ता. १/१२/१९१९ साली टिळक विलायतेहून परत पुण्यास आले, तेव्हापासून ते थेट त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या काळात त्यांना ठिकठिकाणी ब्राह्मणेतरांच्या व प्रागतिकांच्या प्रखर विरोधास तोंड द्यावे लागले. त्यांना पुणे येथील नागरिकांतर्फे मानपत्र देण्याचे जाहीर झाले होते. त्यास विरोध करणारे असे पत्रक "पुण्याच्या नागरिकांस जाहीर विनंती" ह्या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आले होते. ह्या पत्रकावर प्रमुख अशा १२५ वर नागरिकांच्या सह्या होत्या. त्यात "विजयी मराठा"कार श्रीपतराव शिंदे "जागरूक"कार वा. रा. कोठारी, केशवराव बागडे, दिनकरराव जवळकर, केशवराव ढेरे, हरिश्चंद्र नारायणराव नवलकर, मोतीचंद व्होरा, लक्ष्मण सावळाराम काटे, प्रागतिक पक्षाचे रँग्लर र. पु. परांजपे, अस्पृश्य पुढारी शिवराम जानबा कांबळे, सीताराम बाबाजी लांडगे ह्यांच्या प्रमुख सह्या होत्या. कर्मवीर शिंदे ह्यांनी आपली सही करताना हस्तपत्रिकेत पुढीलप्रमाणे मतप्रदर्शन केले होते. "सामाजिक बाबतीत रा. टिळकांचे धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास विघातक असल्याकारणाने त्यांना पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे मानपत्र देणे योग्य नाही. ह्या वैगुण्यामुळे ते माझ्या मते खरे राष्ट्रीय पुढारी नाहीत."
"महात्मा फुले हे असामान्य पुरुष होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात ब्रह्मो समाजापेक्षाही अधिक कार्य केले आहे. ह्या समाजाचे ध्येय उच्च आहे. जोतिरावांनी लिहिलेले 'सत्यधर्म' पुस्तक हे सत्यशोधकांचे बायबल आहे. हे पुस्तक ब्रह्मो समाजाच्या प्रार्थनेच्या वेळी आम्ही घेतो. मी छातीला हात लावून सांगतो की, जोतीरावांचे चरित्रांत महाराष्ट्राचा महत्त्वाचा इतिहास ग्रथित झालेला आहे. दांभिक देशभक्तांपेक्षा त्यांची देशभक्ती फारच वरच्या दर्ज्याची आहे." (फुट नोट – विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, लेखक मा. श्री. शिंदे, पृष्ठे ३१ व ३२. श्री. पं. सी. पाटीलकृत म. फुले चरित्र, पान २०६.)