इतिहास संशोधन व भाषाशास्त्र

वाङ्मय व इतिहास ह्यांची जोड जुळणे कठीण आहे. कारण, वाङ्मयाला ज्या गोष्टींची जरूर आहे, त्या गोष्टीं इतिहास बिघडविण्यास कारण होतात. वाङ्मयाला भावनांची जरुरी असते. परंतु इतिहासकार जर भावनाप्रधान असेल, तर त्याची इतिहासकाराची भूमिका सुटून, त्याचे लिखाण लगेच कादंबरी बनते. तसेच भावना नसली, तर वाङ्मय-निर्मिती थांबेल. मला मात्र वाङ्मयाऐवजी इतिहासच जास्त आवडतो.

हल्ली साहित्यामध्ये क्रांती होऊ लागली असून, ती लोकांच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. हल्ली वाङ्मयाची प्रदीर्घता नाहीशी होत चालली असून त्याला लघुत्व प्राप्त होऊ लागले आहे. कै. हरिभाऊ आपट्यांप्रमाणे मोठमोठ्या कादंब-यांचे दिवस केव्हाच संपले असून त्यांची जागा सुटसुटीत गोजिरवाण्या लघुकथांनी व्यापिली आहे. कविताही लहानलहान होत आहेत. आज वीणाकाव्ये लिहिण्याचा प्रघात फार वाढला आहे. पूर्वीच्या १२/१२ तास सबंध रात्रभर चालू राहणा-या नाटकांच्या जागी आता लहानलहान २ तासांत आटोपणारी नाटके आली आहेत. वर्तमानपत्रांची वाढ चांगली झाली आहे परंतु सर्व वर्तमानपत्रे ब्राह्मणांनीच चालविली आहेत. मराठ्यांनी चालविलेली वर्तमानपत्रे नाहीत, ही काही समाधानकारक गोष्ट नाही. स्त्रियांची मासिके असली तरी ती फार थोडी आहेत. सर्व जातींनी चालविलेली वर्तमानपत्रे असल्याशिवाय वाङ्मय प्रातिनिधिक होऊ शकत नाही. ह्या प्रांतात एकही मराठी दैनिक नाही, ही काही चांगली गोष्ट नाही. परंतु, लवकर येथे दैनिक सुरू होईल, अशी मला आशा आहे.

इतिहास संशोधक कसा असावा ?

इतिहास हे एक शास्त्र आहे. इतिहास लेखनाला निःपक्षपातीपणा व निर्विकारता हे गुण अवश्य लागतात. हे गुण जर इतिहासकाराच्या अंगी नसतील (फुट नोट – १८ वे महाराष्ट्र साहित्यसंमेलन-प्रदर्शन-अध्यक्षीय भाषण, महाराष्ट्र-रविवार ता. ३१ डिसेंबर १९३३. नागपूर) तर नदीच्या उगमाशी एकादा घाणेरडा पदार्थ पडला की नदीचे सर्व पाणी बिघडते, तशीच स्थिती तर इतिहासाची होते. आपणाकडे ऐतिहासिक दृष्टी कमी आहे, असा आरोप केला जातो व त्यात बरेच तथ्यही आहे. ग्रीक रोमन लोकांमध्ये ती दृष्टी होती, म्हणूनच त्यांचे इतिहास आज जिवंत आहेत. परंतु, आपल्या प्राचीन इतिहासाचा मात्र पत्ता लागत नाही. आपला प्राचीन इतिहास जागतिक संस्कृतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. परंतु त्याचे संशोधन अद्याप झालेले नाही. अजून हा इतिहास तयार व्हावयाचा आहे. इतिहासाची प्रत्यक्ष साधने—पुरावा संपतो, त्यावेळी भाषाशास्त्राची मदत घ्यावी लागते, व आपला प्राचीन इतिहास लिहिण्यासाठी भाषाशास्त्राची मदत घेणे फार अवश्य आहे.

मराठी ही संस्कृत भाषेपासून उत्पन्न झाली, तिचा वेदाशी संबंध असावा, असे सांगण्यात येते. परंतु, हे म्हणणे चूक आहे. मराठी ही फार जुनी भाषा आहे. ज्ञानेश्वरीच्या वेळची मराठी ही एकाद्या नव्या भाषेसारखी दिसत नाही. त्यावेळी तिच्यामध्ये शब्दसंपत्ती भरपूर असलेली व तिची पूर्ण वाढ झालेली दिसते. त्याअर्थी तिचा उगम फारच जुना असला पाहिजे, असे स्पष्ट दिसते. मराठी ही कानडी व संस्कृत ह्यांच्या सरहद्दीवरची भाषा आहे. संस्कृत व कानडी ह्या सारख्याच जुन्या भाषा आहेत. परंतु, संस्कृतला राजाश्रय मिळाला व तिची भरभराट होऊन, तिने कानडीवर आक्रमण केले व ती भाषा मागे पडली.

विद्यापीठांची निष्क्रियता
हल्ली इतिहास संशोधन चालू आहे. परंतु, अद्याप प्राचीन इतिहासाकडे कोणाचेच लक्ष गेलेले नाही. पुण्याचे भारत इतिहास-संशोधक मंडळाचे संशोधन कितीही महत्त्वाचे असले, तरी ते मराठशाही व पेशवाई ह्यांच्या भोवतीच घोटाळत आहे. यवतमाळच्या शारदाश्रमाचे संशोधन त्यापेक्षा जास्त जुने आहे. परंतु ह्या दोन्ही मंडळांनी आपली हल्लीची चाकोरी सोडून देणे अवश्य नाही काय ? मुंबई व नागपूर विद्यापीठांनीही प्राचीन संशोधनाला मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांचे ते कर्तव्य आहे. परंतु, आजपर्यंत ह्या बाबतीत विद्यापीठांनी फारसे काही केलेले नाही. ती प्राचीन इतिहासाकडे अधिक लक्ष देतील अशी मी आशा करतो.