव आहे. पण तेवढ्यावरून इतर अस्पृश्यांचे मूळ कमी दर्जाचे असेल असे मुळीच माझे म्हणणे नाही. अस्पृश्य हेच महाराष्ट्र ऊर्फ दंडकारण्याचे मूळ मालक. मराठे हे केवळ उपरे. मूळ मालक तो आज केवळ पहिल्या नंबरचा बलुतेदार झाला आहे. जमिनीच्या शिवेचा तटा लागल्यास महारांचा निकाल पूर्वी शेवटला समजत असत. कोकणात अद्यापि गावकरी महारांना पागोटे बांधून त्यांच्या मूळ हक्काची दरसाल आठवण करून देत असतात. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्यात दुर्भेद्य एकी करून जमिनीवरील आपली गेलेली सत्ता पुन: मिळविली पाहिजे. सरकारजवळ अजूनही पडीक जमीन पुष्कळ पडलेली आहे. लहान लहान प्रमाणावर ह्या जमिनीचे तुकडे नांगराखाली आणून तुम्ही स्वतंत्र रयत झाल्यास तुमचा, सरकारचा व सर्व देशाचाही फायदाच होणार आहे.

महर्षी शिंदे ह्यांनी वर केलेले विवेचन आजही महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व देशाला उद्बोधक व मार्गदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशात आज स्पृश्य-अस्पृश्य अगर वेगवेगळ्या जाती-जमातींमध्ये जे संघर्ष अधून मधून निर्माण होत आहेत त्यावर महर्षींचे वरील विचार झणझणीत अंजन ठरणारे आहेत.

सातारा येथील प्रांतिक सामाजिक परिषदेत अध्यक्षीय भाषण करितानाही महर्षींनी कुळाभिमान बाळगणा-या समाजातील विशिष्ट वर्गास अंतिम इषारा दिला आहे. महर्षी म्हणतात, “आमचा जन्म अमूक कुळात झाला आहे म्हणून आम्हाला अमूक हक्क मिळायला पाहिजेत असे म्हणण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. प्रत्येक समाजसुधारकाचे हे अवश्य कर्तव्य आहे की, ज्याच्यामुळे जाती-जातींत वैमनस्य होण्याचा संभव आहे, अशा सर्व जन्मजात हक्कांना मूठमाती मिळेल; निदान त्या हक्काचे स्वरूप पुष्कळच बदलेल असे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.” महर्षी शिंदे ह्यांचे वरील विचार आजही अनेकांना अंतर्मुख करतील यात मला शंकाच वाटत नाही.

महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन घडविणा-या थोर विचारवंतांचे, समाजसुधारकांचे किंवा संत महात्म्यांचे साहित्य प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील वैचारिक क्रांतीला हातभार लागावा हाच ह्या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या परंपरेला साजेल असेच हे कार्य आहे. महर्षी विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या साहित्याचा दुसरा खंड महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रसिद्ध होत आहे त्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. संपादक मंडळाने या कामी घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो.

-आपला,
(अर्जुनराव कस्तुरे)
समाज कल्याण व आदीवासी कल्याण मंत्री