जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा सुवर्णमहोत्सव

जमखंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव होत आहे हे ऐकून मला फार संतोष वाटला. ह्यासंबंधी मजकडून दोन शब्द प्रसिद्ध व्हावेत म्हणून चिटणीसांचा आग्रह आहे.

हे हायस्कूल सुरू होण्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांपैकी मी एक अत्यंत जुना विद्यार्थी आहे. जमखंडी येथील प्राथमिक मराठी शाळेचे माझे शिक्षण सुरू झाल्यावेळी, शिक्षणखात्याची व्यवस्था नुकतीच झाली होती. स्वतः माझे शिक्षण पूर्वीच्या गावठी शाळेत सुरू झाले. धूळपाटीवर ‘श्रीगणेशा’ लिहिण्याची मला चांगली आठवण आहे. अशा स्थितीत तेव्हाचे कै. श्रीमंत रामचंद्रराव अप्पासाहेब ह्यांनी उदार मनाने इंग्रजी शाळेची सोय आपल्या संस्थानात अगदी मोफत केल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सल्लागारांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. मराठी चार इयत्ता संपवून इंग्रजी शाळेत इ.स. १८८५ साली मी गेलो, तेव्हा ती शाळा अँग्लो-व्हर्नाक्युलर दर्जाची होती. सन १८९१ साली मॅट्रिकला पाठवून दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी पास झालेल्या ४ विद्यार्थ्यांमध्ये माझे नाव पहिले होते. मला मिळालेला हा इंग्रजी ज्ञानाचा लाभ, हे हायस्कूल नसते तर, मिळाला नसता. त्या वेळचे हेडमास्तर कै. श्री. त्रिंबकराव खांडेकर हे जुन्या चालीचे, गरीब, सुशील, पापभीरू आणि नमुनेदार गृहस्थ होते. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाविरुद्ध दुराग्रहाला थारा मिळत नसे. माझ्या वेळी मराठी शिक्षणही इतके दुर्मिळ होते की, माझी मराठी तिसरी इयत्ता पास झाली म्हणून, माझ्या आत्याबाईने तमगी वाटेवर असलेल्या छोटूसिंगाच्या थडग्याला नवस करून पेढे वाटले. माझ्या शिक्षणाचे काही अंशी श्रेय ह्या छोटूसिंगाला जावे असा तो काल होता. माझ्या इंग्रजी शाळेत माझ्याप्रमाणे गरीब स्थितीतील, माझ्या वर्गातील लिंगायत, मुसलमान, न्हावी, धोबी वगैरे इतर जातीय मुले होती. त्यांना कोणताही पक्षपात न करता ब्राह्मण शिक्षक शिकवीत होते ह्याचे श्रेय कै. श्रीमंत अप्पासाहेबांनाच होय. (फुट नोट – परशुरामभाऊ हायस्कूल सुवर्णमहोत्सव स्मारक ग्रंथ, संपादक प्रो. रा. द. रानडे, (जमखंडी, १९३८, पृ.१-२).)

माझा प्रत्येक वर्गात नेहमी पहिला नंबर राहिल्यामुळे, म मी मॅट्रिक परीक्षेतही ह्या हायस्कूलमध्ये पहिला नंबर पटकावल्यामुळे कै. खांडेकर (हेडमास्तर) ह्यांनी माझा अभिमान बाळगून, शाळेत बोलावून नेऊन मला शिक्षकाची नोकरी दिली. ही गोष्टही स्मरणात ठेवण्यासारखी आहे. पुढे उच्च शिक्षण घेण्याकरिता मला जमखंडी सोडावी लागली. तेव्हापासून आजपर्यंत जमखंडीशी माझा अजीबात संबंध तुटला. त्यामुळे ह्या हायस्कूलचा पुढे जो विकास झाला त्याविषयी मला काही लिहिता येत नाही. मधूनमधून केव्हा तरी मी जमखंडीला जात असे. त्या वेळेस मागासलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा फैलाव कसा झाला ह्याविषयी चौकशी करीत असे, तेव्हा सुधारलेल्या परिस्थितीच्या मानाने, जमखंडी संस्थानातील शिक्षणाच्या सोयीच्या दृष्टीने, विशेष फैलाव झालेला मला दिसला नाही.

तथापि जमखंडी येथील विद्यार्थ्यांची उच्च वर्गामध्ये अलीकडे बरीच सोय लागत आहे आणि ते निरनिराळ्या विषयांमध्ये प्राविण्य संपादून विश्वविद्यालयातच नव्हे तर लोककार्यातही पुढे येत आहेत ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे. संस्थानचे सुधारलेले धोरण आणि श्रीमंतांची कीर्ती वाढवायला, संस्थानातील उच्च शिक्षणाची तयारी आणि व्यवस्था हीच कारणीभूत आहेत. सर्व वर्गांमध्ये विशेषतः पददलित अस्पृश्य वर्गांमध्येही आणि अबलावर्गात ज्ञानाची वाढ होऊन हे संस्थान नामांकित होवो अशी माझी नेहमी ईश्वराजवळ प्रार्थना राहील.

जमखंडी संस्थान हे मुख्यतः कर्नाटक भागात असून खुद्द राजधानीतही सर्वांना कानडी येते. अलीकडे कानडी भाषेला अधिक प्राधान्य देण्याची सुवार्ता ऐकून मला फार आनंद झाला. मागासलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा फैलाव व्हावा तितका झाला नाही असे मी जे वर म्हटले, त्याचे कारणही मातृभाषेत बहुजन समाजाला शिक्षण मिळत नाही हे असू शकेल. खेड्यातील मराठ्यांना आणि मुसलमानांनासुद्धा मराठी आणि मुसलमानी भाषा येत नसेल; कारण त्यांची मातृभाषा कानडी हीच असते. हे जाणून श्रीमंतानी आपले जे धोरण उदार दृष्टीने बदलले आहे, त्यास सर्व अधिका-यांनी मनःपूर्वक पाठिंबा द्यावा, इतकेच नव्हे तर, त्याचा फायदा बहुजनसमाजाने, हरिजनानीं आणि स्त्रीवर्गाने उत्साहाने घ्यावा, त्यात ह्या संस्थानचाच नव्हे तर अखिल कर्नाटकाचा भाग्योदय आहे. श्रीमंतांचे मनःपूर्वक आभार मानून आणि त्यांना आयुरारोग्य चिंतून मी हा लहानसा लेख पुरा करतो.